Login

आर. ए.सी.तिकीट (भाग १)

Traveling Experience Of A Lady
आर. ए. सी. तिकीट
( भाग - १)

कोर्टाची डेट कळाली आणि तिने मुलाला रेल्वेचे रिझर्वेशन करायला सांगितलं

“ आई पंधरा दिवसात कसं मिळेल कन्फर्म तिकीट? ती गाडी नेहमी फुल असते.”
“ बघ बेटा , प्रयत्न कर .”

संध्याकाळी निरोप आला की” आई तिकीट काढून ठेवले आहे. इथून परत जाण्याचे आरक्षण कन्फर्म आहे पण तू इकडे येतानाचे तिकीट मात्र वेटींग मिळालं आहे .पाहूयात अजून दहा - बारा दिवस आहेत ना ! होइल कनफर्म” तिचा मुलगा सांगत होता.

प्रवासाच्या आदल्या दिवशी मुलाचा निरोप आला .

“आई , तुझं तिकीट कन्फर्म झालं नाही पण आर ए सी ‘ स्टेटस मध्ये आहे.”
प्रवासाच्या दिवशी सुद्धा चार्ट तयार होईपर्यंत ते तिकीट आर ए सी च राहिले.

साईड लोवर बर्थ नंबर 63.

“आई प्रवासामध्ये अनोळखी प्रवासी असतात, एकटीच येणार आहेस तर जमेल ना ?” मुलाची काळजी.

“अरे काही हरकत नाही, आता सवय झाली आहे. येईन मी.”

तिने काही काळजी नाही केली आणि जाण्यासाठी मनाने तयार झाली.
यापूर्वी देखील असे बरेचदा नवऱ्यासोबत किंवा मुलासोबत प्रवास केला होता आर ए सी मधे.

कधी कधी वेळेवर तिकीट काढलं की ते कन्फर्म व्हायचं नाही आणि आरए सी स्टेटस मध्ये राहून जायचं . त्यावेळी मुलगा लहान असताना ,मुलाला झोपू द्यायचं आणि ती बसून राहायची. कधी नवरा सोबत असेल तर नवरा थोडा वेळ आणि ती थोडा वेळ असं काहीतरी अड्जस्ट करून घ्यायचे. अर्धी झोप व्हायची , पण प्रवास होवून जायचा.

आज स्टेशनवर बी सी एस,फर्स्ट इयरला शिकणारी तिची मुलगी सोडायला आली होती.
मुलगी आत चढली, आईची बॅग सीट खाली ठेवली तिला एक मिठी मारली आणि खाली उतरली.

त्याच सीट वर कोपऱ्यात एक कृषकाय , तुरळक दाढी असलेला , मध्यमवयीन, साधा माणूस बसलेला दिसला.

मुलगी आईच्या कानात म्हणाली ,” काय ग,हा माणूस आहे , जर तो तुझ्यासोबत बसणार असेल तर त्याला दुसरीकडे कुठेतरी सीट बदलायला सांग. मी विचारू का?”

ती म्हणाली,” नाही नको. मी करून घेते ऍडजस्ट ,काही प्रॉब्लेम नाही. “

थोडा वेळ झाला ,गाडी सुटायला लागली, मुलीने हाताला पकडलं , काळजी घे म्हणाली आणि डोळ्यात गच्च भरून पाणी होतं.

मुलगी एकटी घरी थांबणार होती , तिची मैत्रीण तिच्यासोबत घरी रहायला आली होती.

दोन दिवसांसाठी तिला जावं लागत होतं , मुलगा तिकडे स्टेशन वर घ्यायला येणार होता.

थोडा वेळ झाला असेल . साईड लोवर तिकीट नेहमी आर ए सी मध्ये मिळतात . रात्रभर बसून काढावी लागणार होती .

तो माणूस व्यवस्थित मांडी घालून, समोर टेकून बसलेला होता.
तो चष्मा लावून मोबाईल मध्ये पाहत होता.
त्याने सहज स्माईल दिल्यावर तिने इकडे तिकडे पाहिलं. त्याने विचारलं,

“ जो छोडणे आई थी वह बेटी थी क्या?”

(सोडायला आली ती मुलगी होती का)

(संभाषण हिंदीत असले तरीही, वाचकांसाठी संवाद मराठीत घेत आहे.)

“हो, मुलगीच आहे. काळजीपोटी सोडायला आली होती .तुम्ही कुठे पर्यंत जाणार आहात ?”

तिने औपचारिकता म्हणून विचारलं .

“निजामाबाद आणि तुम्ही?”

“ मी हैदराबाद.”

“ म्हणजे सहजच की काही कामाने?”

“ सहज म्हणजे कोर्टाचं काम आहे थोडं. “

“ अच्छा, तिकडे कोण असतं? म्हणजे इतक्या मोठ्या शहरात कुठे उतरणार , नाही का?”

“ माझा मुलगा राहतो तिथे, आता तर नोकरी लागली आहे त्याला .”

इतक्यात मुलाचा फोन येवुन गेला. तो पण सीट बद्दल विचारात होता. तिने फोन ठेवला आणि हसली.

“हे सीट असे मिळाले आहे म्हणून टेन्शन आहे त्याला.”

“काळजी करू नका, माझ्याकडून तुम्हाला काही त्रास होणार नाही. फक्त झोपून जाऊ शकणार नाही एवढंच. जर टी. सी. आला तर मी विचारेन त्याला वेगळ्या सीट साठी. तुम्ही अगदी आरामात बसा.”

“ थँक्यू भैया, तुमच्या सारखे सहप्रवासी असल्यावर जास्त त्रास होत नाही .”

“अहो, मी गरीब शिक्षक आहे, त्यामुळे त्रास काय देणार. तुम्ही निश्चित होऊन बसू शकता. बर एक विचारू का, मी जेवून घेऊ का?”

“ अहो जेवा ना “

“तुम्ही जेवणार का ?”

“नाही मी जेवूनच निघाले.”

“बरोबर आहे म्हणा माझ्यासारख्या अनोळखी माणसाने तुम्हाला एकदम जेवा म्हटल्यावर माझ्यासमोर कसे जेवणार? नाही का ?”

“तसं नाही पण मी जेवण करूनच निघाले.तिकीट आर ए सी स्टेटस आहे, सोबत कोण असेल ?जेवायला पण जागा मिळेल की नाही ?असं वाटलं म्हणून.” तिने उगीचच स्पष्टीकरण दिलं.

“बरं मॅडम एक केळ तर घेऊ शकता, म्हणजे फळांमध्ये काही जोखीम नसते , ते पण तुमच्या शहरातलेच आहेत.”

आता तिला घ्यावच लागलं . पण सोबतच्या माणसाचं ते मर्यादित बोलणं, आदरयुक्त स्वर वगैरे ऐकून तो माणूस परका वाटला नाही.

क्रमशः

©® स्वाती बाळूरकर देशपांडे, सखी
दिनांक - २५.०१.२५

(अष्टपैलू लेखन स्पर्धा, सामाजिक जलद कथा लेखन फेरी)
सदर कथेचे हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत. वाचून प्रतिक्रिया द्यावी.

🎭 Series Post

View all