Login

राजेश प्रधान द घोस्ट हंटर अंतिम भाग

खुनी शक्तीला संपवू शकेल का राजेशची टीम?

राजेश प्रधान द घोस्ट हंटर अंतिम भाग

मागील भागात आपण पाहिले विनयच्या मृतदेहाला पाहून राजेशला काहीतरी समजले. आता काय असेल राजेशचे पुढचे पाऊल.
"मुग्धा, किती दिवस घरात बसणार आहेस?" सारिकाने तिला हळूवार विचारले.
"कुठेही जायला नको वाटते ग. विनय सतत दिसत राहतो." मुग्धा रडत म्हणाली.
"आपण विक एंडला माझ्या मैत्रिणीच्या फार्म हाऊसवर जाऊ." सारिका मुग्धाला म्हणाली.
मुग्धाला सारिकाने तयार केले.

"टार्गेट इज रेडी." टेक्स्ट वाचून राजेश हसला. पवित्र जल,चांदीची पिस्तूल आणि रुद्राक्ष माळ तसेच सुरक्षाकवच घेऊन त्याने रोझीला फोन केला,"रोझी तयारी झाली आहे."

सुरक्षाकवच घेऊन तो परत एकदा मोहिमेवर निघाला. सारिकाने मुग्धाला घेतले आणि गाडी निघाली. विवेक गाडीवर ड्रायव्हर म्हणून आला होता. कर्जतजवळ फार्म हाऊसवर गाडी पोहोचली. निसर्ग पाहून मुग्धा खुश झाली.

तेवढ्यात आतून एक अतिशय पिळदार शरीर असलेला, काळेभोर डोळे असणारा एक सुंदर तरुण आला.

"मुग्धा,हा इथला केअर टेकर अंकित."
अंकितने हात मिळवला आणि मुग्धाचा थंडगार स्पर्श पाहून तो हसला.


"रात्री जेवायला काय करायचे." अंकितने विचारले.

"मटण करा." मुग्धा म्हणाली.

जेवण करून सगळे झोपले. रात्रीच्या अंधारात दाट झाडीत असणारा तो भव्य बंगला, किर्र किर्र येणारा रातकिड्यांचा आवाज आणि अधूनमधून ऐकू येणारे प्राण्यांचे आवाज. सगळे वातावरण आणखी गूढ भासत होते.

तेवढ्यात कटकट कटकट असा दात वाजण्याचा आवाज येऊ लागला. सारिकाने रुद्राक्ष घट्ट मुठीत धरून ठेवला. मुग्धा उठून बाहेर गेल्याचे तिला जाणवले.

बाहेर दिवाणखान्यात अंकित झोपला होता.

"झोप येत नाही का?"अंकितने विचारले.

" हो ना! नवी जागा असली की असे होणारच." मादक हसत तिने उत्तर दिले.

" तुम्ही सोबत असाल तर कोणतीही रात्र सुंदर वाटेल." अंकित पटकन म्हणाला.

तिने त्याच्या मांडीवर हात ठेवला.
" किती गोड दिसताय तुम्ही. पहातच रहावे वाटते." त्याने उत्तर दिले.

तिने हळूच तिची नाजूक बोटे त्याच्या छातीवर ठेवली आणि मान खांद्यावर ठेऊन गप्प पडून राहिली. थोड्याच वेळात दोघे एकमेकांच्या मिठीत गेले.
अचानक ती ओरडली,"आग,आग होतेय. काय केले तू मला."

संपूर्ण बंगला उजेडाने उजळला. राजेश उर्फ अंकित पुढे येऊन म्हणाला,"मुग्धा कुठेय?"

"राजेश,मुग्धा हीच आहे." शेखर म्हणाले.

"काका,ही मुग्धा नाही. गेल्या पंधरा दिवसात तिचा वाढलेला आहार,मांस खाणे. काळे कपडे घालणे. तुमच्या लक्षात आले नाही का?" सारिका हताश होऊन विचारत होती.

तेवढ्यात राजेशने पवित्र जल तिच्या अंगावर टाकले,"मुग्धा कुठेय?"

"तिला आता संपवणार होतेच. पण तू मध्ये आलास?" जखीन ओरडली.

तेवढ्यात तिने राजेशवर झडप घातली. त्याच्या गळ्यावर आपली नखे रुतवत हसली,"खर तर विनय मेला कारण त्याने माझ्यावर मुग्धा समजून प्रेम केले. पण मला तू आवडलास राजेश."

राजेशच्या अंगावरचा शर्ट फाडत ती हसली. एवढ्यात ज्ञानदाने तिला गोळी मारली.

" तिला काहीच होणार नाही. रोझी गोळी झाड." राजेश ओरडला.

चांदीच्या पिस्तुलातून रोझीने गोळी झाडली. नेम हुकला आणि तिने पंधरा फुटांवरून रोझीचा गळा दुसऱ्या हाताने आवळला.

तेवढ्यात रोझीने फेकलेले पिस्तूल हवेत झेलून ज्ञानदाने बरोबर कपाळावर मधोमध गोळी झाडली. त्याबरोबर जखिनीचा देह जळू लागला. ज्ञानदाकडे पाहून रोझी अवाक झाली.


राजेशने जखिनीच्या आत्म्याला मुक्त केले.

"राजेश,माझी मुलगी कुठेय?" शेखरने अधिरतेने विचारले.

"तुमच्याच बंगल्यात. रोझी,सारिका लॅपटॉप लाव." सारिकाने दाखवलेले दृश्य पाहून शेखर खाली बसला.

राजेश पुढे सांगू लागला,"शेखर साहेब,हा रंजन राघवेंद्र देसाई."

"काय?राघवेंद्र देसाई? म्हणजे?" शेखर हबकला.

" बरोबर,तुमचे पार्टनर देसाई यांचा मुलगा."राजेश शांतपणे म्हणाला.

"अरे मग चला लवकर. तो मुग्धाला मारेल." शेखर बाहेर जाऊ लागला.

" नाही,पुढचे काम इन्स्पेक्टर ज्ञानदा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे."राजेश हसून म्हणाला.

"काय? म्हणजे राजेश तुला हे सगळ माहीत होत?" सारिका अवाक होऊन म्हणाली.

"होय,विनयचा मृतदेह पाहिला आणि हे जखिनीचे काम असल्याचे लक्षात आले. त्यांनतर मी मुग्धा गेल्या पंधरा दिवसात कशी वागत आहे तपासले. दिवसा नॉर्मल असणारी मुग्धा रात्री मांस खाई,दारू प्यायची आणि....पुरुष. हे सगळे घरातून होतेय याचा संशय होताच त्यामुळे जेव्हा तुमच्या घरात मी खऱ्या मुग्धाला काही काळ संमोहन मुक्त केले तेव्हा तिच्या खोलीत कॅमेरा लावला होता." राजेश थांबला.


"राजेश,मला हे सगळं आधी खोटं वाटतं असे. पण काही गोष्टी अनुभवल्या की समजतात." ज्ञानदा म्हणाली.

"राजेश द घोस्ट हंटर यांचा हा कारनामा मात्र मला कव्हर करायला हवा." सरिकाने माईक हाती घ्यायची कृती केली आणि सगळे हसू लागले.

आज आणखी एक निष्पाप जीव वाचला होता.


कथा केवळ मनोरंजन म्हणून वाचा.
©®प्रशांत कुंजीर.