रहस्य स्यमंतकाचे.. भाग ८
मागील भागात आपण पाहिले की सुजयची आणि वल्लभरावांची एक गुप्त भाषा असते. त्या भाषेत सुजयने लिहिलेल्या काही डायर्या वल्लभरावांना मिळतात. आता बघू पुढे काय होते ते.
कृष्ण गुंफेत शिरला. आतमध्ये काळोख होता. हळूहळू तो पुढे जाऊ लागला. गुहेच्या मधोमध एक पाळणा ठेवला होता. त्या पाळण्याला तो मणी लटकवला होता. कृष्ण ते बघून हसला. तो अजून पुढे होणार तोच एक आवाज आला.
" कोण आहेस तू? तुझी हिंमत कशी झाली इथे यायची?" अस्वलासारखे दिसणारी एक व्यक्ती चिडून बोलत होती.
" मी तो मणी घेऊन जायला आलो आहे." कृष्णाच्या चेहर्यावर मिस्किल हसू होते.
" तो मणी घेऊन जायच्या आधी तुला माझ्याशी युद्ध करावे लागेल." जांबुवंत रागावला होता.
" मी प्रत्येकाची इच्छा नेहमीच पूर्ण करतो." कृष्ण हसत म्हणाला. युद्धाला सुरुवात झाली.
************
" आजोबा.." कौस्तुभने हाक मारली. कौस्तुभ गाडीच्या आरशातून त्यांच्याकडे बघत होता. त्यांच्या डोळ्यातून ओघळलेले अश्रू त्याला दिसले होते. त्यांना नक्कीच जुने काहीतरी आठवले असणार. कौस्तुभ मनात विचार करत होता. काव्याने ते बघितले.
" मला खूप भूक लागली आहे. आपण काहीतरी खायचे का?" काव्याने वातावरण बदलावे म्हणून विचारले.
" घरून काही न खाता निघालात का?" कौस्तुभ म्हणाला. भूक त्यालाही लागलीच होती. काव्या सकाळी अचानक आल्यामुळे कसेतरी आवरून ते निघाले होते. तसेही स्वयंपाकघर पूर्ण रिकामे होते. निघताना हॉटेलमध्ये काहीतरी खाऊन निघायचे असे त्यांनी ठरवले होते. घाईघाईत सगळेच राहून गेले होते. खायचे तर होते पण काव्याने सुचवल्यावर जायचे का? हा विचार डोकं कुरतडत होता. पण पोटात खेळणाऱ्या उंदरांचा दंगा वाढण्याआधी काहीतरी खाणे गरजेचे होते.
" ते आमच्याकडे अतिथी देवो भव म्हणतात म्हणून थांबतो आहे." कौस्तुभने तिच्यावर उपकार करत असल्याच्या भावात गाडी आलेल्या हॉटेलजवळ थांबवली. पण आता काव्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले.
" आजोबा, तुमच्या या विठ्ठलाचे काय करणार आता?" काव्याने आपला मोर्चा आजोबांकडे वळवला.
" त्याला पण घेणार सोबत. नैवेद्य नको दाखवायला?" आजोबा हसले. आजोबांनी मूर्तीभोवतीचा सीटबेल्ट हळूच काढला. मूर्ती काढत असताना मूर्तीचा मुकुट काव्याला हलल्यासारखा वाटला.
" आजोबा, राग येणार नसेल तर एक विचारू?"
" राग का येईल? विचार ना.."
" त्या मूर्तीचा मुकुट हलतो आहे का?" काव्याने घाबरतच प्रश्न विचारला.
" नाही ग. तुला भास झाला असेल. दरवाजा धरशील का? मी याला घेऊन बाहेर येतो."
" मी ऑर्डर देतो आहे.. या लवकर." कौस्तुभ आत जात म्हणाला.
" आजोबा, हा असाच आहे का?" काव्याने विचारले.
" असाच म्हणजे कसा?"
" खडूस.."
" नाही ग. खूप चांगला आहे माझा कौस्तुभ. त्याला ना मुलींशी बोलायची सवय नाही म्हणून."
" का? घरी त्याच्या बहिणीच्या मैत्रिणी वगैरे नाही यायच्या?"
" नाही.. या जगात आम्ही दोघेच एकमेकांना आहोत."
" ओ सॉरी.. मला माहित नव्हते." काव्या मान खाली घालत म्हणाली.
" सॉरी कशाला? ठीक आहे. आम्हाला आता सवय झाली आहे. आता जाऊयात का खायला? नाही तर तो परत ओरडायचा." आजोबा आणि काव्या हॉटेलमध्ये गेले. कौस्तुभने आधीच ऑर्डर देऊन ठेवली होती. खाणं येताच आजोबांनी आधी विठूरायाला नैवेद्य दाखवला आणि ते खायला सुरुवात करणार तोच त्यांची नजर समोर बसलेल्या मालकाच्या पाठी लावलेल्या फोटोकडे गेली. त्यांचा हात थबकला. पण बाकीच्यांना संशय यायला नको म्हणून त्यांनी खाऊन घेतले. पण त्यांची नजर मात्र त्या फोटोवर खिळली होती.
" बनशंकरी देवी ना?" आजोबांनी मालकाला विचारले.
" हो.. आमची कुलदेवता." मालकाने हात जोडले.
" आणि त्या बाजूला काय आहे?"
" ते?? त्या मंदिराच्या बाजूला असलेल्या लेण्या आहेत." तो मालक उत्साहाने सांगत होता. आजोबा एवढं काय बोलत आहेत हे बघायला कौस्तुभ तिथे आला. त्याने आजोबांना नजरेने विचारले. आजोबांनी फक्त त्याला त्या लेण्या दाखवल्या. त्या बघताच त्याला त्याच्या बाबांनी लपवलेला नकाशा आठवला. त्या नकाशातही अश्याच आकृत्या काढल्या होत्या. त्याने आजोबांकडे बघून समजले अशी मान हलवली.
" कौस्तुभ, आता जातोच आहोत तर देवीला पण जाऊयात." हात धुवून आलेल्या काव्याला बघून आजोबा म्हणाले.
" कोणती देवी?" काव्याने उत्सुकतेने विचारले.
" बनशंकरीची शाकंभरी देवी. खूप जागृत देवस्थान आहे ते." आजोबा सांगत होते.
" हो का.. मी नाही नाव ऐकले कधी." काव्या म्हणाली. आता आश्चर्यचकित होण्याची वेळ कौस्तुभ आणि आजोबांची होती.
" तू इतिहास संशोधक आहेस ना?" आजोबांनी विचारले. काव्याने नकारार्थी मान हलवली.
" मग पुरात्तवज्ञ?" कौस्तुभने विचारले. काव्याने परत नकारार्थी मान हलवली.
" मग?" दोघांनी एकत्र विचारले.
" मी फोटोग्राफर आहे. मला हेरिटेज वास्तूचे फोटो काढायचे होते म्हणून मी येते आहे तुमच्यासोबत."
" पण मग तू मला मदत काय करणार?" कौस्तुभने हतबुद्ध होत विचारले.
" तुम्ही जे काही कराल त्याचे मी शूटिंग करेन. तेच बाबांना पण वापरता येईल. म्हणजे त्यांना हवे आहे त्याच पद्धतीने मी शूटिंग करणार आहे. तेवढीच तुम्हाला मदत." काव्याने स्पष्टीकरण दिले.
" मदत की त्रास?" कौस्तुभ पुटपुटला.
" काही बोललास?" काव्याने विचारले.
" माझी हिंमत? चला गाडीत बसा. आजोबा आपण देवीला चाललोच आहोत तर मग तिकडच्या लेण्याही बघूयात का?"
" चालेल. पण काव्या तुला चालणार आहे का?"
" मला जेवढे जास्त फोटो काढता येतील तेवढे हवेच आहेत. फक्त बदललेल्या प्लॅनबद्दल घरी सांगावे लागेल. " काव्या फोन हातात घेत म्हणाली.
बदामीला नक्की काय असेल? मिळेल का दुवा पुढे जायचा? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
कृष्णार्पणमस्तु
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा