इकडे फलटणच्या वाड्यातही विवाहाची लगबग सुरू झाली. निमंत्रणे पाठवली गेली. सईबाई आणि शिवबा यांच्या विवाहाची जोरदार तयारी सुरू झाली. हरतऱ्हेचे फराळाचे पदार्थ तयार होऊ लागले. धनधान्य, वस्त्र ,दागिन्यांची खैरात होऊ लागली.
शहाजीराजे व्यस्त असल्याने या लग्नास येऊ शकणार नव्हते, त्यामुळे जिजाऊसाहेब नाराज होत्या. मात्र शहाजीराजांनी मनापासून या लग्नास आनंदाने मान्यता कळविली. तसेच मुधोजी राजांना खलिता धाडून त्यांचे अभिनंदनही केले. मुहूर्तमेढ रोवली गेली.
नाईक निंबाळकर आपल्या लाडक्या लेकीसह पुण्यात दाखल झाले.
हळदीचा कार्यक्रम पार पडला.
सईबाई किती सुंदर सजल्या होत्या! कपाळी रेखलेले कुंकू, डोळ्यात काजळाची रेष, दोन्ही हातात भरगच्च हिरवा चुडा,भाळी मुंडावळ्या, अंगावर विविध प्रकारचे दागदागिने, नाकात नथ, कानात डूल, दंडावर वाकी, कंबरपट्टा.. आपली परकरी पोर अशी सजलेली पाहून रेऊबाई आणि मुधोजीराजे समाधानाने धन्य झाले. तिच्या बालपणीच्या आठवणी त्यांच्या मनात गुंजारव करू लागल्या. "आत्तापर्यंत वाड्याच्या अंगणात खेळणारी, बागडणारी इवलीशी पोर कधी मोठी झाली! विवाहयोग्य झाली!" दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. नशीब उजळले लेकीचे. इतके भाग्याचे सासर मिळणे, याहून अधिक भाग्याची गोष्ट ती काय!
शिवबा वराच्या वेषात उठून दिसत होते.
सनई चौघडे वाजले. वधू-वरांनी एकमेकांना वरमला घातल्या. १६ /५/ १६४० रोजी 'शिवबा आणि सईबाई' यांचा राजेशाही विवाह मोठ्या थाटामाटात, उत्साहात पार पडला. नाईक- निंबाळकरांच्या लाडक्या लेकीने आता भोसल्यांची लक्ष्मी म्हणून माप ओलांडले.
"नाईक निंबाळकरांच्या वाड्यातील थाटच निराळा. आता भोसल्यांची 'सून 'या घराण्याची शान वाढवणार." आपली लहानगी लेक क्षणात मोठी झाली. रेऊबाईंची अवस्था विचित्र झाली. त्यांनी आपल्या लाडक्या लेकीस जवळ घेतले.
"नाईक- निंबाळकरांचे पराक्रमी घराणे मागे सोडून आता भोसल्यांची सून म्हणून मिरवायचे.. आपल्या पित्यास, आईसाहेबांस सोडून इथेच राहायचे." या कल्पनेने सईबाईंच्या डोळ्यात पाणी आले.
सईबाईंची ही अवस्था पाहून जिजाऊंनी त्यांना मायेने जवळ घेतले. त्याक्षणी त्यांचे सासु-सुनेच्या नात्याचे रूपांतर नव्याने माय-लेकीच्या नात्यात झाले. जिजाऊंच्या डोळ्यात सईबाईंना आपल्या रेऊआईसाहेब दिसल्या. त्या जाणीवेने सईबाई जिजाऊ आईसाहेबांना घट्ट बिलगल्या.
"सईबाईंच्या रूपाने आम्हास मुलगी मिळाली," म्हणून जिजाऊंनी नाईक-निंबाळकर मंडळीस आश्वस्त केले.
सारी फलटणकर मंडळी परतली. सईबाई मात्र जिजाऊं सोबतच राहिल्या.
नव्या सुनेच्या आगमनाने लाल महाल आनंदाने न्हाऊन गेला. सईबाई वाड्यात हळूहळू रमू लागल्या. जिजाऊ आईसाहेबांच्या मायेत, शिवबांच्या संगतीत सईबाई, भोसले घराण्याशी एकरूप झाल्या. आपल्या शांत ,सोज्वळ रुपाने सईबाईंनी साऱ्यांचे मन जिंकून घेतले. या घराण्याचे रितीरिवाज, संस्कार जिजाऊ आईसाहेबांच्या मदतीने आपल्या अंगी भिनवू लागल्या. "सासू होण्याचा आनंदच निराळा!" जिजाऊसाहेबांच्या चेहऱ्यावर तो ओसंडून वाहत होता. "आपली निवड सार्थ ठरली, नाईक निंबाळकरांची गुणवंत लेक आपली सून म्हणून या घरात आली. या घराण्याची 'रीत' सईबाई जबाबदारीने सांभाळतील" हे जाणून जिजाऊसाहेब निश्चिंत झाल्या.
भोसले घराणे मोठे तालेवार. "शिवबांसारखा सामर्थ्यवान पती, शहाजीराजांसारखे पराक्रमी सासरे आणि जिजाऊं सारख्या प्रेमळ, धैर्यवान स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगणार्या स्वाभिमानी सासुबाई.. आणि काय हवं?" सईबाई या साऱ्यांशी एकरूप झाल्या. नाईक निंबाळकरांची संस्कारी, देखणी लेक आपणास पत्नी म्हणून लाभली यांचा शिवबांना मनस्वी आनंद झाला.
याच दरम्यान जिजाऊसाहेब शिवबा आणि सई बाईंसह शहाजीराजांना कर्नाटक प्रांतात भेटावयास गेल्या. तिथेच शिवाजीराजांचा दुसरा विवाह राजेशिर्के यांची कन्या' सगुणाबाईंशी' बंगळूर इथे पार पडला.
जिजाऊ आणि शिवबांसोबत सईबाईंनीही स्वराज्याचे स्वप्न पाहिले. त्यांना दागदागिने, भरतारी वस्त्र मिरविण्याची हौस नव्हतीच मुळी. याहूनही त्यांची स्वप्ने खूप मोठी होती. "आपले स्वतंत्र राज्य असावे, त्या राज्याच्या रक्षणार्थ सैन्य, मार्गदर्शक राजा असावा."
स्वराज्याच्या खेळात शिवबा आणि सवंगड्यांसह सईबाईही सामील होत होत्या. जिजाऊंना स्वराज्याचे धडे देताना, सारा कारभार सांभाळताना त्या पाहात होत्या. याच दरम्यान शिवबांनी रोहिडा किल्ल्यावर जाऊन आपल्या सवंगड्यांसह 'स्वराज्याची शपथ' घेतली आणि त्यानंतर स्वराज्याच्या कार्यास सुरुवात करून राजगड ,कोंढाणा ,तोरणा असे किल्ले स्वराज्यात घेतले.
रांझे गावाच्या पाटलाने, भिकाजी गुजर याने परस्त्री वर अत्याचार केला. याची खबर शिवबांना मिळाली. पाटलांना जेरबंद करून शिवबांसमोर हजर केले गेले. रीतसर चौकशी नंतर गुन्हा कबुल झाल्याने जिजाऊसाहेबांच्या उपस्थित शिवबांनी त्या पाटलाचे कोपरापासून दोन्ही हात आणि गुडघ्यापासून दोन्ही पाय तोडून टाकण्याची जबरी शिक्षा ठोठावली.
हा न्यायनिवाडा ऐकून सईबाईंना आपल्या पतीचा खूप अभिमान वाटला. हर परस्त्रीला मातेसमान आणि भगिनी समान वागविण्याच्या जिजाऊआई साहेबांच्या संस्कारास धरून ही शिक्षा सईबाईंना रास्तच वाटली. त्या बळी पडलेल्या भगिनीचे दुःख त्यांना कल्पना करूनही सहन होईना. ते आठवून त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आणि या शिक्षेमुळे गुन्हेगारीस जरब बसेल याची त्यांना खात्री झाली. स्वराज्याच्या वाटेवरची ही पहिली सुरुवात.. अशा या 'तेजस्वी' पुरुषाच्या आपण पत्नी आहोत, ही भावना सईबाईंना सुखावू लागली.
याच दरम्यान सईबाईंचे सासरे, शहाजीराजांवरची आदिलशहाची मर्जी उतरली. पुण्यावर आदिलशहाच्या शाही फौजा चालून येत होत्या. यांचा प्रतिकार करण्यासाठी, आपल्या संरक्षणासाठी गड किल्ले ताब्यात असणे शिवबांना आणि त्यांच्या सवंगड्यांना -मावळ्यांना आवश्यक वाटले. मग स्वराज्यासाठी त्यांनी धाडसाने 'तोरणागड' घ्यावयाचा बेत आखला गेला. हा महाराष्ट्रातील अत्यंत बिकट व बळकट किल्ला. बादशहाचे या गडाकडे दुर्लक्ष होते. तोरणगड सहज हाती आला आणि किल्ल्यावर भगवा झेंडा अभिमानाने फडफडू लागला. स्वराज्याच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल. शिवबांच्या या कामगिरीने सईबाईंना कोण आनंद झाला! पुन्हा एकदा अभिमानाने त्यांचा ऊर भरून आला.
शिवाजीराजेंनी 'मुरुंबदेवाचा 'डोंगर म्हणजेच किल्ला आपल्या ताब्यात घेतला. या किल्ल्याचे नाव नंतर 'राजगड 'असे ठेवले गेले. राजगड नंतर स्वराज्याची "राजधानी "बनली.
त्यानंतर पौड खोऱ्यातला 'कुवारीगड 'ताब्यात घेतला. बादशहाने दुर्लक्षित केलेले गड प्रथम शिवाजीराजांनी आपल्या ताब्यात घेतले. त्यामुळे त्या भवतालचा मुलूख आपोआपच ताब्यात आला.
दरम्यान सईबाईंचे मामासाहेब 'जावळीचे चंद्रराव म्हणजेच दौलतराव मोरे' यांचे निधन झाले. ते विजापूरच्या बादशहाचे सरदार होत. घनदाट अरण्यात वसलेल्या कोयना खोऱ्यातील जावळीवर शिवाजीराजांचे लक्ष होतेच.
विजापूरचा बादशहा जावळीवर हल्ला करणार त्याआधीच शिवाजीराजांनी जावळी आपल्या ताब्यात घेऊन निवर्तलेल्या चंद्ररावांच्या पत्नीच्या इच्छेने 'नवे चंद्रराव मोरे' या गादीवर बसवले.
आता राजांचे लक्ष कोंढाण्याकडे गेले. स्वराज्यासाठी अत्यंत महत्वाचा असा हा किल्ला जिंकून घेणे तितके सोपे नव्हते. बापूजी मुदगल देशपांड्यांनी कोंढाण्याच्या गडकर्यांना फितवले आणि झुंज न लढताच कोंढाणा हाती आला. या बातमीने बादशाह तडकला. चाकणचा किल्ला ही राजांनी फिरंगोजी नरसाळा या किल्लेदारास आपलेसे करून हाती घेतला.
आता राजांची पुढची झेप शिरवळच्या ठाण्यावर पडली. किल्ले सुभानमंगळ ही ताब्यात घेतला.
आता मात्र या वार्तेने बादशहाचे झोप उडाली. शिवबाचे बंड मोडणे तितके सोपे नव्हते, हे बादशाहही जाणून होता. शहाजीराजे हे निजामशाहीशी प्रामाणिक होते. शिवाजीराजांवर चालून जावे तर शहाजीराजेही बिथरणार होते.
स्वराज्याच्या कामगिरी सईबाई राणीसाहेबांची राजांना साथ होती. आपल्या पतीचा विरह सहन करणे ही साधी -सोपी गोष्ट नक्कीच नव्हती. आपल्या संयमी, सहनशील आणि प्रेमळ स्वभावाने सईबाईंनी राजांचे मन कधीच जिंकून घेतले होते. स्वराज्याची ही वाट कठीण बिकट असली तरी सईबाईंनी राजांना खंबीर साथ दिली.
राजे स्वराज्याच्या कार्यात सतत व्यस्त असत. त्यांना आपल्या संसाराकडे लक्ष देण्यास वेळच नव्हता. याचा सईबाईंनी कधीच बाऊ केला नाही. आपल्या स्वभावाप्रमाणे त्यांनी शिवाजीराजांना समजून घेऊन या स्वराज्य उभारणीच्या संसारात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना साथ दिली. राजांची कामगिरी पाहून सईबाईंना अभिमानाचे भरते येई. त्यांच्या तोंडून लढायांची वर्णने ऐकून त्यांच्या काळजात धडकी भरे. आपल्या पतीने सतत आपल्या समवेत असावे अशी त्यांची अपेक्षा नव्हतीच कधी. कारण त्या जाणून होत्या या क्षणिक मोहापेक्षाही स्वराज्याचे स्वप्न कितीतरी पटीने मोठे होते.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा