Login

रहस्यमयी गावाची वाट | लघुकथा | भयकथा

It Is A Story About Village Haunted Way Which Takes People Towards Haunted Village.
स्पर्धेसाठी रचना

रहस्यमयी गावाची वाट

"अरे बंट्या किती वर्षांनी आलो रे गावी कसलं भारी वाटतंय सांगू."

"अरे मग येत जायचं ना अधून मधून किती वर्ष झाले गावाकडे तोंड दाखवल नाहीस."

"हो रे पण शाळा संपली मग कॉलेज आणि मग जॉबमुळे कधी येणं शक्यच झालं नाही गावी, पण आता आलोय खूप धमाल करू आपण."

राहुल बऱ्याच वर्षांनी गावी आला होता त्याचा बालमित्र बंटी त्याला गावात आणण्यासाठी नदी पलीकडे होडी घेऊन आला होता. इतक्या वर्षांनी भेटल्यावर दोघांच्या छान गप्पा रंगल्या.

राहुल एकटाच त्याच्या घरच्यांशिवाय आला. त्याला त्याच्या आज्जी आजोबांना भेटायचे होते सोबतच मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम हवा होता. तो रात्रीच्या एसटीने प्रवास करून सकाळी लवकरच पोहोचला. बंटी त्याला नदी होडी नदी पार करून गावात घेऊन आला.

काही वेळातच ते दोघे राहुलच्या गावच्या घरी पोहोचले त्याचे म्हातारे आज्जी आजोबा अंगणातच त्याची वाट बघत उभे होते. त्याला येताना बघताच त्याची आज्जी बोलू लागली,"आलास व्हय लेकरा ये ये..."

त्याने येऊन त्यांचे दोघांचे पाय शिवले. आज्जीने लाडाने त्याचा मुका घेतला. सर्वत्र आनंदच वातावरण झालं. ते दोघे त्याला घरात घेऊन गेले. बंटी काम संपवून पुन्हा येण्याचं सांगून निघून गेला. आज्जी आजोबांनी नातवाचे खूप लाड पुरविले. तो कित्येक वर्षांनी त्यांच्याकडे आला होता म्हणून त्यांच्या आनंदाला सीमा नव्हती. ते सगळ्यांची विचारपूस करू लागले.

"राहुल्या संध्याकाळी शेतावर जाऊ की, नानांसोबत शेती बघू आणि तिथेच मस्त जेवण करू."
बंटी राहुल आणि त्याच्या आजोबांना म्हणाला.

बंटी त्यांचं काम संपवून पुन्हा येऊन राहुल सोबत बसला तिथे त्याचे आजोबा देखील होते त्याने सगळे नाना म्हणत असत. गावातील त्यांना खुप मान देत असे.

संध्याकाळ होण्याआधीच ते सगळे शेताकडे जाण्यासाठी निघाले. आज्जी देखील त्यांच्या सोबत निघाली. त्यांनी सोबत जेवणाच सामान घेतलं. त्यांच्या सोबत राहुलचे आणखीन जुने दोन मित्र सोबत होते.

सुमारे संध्याकाळी ४ वाजता ते जाण्यासाठी निघाले. राहुल गप्पा मारत वाटेतील झडांवरची फळे तोडत सर्वात पुढे चालू लागला. इतक्यात त्याला त्याच्या कानांवर हाक ऐकू आली,"राहुल्या थांब लेकरा ती वाट नव्हं आपलं शेत ह्या बाजूला हाय."
तो आवाज त्याच्या आजोबांचा होता. ते ऐकून राहुलने वाट बदलली.

बऱ्याच वर्षांनी गावी आल्यामुळे तो बहुतेक वाटा विसरला होता. त्याने वाट बदलली पण त्याच्या डोक्यात लहानपणी ची आठवण आली. लहानपणापासून ह्या वाटेवरून कोणी कुठे येत जात नसे. त्याला ही इथे जाण्यास आजोबांनी आता पुन्हा एकदा सक्त मनाई केली.

' पण का आडवल असेल नानांनी तिथे जाण्यापासून? का जात नसतील त्या वाटेने लोक पुढे? इतक्या वर्षात कोणीच तिथून आलं गेलं नसेल का? कोणी ह्या विषयी नीट सविस्तर सांगितले सुद्धा नाही' असे अनेक प्रश्न त्याच्या मनात येऊ लागले. पण मित्र सोबत असल्यामुळे त्याला जास्त विचार करायला वेळ देखील मिळाला नाही. तो सगळ्या लोकांवर आणि विचारांवर तसाच मनातल्या मनात हसून पुढे निघून गेला.

काही वेळातच ते त्यांच्या शेतावर पोहोचले आजोबांनी त्याला जगेबद्दल शेतीबद्दल सगळी माहिती सांगितली. मग ते आज्जीला जेवण बनवायला मदत करू लागले. बाकी मुलांनी आज्जीला चूल मांडून दिली.

मग राहुल आणि त्याचे मित्र थोडं बाजूला असलेल्या रानात फळं खाण्यासाठी गेले.
' जास्त लांब जाऊ नका '
असं आजोबांनी त्यांना आधीच बजावून सांगितले होते. काही वेळातच आज्जीच एकच मसाले भात तयार झाला. तेव्हाच रानातून फिरून मुलं देखील परत आली.

सगळ्यांना फारच भूक लागली होती. त्यातच आज्जीच्या भाताच्या सुगंधाने सर्वांची भूक दुप्पट झाली. सर्वांनी टोपातून गरम गरम भात आपापल्या ताटात काढून घेतला. लाडक्या राहुलला मात्र आज्जीने वाढून दिले. सर्वांनी बोठं चाटून ताटातील भात संपवला. सर्वांची पोटे अगदी तुडुंब भरून गेली.

बघता बघता संध्याकाळ सरू लागली. दिवस भरचा थकलेला सूर्य डोंगरामागे गुडूप झाला. त्याच्या उरलेल्या प्रकाशात आजोबांनी घरी निघायचं ठरवलं. ते सगळे आणलेलं सामान घेऊन पुन्हा घरी जाण्यास निघाले.

निघता निघता अंधार पडू लागला. आज्जी आजोबा ह्या वेळी पुढे चालू लागले. राहुल आणि त्याची मित्र मंडळी मागून चालू लागली. चालता चालता ते त्याच वाटे जवळ पुन्हा पोहोचले. अमावस्या जवळ आली असल्यामुळे आता चांगलाच अंधार पडू लागला. ते सगळे टॉर्चच्या उजेडाचा वापर करू लागले.

तिथून चालत असतानाच सर्वात शेवटी चालत असलेल्या राहुलला त्याच्या नावाची हाक ऐकू आली. पण त्याला तिथे कोणीच दिसले नाही. पुन्हा काही पाऊल चालत पुढे गेल्यावर त्याला तोच आवाज ऐकू येतो त्याने तसच मागे फिरून कोण असल्याचं बघितलं. तर ज्या वाटेवर त्याला आजोबांनी जाण्यास बंदी घातली होती जिथे तो बहुतेक गेलाच होता तिथे झाडाच्या मागे त्याला एक आकृती उभी दिसली. ती कोण असल्याचं बघण्यासाठी तो सगळ्यांची साथ सोडून त्या दिशेला चालू लागला. सगळे अंधारात घरी पोहोचण्याच्या घाईत पुढे निघून गेले. तो तसाच त्या वाटेवर जाऊ लागला.

त्या वाटेच्या सुरुवातीला त्याने पाऊल टाकलं आणि त्याला झटकन कोणी तरी हात धरून मागे ओढले. तो मागे झाला. त्याला मागे ओढणारे त्याचे आजोबा होते. ते त्याला न काही बोलता तसाच हाताला धरून घराच्या दिशेला घेऊन जाऊ लागले.

घरी आल्यावर त्याला समोर उभा करून म्हणाले," का गेला होता परत त्या वाटेवर? नको सांगितले होते ना." आजोबा चिडलेले बघून तो बोलू लागला,"आजोबा मी लघवीसाठी थांबलो होतो अंधारात मला नाही समजलं तिचं वाट आहे ते."

आजोबा त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले,"लेकरा जपून र ती वाट घात करते तू चार दिस आलाय इथ नीट राहून जा माघारी." आजोबांना होकार देऊन त्यांची माफी मागून तो झोपायला गेला. पण आजोबांच्या चेहऱ्यावरची काळजी तशीच दिसत होती.

राहुलचे सगळे मित्र दुसऱ्या दिवशी भेटायचं बोलून आपापल्या घरी निघून गेले. त्या नंतर राहुल आणि त्याचे आज्जी आजोबा शांत झोपी गेले.

पण रात्री सुमारे १ ३० वाजता राहुलला अचानक जाग आली. तो जागेवरच उठून बसला. त्याला पुन्हा त्याच्या कानावर तोच आवाज ऐकू येऊ लागला.

तो आवाज दरवाजाच्या दिशेने येत होता. तो उठून दरवाजाकडे गेला. आज्जी आजोबांना कळायला नको म्हणून हळूच दरवाजा खोलून घराच्या बाहेर आला.

पण बाहेर त्याला कोणी दिसले नाही. त्याच्या नावाने अजूनही कोणी तरी त्याला बोलावत होत. घराच्या काही अंतरावर झाडीत त्याला तशीच आकृती दिसू लागली पूर्वी दिसली होती तशी.

ते कोण असल्याचं बघण्यासाठी तो तिच्या जवळ जाऊ लागला. पण तो जसजसा जवळ जात होता. तस तशी ती आकृती त्याच्या पासून लांब जाऊ लागली. तो ही त्या आकृतीच्या मागून जाऊ लागला. बाहेर सर्वत्र अंधार होता तरी त्याला तो कसा चालतो आहे? कुठे जातो आहे? त्याच भान नव्हत.

अचानक एका जागे वर येऊन ती आकृती अदृश्य झाली. तसा तो अजू बाजूला सगळी कडे बघू लागला. तेव्हाच काय माहीत कस त्याला त्याच्या अवती भवती एक गाव दिसू लागलं. तिथली घरं जुनी होती. तिथे वाटेवर काही लोकं चालत होती. त्याला काहीच समजेनासे झाले.

तो काही लोकांजवळ जाऊन तो कुठे असल्याचं विचारू लागला, ती जागा कोणती असल्याचे विचारू लागला पण त्याला कोणीच काहीच उत्तर देईना. तो तसाच विचार करत असताना अचानक त्याला लोकांचा आरडाओरडा ऐकू आला तो आणखीनच घाबरून गेला.

तसाच ओरडा चालू असताना त्याच्या आजूबाजूच्या घरांनी पेट घेण्यास सुरुवात केली. सगळी लोक इथून तिथून धावत होती. सर्वत्र माणसांच्या जनावरांच्या किंचाळ्या उठल्या होत्या. त्याला आता सगळ असह्य झालं काय करावे समजेनासे झाले. तो दोन्ही कानांवर हात ठेवून तसाच रडत खाली बसला. आणि देवाचे नामस्मरण करू लागला.

तेव्हा त्याला त्याच्या खांद्यावर कोणाचा तरी हात जाणवला. त्याच्या मागे हातात टॉर्च घेऊन त्याचे आजोबा उभे होते. तो तसाच उठून त्याच्या आजोबांना बिलगला.
तो काही विचारणार बोलणार इतक्यात त्याचे आजोबा त्याला इतकंच म्हणाले,"चल इथून बघू कोण काय करतो ते." ते त्याला तिथून घेऊन माघारी चालू लागले.

चालताना कोणी एक शब्दही बोलले नाही तो फक्त त्याच्या आजोबांच्या गंभीर चेहऱ्याकडे बघत राहिला. चालता चालता ते एका मुख्य वाटेवर आले आता त्याला टॉर्चच्या उजेडात सगळ नीट दिसत होत. ते दोघे मुख्य वाटेवर आले. तो मगाशी अंधारात त्या आकृती मागे त्या रहस्मायी वाटेवर गेला होता.

बाहेर येऊन त्याच्या आजोबांनी मागे वळून पाहिले तर तिथे बऱ्याच आकृत्या ह्या दोघांना जाताना बघत उभ्या होत्या. ते सरळ त्याला गावच्या देवळात घेऊन गेले.

त्याला देवा समोर बसवून त्यांनी त्याला देवाचा अंगारा लावला आणि त्याच्या बाजूला बसून दोघांनी हात जोडून देवाचे आभार मानले.

मग राहुल त्याच्या आजोबांना विचारू लागला,"नाना काय होत ते सगळ आणि तुम्ही तिथे कशे अलात?"

त्यावर त्याचे आजोबा बोलू लागले,"आरं लेकरा वाचलास तू, ह्या देवानं मला उठवलं येऊन बोलला ' नाना झोपलास काय? उठ बघ तुझं लेकरू संकटात गेलंय उठ आणि जा वाचावं त्याला घाबरु नकोस मी आहे तुझ्या सोबत ' मग मी उठलो तू घरात नाहीस हे बघून समजलं आणि घरात असलेली हे आपल्या देवाची वस्तू सोबत घेऊन आलो. आणि हा प्रकार म्हणालास तर खूप वर्षांपूर्वी त्या वाटेने पुढे जाऊन एक वस्ती होती. त्या वस्तीची जागा हवी म्हणून गावच्या पटलान ती वस्ती एका रात्री जाळून टाकली त्यात बरीच माणसं मारली गेली. नंतर पाटील पण काही वाचला नाही, तो ही त्याच जागेत जळून मेला कसं ते कुणाला ठाऊक नाही."

आजोबांचं बोलणं राहून नीट ऐकत होता. त्यांचं बोलणं होताच तो पुढे विचारू लागला," मग नाना कोणी ह्याबद्दल काही करत का नाही ती वाटच बंद का नाही करत?"

त्यावर ते पुन्हा बोलू लागले,"केलं र पोरा लय प्रयत्न केलं पण कशालाच यश नाही जो ती वेस ओलांडून जाईल त्याच खरं नाही. शेतातून घरी येताना तू ती वेस ओलांडली होतीस म्हणून तू तिथे ओढला गेलास. चल आता घाबरायच कारण नाही घरी जाऊ आपण, घरी जाऊन झोप तू शांत धोका टळला आहे आता आणि ह्यो आहे आपल्या सोबतीला." असं बोलत आजोबा स्मित करत राहुल सोबत घरी जाण्यासाठी निघाले. पण राहुलला आता कळलं तो किती मोठ्या संकटातून वाचला तो, आणि त्याच्या मनात चांगलीच भीती बसली त्या,

' रहस्यमयी गावाच्या वाटेची '.