Login

राजनंदिनी - लव्ह इन एअर (भाग 7)

दोन वेगवेगळ्या परिस्थितीत जगणारे, एकमेकांशी काही संबंध नसणारे हे दोघे जेव्हा एकमेकांसमोर येतील तेव्हा काय होईल?
मागील भागात..

नंदिनी इव्हेंटच्या ठिकाणी पोहोचली. तिची सीट फ्लोरा जेम्सचा मालक लिओ जोन्स याच्या शेजारी होती. अलेक्सने तिच्यासाठी खास ऑफर केलेलं ड्रिंक तिने तब्येतीचं कारण देऊन नाकारलं. लिओला लक्षात आलं की हा प्लॅन्ड इव्हेंट होता.

आता पुढे..

       पर्लच्याच कलेक्शनमधले काही दागिने अलेक्सने निवडले आणि त्याने तिथे डिक्लेअर केलं की आजच्या इव्हेन्टसाठी पर्लची निवड करण्यात आली आहे. आपोआप सगळ्या कॅमेराजचा फोकस नंदिनीकडे वळला. ती आजच्या इव्हेन्टची स्टार होती. मगाचपासून चेहऱ्यावर हसू घेऊन असलेली ती आता मात्र गंभीर चेहऱ्याने आणि भेदक नजरेने कॅमेराजकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावरचा अभिमान स्पष्ट दिसत होता. लिओला मात्र फर्स्ट रोमध्ये बसल्याचं फार वाईट वाटू लागलं होतं. सारखा त्याच्याकडे कॅमेरा आल्यावर तो नजर चोरट होता. पण त्याच्याकडे तरी आता काय पर्याय होता म्हणा! इव्हेंट संपल्यावर लिओ लगेचच निघून गेला. अलेक्स तिच्याजवळ आला.

"हॅलो नंदिनी!"

त्याने हॅन्डशेक करण्यासाठी हात पुढे केला.

"हॅलो अलेक्स!"

तिनेही हात मिळवला.

"माझ्या सगळ्या फॅमिलीला पर्लचे हे स्पेशल डिजाईन्स आवडले आहेत. मला तुझ्याकडे अजून एक फेव्हर मागायचा होता. पर्लचे दागिने आहेत तर.."

तिला काय ते समजलं होतं.

"तुझ्या अपेक्षा वाढत आहेत अलेक्स. मी पूर्ण एक आठवडा खर्च केला आहे हे डिजाईन्स बनवायला. आता क्लासिकसाठीही मला तेवढाच वेळ घालवावा लागेल. जो कदाचित माझ्याकडे नाही आहे. कसं आहे, फक्त एका क्लायंटवर दोन आठवडे घालवले तर मला ते अचिव्ह नाही करता येणार जे मला करायचं आहे. पण मला अपेक्षा आहे की क्लासिक मध्ये आल्यानंतर पर्सन्लाईझ्ड आउटफिट हवा असं तुझ्या बहिणीला वाटणारच नाही. तिथे ऑलरेडी एवढे ऑप्शन्स आहेत की एक तरी ब्रायडल वेअर गाऊन तिला नक्की पसंत येईल. मेक शुअर टू व्हिजिट!"

अलेक्सला जाणवलं की मैत्री असेल किंवा व्यवहार, एका मर्यादेच्या पुढे ती तिच्या आयुष्यायत कोणालाच जागा देत नव्हती. देणारही नव्हती! त्याने फक्त होकारार्थी मान डोलावली. तो किंचित नाराज झालेला होता. त्याने आधीच आपल्या बहिणीजवळ आपल्या मैत्रिणीबद्दल फार स्तुती करून झाली होती. आता तिने खास तिच्यासाठी वेगळं काही डिजाईन करायला नकार दिला आहे हे तो तिला कसं सांगणार होता? त्याची नाराजी नंदिनीला जाणवली. मात्र म्हणून ती आपला निर्णय बदलणार नव्हती. नको तिथे, नको त्याला सॉफ्ट कॉर्नर दाखवणं तिला आवडत नव्हतं.

"जोसेफ, लेट्स गो! सी यु अगेन अलेक्स!"

तिने अलेक्सचा निरोप घेतला आणि जोसेफ व तिच्या बॉडीगार्ड्ससोबत ती बाहेर पडली. ती कारमध्ये डोळे घट्ट मिटून बसली होती.

"तुमच्यासाठी काही थंड मागवू का? आईस्क्रीम किंवा कोल्ड ड्रिंक?"

जोसेफने तिच्याकडे पाहून विचारलं.

"काही गरज नाही. आय एम फाईन. एक काम कर, उद्या लवकर ये बंगल्यावर. तिथून क्लासिकला जाऊ. मी एक छान ड्रेस तयार केला होता दोन दिवसांपूर्वी. जेनीसाठी घेऊन जाऊ."

"कोणासाठी?"

जोसेफला आश्चर्यच वाटलं.

तिने मात्र भुवया आकसून त्याच्याकडे पाहिलं.

"ओके ओके. ऐकलं मी. जेनीसाठी! येतो मी सकाळी लवकर."

त्याने पुन्हा आपली नजर रस्त्याकडे वळवली. तो जरा दचकलाच होता. जेनीला भेटूया असं ती म्हणालेली खरी. पण ती खरंच भेटायला येईल अशी अपेक्षा त्याने केली नव्हती. त्याला खूप आनंद झाला होता. त्यात अलेक्स, जो तिने डिजाईन केलेल्या एका ड्रेससाठी मोठी किंमत मोजायला तयार होता, त्याला तिने ड्रेस डिजाईन करायला नकार दिला होता आणि जेनीसाठी तर दोनच दिवसांपूर्वी डिजाईन केलेला नवाकोरा ड्रेस घेऊन यायला ती तयार होती. कधी कधी तिला समजून घेण्याचा प्रयत्न करणंच चुकीचं आहे असं वाटायचं त्याला. फार विक्षिप्त वागायची ती. कधीही कुठल्याही टोकाला जाऊन काहीही करू शकते अशी!

त्याने पुन्हा मागे पाहिलं. तिला झोप लागली होती. आता कार थेट बंगल्यावर थांबणार होती. तोपर्यंत तरी त्याला काही बोलता येणार नव्हतं.

**************

राजवीर तिथे सहज रुळला होता. त्याला इथे येऊन एकच दिवस झाला आहे असं कोणालाच वाटूच शकत नव्हतं. आज तिथे जितके पालक आपल्या मुलांना सोडायला आले त्यांच्याशी तो पर्सनली बोलला होता. आधी जो स्टाफ होता त्यांना खरंच पर्वा नव्हती. राजवीरच्या अशा वागण्यामुळे पालक आज निर्धास्त झाले होते. तो मुलांसोबतही छान मिक्स झाला होता. त्यात जेनी आणि त्याची मैत्री तर काही औरच होती! अचानक दुपारी त्याला कोणीतरी आलेलं जाणवलं.

एक तरुणी, जिने हाय वेस्ट जीन्स आणि क्रॉप टॉप अशा वेश केला होता, ती गॉगल पर्समध्ये टाकत धावतच आत आली. तिने समोर राजवीरला पाहिलं.

"सॉरी सर! मी खरंच वेळेवर निघाले होते. माझी हिल तुटली. त्यामुळे इथे येईपर्यंत वेळ झाला."

तिने पाय किंचित क्रॉस करून तुटलेली हिल दाखवली. त्याला तर हसूच आलं.

"रिलॅक्स मिस! आय एम सॉरी मी तुम्हांला ओळखत नाही."

"ओळखत नाही? सर असं नका करू. कालच तर तुम्ही मला जॉब कन्फर्म झाला म्हणून कॉल केला होता. मी जरा लेट आले म्हणून तुम्ही मला ओळख न दाखवताच हाकलून देणार का? प्लिज सर. असं नका करु."

तिचा चेहरा पाहून त्याला हसूच आलं. ती गोंधळून त्याच्याकडे पाहत होती.

"मिस, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. मी कोणी सर वगैरे नाही आहे. मीही इथेच जॉब करतो. मला सांगितलं होतं की अजून एक व्यक्ती येणार आहे इथे जॉबला. मे बी तुमच्याबद्दलच सांगत होते ते."

राजवीरने असं बोलताच तिने सुटकेचा श्वास सोडला आणि ती भिंतीला टेकली.

"नशीब माझं! मला वाटलं जॉब गेला की काय! बाय द वे, हाय! आय एम मायरा."

तिने आपला हात पुढे केला.

"हॅलो! मी राजवीर."

त्यानेही हात मिळवला.

"ओह.. स्वीट बट लॉन्ग नेम! मी तुला राज म्हणू? इफ यु आर फाईन देन ओन्ली."

ती मोठी स्माईल देत म्हणाली.

"शुअर. मला सगळे राजच म्हणतात."

त्याने हसून सांगितलं.

"राज, कम हिअर. फायनली मी बांधलं घर. बघ ना!"

जेनीने मोठ्याने हाक दिली.

"बघितलंस? कमिंग प्रिन्सेस! तू युनिफॉर्ममध्ये चेंज करून ये. चेंजिंग रूम तिकडे आहे."

त्याने मायराला चेजिंग रूम कुठे आहे ते दाखवलं आणि तो धावतच जेनीकडे गेला. मायरा त्याच्याकडे पाहतच राहिली. हो, तिला पाहता क्षणी आवडला होता तो! तिच्याकडे हसत पाहत असलेला तो! लव्ह एट फर्स्ट साईट म्हणतात तसं!

"सिस्टर, मला पाणी देशील का तिथलं?"

एका मुलाने तिच्या पायाला हात लावत पाण्याच्या फिल्टरच्या दिशेने बोट दाखवलं. तसं तिला आपल्या जबाबदारीचीही जाणीव झाली. पण युनिफॉर्म घातल्याशिवाय काम करायला परमिशन नव्हती.

"राज, जरा ह्याला पाणी हवं आहे. देशील का? मी पटकन चेंज करून येते."

पर्स तिथे डेस्कवर ठेवत ती धावतच आत पळाली. राज तिची धांदल पाहून हसू लागला. त्यालाही तिचा स्वभाव आवडला होता. ती बडबडी होती. पण अगदी हसरी मुलगी होती. तिच्यासोबत आता इथे सगळं मॅनेज करायला बरं होईल असं वाटल्याने तीही खुश झाला होता.