Login

रखमा

स्त्री भ्रूणहत्या
*चॅंम्पियन्स ट्रॉफी २०२५*

*रखमा* भाग.....१

चार दिवस झाले मंदार पुन्हा कामानिमित्त शहरात गेला होता, तो नसला की करमतचं नाही, म्हणून आज मुद्दाम खाली उतरलेच नाही,माईंनी दोन तीन वेळा रखमालाही पाठवले न्याहरीसाठी बोलवायला पण मीच नाही गेले, रखमा ही घरच्या कामासाठी माईंची मदतनीस, दिसायला काळी सावळी पण रेखीव होती, तिचे डोळे खूप बोलके, पण सतत कसल्यातरी दडपणाखाली जाणवायची मला ती, मंदारची देखील खूप काळजी घ्यायची. माझ्या पेक्षा मंदारच्या आवडीनिवडी तीलाच जास्त माहीती होत्या आणि माई तर खूप प्रेमळ आहेत तशा, पण दादासाहेंबांची का कुणास ठाऊक खूप भिती वाटते मला, तोंडाने कधी मला प्रत्यक्ष बोलले नाहीत पण त्यांची नजर, खूप आत खोलवर रुजते आणि आपोआपच पोटात भीतीचा गोळा येतो.

मस्त थोडावेळ विश्रांती घेउन कपाट लाऊन घेतले, इथे आल्यापासून वेळच मिळाला नव्हता ,सामान तसंच पडले होते, म्हंटले चला आज वेळ आहे तर कपाट लावूया. खोलीच्या खिडकीलगतच बसून कपडे आवरताना पावसाची सर आली, म्हणून लागलीच खीडकी बंद करायला गेले, तर मागच्या परसात तिन छोट्या गोड मुली भिजताना दिसल्या,

'अरे इतक्या पावसात आमच्या परसात ह्या मुली कोण आणि कुणाच्या?'रखमाला तर मुलबाळ नाही आणि तसंही वाड्यात कोणी येत जात नाही. आजुबाजुला वस्ती ही नाही,मग ह्या मुली कोण?

"रखमा..अगं एक रखमा" रखमाला हाका मारतच खोली मधुन बाहेर आले, खाली जीन्या लगत माई वाती वळत बसल्या होत्या, मी भराभभरा जीना उतरु लागले..

" अगं..अगं सावकाश भरल्या बाईनं असं धावपळ करू नये, दोन जीवांची आहेस तू, सावकाश जरा..!!

"अहो माई, मागे परसात तिन छोट्या मुली भीजत आहेत कुणाच्या आहे हो, आणि इतक्या पावसात....."

माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत माई माझ्या जवळ आल्या, इथे तीथे पहात माझ्या तोंडावर हात ठेवला..

" सुनबाई...हळू..,काही बोलू नका."

" मी जरा जाऊन बघते हो माई, लेकरू भिजतय"

माज घरामधुन काही ठोकल्याचा आवाज आला, म्हणजे दादासाहेब आले, आवाजाने माई घाबरल्या, मला हात जोडून शांत राहण्याचा इशारा केला, आपला पदर सावरून तांब्या पेला घेऊन माजघरात गेल्या.

" हं काय गडबड चालू आहे ?..."

" काही नाही हो... सुनबाई ना थोडं परसात.....

तांब्या पेला पडल्याचा आवाजाने मी ही माजघरात गेले तर, माई घाबरून एका कोपर्‍यात उभ्या, आणि दादासाहेब हातातील काठी उगारून..

" आपल्या घराचे काही नियम आहेत ते तुमच्या लाडक्या लेकाने सुनबाईना नसतील सांगितले पण तुम्हाला सांगता येत नाही. पुन्हा परसात जायचा विचार जरी केलात तर, तुमची ही कायमची परसात सोय करतो"

हुकमी, भारदस्त आवाजाचे दादासाहेब, ज्यांचा येवढा दरारा होता की मंदार साठीही त्यांनी सांगितलेला प्रत्येक शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ होती, आणि माई तर, इतक्या घाबरायच्या की,अक्षरशा कापायच्यच.
आमच्या लग्नाला ही परवानगी नव्हती दादासाहेबांची, लग्न होऊन ७ महिने नागपूर मधेच होतो,पण नव्या पाहुण्यांच्या चाहुलीने इथून सांगावा आला की नातवाचा जन्म आपल्या घरीच होऊ दे... तेव्हा मीही रागावले की " नातवाचा जन्म, असं का?" नात ही होऊ शकते ना? आणि मला तर बाई पहीली मुलगीच हवी."

यावर मंदार काहीच बोलला नव्हता, फक्त हसला.. त्यांच्या हसण्यात असंख्य गुढ लपली होती,जी मला दिसत नव्हती... कदाचित दाखवली जात नव्हती.

*शिल्पा परुळेकर पै*
क्रमशः:
0

🎭 Series Post

View all