राहून गेलेलं काही..!

This is one of the experience in school days

             मी सहावीत असेन तेव्हा... मी आणि माझ्या तीन मैत्रिणी -मानसी, रिमा आणि सुप्रिया वर्गात रिकाम्या तासाला गप्पा मारत होतो. वर्गात मी खुपच हुशार ( अस मला वाटे???? ) आणि ही हुशार मुलं स्वतःला नम्र , सालस भासवण्यात खूप पटाईत असतात...!!
रिकामा तास म्हणजे गप्पा रंगतात. आणि तो किलबिलाट शाळेत निनादत असतो. गप्पांच्या नादात अस लक्षात आलं की मुलींमध्ये फक्त मलाच शीळ वाजवत येते. आता आपल्याला जे येत ते दुसऱ्याला शिकवलच पाहिजे हा माझा बाणा होता तेव्हा...त्यामुळे मी बाकीच्यांनाही शीळ कशी वाजवावी याचे प्रशिक्षण देणे सुरू केले..
आमची मराठी शाळा..एकाच हॉल मध्ये पार्टीशन टाकून केलेले चार वर्ग. तीन वर्गात पाचवी ,सहावी , सातवी आणि एका वर्गात ऑफिस तिथे आमचे केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक असायचे.
शीळ वाजवायचा तास खूप रंगला...जवळ 10-12 शीळ वाजवून झाल्या..
आणि एक करडा आवाज वर्गात घुमला.

" कोण शीळ वाजवत होत...??"

साक्षात केंद्रप्रमुख वर्गात होते..

वर्गात टाचणी शांतता पसरली होती. अशावेळी आम्ही एकीच्या बळाने उभे राहत असू. बावीस मुलांपैकी एकही जण नाव सांगायला तयार नव्हतं की शीळ कोण वाजवत होतं...!
माझ्यावर संशय यायचा दुरान्वये संबंध नव्हता. कारण इतर वेळीचा शांत संयमी चेहरा ..! मी शीळ वाजवली अस मी स्वतः म्हणाले असते तरी गुरुजींनी मला निरागसपणे निरागस समजून खाली बसवलं असतं.

कुणी नावही सांगत नव्हत कुणाचा आणि मान्य ही करत नव्हतं.

गुरुजी गरजले,

" आता तोंड उघडले नाही तर सगळ्याना पट्टीने फोडून काढेन..."

पण वर्ग तसाच शांत होता.

प्रत्येक वर्गात चार डोकी अशी असतात की संशयाची सुई नेमकी तिकडे फिरते... तशीच ती चार डोकी आमच्याही वर्गात होती...आणि या चार डोक्याचा एक म्होरक्या असतो..... तो होता रमेश सावंत..!

वर्गात कुणीच उत्तर देत नाही म्हटल्यावर गुरुजींनी रमेशनेच शिट्टी वाजवली असाच ग्रह केला आणि त्याच्या ३-४ कानशिलात लगावली.

त्याला माहित होतं शीळ कोण वाजवत होत..आणि तो सांगूही शकला असता माझं नाव..!

त्यावर कुणाचा विश्वास बसला नसता ही एक वेगळी बाजू होती..!

पण त्या माझ्या मित्राच्या श्रीमुखात बसत असताना मी शीळ वाजवली अस म्हणायचं धाडस मी नाही दाखवू शकले....!
खूप लाज वाटली होती मला तेव्हा स्वतःची..!!

त्याला खूप वर्षांनी मी ही गोष्ट सांगून सॉरी म्हटलं ... अर्थात त्याने त्याचा राग कधीच मनात ठेवला नव्हता.

"इतर वेळी आम्ही स्वतःसाठी मार खात होतो कधीतरी तुझ्यासाठी खाल्ला.."

अस म्हणून तो मिश्किल हसला.

पण तेव्हा मात्र मार त्याने खाल्ला आणि जाळ माझ्या कानाखाली निघाला होता...!

अजूनही मला तो जाळ अधून मधून जाणवत असतो..!!


समाप्त