Login

रहस्य स्यमंतकाचे... भाग १३

कथा स्यमंतकाची
रहस्य स्यमंतकाचे.. भाग १३

मागील भागात आपण पाहिले की कौस्तुभ हंपीच्या विठ्ठलमंदिरात येतो. जिथे विठ्ठलाची मूर्ती नाहीये. आता बघू पुढे काय होते ते.


" धाकल्या, शतधन्वाला शासन झाले. पण ज्या मण्यामुळे एवढा गोंधळ होतो. ते मणीरत्न मला दाखव ना." बलराम कृष्णाला म्हणाला.

" दादा, ते दाखवायला माझ्याकडे तर पाहिजे ना. ते घेऊन अक्रूरकाका काशीला जाऊन बसले आहेत." कृष्ण नेहमीच्या स्वरात बोलला.

" एका साध्या मण्यासाठी माझ्याशी खोटं बोलतो आहेस? नाही दाखवायचे तर तसे सांग." बलराम चिडला होता.

" दादा, मी आजपर्यंत तुझ्याशी कधी खोटं बोललो आहे का? मणी खरंच माझ्याकडे नाहीये." कृष्ण समजावण्याचा प्रयत्न करत होता.

"नको दाखवूस. मला तुझा मणीही नको आणि द्वारकाही नको. मी चाललो इथून." कृष्णाचे काहिही न ऐकता बलराम निवडक यादवांना हाताशी धरून तिथून निघून गेला. कृष्ण हताशपणे बघत राहिला.

******************


" काव्या, काय झाले?" फोन हातात धरून उभ्या असलेल्या काव्याला कौस्तुभने विचारले.

" बाबा.." काव्या म्हणाली.

" काय झाले सरांना?"

" ते कालपासून घरी आले नाहीत. त्यांचा फोनही बंद आहे. आई खूप घाबरली आहे. दादाही परदेशात असतो. आई अगदी एकटी पडली आहे. मला जायला हवं." काव्या घाबरली होती.

" काव्या.. शांत हो. तू परत एकदा सरांना फोन करून बघ. आणि मग ठरव." कौस्तुभ तिला पाणी देत म्हणाला.

" मी फोन करते." काव्याने फोन लावला. तिचा फोन लागला. " डॅड, आहात कुठे? आई कधीचा फोन लावते आहे तुम्हाला. ओके. कळवते तसं आईला. काळजी घ्या. हो. मी आता हंपीला आहे. बरं.." काव्या बोलत होती. तिने फोन ठेवला. आता तिच्या चेहर्‍यावर हसू होते.

" काय झाले?"

" अरे बाबांना अचानक काल रात्री बाहेर जावे लागले. चार्जर नव्हता म्हणून मोबाईल बंद पडला. आता कसातरी चार्जर शोधून मोबाईल चार्ज केला आणि फोन सुरू झाला. ही आई पण ना." काव्या आईला फोन करायला बाहेर गेली. कौस्तुभने सुस्कारा सोडला. तो परत गर्भगृहाकडे वळला. तिथे थोडा अंधार होता. आत मूर्ती नसल्याने कोणीच पर्यटक दिसत नव्हते. तो विचार करत होता, नरसिंह आणि विठ्ठल. हेच का? त्याने आतल्या गर्भगृहाचे निरीक्षण करायला सुरुवात केली. आतमध्ये मोठमोठे खांब होते. प्रत्येक खांबावर व्यालशिल्पे होती. म्हणजे तोंड एका प्राण्याचे तर शरीर दुसर्‍या. तो बघत होता. आणि त्याला ते दिसले. दशावतार.. तसेच जसे त्याच्याकडे असलेल्या किल्ली वर होते , तसेच जसे अनंतविष्णूच्या लेणीमध्ये होते. म्हणजे खजिना आहे. आईबाबांना त्याचाच शोध लागला होता की सापडला होता? मला सापडेल का? कौस्तुभ विचार करत होता.

" किती बरं वाटलं." काव्या म्हणाली.

" काय?" कौस्तुभ दचकला.

" अरे, आईबाबांशी बोलून बरं वाटलं. अजून किती वेळ थांबायचं इथे? मला आता भूक लागली." काव्या बालिशपणे म्हणाली. ते बघून कौस्तुभला हसू आले.

" तुझे वय अठरा तरी पूर्ण आहे का ग? म्हणजे सतत लहान मुलांसारखी वागत असतेस."

" ओय.. तेवीस वर्षांची आहे मी. आणि एक प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणून प्रसिद्ध आहे. फक्त तुझ्यासोबत रहायला मिळावं म्हणून इथे आले आहे." शब्द तोंडातून जाताच काव्याने जीभ चावली.

" काय म्हणालीस?"

" काही नाही." काव्या जायला वळली. कौस्तुभने तिचा हात पकडला.

" मी ऐकलं.. परत सांग." काव्याने एक दीर्घ श्वास घेतला. आणि बोलायला सुरुवात केली.

" त्या दिवशी बाबांच्या केबिनमध्ये तुला बघितलं आणि जणू तुझ्या प्रेमात पडले. किती वेळ त्यांना मस्का लावला त्यानंतर तुझी माहिती मिळाली. मग मीच तुझ्या प्रोजेक्टमध्ये कशी तरी जागा मिळवली. आणि आता इथे तुझ्यासोबत आहे."

"खरं?" कौस्तुभने विचारले.

" हो.. पण तू आहेस की तुला याबद्दल काही वाटतच नाही. सतत आपलं हे शिल्प आणि ते शिल्प." काव्या वैतागून म्हणाली.

" ते तर माझं आयुष्य आहे. आत्ताच त्याला वैतागलीस तर पुढे कसं होणार तुझं?" कौस्तुभ हसत होता.

" म्हणजे.. तू ?" काव्याचा आनंद गगनात मावत नव्हता.

"हो.. मी पण.. आधी आवडत नव्हतीस. पण आत्ता आवडू लागली आहेस." कौस्तुभ मस्करी करत होता.

" तू पण ना.. चल आजोबांना सांगूया."

" ते माझे आजोबा आहेत. त्यांनी आधीच ओळखलं आहे. म्हणून तर आपल्या दोघांना सोडून काल एकटेच पुढे गेले होते."

आपल्या प्रेमाची कबुली देत दोघेही तिथून निघाले. हॉटेलवर आले तर आजोबा कोणाशीतरी फोनवर बोलत होते. त्यांचा चेहरा थोडा गंभीर दिसत होता म्हणून दोघांनीही त्यांच्याशी बोलणं टाळलं. जेवून सगळेजण आराम करायला गेले. कौस्तुभ मात्र बेचैन झाला होता. त्याच्या डोळ्यासमोर फक्त ते विठ्ठलमंदिर आणि त्यासमोरील नरसिंह येत होता. शेवटी तो बाहेर पडलाच. थोडं चालल्यावर त्याने रिक्षा केली. संध्याकाळ झाल्यामुळे पर्यटकांची संख्या घटली होती. तुरळक लोकं तिथे फिरत होते. त्याने रिक्षा विठ्ठलमंदिरापाशी घ्यायला सांगितली. सगळीकडे संधीप्रकाश पसरला होता. रिक्षावाल्याला बाहेर थांबायला सांगून कौस्तुभ आत गेला. नरसिंहाची मूर्ती समोर गर्भगृहाकडे इशारा करत होती. वेळ जास्त नव्हता. आत मधल्या खांबावर असलेले हत्ती आणि घोडे एकमेकांच्या विरूद्ध दिशा दाखवत होते. दोन्ही खांबांच्या इथे दशावतार कोरले होते. कौस्तुभ घोड्याचे तोंड ज्या खांबाकडे दाखवत होते त्या खांबाजवळ गेला. त्याने ती पट्टी तिकडच्या फटीत टाकली, फिरवली. पण काहीच झालं नाही. शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने ती पट्टी हत्तीचे तोंड समोर असलेल्या फटीत घातली. हा दरवाजा उघडला तर ठीक. नाहीतर आपण आणि आपलं काम. कौस्तुभने स्वतःला सांगितले.

कौस्तुभने किल्ली फिरवली. खांब फोडून जसा नरसिंह बाहेर आला होता त्याचप्रमाणे तो खांब दुभंगला. आणि खाली तळघरात जाणारा रस्ता दिसू लागला.


" जे बापाला जमले नाही, ते लेकाने करून दाखवले. खात्री होती मला." पाठून आवाज आला.


त्या तळघरात खरंच खजिना असेल? कोण असेल ती व्यक्ती जी कौस्तुभच्या वडिलांपासून खजिन्याच्या शोधात आहे? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

कृष्णार्पणमस्तु

🎭 Series Post

View all