Login

रहस्याच्या पलीकडे... भाग - २

परंपरेचे संरक्षण.
रहस्याच्या पलीकडे... भाग - २


सिया दुसऱ्या दिवशी शाळेत गेली तेव्हा तिच्या मनात अजूनही मागच्या रात्रीचे प्रसंग धावत होते, टेरेसवरील अंधार, तो गूढ “संरक्षक”, आणि ती सावलीसारखी पळून जाणारी दुसरी व्यक्ती. वर्गात बसूनही तिचं लक्ष काही लागत नव्हतं.

पहिल्या तासातच मराठीचा प्रोजेक्ट शिक्षकांनी जमा करायला सांगितला. सियाने व्यवस्थित सर्व तपासून आपली वही पुढे दिली. हातातून वही सुटतेय तेव्हा तिच्या मनात एक प्रश्न पुन्हा चमकून गेला,‌ “त्या दुसऱ्या व्यक्तीने माझ्या वहीतून काही पाहिलं असेल का?”

वही शिक्षकांकडे गेल्यावर ती थोडी शांत झाली.
पण फक्त काही क्षणासाठी.

लंच ब्रेकला सिया कॅन्टीनकडे जात असताना तिला कोणी तरी तीच्याकडे पाहतंय असं जाणवलं. ती थांबली. गर्दीत एक काळा हुडी घातलेला मुलगा तिला पाहत होता. तो नजर चुकवत फोनकडे बघण्याचा अभिनय करू लागला.

सियाला क्षणातच ती टेरेसवरील सावली आठवली.
“हा तोच आहे का?”

ती पुढे गेली नाही. हुडी घातलेला मुलगा मात्र तिच्या दिशेने सरकू लागला. सियाने लगेच मागे वळून लाइब्रेरीकडे धाव घेतली. तिथे विद्यार्थ्यांची गर्दी होती, म्हणून तिला थोडं सुरक्षित वाटलं.

पण दहा मिनिटांनी तोच मुलगा लाइब्रेरीतही दिसला.
तो तिच्याजवळ आला. सियाचं हृदय धडधडू लागलं.

“तू… तू माझ्या मागे का फिरतो आहेस?” सियाने थरथरत्या आवाजात विचारलं.

मुलगा एकदम हात वर करून म्हणाला,
“अरे थांब! मी काही तुला घाबरवायला आलेलो नाही! मी आरव… आणि मला फक्त एकच गोष्ट विचारायची होती.”

सिया सावध झाली. “काय?”

आरवने हळू आवाजात म्हटलं, “काल तुझ्या बिल्डिंगच्या टेरेसवर कोणासोबत होतीस तू?”

सियाचे डोळे मोठे झाले. त्याला माहीत होतं!

लाइब्रेरीच्या एका टेबलावर दोघे बसले. सिया अजूनही सावध होती, पण आरवचा स्वभाव शांत वाटत होता.

आरव म्हणाला, “मी काल माझ्या मित्राला भेटायला तुझ्या परिसरात आलो होतो. त्याच्या बिल्डिंगच्या टॉपवरून वरती काही हालचाल दिसत होती. मला वाटलं कुणी अडकलेलं असेल… म्हणून मी पहायला गेलो.”

सिया, “आणि मग?”

आरव, “मी जिना चढत होतो तेव्हा वरून दोघांची बोलण्याची चाहूल आली. तू आणि एक मोठा माणूस. तुझ्या हातात वही… आणि त्याच्या हातात काहीतरी लाल चिन्ह होतं.”

सिया थक्क झाली. तु सर्व पाहिलं होतं?

आरव पुढे म्हणाला, “मी वर पोहोचण्याआधीच कोणीतरी टेरेसच्या मागच्या बाजूने पळत उतरलं. मी त्याचा चेहरा नीट पाहू शकलो नाही. म्हणून मी घाबरून खाली पळालो. पण आज तुला पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं".

सियाने खोल श्वास घेतला. “पण मला एक गोष्ट सांग… तू कोण आहेस? आणि त्या माणसाबद्दल तुला काही माहिती आहे का?”

आरव काही क्षण शांत झाला. मग हळू आवाजात म्हणाला, “हो. कारण माझ्या कुटुंबाचंही त्या परंपरेशी काहीतरी नातं आहे.”

सिया गोंधळली. “म्हणजे?”

आरव म्हणाला, “माझे आजोबा ‘काळोखं व्रत’ पाळणाऱ्या गावांपैकी एका गावचे होते. ते सांगत असत की काही लोकांनी त्या परंपरेचं चुकीचं रूप बनवलं आणि ती भीतीदायक असल्याचं पसरवलं. त्यांना त्याचा विरोध करायचा होता.”

सिया थोडी रिलॅक्स झाली. म्हणजे हा काही वाईट माणूस नाही.

आरव पुढे म्हणाला, “काल तुझ्यासोबत असलेला माणूस… मला माहित नाही तो कोण आहे. पण माझ्या आजोबांनी सांगितलं होतं की काही ‘संरक्षक’ आजही असतात. ते परंपरेचं योग्य अर्थाने संरक्षण करतात.”

सियाच्या पोटात गोळा आला. “तुला वाटतं तो ‘संरक्षक’च असेल?”

आरव मान हलवून म्हणाला, “कदाचित. पण तुला त्याने माहिती का दिली, हे मला समजत नाही.”

सियाने वही बद्दल सगळं सांगितलं, लाल मोर चिन्ह, नवीन माहिती, आणि टेरेसवरची सावली.

आरव एकदम ध्यानात मग्न झाला. काही क्षणांनी तो म्हणाला, “ते लाल चिन्ह… ते साधं मोर नाही. ते एका जुन्या मंडळाचं चिन्ह आहे, ‘नित्यरक्षक मंडळ’. माझ्या आजोबांनी त्याचा उल्लेख केला होता.”

सियाने विचारलं, “म्हणजे हा मंडळ अजूनही अस्तित्वात आहे?”

आरवच्या चेहऱ्यावर काळजी दिसली. “हो, आणि ते खूप गोपनीय आहे. कुणालाही सहज भेटत नाहीत. पण जर तुला त्यांनी माहिती दिली असेल, तर त्याचा अर्थ मोठा आहे.”

सिया आश्चर्यचकित झाली, “याचा काय अर्थ?”

आरव, “तू आता त्या परंपरेची ‘वाहक’ झाली आहेस, अर्थात, तिची योग्य माहिती पुढे नेणारी व्यक्ती.”

सियाचं मन सुन्न झालं.‌ हा सर्व एवढा मोठा विषय आहे? मीच का?

त्या दुपारनंतर सिया वर्गात परतली. तिला वाटलं की आता थोडंसं तरी स्पष्ट झालंय. आरवसोबतचा संवाद तिला थोडा धीर देऊन गेला.

पण शाळा सुटली तेव्हा बाहेर उभं राहून पाहतांना तिला काहीतरी विचित्र दिसलं, रस्त्याच्या पलीकडे एक पांढरा स्कूटरवर बसलेला व्यक्ती तिच्याकडे पाहत होता. त्याने हेल्मेट घातलं होतं, चेहरा दिसत नव्हता.

आरव तिच्या बाजूला आला आणि त्या दिशेने पाहिलं.
तो हलक्या आवाजात म्हणाला, “तो सकाळपासून तुला फॉलो करत आहे.”

सिया घाबरली, “आता काय करू?”

आरव ठाम आवाजात म्हणाला,‌ “आपल्याला त्या ‘संरक्षकाला’ पुन्हा शोधावं लागेल. तोच आपल्याला सांगू शकेल की हा कोण आहे… आणि तुला धोका का निर्माण झाला.”

सिया त्याच्याकडे बघत होती भीती, जिज्ञासा आणि गोंधळ यांचं मिश्रण तिच्या मनात सुरू होतं.

त्या क्षणी तिच्या मनात एकच विचार होता,
“माझी वही गायब झाली तेव्हा ही फक्त एक छोटी चूक वाटत होती… पण खरं तर हे सगळंच काहीतरी मोठ्या गोष्टीची सुरुवात आहे.”