ईरा चॅम्पियन ट्रॉफी:- २०२५
लघुकथा लेखन स्पर्धा
शीर्षक:- राहणीमान
"ओह, गाॅड ! आज नवीन बाॅस येणार ऑफिसमध्ये. तिचा पहिला दिवस आहे. मला जर आज लेट झालं ना. पहिल्याच दिवशी माझं बॅड इंप्रेशन पडायचं. ह्या स्कूटीलाही आजच बंद पडायचं होतं. छे !" बराच वेळ प्रयत्न करूनही सीमाची स्टूकी चालू झाली नाही म्हणून तिने स्टूकीला लाथ घालत ती वैतागत म्हणाली.
"आता बसने तर जाऊ शकत नाही, खूप उशीर होईल. रिक्षा नाही तर टॅक्सीने जावं लागेल." ती हाताच्या मनगटावरील घड्याळ्यात पाहत म्हणत रिक्षा किंवा टॅक्सी दिसते का बघत मुख्य रस्त्यावर आली.
दहा पंधरा मिनिटे झाली तरी एकही रिक्षा किंवा टॅक्सी काही येण्याची चिन्हं दिसेनात.
ती इकडे तिकडे पाहत असताना तिची नजर एके ठिकाणी स्थिरावली.
एका झाडाखाली साधी सिंपल कॉटनची साडी, कोपऱ्यापर्यंत ब्लाऊज, लांब सडक केसांची वेणी, शिडशिडीत बांधा, उंची कमी, काळीसावळीशी ती व्यक्ती पाहून सीमाच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्या व्यक्तीचा पेहराव आणि राहणीमान अत्यंत साधा होता.
"हिला कुठे तरी पाहिल्यासारखं का वाटतं? हिला पाहून ओळखीचे वाईब्ज येत आहेत. कोण असेल ही? पुढे जाऊन पाहू जाऊन पाहते म्हणजे कळेल?" ती स्वतःला म्हणत त्या व्यक्तीच्या दिशेने जाऊ लागली.
सीमा जसं जसं त्या व्यक्तीच्या जवळ जाऊ लागली तसं तसे तिच्या कपाळावरील आठ्या अजून गडद झाल्या.
"अरे, ही काळी मैना इथे काय करतेय? आणि ते ही इतक्या आलिशान गाडी जवळ? कुछ तो झोल हैं, यार ! पता लगाना पड़ेगा।" पुन्हा तिने मनाशी संवाद साधला.
आणखी जवळ गेल्यावर ती व्यक्ती ड्रायव्हरशी बोलत होती असे तिला दिसले.
"अरे ही तर ड्रायव्हरशी बोलतेय म्हणजे ती कोणाला तरी शोधत असेल किंवा तो ड्रायव्हर तिला पत्ता विचारत असेल. तरीच म्हटलं हिची इतकी ऐपत तरी आहे का एवढी महागडी गाडी घेण्याची? शी ! दिसते पण कशी? जणू कोळशाची खाण वाटते. गावंढळ ती गावंढळच. इतक्या दिवसात ना हिचे राहणीमान बदलले ना कपड्यांची निवड. जरा जवळ जाऊन मजा घेते तिची. आणि याच ड्रायव्हरकडून लिफ्ट मागते. म्हणजे मी पटकन पोहोचेल ऑफिसला. हा हेच बेस्ट राहिलं." त्या व्यक्तीकडे पाहत तिच्या जवळ येत त्या व्यक्तीबद्दल असलेला घृणा युक्त बोलत सीमा आली.
"हे हाय ! तू पूनम आहेस ना?" सीमा तिला वरून खाली पर्यंत न्याहाळत ओठ तिरकस करत हसत म्हणाली.
"हो, तू सीमा आहेस ना? आपल्या काॅलेजची ब्युटी क्वीन." पूनम स्मित हास्य करत म्हणाली.
"हो, तुझ्या लक्षात आहे मी!" सीमाने आश्चर्याने डोळे मोठे करून तिला विचारले.
"हो, मग तुला कसं विसरेन? अख्ख्या काॅलेजची शान होती तू. तुझ्या फॅशन सेन्सचे, दिसण्याचे सर्वच कौतुक करत होते. अजूनही तशीच आहेस की तू." पूनम प्रसन्न मुद्रेने तिला म्हणाली.
तिच्या सावळ्या मूर्तीवर ते प्रसन्न तेज खुलून दिसत होतं. तिच्या डोळ्यांत आत्मविश्वासाची एक वेगळीच चमक होती.
"हो ते तर आहेच. अजून मी तशीच तुझ्यासारखे खूप जण म्हणतात." स्वतःच्या दिसण्याचा गर्व करत खांद्यापर्यंत असलेल्या केसांना झटका देत हसत म्हणाली.
त्यावर काही न बोलता पूनम मंद हसली.
"पण मात्र अजूनही तशीच आहेस काकूबाईसारखी." न राहवून मनातलं ओठांवर आणत पूनम कुत्सित हसत म्हणाली.
तरीही पूनमने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.
"तू इथे कशी?" पूनमने तिला विचारले.
"ओह गाॅड ! मी तर विसरलेच बघ. एक मिनिट थांब मी आलेच." पुन्हा सीमाला ऑफिस आठवले तसे ती पटकन त्या गाडीच्या ड्रायव्हरकडे गेली व त्याला आर्जव करत म्हणाली,"दादा, तुम्ही याच रस्त्याने जाणार असाल तर प्लीज मला पी एस कंपनी पर्यंत लिफ्ट द्याल का? ते काय आहे ना आज नवीन बाॅस येणार आहेत. मला लवकर जायचे आहे. माझी स्कूटी बंद पडली. त्यात कोणती रिक्षा किंवा टॅक्सी पण मिळेना. त्यामुळे तुम्हाला विचारतेय."
ड्रायव्हरला गाडीच्या आरश्यात पूनमचा चेहरा दिसत होता. तो विचारणार तोच तिने नजरेने त्याला तिला होकार द्यायला सांगितले.
ड्रायव्हरने होकारार्थी मान डोलावली. सीमा हसत त्याला हसत थॅंक्यू म्हणाली आणि पुन्हा पूनम जवळ आली.
"हुश्श ! चल गं मी निघते. ड्रायव्हरकडून लिफ्ट मागितली. आज नवीन बाॅस येणार आहे. तर वेळेवर पोहचेन आता. छान वाटलं तुला भेटून बोलून." बळेच हसून ती तिचे म्हणणे न ऐकता तोऱ्यात जाऊन गाडीत बसली.
तिच्या पाठोपाठ पूनमही तिच्या शेजारी बसली. तिला जवळ बसलेले पाहून सीमाने किळसवाणा चेहरा करत म्हणाली,"अगं ए, तू कुठे निघालीस? "
"मलाही तिकडेच जायचे आहे. थोडक्यात काय तर दोनोंकी मंझील एकही समज." फार काही न बोलता पूनम शांतपणे म्हणाली.
"म्हणजे तू काय आमच्या कंपनीत झाडू पोछा करणार आहेस का? त्या शिवाय दुसरं काम मिळणारही नाही तुला? तुझे कपड्यांवरून तरी तसेच वाटते आणि मगाशी तूही ड्रायव्हरला लिफ्टचच बोलत होती वाटतं." सीमा तिचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नव्हती. मगाशी ती ड्रायव्हरशी बोललेल आठवत म्हणाली.
ड्रायव्हर अवाक होऊन ऐकत होता.
पूनमला खरं तर तिच्या बोलण्याचा विचारसरणीचा राग न येता कीव करावी वाटत होती. ती काहीच न शांतपणे पळणाऱ्या रस्त्याकडे बघत होती.
"खरं बोलले म्हणून राग आला का तुला? चू चू .." तिला गप्प बसलेले पाहून पुन्हा सीमा कडवट हसत म्हणाली.
"वेळ आली की कळेल तुला." पूनम शांतपणे म्हणाली.
नकारार्थी मान डोलावत सीमाने खांदे उडवत मानेला झटका दिला.
तो पर्यंत गाडी कंपनीच्या गेटजवळ आली. सीमा उतरून बाहेर पडली. तिला आणि ड्रायव्हरला बाय करून ती कंपनीत गेली.
थोड्यावेळाने कंपनीच्या मॅनेजरने नवीन बाॅस येण्याची घोषणा केली. सगळे त्याच्या स्वागतासाठी उभे राहिले. त्यात सीमाही होती. सगळ्यांना उत्सुकता होती नवीन बाॅसला पाहण्याची.
जेव्हा पूनमचे आगमन झाले तेव्हा मात्र सीमाचे डोळेच बाहेर यायचे राहिले होते. ती आ वासून तिच्याकडे पाहतच राहिली. मॅनेजरने पूनमची सर्वांना ओळख करून दिली, "या आहेत आपल्या कंपनीच्या नवीन बाॅस मिस पूनम. जोरदार टाळ्याने यांचे स्वागत आहे."
सर्वांनी टाळ्या वाजवून तिचे स्वागत केले. सीमाचे तोंड मात्र बघण्यासारखे झाले होते.
पूनम मंद हसत तिच्याकडे पाहत निघून गेली. तिची नजर जणू तिला म्हणाली,"आता कळले का तुला?"
आपण काय बोललो या विचाराने सीमा मनात खजील झाली.
समाप्त -
राहणीमान, पेहराव आणि दिसणे पाहून माणसाची पारख कधीही करू नये. एखाद्याच्या रंगरूपाबद्दल हिणवून बोलू नये.
जयश्री शिंदे
प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा