याआधी आपण पाहिले..
राज त्याच्या दोन्ही भावंडांना, मीना आणि वरुणला घेऊन लंडनला आला आहे. मीनाचं एडमिशन झालं आहे आणि राजने त्याच्या मित्राला, अजयला कॉलवर सांगितलं आहे की तो लंडनमध्ये आहे.
आता पुढे..
ती एक सुरेख रेस्टॉरंटची रूम होती. तिने स्पेशल रूम बुक केली होती. कारण हे फार फेमस रेस्टॉरंट होतं. इथे माणसांची वर्दळ होती आणि तिला माणसांच्या वर्दळीत राहायला आवडत नव्हतं. रूमला काचेचं पार्टीशन होतं. त्यामुळे बाहेरून सर्वांच्या नजरा तिच्यावर होत्या. हो, ती एक अतिशय फेमस बिजनेसमन होती. यंग आणि सक्सेसफूल बिजनेसमन! तिने लहान वयातच फक्त लंडनमध्ये नव्हे तर सर्वत्र आपलं नाव कमावलं होतं. तिच्या नावे अनेक अवॉर्ड्स होते. तिने आता चिकन फ्राईड राईस मागवलेला होता. हातात असलेल्या काट्याने चिकन कट करण्यात ती व्यस्त होती.
स्वतः मॅनेजरची नजर तिच्यावर टिकून राहिली होती. ती मॉडेल असती तर कंपनीला किती फायदा झाला असतं असं त्याला वाटून गेलं होतं. गौर वर्णाची, स्ट्रेट केस असणारी, चेहऱ्यावर छान मेकअप केलेली, ब्लड रेड रंगाची लिपस्टिक लावलेली, त्याच लालभडक रंगाचा ऑफशोल्डर नीलेंग्थ, स्किनफिट ड्रेस घातलेली ती खरंच खूप सुंदर दिसत होती. तिच्या सौंदर्यात विशेष म्हणजे तिच्या गळ्यात असणारा डायमंड नेकलेस! तो कायमच तिचा आवडता होता. तो एकप्रकारे तिची ओळख बनला होता असं म्हणू शकतो. निळ्या रंगाच्या त्या डायमंडला सोन्याच्या कोंदणात फार सुंदररित्या बसवलेलं होतं. खास असण्याचं कारण हे की तो नेकलेस तिने स्वतः बनवलेला होता.
तिच्या शेजारी दोन चेहऱ्यावर काही हावभाव नसलेल्या व्यक्ती उभ्या होत्या. त्यांचे कपडे आणि उभं राहण्याची स्टाईल पाहून जाणवत होतं की ते तिचे बॉडीगार्ड्स आहेत. एक व्यक्ती धावतच त्या रेस्टॉरंटमध्ये शिरला आणि चटकन त्या स्पेशल रूममध्ये आला. त्याला पाहूनही तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं नाही. पण तिच्या बॉडीगार्ड्सनी त्याला रोखलंही नाही.
"आपल्याला जायचं आहे."
त्याने तिला सांगितलं.
"माझं खाऊन संपलेलं नाही. बस शांत!"
तिने अधिकाराच्या सुरात त्याला ऑर्डर दिली. तसा तो मुकाट्याने समोरची खुर्ची ओढून तिथे बसला. अचानक एक यंग मुलगी जी बाहेर बसली होती तिची नजर आत बसलेल्या त्या तरुणीवर गेली. ती दचकलीच. तिने कधी अपेक्षा केली नव्हती की ती तिला भेटेल. ती चटकन स्पेशल रूमच्या दाराजवळ आली आणि तिने नॉक करून दर आत लोटला. तिचे बॉडीगार्ड्स त्या आत येणाऱ्या मुलीला थांबवायला पटकन पुढे गेले.
"डोन्ट!"
तिने मात्र एकच शब्द उच्चारला आणि ते मागे झाले. ती मुलगी खुश झाली आणि तिच्यासमोर आली.
"ह.. हॅलो मिस. नंदिनी. मी कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की मी तुम्हांला असं समोर पाहीन. तुम्ही माझ्या आयडल आहात. मी तुमचा प्रत्येक शो, प्रत्येक इंटरव्ह्यू बघते. यु आर जस्ट ऑसम!"
"आय नो!" (मला माहित आहे.)
ती किंचित गर्विष्ठपणे म्हणाली. पण आधीच तिची फॅन असणाऱ्या त्या मुलीला तिचा गर्विष्ठपणा जाणवला नाही.
"मला तुमचा एक ऑटोग्राफ हवा आहे. खरंतर मीसुद्धा एका क्लोथिंग ब्रँडसाठी काम करते. मला अशीही इच्छा होती की मी तुमच्यासोबत कधीतरी काम करावं. तुम्ही मला चान्स दिला तर.."
तिचं बोलणं पूर्ण झालंच नाही.
"डायरी कुठे आहे?"
नंदिनीने विचारलं.
"हं?"
"आय सेड डायरी कुठे आहे? कशावर ऑटोग्राफ घेणार आहेस तू?"
तिच्या भुवया उंचावल्या होत्या. ती मुलगी आधी गडबडली. मग तिने आपल्या हॅन्डबॅगमधून छोटी डायरी काढून तिच्यासमोर सरकवली. सोबत एक छान स्टायलिश पेनही दिलं. तिने डायरी तर हातात घेतली. मात्र त्या पेनाला हात लावला नाही. तिने आपल्या बॉडीगार्डकडे पाहिलं. त्याने त्याच्या खिशातून एक छोटीशी पेटी काढली आणि उघडून तिच्यासमोर धरली. त्या पेटीत डायमंड लावलेलं आणी काही लाखात किंमत असणारं अतिशय महागडं पेन होतं. तिने ते पेन हातात घेतली आणि डायरीच्या त्या पानावर सुंदर ऑटोग्राफ लिहिला.
"सॉरी हा. मला राहवत नाही म्हणून बोलतेय. माझ्या सगळ्या फ्रेंड्सना पण वाटतं की तुमच्यासारखं सुंदर दिसावं. अगदी आकाशातून खाली उतरलेल्या अप्सरेसारख्या दिसत तुम्ही."
ती मुलगी तिची फार स्तुती करत होती. तिने किंचित हसून त्या मुलीकडे पाहिलं आणि तिची डायरी तिच्याकडे सोपवली.
"फक्त माझं नाव नंदिनी आहे. त्या नावाइतकी सात्विक मी नाही आहे. अप्सरा बनण्याचा मला शौक नाही आहे. मी डेव्हील आहे आणि मला कायम डेव्हीलचं राहायचं आहे. रिमेंबर इट!"
तिची तीक्ष्ण नजर त्या मुलीच्या नजरेला भिडली. तिने आपल्या समोर येऊन बसलेल्या त्या एका व्यक्तीकडे पाहिलं आणि ती उठून बाहेर पडली. तिच्या मागोमाग तिचे बॉडीगार्ड्सही बाहेर पडले. तो व्यक्ती जो तिच्या समोर बसला होता तो त्या मुलीच्या समोर आला.
"हॅलो मिस. मी जोसेफ. माझी बॉस आता जे काही म्हणाली ते मनावर घेऊ नका. तिला आवडत नाही लोकांनी तिच्या आसपास फिरकलेलं. त्यामुळे ती रुड वागते. डोन्ट माईंड हं.!"
त्याने वेटरने आणून दिलेलं बिल भरलं आणि तोही धावतच बाहेर गेला. ती मुलगी मात्र किंचित वैतागलेल्या आणि किंचित रागीट चेहऱ्याने तिथे उभी होती.
"मूर्ख आहे का ती? एखाद्याची स्तुती करतेय आणि तिला ती आवडत नाही म्हणजे काय! डेव्हीलचं राहायचंय म्हणे! रहा तशीच. बावळट!"
ती मुलगी रागाने तिथेच उभी होती. तिचं वाक्य पूर्ण होतं ना होतं तोच नंदिनी परत आत आली. तिने त्या मुलीचं बोलणं ऐकलं होतं. त्या मुलीलाही जाणवलं की आपण मोठ्याने बोलून चूक केली आहे. नंदिनीने त्या टेबलवरच राहिलेला आपला मोबाईल उचलला आणि त्या मुलीसमोर आली.
"मला माझी स्तुती आवडत नाही. पण मला माझी निंदाही आवडत नाही. जे बोलायचं असेल ते माझ्या समोर बोलायचं. माझ्या मागून आडून वार करणारे मला आवडत नाहीत."
तिने त्या मुलीच्या हातातली डायरी ओढली आणि स्वतः जो ऑटोग्राफ केला होता ते पान टर्रकन फाडून घेतलं. तिच्याच समोर त्याचे चार तुकडे करत डस्टबिनमध्ये टाकले.
"म्हणूनच मी उत्तर दिलं नव्हतं. माझ्यासोबत काम करण्याचा चान्स मिळण्यासाठी माणुसही तितकाच डेव्हील असावा लागतो."
त्या मुलीकडे एक कटाक्ष टाकत ती बाहेर निघूनही गेली. ती मुलगीही नाराज होऊन बाहेर पडली. आपण काही बोललो नसतो तर निदान आपल्या मैत्रिणींना दाखवायला आपल्याकडे नंदिनीचा ऑटोग्राफ असता असं तिला वाटून गेलं. मात्र आता विचार करून फायदाही नव्हता.
ही आहे कथेची नायिका.. नंदिनी! नंदिनी तिथल्या अनेक प्रसिद्ध बिजनेसमनपैकी एक होती. ती सद्यस्थितीत तिथली यंगेस्ट अँड सक्सेसफुल बिजनेसमन म्हणून ओळखली जात होती. पण ती म्हणाली त्यातही तथ्य होतं. तिचं वागणं, बोलणं, राहणं पाहता ती फक्त एक डेव्हील होती.
**************
क्रमशः
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा