Login

Rahasya premanandache bhag 2

Prem katha

( पहिल्या भागात आश्रमाच्या दारातील बेंचवर बसून एक आजोबा कोणाचीतरी वाट पाहत आहेत हे आपण पाहिलं. आश्रम श्रीनाथ आणि जानवीने कशापद्धतीने उभारला आणि त्याचे प्रेमानंद हे नाव देऊन उद्घाटन केले. आता पुढे)

     एक दिवस एक मुलगी आपल्या वडिलांना सोबत  वृद्धाश्रमात आली. वृद्धाश्रमाची सगळी माहिती वडिलांनी विचारली फॉर्म ही भरला .स्वतःचे पथ्यपाणी सांगितले आणि उद्यापासूनच मी इथे राहायला येतो असे म्हणाले. मुलगी एकही शब्द बोलली नाही. दुसऱ्या दिवशी आजोबा आपले सामान घेऊन आले आणि मुलीला निरोप देऊ लागले. तशी मुलगी त्यांच्या पाया पडून रडू लागलीह आजोबा तिला म्हणाले, मला भेटायला येत जा, माझी काळजी करू नको, मी खूप खुश आहे, आता तू घरी जा बरं असे म्हणून त्यांनी आश्रमातल्या एक नोकर नारायण यांच्याकडे आपले सामान देऊन ते स्वतःच्या रूम कडे निघाले. जानवी हे सर्व तिथे उभा राहून पाहत होती. तिला पाहून ती मुलगी तिच्या जवळ आली आणि रडू लागली म्हणाली. हे माझे बाबा आहेत. मी त्यांचे सगळे करायला तयार आहे
 हाताखाली आमच्या नोकरचाकर ही आहेत. तरीपण बाबा माझं ऐकतच नाहीत . वृद्धाश्रमात राहण्याचा हट्ट करत आहेत. जानवी ने तिला शांत केले, समजावले . अगं कदाचित आपल्या जावयाच्या घरात राहणे त्यांना चांगले वाटत नसेल म्हणून ते वृद्धाश्रमाचा हट्ट धरत असतील. तू काळजी करू नको आणि असा ही एकटेपणा माणसाला नकोसा वाटतो. इथे त्यांचे मन रमेल. त्यांना नवीन मित्र मिळतील. आम्ही त्यांची नीट काळजी घेऊ. तू घरी जा आणि तुला हवं तेव्हा भेटायला येत जा. जानवीशी बोलून ती मुलगी निघून गेली. संध्याकाळी  श्रीनाथशी  बोलताना जानवी म्हणाली, अरे आज काही तरी वेगळेच घडले आश्रमात आतापर्यंत जितके  आजी-आजोबा आपल्याकडे आले आहेत. त्या सगळ्यांना त्यांच्या मुलांनी वृद्धाश्रमात आणून सोडले आणि आपली जबाबदारी झटकली. पण आज एक आजोबा स्वतःहून आनंदाने आपल्या आश्रमात आलेत याचं मला अगदी नवलच वाटतं . श्रीनाथ म्हणाला असेल त्यांची पण काहीतरी अडचण. जाऊदे आपण कधीही कोणाच्या घरच्या गोष्टी विचारल्या नाहीत. आपण फक्त त्यांना येथे प्रेमानंद कसा मिळेल याकडे लक्ष द्यायचे. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने श्रीनाथ आणि जानवी जरा लवकरच आश्रमात आले. बायका स्वयंपाक घरात नाश्त्याची तयारी करत होत्या. काही नोकर आश्रमाचा परिसर झाडत होते. मोठी मुलं लहान मुलांना आवरण्यात मदत करत होती. आजी-आजोबा आपली सकाळची कामं करत होते आणि एका रूम मधून ओम चा स्वर ऐकू येत होता. नव्याने भरती झालेल्या आजोबा त्यांचीच ती रूम. ते दोघेही त्या रुमच्या खिडकीतून आत पाहू लागले. आजोबांनी ओंमकार म्हणाले. व्यायाम केला इतकेच नव्हे तर सूर्यनमस्कार घातले. त्यांना पाहून श्रीनाथच्या मनाने सर्वांसाठीच एक व्यायाम खोली तयार करायचे ठरवले . 
      ऑफिसमध्ये काम करत असताना ते नवीन आजोबा तिथे आले आणि म्हणाले, मला जरा तुमच्याशी बोलायचे होते. श्रीनाथ आणि जानवी ने त्यांना बसायला खुर्ची दिली. दोघेही हातातले काम बाजूला ठेवून त्यांच्या जवळ येऊन बसले .
"आजोबा काही हवे का तुम्हाला?" श्रीनाथ म्हणाला
 मला एक काम हवे आहे. आजोबा म्हणाले 
 तसे दोघेही चकित झाले. जानवी म्हणाली ,आजोबा वयाची इतकी वर्षे तुम्ही कामच केले ना. आता आराम करा. लहानाशी गप्पागोष्टी करा. इथे आम्ही कोणालाही काम करायला लावत नाही.
 तसे आजोबा म्हणाले " तुम्ही माझ्या मुलासारखे आहात,  मी काही बोललो तर चालेल का? निर्णय तुम्ही घ्या. मी फक्त विचार  मांडतो. दोघेही त्यांना हो म्हणाले तसे आजोबा बोलू लागले. मला माझ्या मुलीने  छानच सांभाळले पण जावयाच्या घरात राहणे मनाला पटेना आणि रिकामटेकडे बसून जुन्या आठवणी सतत छळत राहतात. त्यापेक्षा नवीन काहीतरी काम केले तर मन प्रसन्न राहते. दुखणेही विसरायला लावते आणि कोणाचीतरी मदतही होते. या विचारांचा मी आहे. तसेच प्रत्येकाला वेगवेगळ्या कामांची  आवड असते.  मला ऑफिस कामात फार उत्साह वाटतो. रजिस्टर ठेवणे, फाईली लावून ठेवणे, नोंदी करणे आणि हो वृक्षलागवडीची खूप आवड आहे मला. तुम्हाला इथे असलेल्या प्रत्येकाच्या आवडी निवडी माहीत असतीलच ना पण माझी आवड माहिती नाही म्हणून मी सांगितले. मला जर तुम्ही ऑफिस कामात मदतनीस म्हणून काम करून दिले तर मला खूपच आनंद मिळेल.
 हे ऐकून जानवीला ही आजोबांचे बोलणे पटले. ती पटकन म्हणाली "आजोबा थोडा विचार करून उद्यापर्यंत सांगतो तुम्हाला चालेल का?" तसे आजोबा म्हणाले, हो चालेल कि मला काय घाई आहे. करा तुम्ही तुमची कामे. मी आता निघतो असे म्हणून आजोबा गेले सुद्धा.
      श्रीनाथ जानवी दोघेही त्याच्या बोलण्याचा विचार करत होते. दिवसभर जानवी आजोबांवर लक्ष ठेवून होती. दुपारच्या जेवणापर्यंत तर आजोबांची सगळ्या वृद्धांशी मैत्री झाली. संध्याकाळी नारायण झाडांना पाणी देत होता तर आजोबांनी मी पाणी घालतो असे म्हणून त्याच्याकडून झारी घेतली आणि सर्व झाडांना अगदी हात लावून, कुरवाळून पाणी घालत होते. नंतर मुलांच्या जवळ जाऊन सगळ्यांना जवळ घेऊन त्यांनी एक गोष्ट सांगितली. दिवसभर विचार करून जान्हवीच्या मनात एक कल्पना आली.  तिने श्रीनाथशी  चर्चा केली आणि दुसऱ्या दिवशी त्यावर काम सुरू झाले.  तिने आजोबांना ऑफिसमध्ये कामासाठी जॉईन केले आणि एक नवीन माहितीचे रजिस्टर बनवले. आत्तापर्यंत कोणाचाही घरच्या गोष्टीत न जाणाऱ्या जान्हवीने आता प्रत्येकाचा भूतकाळ जाणून घ्यायचे ठरवले. तसेच नव्याने भरती होणाऱ्या आजी-आजोबांचे भूतकाळ विचारून नोंद करून ठेवायचं ठरले. पंधरा-वीस दिवस ती प्रत्येक आजी आजोबांच्या आयुष्याची माहिती घेत होती. प्रत्येकजण आपले दुःख मांडत होता, स्वप्न सांगत होता, इच्छा सांगत होता , आपल्या आवडी-निवडी सांगत होता, कोणाला स्वयंपाकाची आवड होती, कोणाला गाण्याची, कोणाला वृक्षलागवडीची तर कोणाला शिवणाची. प्रत्येकाला त्याच्या आवडीचे काम कसे करायचे असे त्यांनी ठरवले. स्वयंपाक काम आवडणाऱ्या आजींना दोन-तीन तास स्वयंपाक घरात मदत करायला सांगितले. वाचनाच्या आवडीसाठी आश्रमात छोटीशी लायब्ररी उघडायचे ठरवले. काहीजण नवीन झाडे लावू लागले .रोपांची काळजी घेऊ लागले. काही जण लहान मुलांना आवरणे, त्यांना गोष्टी सांगणे, गाणी शिकवणे हे काम करू लागले. नवीन आजोबा आल्यापासून दोन चारच महिन्यात आश्रमात नवीन वाचनालय, व्यायामशाळा सुरू झाल्या. आश्रमाचा परिसर छान छान फुलांनी बहरून गेला. म्हाताऱ्या बायकांच्या सुनांच्या गप्पा बंद झाल्या आणि प्रत्येक जण हसत खेळत, आपली दुखणे विसरून काम करू लागले. श्रीनाथ आणि जानवी यांना तर नवीन आजोबांचा रुपात एक मार्गदर्शक बाप मिळाल्यासारखे वाटले. आता ते दोघे प्रत्येक गोष्ट आजोबांना विचारून ठरवत असत. आजोबाही त्यांच्यावर खूप प्रेम करतं. जणू त्यांच्या आयुष्यातली आई-वडिलांची पोकळी भरून काढत होते. आजोबा रोज नवीन मुलांची वृद्धांची भरती करताना त्यांच्या सगळ्या नोंदी करत.
          सगळेच जण आश्रमाचे  काम खूप छान करत होते. आता आजोबा आश्रमात येऊन जवळजवळ चार पाच वर्षे झाली होती. त्यांची मुलगी त्यांना सतत भेटायला येईल त्यांना पाहून खुश होत असे. आता आजोबा तर त्यांच्या नवनवीन कल्पनांमुळे सगळीकडे नवीन आजोबा म्हणून फेमस झाले होते. आजोबा आल्यापासून हळूहळू आश्रमामध्ये मुलांसाठी शाळा, रेग्युलर डॉक्टर चेक अप, मोठ्या मुलांसाठी लहान मोठे कोर्स सुरू करण्यात आले होते. अनेकजण आश्रमाचे कीर्ती ऐकून आश्रमाला भेट देत असत त्यांनी दिलेल्या देणग्यांमधून प्रत्येक वेळी नवीन एखादा उपक्रम राबवला जाई. अंगणात रांगोळ्या शिकवल्या जात होत्या, शिवण्याच्या मशीन आल्या होत्या ज्यांना शिवण्याची आवड आहे त्या इतर लहान मुलींना शिवण शिकवता शिकवता आश्रमात लागणारे रुमाल, पायपुसणी अशा छोट्या छोट्या गोष्टी आश्रमातच शिवत  होत्या. जानवी आणि श्रीनाथ आजोबांचे सतत कौतुक करत असत. तर आजोबांची मुलगी आजोबांना खुश पाहून  जानवीचे परत परत आभार मानत असे. जानवीने तिला सांगितले आता हे आजोबा फक्त आमच्या आश्रममधले आजोबा नाहीत तर आमचे बाबा आहेत त्यामुळे त्यांची अजिबात काळजी करू नको. 
      आता आजोबांचेही  वय झाले होते. हल्ली जरा ते शांत असायचे. गेला महिनाभर तर संध्याकाळी पाच ते सात मध्ये आजोबा आश्रमाच्या जवळच्या बेंचवर बसून राहतात. रस्त्याकडे डोळे लावून. जणू कोणाची तरी वाट पाहत आहेत. जानवी ने श्रीनाथ ला सांगितले, आजोबांना काय झाले विचारायचे का? ते कोणाची वाट पाहतात काहीच कळत नाही. कधी कधी तर चुकून किरण असे शब्दही निघतात त्यांच्या तोंडातून. तसे श्रीनाथ म्हणाला अगं वय झाले त्यांचे. जुने काहीतरी आठवत असेल तेच शब्द तोंडी येतात. डॉक्टर चेकअप करून गेले. ते म्हणाले आजोबा ठीक आहेत. सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत काळजी करू नकोस. पण जानवी चे मन काही मानतच नव्हते. तिने ठरवलं होतं काही करून आता आपण आजोबांना विचारायचंच.
विद्या मेटे.

🎭 Series Post

View all