Login

राजनंदिनी- लव्ह इन एअर (भाग 1)

दोन वेगवेगळ्या परिस्थितीत जगणारे, एकमेकांशी काही संबंध नसणारे हे दोघे जेव्हा एकमेकांसमोर येतील तेव्हा काय होईल?
Disclaimer :

ही कथा पूर्णतः काल्पनिक असून केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने लिहिण्यात आलेली आहेत. ह्यात कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. कथेत वापरण्यात आलेली स्थळे, व्यक्तींची नावे ही काल्पनिक आहेत. त्याचा सत्य परिस्थितीत कोणाशीही संबंध नाही.

**************

  राजनंदिनी ?? - लव्ह इन एअर

           दहा वाजून गेले असूनही थंडी जाणवत होती. इथल्या बस अतिशय सुंदर होत्या. एवढं स्टायलिश वातावरण तो पहिल्यांदा पाहत होता. आपल्या देशातून एका साध्याशा गावातून तो इथपर्यंत आलेला होता. खिडकीच्या काचेतून तो बाहेर पाहत होता. एसी बस होती. त्यामुळे खिडक्या उघडण्याची सोय नव्हती. त्याच्या बाजूला असलेल्या तरुणीने त्याला हात लावला.

"दादा.."

तिची हाक ऐकू आली तसं त्याने तिच्याकडे पाहिलं.

"काय मीनू?"

त्याने काळजीने तिच्याकडे पाहिलं.

"आपण आलो का तिथे?"

तिने बाहेर डोकावत विचारलं.

"नाही अजून. मी मोबाईलवर लोकेशन सेट केलं आहे. आसपासही फिरकलेलो नाही आहे. पोहोचू थोड्या वेळात."

तिच्याशी बोलताना त्याची नजर पुढच्या सीटवर बसून झोपी गेलेल्या वरुणकडे गेली.

"वरुण झोपला वाटतं."

मीना हसून म्हणाली.

"असुदे. थकला असेल तो. तुही झोप हवं तर थोडा वेळ."

त्याने तिला सांगितलं. तिने मात्र नकारार्थी मान डोलावत मोबाईलमध्ये नजर वळवली. तो पुन्हा खिडकीच्या काचेतून बाहेर पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावरचं टेन्शन दिसत होतं. थोड्याच वेळात ते कॉलेजच्या कॅम्पससमोरच्या स्टॉपवर थांबले. बसच्या समोर इलेक्ट्रिक स्लाईडवर स्टॉपचं नाव आलं तसं त्याने वरुणला हलवलं. ते तिघेही तिथेच खाली उतरले. समोर प्रशस्त बिल्डिंग दिसत होती. स्टॉपवर तिघांच्या मिळून सहा बॅग्ज घेऊन ते उभे होते. मीनाला ते आवडलं नाही.

"दादा, ह्या कॉलेजमध्ये आपण असंच सगळं सामान घेऊन गेलो तर सर्वजण मला हसतील. आपण आधी एखाद्या हॉटेलवर थांबायला पाहिजे होतं."

तिने सांगितलं.

"मीनू, आपल्याकडे तेवढे पैसे असते तर सगळं विकून यावंच लागलं नसतं मला. तू काळजी नको करुस. मी एकटाच आत जाऊन सगळं एडमिशन, हॉस्टेल्स वगैरे प्रोसेस पूर्ण करून येतो. तू आणि वरुण इथे सामानाजवळच थांबा."

त्या दोघांनी होकार दिल्यावर तो चालत कॉलेजच्या कॅम्पसमध्ये शिरला. कॉलेज फारच भव्य होतं. एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये आपली बहीण शिकणार आहे म्हटल्यावर त्याला फार आनंद झाला होता. त्याने सगळी प्रोसेस पूर्ण केली. जवळजवळ दोन तासांनी तो बाहेर आला. तोवर मीना आणि वरुण कंटाळले होते. त्याला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.

"दादा, झालं एडमिशन?"

"हो. मी ऑनलाईन सगळी प्रोसिजर पूर्ण केली होती म्हणून लवकर झालं. आता तू काळजी करू नकोस. सगळं व्यवस्थित होईल. हॉस्टेल कॅम्पसमध्येच आहे. तू तुझ्या बॅग घेऊन जा आत. हे तुझं आयडी आणि हे कसलेतरी डॉक्युमेंट्स आहेत कॉलेजचे. हे तुझं रूमकार्ड!"

त्याने सगळं तिच्या हातात दिलं. तिने त्याला घट्ट मिठी मारली. आता पुढची चार वर्षे तिला इथेच घालवायची होती.

"दादा, आता पुढे तुम्ही दोघे काय कराल?"

तिने विचारलं.

"मी काहीतरी करेनच मीनू. तू त्याची काळजी करू नकोस बाळा. तू भरपूर कष्ट कर आणि छान शिक्षण घे. जा आता आत."

त्याने तिला कॅम्पसच्या गेटपर्यंत सामान नेऊन दिलं. तिथून त्या दोघांचा निरोप घेऊन ती आत निघून गेली. वरुण भरलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत होता. त्याने वरुणकडे पाहिलं.

"वरुण, चल. आपल्याला निघायला हवं."

त्याने वरुणच्या खांद्यावर टॅप करत म्हटलं. तसं वरुणने होकारार्थी मान डोलावली. ते चालत चालत एका साध्याश्या हॉटेलकडे चालले होते. कुठेतरी राहणं गरजेचंच होतं. आधी ते एका छोट्या रेस्टोरंटमध्ये थांबले.

"वरुण, तुला काय हवं ते ऑर्डर कर."

त्याने सांगितलं. वरुण मेन्यू कार्ड पाहत होता. एवढ्यात मोबाईलची रिंगटोन त्याच्या कानावर पडली. त्याने वरुणकडे एक नजर टाकली आणि कॉल उचलला.

"हॅलो!"

"हॅलो राज, अरे कुठे आहेस भावा? आठवडा झाला आहे तुझ्यासोबत कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होतो."

"मी लंडनमध्ये आहे अजय."

"हो आणि मी रशियात आहे. मस्करी करू नकोस भावा. पटकन सांग कुठे आहेस ते."

"इंटरनॅशनल कॉलला चार्जेस जास्त जातात अजय. मी तुला व्हिडीओ कॉल करतो वेट!"

त्याने कॉल कट केला आणि व्हिडीओ कॉल केला. तोवर वरुणने ऑर्डर दिली होती.

"बापरे! राज तू लंडनमध्ये काय करतो आहेस? कधी गेलास? कशासाठी? कसं मॅनेज केलंस हे सगळं?"

अजयचे प्रश्नावर प्रश्न सुरु झाले होते.

"जरा दमाने घे अजय. सांगतो सगळं. आपल्या मीनूला इथे एडमिशन मिळालं आहे मोठ्या कॉलेजमध्ये. तिला नाही म्हणता आलं नाही मला. मग सगळं काही अरेंज करून आजच लंडनमध्ये आलो आहे. मीनूला कॉलेज कॅम्पसमध्ये सोडलं आणि मी वरुणसोबत इथे नाश्ता करतो आहे. मीनूमुळे चार वर्ष इथेच राहायला लागणार आहे. मग वरुणचं एडमिशनही इथेच घेईन असं ठरवलं आहे. दोन कॉलेजेसचे फॉर्म भरलेत. दोन दिवसांनी कळेल की कुठल्या कॉलेजकडून सिलेक्ट झाला आहे."

त्याने सर्व काही अजयला सांगितलं. अजयला कमाल वाटली. तितकाच अभिमान वाटला त्याचा. आपल्या भावंडांसाठी सगळं काही सोडून तो तिथे आला होता.

"आणि तुझ्या जॉबचं काय? तू कसं मॅनेज करणार आहेस तिथे?"

अजयने विचारलं.

"मी पाहतो. माझं ग्रॅज्यूशन सायकॉलॉजीमध्ये आहे. आता त्यावर मला कुठे आणि कोणता जॉब मिळतो ते पाहायला हवं. सध्या आधी मीनू आणि वरुणचं कॉलेज सुरु झालं की एक जबाबदारी पूर्ण होईल. मग माझं की पाहून घेईन."

"राज, काही लागलं तर कॉल कर मित्रा. मी काही फार श्रीमंत नाही आहे. पण तुला काही लागलं तर नक्की काहीतरी करू तुला पैसे ट्रान्सफर करेन."

अजयने आपुलकीने सांगितलं. त्याने होकारार्थी मान डोलावली. थोडंसं बोलून त्याने कॉल कट केला. लंडन शहर त्याची परीक्षा घेणार होतं एवढं नक्की.

**************
क्रमशः


(हॅलो फ्रेंड्स..
मी नवीन लेखिका आहे. लिहिण्याचा माझ्याकडे काही फार अनुभव नाही. मी पहिलीच कथा लिहीत आहे. त्यामुळे सर्वांच्या सपोर्टची गरज आहे. मला सपोर्ट करा आणि कथा आवडली तर अकाउंटला फॉलो करा.
See you..)


0

🎭 Series Post

View all