आर ए सी तिकीट
(भाग - २)
कथा पुढे
आता तिला घ्यावच लागलं . पण सोबतच्या माणसाचं ते मर्यादित बोलणं, आदरयुक्त स्वर वगैरे ऐकून तो माणूस परका वाटला नाही .
तिने तिच्या पर्स मधला चिवडा आणि लाडूचा पॅकेट काढले आणि त्याला विचारलं , त्याने ते पटकन घेतलं .
“वाह वाह, अहो , हे तर माझं फेवरेट आहे शिवाय घरचं खायला मिळालं म्हणजे स्वर्गच ! तुम्हाला काय सांगू गेल्या पंधरा दिवसांपासून भटकतो आहे त्यामुळे बाहेरच खाऊन कंटाळलो आहे .
त्याने अगदी आवडीने तो चिवडा त्याच्या पेपर प्लेटमध्ये घेतला आणि आनंदाने खाल्ला .बेसनाचे लाडू खाऊन तर खूपच स्तुती केली.
आता त्याचं बोलण थोडे सहज झाले होते, जणू जुनी ओळख आहे.
का कुणास ठाऊक एखाद्या माणसाबद्दल का आपुलकी वाटत असते? तिला वाटून गेलं.
“एक बात बताये, हमें ऐसे क्यो लग रहा है कि हम इसके पहले भी कभी मिले हैं, अभी तो यह हमारी पहली मुलाकात नहीं है “
तिला मनात वाटत असलेलं तो बोलला होता, तिने स्वतःला थांबवलं नाही आणि उत्तर दिलं “ ऐसे भी लोग होते हैं जो किसी जनम से जुडे होते हैं, हो सकता है ,कभी मित्र, रिश्तेदार बन जाते हैं!”
“शायद इसलिये हम इस सफर में मिले है. , कुछ लोगों से आप रोज मिलते है परंतु वो आपको पसंद नही होते, और कोई व्यक्ति जिसको आप जानते भी नही और ऐसे लगता है ना की कोई अपना है, आत्मा का संबंध है। मुझे तो ऐसे ही लग रहा है। “
“होता है , आप शिक्षक है तो कौनसे स्कूल में पढाते हैं? “ तिने विचारले.
(संभाषण हिंदीत असले तरीही, वाचकांसाठी संवाद मराठीत घेत आहे. काही ठिकाणी मिश्रित असेल.)
“ सध्या तर कुठे शिकवत नाही पण आहे शिक्षकच! मी मुळात खूप आध्यात्मिक माणूस आहे, देवाने मला जास्त पैसा नाही दिला , पण खूप सुंदर फॅमिली दिली आहे. बरं माझं सोडा ,मला जे जाणवलं ते एक सांगू का? तुमच्या डोळ्यात खूप मोठी व्यथा किंवा दुःख आहे जे तुम्ही दाबून ठेवले आहे, लपवून ठेवले आहे आणि ते तुमच्या स्माईल ला आकर्षक बनवते . बरोबर ना!”
“असं काही नाही…” तिने टाळलं .
“म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का ? असो. तुमचे मिस्टर कुठे असतात ?”
तिच्या डोळ्यातून पटकन अश्रू निखळले.
“सॉरी, मुझे पूछना नही चाहिये था !” ते पटकन म्हणाले .
“ सॉरी नका म्हणू. . . म्हणजे ते आहेत .व्यवस्थित आहेत ,फक्त आमच्या सोबत नाहीत .”
“अच्छा म्हणजे तेच ती कोर्ट केस का ?”
“हो, केस तीच आहे. मुलांसाठी काही तरी हवं ना! मी आता आता नोकरी सुरू केली आहे, एका ऑफिसमध्ये. पण प्रायव्हेट मध्ये पगार इतकी नसते.”
तो ज्या तन्मयतेने ऐकत होता त्यामुळे त्या माणसाच्या डोळ्यात पाहताना का कुणास ठाऊक तिला आपलं दुःख त्याला सांगावसं वाटलं .
तो ऐकत होता.
“ सर, एक मात्र खरं की या जगात अनोळखी माणूस असूनही मी तुम्हाला इतकं सगळं सांगितलं, माझ्या जवळच्या लोकांना देखील कधी सगळं बोलले नव्हते. कदाचित ओळखीचा माणूस नुकसान करू शकतो, अनोळखी काय करेल ? असं वाटून बोलले की काय!“ तिने डोळ्यात आलेले अश्रू पुसून घेतले.
“काय बोलता मॅडम , इकडे आपलं म्हणता तिकडे परका करता. मी पण सांगेन की .“ त्याच्या डोळ्यात किती आपुलकीची ओल होती.
“ एक सांगूज का. . . आपण. . म्हणजे नाव?”
“तारा!”
“तर ताराजी, मी सर्वांच्याच भावनांचा खूप आदर करतो. मुळात मी खोटं बोलू शकत नाही, वागू शकत नाही आणि त्यामुळेच कदाचित समाजाच्या दृष्टीने मी श्रीमंत नाही पण माझे विद्यार्थी , त्यांचे पालक आणि त्यांचे प्रेम पाहिलं की वाटतं मी खूप धनवान आहे .”
“असं च असायला हवं. शिक्षक आहात म्हणजे कोणता विषय शिकवत ?”
“शिक्षक आहे तर फक्त एक विषय शिकवेन असं कसं? संस्कृत आणि संस्कृती हे आवडीचे विषय! मी भारतीय असल्याचा मला प्रचंड अभिमान आहे . माझं माझ्या देशावर खूप प्रेम आहे. तुम्हाला वाटेल की मी हे काय प्रतिज्ञा वगैरे म्हणून दाखवतोय प्रत्येक शब्द न शब्द मी जगतो बरं का!”
“अरे वा! तुमच्या मुलांना तर तुमच्याकडून कितीतरी ज्ञान मिळत असेल
“अगदीच, मुलांना समजेल अशा पद्धतीने मी शिकवतो , त्यामुळे ते घेरून ठेवतात मला. सगळच माहित करायचं असतं मुलांना!”
“म्हणजे आपण. . . सर. . ?
“आलोक!”
“आलोकजी, कुठे ट्रेनिंग घेतले तुम्ही?”
“ट्रेनिंग कसली, आला गुरुदेव माझे आदर्श आहेत .रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन मध्ये सात वर्ष होतो. स्वतः ला घडवत होतो. जेव्हा तिथला आनंद मावळला तेव्हा मी तिथून निघालो. मग अशाच सत्याच्या शोधामध्ये निघालो आणि पांडिचेरीला देखील होतो . तुम्हाला माहित आहे की नाही कोण जाणे पण जे मदर आणि मास्टर आहेत ना. . श्री आरबिंदो आणि माताजी. . . . “
तिने मधेच वाक्य तोडले , हात जोडले,
“आलोक जी , तिथे राहिला आहात तुम्ही? आशीर्वाद आहे हो त्यांचा! माझी मुले श्री अरविंद आणि माताजी यांच्या संबंधित शाळेत शिकली, भक्त आहेत त्यांची. म्हणजे मी पण पाँडिचेरीला जाऊन आले. मलाही खूप श्रद्धा आहे त्यांच्या बद्दल .” तिने फोनमधला फोटो दाखवला .
त्याचे डोळे तेजस्वी झाले.
“ मी म्हणालो ना कुठलातरी एक धागा कॉमन आहे इथे ज्याने आपण जोडलो गेलो आहोत . पहा! एक सांगू का ? माझी पण खूप श्रद्धा आहे . मी तिकडे राहिलो, अरोविले पाहिले ,फिरलो, साधना केली. मदर वर माझी प्रचंड भक्ती आहे म्हणजे म्हणूनच कदाचित तिने आपल्याला असं भेटवलं पहा.
तारा जी ,तुम्ही पण मेडिटेशन करता हे दिसते तुमच्या चेहऱ्यावर.. तुम्ही बंगालमध्ये जन्माला यायला हवं होतं. . तशा च दिसता. . हाहा!” त्याने मुक्त स्वरात हसून घेतलं.
तारा जी ,तुम्ही पण मेडिटेशन करता हे दिसते तुमच्या चेहऱ्यावर.. तुम्ही बंगालमध्ये जन्माला यायला हवं होतं. . तशा च दिसता. . हाहा!” त्याने मुक्त स्वरात हसून घेतलं.
“ हो खरच आहे आलोक जी, मेडिटेशन मला जगण्याची शक्ती देतं. आणि हो ,माझे बंगाली भाषेवर खूप प्रेम आहे, शिकायची इच्छा आहे. आणि हो मला शांतिनिकेतन ला एकदा भेट द्यायची आहे .”
“नक्की भेट द्या . आता या वेळी तिथे तो आत्मिक भाव मिळेलच असं नाही , पण जरूर जा. आता मी रमत नाही तिथे!” तो उदास झालं होता.
क्रमशः
©® स्वाती बाळूरकर देशपांडे, सखी
अष्टपैलू लेखन स्पर्धा, सामाजिक कथा फेरी.
दिनांक - २५.०१.२५
दिनांक - २५.०१.२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा