Login

अनुज

An Emotional Story Of Brother And Sister
अनुज ...©®विवेक चंद्रकांत....

गोडाधोडाचा स्वयंपाक होत आला आणि तिने थोडा मोकळा श्वास घेतला. तेवढ्यात बेल वाजली. आता कोण ह्यावेळी? हे तर उशीरा येणार होते? तिने पिपं होल मधून पहिले. चेहरा नीट लक्षात येईना.तिने लाकडी दरवाजा उघडून जाळीच्या दरवाज्यातून त्या इसमाला पाहिले. त्या माणसाचा चेहरा खूप पूर्वी तिला पाहिल्यासारखा वाटला पण कोण ते समजेना.

"कोण? कोण हवय आपल्याला?"

"मी अनुज. अनुज अग्निहोत्री."

अग्निहोत्री म्हटल्यावर तिने चमकून पाहिले.

"म्हणजे तू?"

ती पुतळ्यासारखी झाली. तिला काही सुचेना. खूप साऱ्या जुन्या गोष्टी तिच्या डोक्यात आल्या.

" दरवाजा उघडशील की परत जाऊ? "

त्याने विचारले तशी ती भानावर आली. तिने पटकन दरवाजा उघडला. तसा अनुज आत आला. सोफ्यावर बसला. तिने पाणी आणून दिले.
"चहा ठेवते."

ती आतमध्ये चहा करायला गेली. तिने आतूनच विचारले
" डायबेटीस वगैरे नाही ना? साखर टाकू? "

"टाक. काही आजार नाही "

त्याने हळूहळू चहा संपवला. वातावरणात तणावपूर्ण शांतता होती. काय बोलावे दोघांनाही समजत नव्हते.शेवटी तीच म्हणाली.

" आज इतक्या वर्षानंतर कशी काय आठवण आली? "
तिच्या आवाजात तिरकसपणा डोकावलाच.

अनुजने घसा खाकरला.
"तुझे पती आले होते परवा माझ्या ऑफिसात. माझा ठावठिकाणा कुठून शोधून काढला कोणास ठाऊक? मी ओळखत नव्हतो. त्यांनीच ओळख दिली.ऑफिस सुटल्यावर जवळच्या हॉटेलमध्ये खूप वेळ बसलो. मला म्हणाले हाड वैर तुमच्या आणि तिच्या वडिलांत होते. ज्या इस्टे्टीसाठी दोघे भाऊ वैरी झाले ती इस्टेट आता विकूनही खूप काळ गेला. दोघे भाऊ कैलासवासी होऊन कितीतरी वर्षे झाली. पण त्यांनी त्यांचे वैर तुमच्या पिढीत उतरवले. गेल्या कित्येक वर्षात तुम्ही चुलत भावडानीं एकमेकांचे तोंड पहिले नाही. संवाद नाही. खरेच याची जरूर आहे का? आता इतक्या वर्षात मनातले किल्मीश कशाला ठेवायचे? तिचा भाऊ कितीतरी वर्षांपासून अमेरिकेत जाऊन बसला. तू तिचा सख्खा चुलतभाऊ गावात असून ना तिला माहित, ना तिच्याबद्दल तुला. बघ आता या वयात तरी नाते जोडा..."
अनुज थोडा थांबला.. कदाचित त्याचा गळा भरून आला असावा.

"मंदाताई मी कालच येणार होतो. पण आजचा दिवस निवडला. म्हटले आज राखी बांधून घेऊ आणि नात्यांना पुन्हा सुरुवात करू."

ती उठली, एक पाट ठेवला. त्याभोवती रांगोळी काढली. राखीचे तबक बनवले. अनुजला बसवले, गंध लावला, ओवाळले, राखी बांधली, ताटात असलेल्या वाटीतली खीर चमच्याने भरवली. त्यानेही खिशातून कोरी करकरीत शंभराची नोट टाकली. ती ताट ठेवून परत आली तसा अनुज तिच्या पायाशी वाकला.

"मंदाताई, आशीर्वाद दे "
©®विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार

तिने त्याच्या पाठीवरून हात फिरवून त्याला उभे केले आणि इतका वेळ आवरून ठेवलेला तिचा अश्रूचा बंध फुटला. त्याला घट्ट मिठीत घेऊन ती ओक्साबोकशी रडू लागली. तोही अश्रू पुसत राहिला. आवेग ओसरल्यावर ती बसली.

"आठवत तुला लहानपणी मी कडेवर घेऊन फिरायची."

" फारसे नाही आठवत ग. पण तू भातुकलीत जेवण बनवून आम्हाला द्यायची ते आठवते. आम्ही फक्त सुटीत यायचो खूप लहानपणी.. पुढे बाबा आणि तात्याच्या कोर्ट कचेऱ्या चालू झाल्यावर तेही बंद झाले. ते घर आहे का ग गावाकडचे? "

' नाही रे. दादा अमेरिकेला जाण्याआधीच विकून टाकले. तात्या तर कधीचेच वारले.. आईही गेली. मग कोण राहणार तिथे? "

"काकू रोज दुपारी सातूचे पीठ बनवून द्यायची आम्हांला. ती चव अजून तोंडात आहे. आता तसें पीठ कोणाला बनवता येणारच नाही."

"पद्माकाकू आहे कारे.?"

"नाही ग. आई वारली दोन वर्षांपूर्वी. माझ्याचकडे होती."

" माहिती असते ती इथेच आहे तर आली असती रे भेटायला. माझे लहानपणी किती लाड करायची. तिला मुलगी नव्हती ना म्हणून माझ्यावर हौस पुरी करून घ्यायची. बरं ते जाऊदे
कुठे राहतो रे तू?"

"नेताजी नगरला."

" म्हणजे इथून ऑटोने वीस मिनिटाचा रस्ता. आणि मुलबाळ किती? "

" दोन. मोठा मुलगा बारावीत.. मुलगी दहावीत. तुझा मुलगा बंगलोरला जॉब करतो ना? दाजींनी सांगितलं मला. "

"अनिल कुठे असतो रे.?

"नगरला असतो."

"त्याचा नंबर देशील? बोलते त्याच्याशी."

"नक्कीच."

तेवढ्यात बेल वाजली.
"हे आले असतील." तिने उठून दरवाजा उघडला आणि कृतज्ञतेने नवऱ्याकडे पहिले.

"झाली का भावाबहिणीची भेट?"

"झाली. पण अजून खूप गप्पा मारायच्या आहेत." ती म्हणाली.

"मंदाताई, ही सगळी दाजींची मेहरबानी. नाहीतर आपण तीच जूनी अढी डोक्यात ठेवून बसलो असतो."

"बरे ते जाऊदे सगळे. आता जेवण करूनच जा."

"अगं पण ऐन वेळेस आलो. स्वयंपाक केला नसेल. पुरेल?"

"अनू.. आपल्या अग्निहोत्री घराण्यात थोडे जास्तच बनवतात. ऐन वेळा कोणी आले तर.. आई आणि पद्माकाकूची शिकवणच आहे मला."

"अरे तू भेटल्याने तीच पोट भरले आता. काही कमी पडणार नाही बघ." तिचा नवरा म्हणाला आणि वातावरण हलके झाले.

जेवता जेवता ती त्याला म्हणाली

"आता रविवारी वहिनी आणि मुलांना घेऊन ये रे."

"नाही. नाही आणणार."
तिचा घास घशात अडकला " का रे? " ती कशीबशी म्हणाली.

"अगं या रविवारी आधी तुला आणि दाजींना घरी घेऊन जायचे. जरातरी का होईना माहेरपण करायचे आहे तुझे. चालेल ना?"

तिच्या गळ्यात पुन्हा हुंदका दाटून आल्याने ती बोलू शकली नाही. तिने फक्त होकारार्थी मान हलवली. डोळ्यातले पाणी तिने पुन्हा पुसले.. आज अनुज आल्यापासून कितीदा डोळ्यातले पाणी पुसले असेल हे तिलाही आठवत नाही....
©®डॉ. विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार.