( तिसऱ्या भागात आजोबांनी त्यांचा भूतकाळ जानवीला सांगितला आणि ते किरण ची वाट पाहत आहेत हे जानवीला समजले तेव्हा ती त्या आजोबांना सांगते तुम्हाला तुमची किरण नक्कीच भेटेल )
'बाबा तुमची किरण नक्की तुम्हाला भेटेल, तुम्ही काही काळजी करू नका' असे सांगून जानवी घरी गेली. रात्रभर जानवीला तेच सगळे आठवत होते. कुठे असेल बरं आजोबांची ही किरण? काही माहिती समजली असती तर त्यांना शोधता आले असते. आजकाल जग किती फास्ट चाललंय. इंटरनेट वर शोधून पाहू उद्या असे ठरवून ती झोपी गेली. सकाळी लवकर उठून जानवी ऑफिसला गेली. नारायण ऑफिसमधले आवरत होता. त्याने कालचा पेपर रद्दी मध्ये ठेवण्यासाठी उचलला. ते पाहून तिला काल आजोबा पेपर वाचताना काहीतरी लपवत होते हे आठवले. तिने लगेच तो पेपर नारायण कडून घेतला आणि ती प्रत्येक बातमी तपासून पाहू लागली. पेपर मध्ये तिसर्या पानावर समाजसेवकांना पुरस्काराची बातमी होती. "हसत खेळत शिक्षण" या संस्थेतर्फे चार समाज सेविकांना पुरस्कार देण्यात आले होते. त्यातच किरण खैरे हेही नाव होतं. म्हणजे कदाचित याच तर नसतील ना आजोबांची किरण? तिने घाईने कंप्यूटर चालू केला हसत खेळत शिक्षण या संस्थेची माहिती इंटरनेटवर शोधली. तिथे तिला त्या संस्थेचा लँडलाईन नंबर ही मिळाला. तिने त्यावर कॉल केला आणि पुरस्कार मिळालेल्या चारी समाजसेविका यांचे कॉन्टॅक्ट नंबर लिहून घेतले. आता किरण खैरे यांना फोन करून आजोबां बद्दल सांगितले की झाले म्हणजे आजोबा आणि किरण ची भेट नक्की होणार असे तिला वाटू लागले.
किरण खैरे यांना ती फोन लावणार इतक्यात आजोबा तिथे आले आणि म्हणाले जानवी अग आपला पराग इयत्ता सातवी ला आहे पण अभ्यास करायचं नाही म्हणतो. कितीही प्रयत्न केले तरी त्याच्यात काहीच प्रगती नाही. जर त्याच्या मनातच नसेल शिकायचं तर आपण कशाला त्रास द्यायचा. बंद कर त्याचे शिक्षण आणि त्याला आवडेल अशा गोष्टींचा कोर्स देऊया आपण त्याला. नाही तर तो जास्तच चिडचिड करायला लागेल. प्रेम काय किंवा शिक्षण काय समोरच्याच्या मनात नसेल तर आपण देऊन काय होणार? खरा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा आपल्याला हवे ते आणि कोणाकडेही न मागता मिळत. आपण त्याची आवड जाणून घेऊ आणि त्यादृष्टीने त्याला पुढे उभा करू.कसं? आजोबांचे बोलणे ऐकून जानवी हो म्हणाली. पण त्याचबरोबर तिच्या मनात असाही विचार आला. खरच त्या किरण खैरे यांना आजोबा आठवत असतील ना? जर त्या आपल्या सांगण्यावरूनच येथे आल्या हे आजोबांना कळालं तर आजोबा नाराज होतील. त्या स्वतःहून आल्या तरच आजोबांना खरा आनंद मिळेल. पण त्यांना तरी काय माहिती की आजोबा इथे आहेत ते. काहीतरी करायला हवं. काय बरं करावं? काही सुचेना. शेवटी तिने श्रीनाथशी बोलायचं ठरवलं. ती लगेच उठून त्याच्याकडे गेली. त्याला सगळं सांगितलं. आजोबांची माहिती ऐकून आता श्रीनाथ ला पण आजोबांची काळजी वाटू लागली. आपल्या बाबांची ही इच्छा काहीही करून आपण पूर्ण करायची असे त्यांनी ठरवले. ते दोघे मिळून आता किरण खैरे आणि आजोबा यांची भेट कशी घडवून आणता येईल? याचा विचार करू लागले. आणि अचानक एक कल्पना सुचली.
तो म्हणाला 'आपण किरण खैरे यांना फोन करून सांगायचे हे आमचे लहान मुलांचा आश्रम आहे आणि तिथे तुम्ही त्यांना मार्गदर्शनपर एखादी लेक्चर देण्यासाठी यावे अशी आमची इच्छा आहे,
मग त्या स्वतः ठरवतील इथे येण्याचं आणि आल्यावर आजोबांची भेट झाली तरी आपण त्यांना आजोबांसाठी इथे आणलं हे आजोबांना समजणार नाही ते ऐकून जानवी खुश झाली. तिने लगेच फोन लावला.एका स्त्री ने फोन उचलला.
जानवी ने विचारले " आपण किरण खैरे बोलताय ना?
हो आपण कोण? किरण.
मी प्रेमानंद आश्रमातून बोलत आहे. जानवी
आश्रम? कोणता आश्रम? किरणने जरा घाईत विचारलं. त्यांचे विचारण्यातली घाई पाहून जानवीला भलताच आनंद झाला.
तिने लगेच सांगितलं ' मी नगर मध्ये एका अनाथाश्रमाची संस्थापिका आहे. आमची इच्छा आहे की तुम्ही आमच्या मुलांना एखादा मार्गदर्शनपर लेक्चर द्यावे. तुम्ही आम्हाला तुमची वेळ आणि मानधन कळवा. आम्ही त्यादिवशी लेक्चर ची तयारी करून ठेऊ.
'ठीक आहे. मी कळवेन उद्या तुम्हाला'. किरण
'चालेल मी तुम्हाला माझ्या संस्थेचा पत्ता मेसेज करते'. जानवी म्हणाली.
मॅडम तुमच्या आश्रमात मी नक्की येईल पण मला एक विचारायचं होतं. किरण म्हणाली
हो विचारा ना मॅडम. जानवी.
नगरमध्ये एखादे वृद्धाश्रम आहे का? सध्या आम्ही सर्व वृद्धाश्रमांना भेट देण्याचा विचारात आहोत. म्हणून विचारले. किरण
हे ऐकून जानवी चमकली म्हणाली, हो आहे ना तुम्ही इथे या मी तुम्हाला घेऊन जाईन तिथे.
थँक्यू म्हणून किरणे फोन ठेवला.
जानवी ने त्याचे बोलणे श्रीनाथ ला सांगितले तसे श्रीनाथ लाही आश्चर्यं वाटले.
खरच इतक्या वर्षानंतर आजोबांची किरणशी भेट होईल तेव्हा त्यांना किती आनंद होईल या विचाराने दोघे सुखावले. दुसर्या दिवशी सकाळीच किरणचा जानवीला फोन आला. दुपारी चार - पाच पर्यंत मी नगरला येईन. असे त्यांनी सांगितले.
जानवी ने हो या तुम्ही आम्ही लेक्चरची सर्व तयारी करू. असे सांगितले
ती आनंदात पळत श्रीनाथ कडे गेली आणि आज किरण खैरे येत आहे असे सांगितले. जानवी लगेच स्वयंपाक घरात गेली. आज संध्याकाळच्या जेवणात आजोबांच्या आवडीचे सर्व पदार्थ बनविण्यास सांगितले. किरण खैरे यांच्या स्वागतासाठी लहान मुलांना आपल्या रुमची सजावट करायला सांगितले. आणि ती आजोबांकडे गेली
बाबा मी आज खूप खूश आहे. तुम्ही मी म्हणते म्हणून आज नवीन कपडे घाला ना. हे बघा मी आणले तुमच्यासाठी. जानवी म्हणाली
तसे आजोबा म्हणाले, जानवी बाळा सरळ सांग ना आज माझा वाढदिवस आहे आणि हे तुझ्या लक्षात आहे म्हणून तू माझ्यासाठी नवीन कपडे घेऊन आलीस बरोबर ना.
तशी जानवी मनात नाराज झाली आज बाबांचा वाढदिवस आणि आपण खरच विसरलो तिने मनातच बाबांना सॉरी म्हणले आणि म्हणाली
बाबा वाढदिवसाच्या शुभेच्छा. पण खरंच मी खूपच खुश आहे. तुम्ही आज नवीन कपडे घालून मस्त तयार व्हा असे सांगून ती कामासाठी निघून गेली. तिने बाबांसाठी एक छानसा केक ऑर्डर केला. दुपारच्या जेवणानंतर सगळे आराम करत असताना सगळ्या लहान मुलांच्या मदतीने आश्रमाच्या अंगणात टेबल सजवले. बरोबर पाच वाजता आजोबा तयार होऊन गेट जवळच्या बेंचवर बसण्यासाठी निघाले. पाहतात तर काय अंगणात इतर सगळे आजीआजोबा फ्रेंड, लहान मुले त्यांची लेक आणि श्रीनाथ जानवी सगळे जण जमले होते. आजोबा येतात सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. टेबलावर ठेवलेला केक पाहून आजोबांच्या लक्षात आले. माझ्या वाढदिवसाची जंगी तयारी त्यांनी सगळ्यांनी केलेली आहे. तसे त्यांनी श्रीनाथ जानवीला जवळ घेतले आणि त्यांचे आभार मानले.
" बाबा आपल्या लेकीचं कोणी आभार मानत का बरं?" जानवी म्हणाली
तशी त्यांची लेकही त्यांच्यासोबत आली आणि म्हणाली खरंच जानवी ताईनी खूपच छान तयारी केली वाढदिवसाची. चला आता आपण सगळे मिळून केक कापू या.
सगळे आजोबांना केक कापा, केक कापा म्हणू लागले. आजोबांची एक नजर गेट कडे गेली आणि पुन्हा मग ते टेबलजवळ निघाले. जानवी ने त्यांचे औक्षण केले. नारायणने केक कापायला सुरी आणून दिली. आजोबा केक कापणार इतक्यात प्रेमानंद गेटवर एक गाडी उभी राहिली. सगळे जण तिकडे पाहू लागले. गाडीतून एक कॉटन साडी नेसलेली स्त्री बाहेर आली. तिच्याबरोबर एक वीस पंचवीस वर्षाची मुलगी होती. आजोबा उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहू लागले. त्या स्त्रीची अंधूक आकृती जशी जवळ येत होती तसे आजोबांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटू लागले. किरण खैरे त्यांची किरण. खरंच आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना भेटायला आली होती. आजोबा घाईने पुढे गेले. त्यांना समोर पाहून किरणलाही प्रकाश ची प्रकर्षाने आठवण झाली. हे प्रकाशच आहेत ना की आपल्याला भास होतोय. किरण मनात विचार करत होती. इतक्यात आजोबांनी तिला साद घातली,
" किरण तू खरंच आली आहेस ना? "
तो आवाज ऐकून किरण च्या मनाची खात्री पटली.
" हो मी आले प्रकाश. तुला भेटायला." किरण म्हणाली
दोघांच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात आसू असं ते दृश्य होते. खूप दिवसांनी एकमेकांना पाहूनच जणू ते दोघांमधील अंतर कमी करत होते. त्यांना तसे पाहून जानवी पुढे आली आणि आजोबांना म्हणाली बाबा या त्याच किरण आहेत का? ज्यांची तुम्ही वाट पाहत होता.
तसे बाबा हो म्हणाले. हो हीच ती किरण माझी मैत्रीण. त्यांनी जानवीला किरणची ओळख करून दिली. जानवी श्रीनाथला जवळ बोलवणार. इतक्यात किरणने आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसे आजोबा अजूनच खूष झाले. म्हणाले , 'किरण तुला माझा वाढदिवस पण लक्षात आहे की ग.
किरण हसली
जानवी आणि श्रीनाथने आजोबा आणि किरण आजी दोघांना मिळून केक कापायला सांगितले. आजोबांच्या चेहऱ्यावरचा आनंद आज श्रीनाथ आणि जानवीला आपल्या वडिलांप्रती असलेल्या कर्तव्यपूर्तीचा आनंद देऊन गेला.
खऱ्या अर्थाने आज आजोबांच्या प्रेमानंदाचे रहस्य जानवी आणि श्रीनाथ यांच्याबरोबरच सगळा आश्रमाला समजलं होतं.
प्रेमानंद म्हणजे - आपल्या माणसावर खूप प्रेम करा.
इतरांना प्रेम द्या .
इतरांना आनंद द्या .
इतरांच्या आनंदात आनंद मानायला शिका.
हाच तो आश्रम जिथे जानवी आणि श्री नाथला आई-बाबांचं प्रेम मिळालं. अनाथ मुलांना आजी-आजोबांचं प्रेम मिळालं. आजी-आजोबांना नातवंडाच्या लिला पाहून आनंद मिळाला. नवीन आजोबांना त्यांचेही प्रेम मिळालं आणि आता नवीन आजोबांबरोबर नवीन किरणआजी पण इथेच राहणार हे ऐकून पूर्ण आश्रमाला आनंद झाला.
विद्या रोहितमेटे.
(मी पहिल्यांदाच भागांमध्ये कथा लिहिली आहे. माझा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि काही शुद्धलेखनाच्या चुका झाल्या असतील तर सॉरी)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा