Login

राजनंदिनी - लव्ह इन एअर (भाग 3)

दोन वेगवेगळ्या परिस्थितीत जगणारे, एकमेकांशी काही संबंध नसणारे हे दोघे जेव्हा एकमेकांसमोर येतील तेव्हा काय होईल?
याआधी आपण पाहिले..

नंदिनी एका रेस्टॉरंटमध्ये होती. तिथे एक मुलगी तिची स्तुती करत होती. तिने सांगितलं की तिला डेव्हिलच राहायला आवडतं. तिने त्या मुलीला दिलेला ऑटोग्राफ फाडला आणि ती निघून गेली. जोसेफही तिच्या मागोमाग बाहेर पडला.

आता पुढे..

         वरुण पाहत होता की राज त्या प्रौढ बाईसोबत बोलत होता. त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं. तो कदाचित तिला काही सांगत होता. त्याने वरुणला बाहेरच थांबायला सांगितलं होतं. त्यामुळे त्याच्या कानापर्यंत काही पोहोचत नव्हतं.

"आंटी, मी इथे एकटाच राहणार आहे. मला एखादी छोटीशी रूमही चालेल. एवढं रेंट द्यायला मला परवडणार नाही."

"एवढं रेंट? बाळा, मी इथे आजूबाजूच्या सगळ्या घरांपेक्षा कमी रेंट घेते आहे. फक्त 760 पाऊंड (80,082 रुपये) म्हणजे काहीच नाही. इथे तर सॅलरीच एवढी असते की माझं घर थोडं जुनं नसतं तर मी निदान 2000 पाऊंड (2,10,743 रुपये) तरी चार्ज केले असते."

"ठीक आहे. मी निघतो."

तो हसून म्हणाला. काहीही झालं तरी त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल विरून देऊन चालणार नव्हतं. नाहीतर वरुणला टेन्शन आलं असतं. जे त्याला नको होतं. तो वरुणजवळ आला.

"दादा, काय झालं?"

"काही नाही रे. ती जरा जास्तच ओल्ड आहे. त्यामुळे तिला सोबतीला म्हणून फॅमिलीलाच रेंटवर द्यायची आहे ही प्लेस. त्यामुळे काही पर्याय नाही. मी ऑनलाईन अजून दोन प्लेसेस पाहिल्या होत्या. आपण तिथे जाऊन पाहूया."

संध्याकाळ होत आलेली होती. त्यामुळे तो जास्तच टेन्शनमध्ये होता. लंडनच्या अनोळखी रस्त्यांवर रात्रभर फिरत बसणं तर शक्य नव्हतं. त्या बाईला ती अमाऊंट छोटी वाटत होती. पण त्याच्याकडे तेवढे पैसे खरच नव्हते. तो दुसऱ्या एका प्लेसवर आला. ती प्लेस पाहून तर त्याला कमालच वाटली. तर अगदी छोटं घर होतं. वन बीचके असं घराचं स्ट्रक्चर होतं. पण आत फार काही फर्निचर नव्हतं. कदाचित याच कारणामुळे घराचा मालक त्या तुलनेत कमी रेंटवर ही प्लेस देत होता. येण्यापूर्वी राजने त्याला कॉल केलेला होता. त्यामुळे तोही तिथे उपस्थित होता. त्याने त्या दोघांना ते घर फिरवून दाखवलं.

"दादा, तू इथे राहणार आहेस का?"

वरुणला ती प्लेस आवडलेली नव्हती. फारच छोटं घर होतं ते.

"हो."

राजने सांगितलं. इथे त्याला रेंट 595 पाऊंड (62,696 रुपये)बसत होतं. काहीही जॉब नसताना ही अमाऊंटही मोठी होती. पण हा चिपेस्ट रेट असल्यामुळे हा नाकारला तर त्याच्याकडे पर्यायही नव्हता. त्यामुळे त्याने मालकासोबत अग्रीमेंट करायचं ठरवलं. सहा महिन्यांच्या अग्रीमेंटवर त्याने सह्या केल्या. सगळे पैसे पे केले. त्यानंतर तो मालक चाव्या त्याच्याकडे देऊन निघून गेला होता.

     त्याने सगळं सामान आत आणलं. आधी बेडरूम थोडी साफ करून घेतली. वरुणचं मनच नव्हतं इथे राहायचं. पण त्याला राजची अवस्था माहित होती. त्याच्याकडे पैसे असते तर तोही इथे राहिलाच नसता.

"वरुण, मी बेडरूम क्लीन केली आहे. तो जाऊन झोप थोडा वेळ. उद्या जर तुझं कॉलेज कुठलं आहे ते समजलं तर तुला तिथे जावं लागेल. मग परत अभ्यासाचं प्रेशर आहेच."

वरुणने होकार दिला. आता त्याचं डोकं एवढं भणभणत होतं की त्याला खरंच थोडा वेळ झोपण्याची गरज होती. तो आत जाऊन झोपला. तसं राजने इतर साफसफाई सुरु केली. त्याला लिव्हिंग रूममध्ये काही मॅगझीन पडलेले दिसले. तो ते उचलत असताना एका मॅगझीनवर त्याची नजर गेली. त्यावर यंगेस्ट बिजनेसमन म्हणून अवॉर्ड मिळालेल्या नंदिनीचा फोटो होता. बिजनेस सूट घातलेली आणि अतिशय रागीट चेहरा, स्टर्न लूक देणाऱ्या तिला पाहून तो काही क्षण तिच्याकडे पाहतच बसला. दिसायला फार सुंदर होती ती. फक्त सौंदर्यातील मोहकपणा नसून एक दाहकपणा होता. तिच्या नजरेत अभिमान, गर्व जाणवत होता. त्याने खाली नाव वाचलं.

'नंदिनी अहुजा.
ओनर ऑफ पर्ल'

'किती चांगलं असेल ना हिचं आयुष्य! माझ्या एवढ्याच वयात एका चांगल्या पोजिशनवर आहे ती. यंगेस्ट बिजनेसमन! हेवा नाही वाटत आहे. पण कौतुक नक्की आहे. कदाचित असं आयुष्य माझंही असतं तर..'

तो स्वतःशीच हसला. काय विचित्र विचार करत बसलोय आपण असं म्हणत त्याने ते मॅगझीन बाजूलाच टाकलं. तिचं स्वतःच असं एक विश्व होतं. तर तो तिच्या नजरेलाही न आलेल्या लोकांमधला एक होता. उगाच मोठी स्वप्नं पाहण्यावर त्याचा विश्वास नव्हता. सगळं आवरून झाल्यावर तो बाहेर पडला. जवळच्याच ठिकाणी जाऊन त्याने कमीत कमीत पैशात खरेदी करता येईल ते जेवण खरेदी केलं. आताही तो जॉबच्या विवंचनेत होता. तो तसाच घरी आला. तोवर वरुण उठलेला होता.

"वरुण, मी जेवण घेऊन आलो आहे. गरम आहे तोवर खाऊन घेऊया."

"हो, मी पार्सल ओपन करतो."

त्यानंतर ते एकत्रच जेवले. वरुण जेवल्यावर तिथेच फिरत होता. तर राज लॅपटॉप घेऊन बसला होता. तो जॉबचे ऑप्शन शोधत होता. अचानक त्याला ऑनलाईन एक जॉब दिसला. पण हा जॉब आपण करू शकतो का याबद्दल त्याला खात्री नव्हती. तरी त्याने तिथे दिलेल्या नंबरवर कॉल केला. तिकडून लगेचच कॉल उचलला गेला. रात्रीचे फक्त सात वाजलेले होते.

"हॅलो!"

"हॅलो सर! मी जॉबबद्दल पाहून तुम्हाला कॉल केला आहे. तुम्ही काही खास रिक्वायरमेन्ट लिहिलेली नाही. फक्त लहान मुलांसोबत छान वागण्याची अपेक्षा केली आहे. मला समजेल का की ह्या जॉबकरीता काय क्रायटेरिया आहे?"

"तुमचं नाव काय?"

"मी राजवीर अरोरा."

त्याने स्वतःच नाव सांगितलं.

"मिस्टर राजवीर, तिथे दिलेल्या पत्त्यावर मला उद्या सकाळी सातनंतर कधीही येऊन भेटा. तुम्हांला काय काम करायचं आहे हे मी तिथे सांगेनच. थोडं स्पष्टपणे सांगायचं तर ही एका चाईल्ड केअर इन्स्टिट्युशनची जाहिरात आहे. त्याअर्थी तुम्ही मुलांसोबत चांगलं वागलं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. तुमच्याकडे तुमच्या शिक्षणाबद्दल इतर काही डॉक्युमेंट्स असतील तर तेही घेऊन या."

"ओके सर."

राजने ओके तर म्हटलं. पण त्याने कॉल कट केला नव्हता. समोरूनही कॉल कट झालेला नव्हता.

"मिस्टर राजवीर, मनात काही डाउट ठेवू नका. सॅलरी आणि इतर सगळे डिटेल्स तुम्हांला सांगितले जातील. वर्किंग टाइम पण सांगेनच. उद्या नक्की भेटा."

"चालेल सर. थॅंक यु!"

यावेळेला मात्र त्याने लगेच कॉल कट केला. वरुण त्याच्याकडे पाहत होता

"दादा, जॉब मिळाला का तुला?"

"माहित नाही. त्यांनी उद्या येऊन भेटायला सांगितलं आहे. उद्या भेटतो आणि मग पाहतो. उद्या सकाळी तुझ्या कॉलेजची लिस्टही पाहून येऊ. म्हणजे तुला काही टेन्शन राहणार नाही. झोपूया आत चल."

राजवीर बेडवर पडला तर होता. पण त्याच्या डोक्यावरचं टेन्शन कमी झालेलं नव्हतं.

**************

ती बेडवर झोपलेली होती. तिच्या शांत, निवांत झोपलेल्या चेहऱ्यावर अचानक आठ्या निर्माण झाल्या. ती प्रचंड बैचेन झाली होती. तिने बेडशीट दोन्ही हातांच्या मुठीत घट्ट पकडली होती. तिच्या चेहऱ्यावर हळूहळू घाम साचू लागला होता. अवचित एका क्षणी ती धाडकन उठून बसली.

"म.. म.. मॉम!"

तिच्या तोंडातून अस्पष्ट शब्द बाहेर पडले. तिला भानावर यायला काही मिनिट्स लागले. तिने घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे दोन वाजून गेले होते. तिने बाजूच्या टेबलवर असणाऱ्या जगातलं पाणी ग्लासमध्ये ओतून घेतलं. ती घटाघट पाणी प्यायली. आता मात्र तिला स्वतःचाच राग आला होता. ती स्वतःशीच म्हणाली.

"नो नंदिनी! नॉट अगेन!"