Login

रखमा भाग 2

स्त्री भ्रूणहत्या
*चॅंम्पियन्स ट्रॉफी २०२५*

*रखमा* भाग....२

पाऊस थांबला तशी मी हळूच खिडकी उघडली, माझी नजर इथे तीथे फक्त त्या मुलींना शोधत होती, पण कुठेच दिसल्या नाहीत,कदाचीत मला भास झाला असेल, पुर्ण दिवस, पुर्ण रात्र त्या मुलींच्या विचारानेच कुस बदलत राहीले, एक थंडगार वार्‍याची झुळक आली, डोळे आपोआप बंद झाले शांत शांत होत गेलं सर्व,...
तितक्यात जोरजोरात दरवाजा ठोठावल्याचा आवाज, उठले अन् आवाजाच्या दिशेने चालू लागले, आमच्या खोली शेजारी दिवाणखाना आणि त्या दिवाणखान्या मधुन एक पोकळ बोळ होता तीथून पुढे गेले तर गच्ची आणि गच्ची मधुन परसात जायचा जीना.. अंधार खूप होता तरी चाचपडत खाली उतरत होते..परसात पोहचले तर डाव्या बाजूला एक बेड होत तिथे अंधुकसा प्रकाश होता, दार लोटलं तर समोर त्या छोट्या मुली.तिघीही घाबरलेल्या

" नका मारू.......नका मारु"

अशा विनवणी करत रडत होत्या आणि त्यांच्या समोर हातात कुर्‍हाड उगारुन दादासाहेब आणि मंदार उभे....!!
.
जाग आली तर पुर्ण घामाघुम झाले होते, हे स्वप्न की वास्तव..नेमकं काय घडतंय, कशाचा कशाशी संदर्भ लागत नव्हता.. त्या मुली सतत माझ्या मेंदुचा ताबा घेत होत्या आणि दादासाहेबा सोबत मंदार??.. तेही इतक्या रात्री हातात कुर्‍हाड घेउन काय करत होते तीथे..डोकं भिणभिणायला लागलं, हे कसले गुढ आहे भगवंता. अंग जड झालं, घशाला कोरड पडली, उठता ही येईना,कसंबसं उठून पाणी घटाघटा प्यायले, मंदारला फोन करायला फोन घेतला तर...शीट इथे आल्यापासून नेटवर्क , इंटरनेट सोशल मीडीया यापासून माझी नाळच तुटली होती, कसा संपर्क करू मंदारला. मग उरली रात्र तळमळतच गेली.
सकाळी जाग आली ती माईंच्या देवपुजेच्या शंखनिनादाने , रखमा खोली आवरत होती, तिला सांगू का कालच्या स्वप्ना बद्दल पण नको..माईंशीच बोलते सरळ मी दादासाहेब बाहेर गेल्यावर.

आवरून खाली आले तर काय.. मंदार, दादासाहेबांन सोबत बसुन न्याहरी करत होता, माई गरमगरम घावणे काढत होत्या..

"अरे..कधी आलास..काहीच निरोप नाही, आणि जरा संपर्का मधे रहा रे..कीती गैरसोय होते माझी, मला बोलायचं असतं, काही हवं असतं..एकतर इथे..."

"बस बस बस अगं किती हे प्रश्न. सांगतो गं बाई"

दादासाहेब काठी आपटत माजघरात निघून गेले, त्यांना मी मंदारला नावांनी हाक मारलेली आवडत नाही.. ना

"बस इथे आणि हे गरम गरम घावणे खा बघू..माझ्या लेकाला भुक लागली असेल.. हो की नाही रे पठ्या.. तुझ्या आईला ना काही कळत नाही,तुझी काळजीच घेत नाही बघ...पण बाबाला आहे हो काळजी आपल्या राजकुमाराची"

"इनफ मंदार ,जस्ट इनफ..
काय तुम्ही सर्व मुलगा मुलगा करता... की ठरवुनच टाकलंय मुलगाच होणार म्हणून, अरे मुलगी ही हवी आहेच की आपल्याला.तो कींवा ती..दोघंही आपलेच.."

" आरुषी...........!!!!

मंदारचा वाढलेला आवाज आणि हे रुप मी पहिल्यांदाच पाहिला.. हात उगारता उगारता थांबला तो.

" मंदार..काय हे... मी ज्या मंदारवर प्रेम केलं तो तूच ना..
मला असं वाटतंय मंदार तू मला आपल्या नागपुरच्या घरी घेउन जा,नाहीतर माझी जाण्याची व्यवस्था तरी कर...मला नाही रहायचं इथे..माझा जीव गुदमरतो इथे..तू निघून गेलास की दोन तिन दिवस येत नाहीस ,तुला संपर्क ही करू शकत नाही,मला अचानक लेबरपेन सुरू झाले तर काय करणार आपण? जवळपास नावालाही माणसं नाही.. ना कुठले हॉस्पिटल, तू काय म्हणून मला इथे घेउन आलास."

बोलता बोलता धाप लागून चक्कर आली मला आणि हळूहळू डोळ्यापुढे अंधार येत गेला.. जाग आली तेव्हा वर आपल्या खोलीत होते, उठता ही येत नव्हते, अंग जणू जड झालंय असं वाटतं होते. हळूहळू डोळे उघडायचा प्रयत्न केला तर खोलीत माझ्या व्यतीरीक्त कोणी नाही, रडू आले की निदान तू माझ्या सोबत थांबला देखील नाहीस, तुझी जास्त गरज आहे रे मला.

उठायचा प्रयत्न केला पण मला उठता येत नव्हतं. साधी घेरीच तर आली होती,मग असं जड-जड का वाटतंय, काहीच समजत नव्हते, मग शांत होत डोळे पुन्हा बंद केले आणि पडून राहिले..तर पावलांचा आवाज आला.रखमा आली माझ्या जवळ बसली आणि माझ्या डोक्यावरुन, माझ्या पोटावरुन हळूवार हात फीरवत असताना मंदार पण आला.

" काय गं ए..तुला साधं एका बाईला सांभाळता येत नाही,मी घरी नसताना तुला फक्त हीला बघायचं आहे, येवढपण जमत नाही का गं ए भवाने!! आणि तिला परसात जावे वाटले..तूच बोललीस का तीला काही, बोल ना..आता काय दातखीळी बसली का? गं भवाने"

" धनी..तुम्ही कशा पाई एवढा राग राग करता माझा, म्या काय केलंय, तुम्ही सांगता तसं गप गुमान करतीया, तुम्ही हिचा संग दुसरं लगीन केलं तरी बी म्या गप राहिलो, माई आनी दादासाहेब घालतात त्या तुकड्यावर जगतूया, आता म्या मुलीचं जन्माला घातल्या त्यात काय माझ्या एकटीचा दोष हाय होय.."

" ए...आवाज बंद कर ती कधीपण शुद्धीवर येईल, नीट लक्ष ठेव,आलोच"

काळजावर हजारो घाव झाले, असं वाटलं आभाळच कोसळले, मंदार ज्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं जो मला इतका जपत होता, प्रेमाच्या आणाभाका घेत होता, माझ्यासाठी घरच्यांसोबत भांडला, माझ्यामुळे तो आपल्या आईवडिलांनशी दुर झाला हा गिल्ट घेउन मी जगत होते.. येवढा मोठा विश्वासघात ..!!त्या दोघांच्या बोलण्याने मी क्षणभर दचकले, वाटलं ऊठुन सरळ जाब विचारावा, पण एकुणच काहीतरी भयंकर घडतंय आणि घडून गेलय, मी जर आतताए पणा केला तर कदाचीत माझ्या आणि पोटात वाढणाऱ्या या जीवालाही धोका होऊ शकतो. कारण मंदारचं हे रूप मी पहिल्यांदाच पहातेय..

तो गेल्यावर रखमा पुन्हा माझ्या डोक्यावरुन हात फिरवत राहीली. बराचवेळ ती तशीच बसून होती. डोळे पाण्यांनी काठोकाठ भरलेले..
*शिल्पा परूळेकर पै*
क्रमशः
0

🎭 Series Post

View all