Login

राजेंचा सोबती

रायगड बोलतोय अशी कल्पना करून लिहिलेले लेख
मी रायगड बोलतोय..(लेख)

शिवयुगाचा साक्षीदार, महाराष्ट्राचे लाडके दैवत, रयतेचे कैवारी, जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुखदुःखांचा साथीदार, मी रायगड बोलतोय.

आश्चर्य वाटलं का, मी कसा काय बोलू लागलो? बाळांनो, कित्येकदा तुम्ही येतात, माझा सर्व परिसर पाहता. इतिहासाच्या खाणाखुणाही तुम्ही इथे पाहता. त्याच गोष्टी आज तुम्हाला सांगावं म्हणतोय. म्हणजे असे म्हणा की मी माझी कहाणी सांगतो आहे, ऐकताय ना, मग.

मी महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कुशीत वसलो आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये माझी खास अशी ओळख निर्माण झाली ती प्रसिद्ध असा किल्ला म्हणून तेही राजेंमुळे. माझे प्राचीन नाव 'रायरी' हे होते. युरोपचे लोक मला 'पूर्वेकडील जिब्राल्टर' असे म्हणत. मी सर्वांच्या दृष्टीने अजिंक्य व दुर्गम असा गड. पाचशे वर्षांपूर्वी मी गडाच्या स्वरूप नसून फक्त एक डोंगर होतो. माझी उंची, आकार व सभोवतालच्या दऱ्या यावरून मला 'नंदादीप' असेही म्हटले जायचे. निजामशाहीत माझा उपयोग कैदी ठेवण्यापुरताच होत असे. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून माझ्याकडे राहायला आला. आपल्या राजेंनी ६ एप्रिल १६५६ मध्ये मला वेढा घातला व मे महिन्यात राजेंनी मला ताब्यात घेतले. गडाचे रूप मला आपल्या राजेंमुळे मिळाले. त्याचवेळी कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरला निघाल्याची बातमी महाराजांना समजली तेव्हा त्यांनी तो खजिना लुटून येथे आणला व त्याचा उपयोग माझ्या बांधकामासाठी केला म्हणजे मला गड करण्यात केला.

माझा माथा राजधानी बनण्यास सोयीचा व पुरेसा होता. तसेच शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातील अतिशय अवघड असे माझे ठिकाण होते. म्हणून हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून माझी निवड करण्यात आली. माझे नावही रायरी वरून रायगड ठेवण्यात आले. खरं सांगू मला किती आनंद झाला ते प्रत्यक्ष राजेंने माझे नामकरण केले, भाग्यवानच ना मी. ज्या राजेंचे मी शौर्य ऐकून होतो, त्याच राजेंचे चरण माझ्यावर पडले. खूप भाग्यशाली आहे मी की राजेंचा दीर्घ सहवास मला लाभला. यापेक्षा आनंदायी आणखी काय असू शकेल माझ्यासाठी? त्यानंतरही मी त्यांच्या प्रत्येक पराक्रम व शौर्याचा साक्षीदार बनलो.

सगळ्यात मोठं आनंद कोणता असेल माझ्यासाठी तर महाराजांचा राज्याभिषेक सोहळा. या अद्भूत सोहळ्याचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवला आहे. न भूतो न भविष्यती असा एकमेक मराठा साम्राज्याच्या राजाचा राज्याभिषेक महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या इतिहासातील लक्षणीय घटनेपैंकी एक महत्त्वपूर्ण घटना बनली. जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे या हेतूने राजेंनी स्वतःला तांत्रिक पध्दतीनेही आणखी एक राज्याभिषेक माझ्या इथेच करून घेतला.

राजेंनी मला सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान मानून त्यांचे निवासस्थान केले याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यांच्यामते मी एवढा प्रचंड आणि विशाल आहे की तीनही लोकीचे वैभव माझ्यात सामावले आहे. माझ्यावर विहिरी, सरोवरे, कूप विराजत आहेत.

जसा मी राजेंच्या राज्याभिषेकाचा साक्षीदार आहे तसेच अनेक छोट्या मोठ्या आनंद व दुःखाचा साक्षीदार तर आहे व ते अनुभवलेही आहे. आनंदाच्या घटना म्हटल्या तर संभाजी राजेंची मुंज, राजाराम राजेंचे लग्न, राजेंनंतर संभाजी राजेंचे विधीपूर्वक राज्यारोहण.

माझा सर्वांत वाईट व दुःखद अनुभव जो माझ्या मनाला कायमचा चटका लावून गेला तो म्हणजे राजेंचे निधन. खूप म्हणजे खूप वाईट वाटलं मला तेव्हा. माझ्यासहित संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला होता. जनतेचा वाली, कैवाऱ्याने कायमचा निरोप घेतला ते माझ्या कुशीतच. कसं सावरलं मी तेव्हा स्वतःला ते माझं मलाच माहित. पण एक गोष्टीचे समाधान मात्र आहे की राजेंची समाधी माझ्यावर बांधली गेली. म्हणजे राजेंचे वास व सहवास मला अविरत लाभतोय. आजही राजें माझ्यासोबत आहेत, माझ्याशी बोलतात असे मला भासते.

मित्रहो, माझ्यावरील अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. जिजाऊंचा वाडा, खुबलढा बुरूज, नाना दरवाजा, मदारमोर्चा, महादरवाजा, चोरदिंडी, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, स्तंभ, पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, राजभवन, नगारखाना, रत्नशाळा,  राजसभा, बाजारपेठ, शिरकाई देऊळ, जगदीश्वर मंदिर, टकमक टोक, हिरकणी बुरुज, इ.

हिरकणी बुरुज राजेंनी का बांधला तुम्हाला माहिती असेलच ना, तरीही सांगतो. इथून जवळच्या गावातील हिरकणी नावाची गवळण दूध विकायला माझ्या गडावर आली होती. त्यात संध्याकाळ झाली. संध्याकाळी गडाचे दरवाजे बंद झाले. विनवणी करूनही दरवाजा उघडला नाही. पण तिचे लहान बाळ घरी असल्याने, त्या बाळाच्या ओढीने तिने माझा अवघड कडा उतरून एक प्रकारचे धाडस व शौर्य दाखवलं. तिचे ते पराक्रम पाहून महाराज थक्क होऊन तिला बक्षीस दिले व साडी चोळी देऊन तिचा सन्मानही केला. त्या कड्यावरील ती एक संभाव्य पळवाट लक्षात घेऊन, राजेंनी तिच्याच नावाने गडाच्या त्या कड्यावर बुरूज बांधला. ज्याला हिरकणी बुरुज म्हणतात. यावरून तुम्हाला राजेंचा मनाचा मोठेपणा, पारखी नजर व स्त्रियाबद्दलचा आदर कळला ना तुम्हाला!

सगळ्यात महत्त्वाचे माझ्यावरती स्थित आहे ती म्हणजे महाराजांची समाधी. जिथे तुम्ही आपोआप आदराने नतमस्तक होतात.

मला एक खंत वाटते की तुम्ही सर्व हौसी शिवप्रेमी मला भेट द्यायला येतात. पण ना स्वच्छता पाळता ना नियम पाळता. माझे संवर्धन करणे तुमचे कर्तव्य आहे ना मग या शिवरायाच्या या ऐतिहासिक स्थळ व वारसाचे जतन करा. इथे आले की तुम्हांला सगळा इतिहास आठवत असेल ना, आठवायलाच पाहिजे. माझ्या गडावरीलच काय कोठेही असलेला आपल्या राजेंचा पुतळा जरी पाहिला की एक प्रकारची ऊर्जा व स्फूर्ती मिळते. मला एक सांगायचे आहे फक्त त्यांच्यासारखी दाढी राखून त्यांच्यासारखे दिसण्याचा प्रयत्न करू नका. त्यांचे गुण, त्यांचे विचार आचरणात आणून तसे वागा. स्त्रियांचा आदर करा. माणुसकीने वागा व माणुसकी जपा.  

चला आता तुमचीही निरोप देण्याची वेळ आली. या पुन्हा मला भेट द्यायला, शिवकालीन काळ नव्याने अनुभवायला. मी युगा न युगे असाच राजेंच्या शौर्याची, त्यांच्या कार्याची कीर्ती ऐकवायला व माझ्याबद्दल बोलायला नेहमीच तत्पर असेन.

जय भवानी, जय शिवाजी.. शुभम भवतु..