बाबा म्हणजे नवीन आजोबा आजही संध्याकाळी पाच ते सात या वेळेत वाटेकडे डोळे लावून बसले होते. हल्ली रोज दोन तास त्यांचे हेच काम चालायचं . कोणाची तरी वाट पहायचे अगदी आतुरतेने, पण नक्की कोणाची वाट पाहतात हे रहस्य उलगडत नव्हतं. सात वाजले की आश्रमाच्या गेटला कुलूप घालायचे आणि प्रेमानंद पाठीवरून हात फिरवायचे.
प्रेमानंद हे आमचे आश्रम आहे. नुसते वृद्धाश्रम किंवा अनाथाश्रम नाही तर ते आमचे घर आहे आपल्या माणसांचे. लहान लेकरांच्या लिला पाहून वृद्धांना आनंद देणारे आणि अनाथ लेकरांना आजी-आजोबांचे प्रेम देणारे असे प्रेम आनंद हे एक मोठे नावाजलेले आश्रम होते. या आश्रमाचे मालक श्रीनाथ दादा स्वतःही अनाथ होते. या जगाच्या शाळेत अनुभव घेता घेता मोठे झाले. स्वकष्टाने शिकले. नोकरीला लागले आणि स्वबळावरच अनेक यशाच्या पायऱ्या चढत गेले. तसेच त्याची बायको जानवी. तीही अनाथ सर्वांवर माया करणारी, श्रीनाथ ला प्रत्येक गोष्टीत साथ देणारी, त्याच्या आनंदात आनंद शोधणारी. दोघांचे बालपण आश्रमातच गेले त्यामुळे आपणही अनाथ मुलांसाठी काहीतरी करायचे हे दोघांचे ठरले होते. त्यांना एक मुलगा होता त्याचे नाव यश . पदवीधर होताच तो पुढच्या शिक्षणासाठी परदेशात गेला. तो परदेशात गेल्यावर मात्र दोघेही त्याच्या आठवणीने सतत व्याकूळ व्हायचे. एक दिवस संध्याकाळी दोघे घराजवळच्या एका मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते. मंदिराच्या पायरीवर एक आजी लहान लेकराला घेऊन बसल्या होत्या. लेकरू रडत होतं .आजी त्याला हातातली साखर चारत होती .पण बाळ काही शांत होत नव्हत. जानवीने आजी कडे जाऊन बाळाला जवळ घेतले. तिने आजीला विचारले, आजी काय झालं? इतकं का रडत आहे बाळ? त्याची आई कुठे? तशा आज्जी रडू लागल्या.
म्हणाल्या , हा माझा नातू आहे माझ्या लेकाने आणि सुनेने कर्जपायी जीव दिला. खायला एक दाणा नाही .राहायला जागा नाही .गेले दोन दिवस मंदिरातच राहत आहे .मिळाल ते खात आहे. लेकरू भुकेनं कासावीस झालंय. ते ऐकून जान्हवीच्या डोळ्यात पाणी आले .ती त्यांना घेऊन घरी आली. दोघांना पोटभर जेऊ घातले. जेवताच बाळ शांत झोपले .आजी म्हणाली, ताई मी तुझ्या घरात धुणीभांडी करते. माझी राहायची, खायची सोय करतेस का गं ? जानवी आजींना म्हणाली तू झोप आता शांत मग आपण बघू काय करायचं ते. जानवीने श्रीनाथ ला सगळं सांगितलं . तसं श्रीनाथच्या मनात आपले स्वप्न जागं झालं तो म्हणाला जानवी आपला यश परदेशात गेल्यापासून आपण तसे रिकामेच आहोत. मलाही ऑफिसमध्ये आता जास्त काम नाही .आपण आश्रम काढायचं ठरवलं होतं ना त्याचा श्रीगणेशा करायचा काय? ते ऐकून जानवी पण खुश झाली.
आपल्या आश्रमात आपण फक्त अनाथ बालकांची नाही तर वृद्धांची पण सोय करायची म्हणजे अनाथ लेकरांना आजी-आजोबा मिळतील. ती कल्पना ऐकून तिला खूप आनंद झाला. तसे दोघांनी उद्यापासून या कामाची कंबर कसून सुरुवात करायची असे ठरवले.
सकाळ होताच जान्हवीने आजीना काही दिवस तुम्ही इथेच राहा असे सांगितले. आजी सुखावली. तिने जानवीला तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ दे असा तोंडभरून आशीर्वाद दिला आणि घरची छोटी-मोठी कामे करू लागली. श्रीनाथने सुद्धा आश्रमाच्या पूर्वतयारीसाठी ऑफिसला दहा दिवसांची सुट्टी टाकली. रोज सकाळी दोघे उठून घरात लवकर आवरून आश्रमाच्या कामाची पाहणी करू लागले. त्यांच्या घराशेजारीच स्वतःची शेतजमीन होती पण शेती करायला कोणी नसल्याने ती जागा रिकामी होती. त्याच जमिनीवर आश्रमाची इमारत बांधायचे ठरले. ओळखीचे एक कॉन्ट्रॅक्टर होते त्याला बांधकाम सोपवण्यात आले . जानवी ने स्वतः आश्रमाचा प्लान तयार केला होता. आश्रमात सध्यातरी पन्नास खोल्या एक मोठे स्वयंपाक घर आणि एक हॉल काढण्यात येणार होता. अनेक ठिकाणी चौकशी करून जान्हवीने गाद्या, उशा , पांघरुन, पडदे अशा लहानसहान गोष्टींची यादी बनवली आणि त्याची ऑर्डर देण्याचे ठरवले. बांधकामाचे भूमिपूजन करून श्रीनाथ पुन्हा एकदा ऑफिसला जॉईन झाला. आता दिवसभर जानवी आणि आजी बाळाला सांभाळणे आणि घर काम उरकून आश्रमाची पाहणी करणे यातच बिझी असायचा. बघता बघता एक वर्ष उलटले आणि आज या आश्रमाचा उद्घाटन समारंभ होता. श्रीनाथ जानवी चे सगळे मित्र मंडळी कार्यक्रमाला आले होते. आजीच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आणि प्रेमानंद असे आश्रमाचे नाव ठेवण्यात आले. महिनाभरातच प्रेमानंद मध्ये 12 लहान मुले आणि आठ नऊ आजोबांचे भरती झाली. जानवी स्वतः सगळीकडे लक्ष देत असे. स्वयंपाकासाठी दोन तीन बायका कामाला ठेवल्या होत्या. तर आश्रमाचा स्वच्छतेचा आणि इतर काही कामांसाठी दोन-तीन नोकरीही कामावर होते. रोज सकाळी दहाच्या आधी पूर्ण आश्रमाचं झाडून पुसून झालं पाहिजे असा नियम होता. रोज दहा ते दोन हा ऑफिस टाईम होता .या ऑफिस टाईम मध्ये नवीन अनाथांची वृद्धांची भरती केली जाई.त्यातही अनाथांची सर्व माहिती, तर वृद्धांची आजार, पथ्यपाणी ची माहिती लिहून घेतली जाई. सकाळी दहा पर्यंत सर्वांचा नाश्ता होत असे. वृद्धांसाठी भजनाची, पोथी वाचनाची सोय केली होती. दुपारच्या जेवणानंतर थोडावेळ आराम होत असे. संध्याकाळी पाच वाजता चहा घेऊन लहान मुले आश्रमाच्या अंगणात नवीन नवीन खेळत. तर काही आजीआजोबा अंगणात बसून गप्पा मारत. काही लहान मुलांसोबत बैठकीचे खेळ खेळत असत. रात्री आठ वाजता जेवण करून परत आपापले झोपी जाई.
अनेकदा जानवी संध्याकाळी अंगणात फेरफटका मारत असे. तेव्हा काही म्हाताऱ्या बायका गप्पा मारताना दिसतात पण त्यांच्या गप्पांचे विषय मात्र ठरलेले असायचे सुना आणि त्यांच्या करामती. कोणी कोणाला कसा त्रास दिला याच विषयावर ते सतत बोलत असायच्या. तिला हे अजिबात आवडत नव्हते. तिने अनेकदा श्री नाथला सांगितले, पण तो म्हणायचा कदाचित एकमेकींना आपले दुःख सांगून त्या मन मोकळे करत असतील. तर करू देत. पण तिला काही ते पटायचं नाही तिला वाटायचं या वृद्धांनी आता आनंदात जगावं, जुनी दुःख विसरून नव्याने जगावे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा