मागील भागात आपण पाहिले की सुयश आणि कनिका पारगावात येऊन पोहोचतात. तो वाडा बघताच कनिकाला जाणवते की हीच तिच्या स्वप्नात आलेली जागा असते. आता पुढे बघू काय होते ते.
" आजी, ही विहीर नेहमीच अशी भरलेली असते?" ओटी भरायला तिथे उभी असलेल्या कनिकाने विचारले.
" कोरडीठाक पडलेली असते. तिला वेध लागले होते बहुतेक तुमच्या येण्याचे. म्हणून एवढी भरली आहे. या, या बाजूला अश्या उभ्या रहा. हळदीकुंकू वहा, हा खणनारळ सोडा त्या विहिरीत. जरा जपून हं. वाकू नका अजिबात. हा नेवैद्य पण ठेवा तिथे. लगेच बाजूला व्हा." आजी सांगत होत्या तसेच कनिका करत होती. नेवैद्य ठेवताना तिला कोणीतरी आपल्याला आत खेचल्यासारखे वाटले. पण आजींनी तिला घट्ट धरले होते. ती पटकन बाजूला झाली. दोघी लगेच आत आल्या.
" आता तुम्ही खोलीत गेला तरी चालेल." आजोबा म्हणाले.
" आजोबा, हे सगळं बघून आम्हाला अजिबात झोप येणार नाही. मला प्लीज सांगा हे सगळं काय सुरू आहे ते." सुयश काकुळतीला आला होता. ते बघून ते आजोबा तिथे दिवाणखान्यात बसले. त्यांनी सुयश आणि कनिकाला सुद्धा खुणावले. त्यांनी सांगायला सुरुवात केली.
" मी सांगितलं तसं, मी तुमच्या घराण्याचा राखणदार आहे.. तीनशेचारशे वर्षांपूर्वी जेव्हा ही जागा ओसाड पडली होती तेव्हा तुमच्या घराण्याच्या मूळ पुरूषाने इथे गाव वसवले. तेव्हा त्याने माझे आवाहन करून मला इकडची राखणदारी करायला सांगितली. तेव्हापासून मी तेच करतो आहे." ते ऐकून सुयश आणि कनिकाचा आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता.
" ही विहीर? हा विधी?" कनिकाने मध्येच विचारले.
" सांगतो.. सगळं सांगतो. गाव वसल्यानंतर या गावाची इनामदारी तुमच्या पूर्वजांकडे आली. सुरतेच्या दोन्ही लुटीत तुमचे पूर्वज गेले होते. केलेली सगळीच्या सगळी लूट त्यांनी सरकारदरबारी जमा न करता लपवून ठेवली. ज्याच्या राखणीची जबाबदारी सुद्धा माझ्यावरच टाकली गेली.
त्या काळच्या रिवाजाप्रमाणे मोठ्या मुलाला वंशपरंपरागत हक्क मिळायचा. तिथेच सुरूवात झाली या विहीरीच्या कहाणीला. तुझ्या पणजोबांचे माधवरावांचे लग्न झाले होते लक्ष्मीबाईंशी. लग्नाला अनेक वर्ष झाली तरी त्यांना मूलबाळ नव्हते. त्यामुळे घरच्यांचा दुसर्या लग्नासाठी त्यांना आग्रह सुरू होता.
" इकडून ऐकणं होईल का?" लक्ष्मीबाईंनी पदराशी खेळत माधवरावांना विचारले.
" ऐकतोय.." अडकित्त्याने सुपारी फोडत माधवराव म्हणाले.
" आमची काहीच हरकत नाही, तुमच्या दुसर्या विवाहाला. तसेही आमच्या हरकतीला विचारते तरी कोण?" लक्ष्मीबाईंच्या डोळ्यात पाणी होते.
" तुम्ही खरंच परवानगी देत आहात? विश्वास ठेवा आम्ही तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. पण आम्ही ही कर्मधर्मसंयोगाने एकुलते एक राहिले आहोत. घराण्याचा विचार करायलाच हवा."
" आम्ही आपल्या शब्दाबाहेर का आहोत? आपल्या सुखातच आमचं सुख."
पदराने डोळे पुसत लक्ष्मीबाई बोलल्या. ते वाक्य ऐकताच माधवरावांनी त्यांना जवळ ओढून घेतले आणि लक्ष्मीबाईंनी आपले सर्वस्व त्यांना अर्पण केले. थोड्याच दिवसात शेजारच्या गावातल्याच एका मुलीशी, भामेशी माधवरावांचा विवाह झाला. वडिल नसल्यामुळे आणि घरच्या गरिबीमुळे सोळावं लागलं तरी तिचं लग्न ठरत नव्हतं. त्यामुळे माधवरावांचे स्थळ येताच भामेच्या मामाने तिचे लग्न लावून दिले. कमी वयातच परिस्थितीचे टक्केटोणपे खाल्लेली भामा तशी चतुर होती. समोर आलेल्या परिस्थितीला कसे तोंड द्यायचे याचा विचार करतच तिने इनामदारांच्या वाड्यात पहिले पाऊल टाकले. लक्ष्मीबाईंने नवदांपत्याचे औक्षण केले. कितीही मनाला आवरले तरिही डोळ्यातले चुकार अश्रु निरंजनावर पडले आणि चर्र आवाज झाला. घाईघाईने त्या वळल्या. त्यांना असं लगबगीने वळताना बघून भामेच्या चेहर्यावर हसू होते.
नहाण येऊन गेल्यामुळे लगोलगच गर्भादानाचा विधीही झाला. त्यावेळेस माधवराव ज्या प्रेमाने तिच्याशी वागले, त्यावरून तिला असे वाटू लागले की आता हा वाडा, ही संपत्ती सगळं आपलंच. माधवरावांसमोर अत्यंत अदबीने बोलणारी ती ते नसताना नोकराचाकरांशी उद्धटपणे बोलू लागली. तिच्या अनंत तक्रारी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे माधवरावांपर्यंत पोहोचू लागल्या. नुकतेच लग्न झालेले ते याकडे कानाडोळा करू लागले. अपेक्षेप्रमाणे लवकरच भामेकडे गोड बातमी आली. ती येताच तिचा रूबाब अजूनच वाढला. सगळी गडी मंडळी लक्ष्मीबाईंकडे बघून गप्पपणे घरात काम करत असायची. अजूनतरी भामेची आपल्या सवतीला उलटं बोलायची हिंमत झाली नव्हती. पण त्या दिवशी कहरच झाला.
"कसलं थंड दूध आहे हे. यात केशराच्या चार काड्या टाकायला सांगितल्या होत्या. त्याही टाकता नाही का आल्या?" भामा जुन्या मोलकरणीवर ओरडत होती.
" धाकट्या बाई काय झालं एवढं चिडायला? आणि आधीपासून त्या मावशी या वाड्यावर आहेत. त्यांच्याशी असे बोलतात?" लक्ष्मीबाई असह्य होऊन बोलायला गेल्या. आपला आवाज अजिबात कमी न करता भामा म्हणाली,
" अनेक वर्ष कामे करत आहेत म्हणजे आकाशाला हात नाही पोहोचले. आणि मला डोहाळे लागले आहेत थंड केशरी दूध पिण्याचे. ते तुम्हाला काय समजणार?" लागट शब्दात भामा बोलली. तिचे ते शब्द ऐकून लक्ष्मीबाई काहीच न बोलता दुखावलेल्या मनाने जायला वळल्या. आणि चक्कर येऊन पडल्या.
भामेची ही अरेरावी माधवराव सहन करतील की तिला आळा घालतील? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा