रक्षा-बंधन

एक वचन.. त्या सगळ्या बहिणींसाठी..
" 'तु कामाला लागलास की मोठ्ठं गिफ्ट वसूल करेन' असं नेहमी म्हणायचीस ना. चल, आता माग तुला हवं ते. भरपूर पगार असलेली नोकरी लागली आहे मला."

राखी बांधून घेता घेता तो बोलला.

"खरचं दादा.. हवं ते गिफ्ट मागू?"

"मागून तर बघ!"

खिशातून पाकीट काढत तो म्हणाला.

तिने तिचा उजवा हात पुढे केला आणि म्हणाली.

"मला वचन हवंय दादा..!"

"वचन? कसलं?"

आश्चर्यचकित होत त्याने विचारलं.

"आम्हा मुलींना स्वातंत्र्य तर मिळालं रे.. पण आम्ही आजही सुरक्षित नाही. आजही बाहेर गेल्यावर बस आणि ट्रेन मधे आमच्या शरीराला नको त्या ठिकाणी गर्दीचा बहाणा करून स्पर्श केला जातो. शाळेच्या मुली, कॉलेज मधे शिकणाऱ्या मुली,घरकाम करून आपल्या संसाराचा गाडा ओढणाऱ्या बायका किंवा नवजात बाळ...कुणालाही सोडत नाही रे पुरुषी जात. आम्हाला पण मोकळा श्वास घ्यायचा आहे. 'तुम्ही मुली तोकडे कपडे घालता म्हणून अतिप्रसंग घडतात' असं म्हणण्यापेक्षा तुम्ही तुमची नजर चांगली ठेवावी. तुझे मित्र सुद्धा मला जसं त्यांची बहिण मानतात तसचं आणखी कुणाच्या तरी बहिणीकडे उपभोगाची वस्तू म्हणून न बघता आपली बहीण म्हणूनच बघावं.
दादा...मला वचन दे. तू कधीच कोणत्या मुलीकडे वाईट नजरेने बघणार नाहीस. जेव्हा केंव्हा तुझ्या मनात चुकीचा विचार येईल त्यावेळी तुला सुद्धा एक बहिण आहे याची आठवण होऊ दे. ती मुलगी पण कुणाची तरी बहिण असेल याची जाणीव राहू दे.
हल्ली रोजच डोकं सुन्न करणाऱ्या बलात्काराच्या बातम्या टिव्हीवर आणि सोशल मीडियावर बघायला मिळतात. सतत एक भीती असते की आपण हिच्या जागी नाही पण ही सुद्धा कुणाची तरी बहिण आणि मुलगी असेलच ना...हिच्यावर बलात्कार करणाऱ्याला पण आई बहीण असेलच ना..त्यांना जरा देखील माणुसकी नसावी का?
यशश्री शिंदे आणि मौमिता सारख्या कितीतरी तरुणींचे रोजचं बळी जातात..कुणाला बलात्कार करून मारून टाकलं जातं तर कुणी आपला बलात्कार केलाय आता आपल्या कुटुंबाला सगळ्या समाजाला समोर जावं लागेल या भीतीने आत्महत्या करून स्वतःच आयुष्य संपवतात.
दादा..आम्हा मुलींना त्या घाणेरड्या नजरांपासून आणि स्पर्शापासून सुटका हवी आहे. तुझी बहिण म्हणून आणि एक स्त्री म्हणून तुझ्याकडे आज रक्षाबंधनाच्या दिवशी भेट म्हणून माझं इतकंच मागणं आहे.

दोघांचेही डोळे पाण्याने भरले होते. त्याने तिच्या हातावर हात ठेवला.

रक्षा - बंधन

"राणी... मी तुला वचन देतो; असं कुठलचं कामं करणार नाही जेणेकरून आई बाबा आणि तुला शरमेने मान खाली घालावी लागेल."

स्वतःसोबत आणखी बऱ्याच मुलींना आपण आज सुरक्षित केलं या आनंदी भावनेने तिने भावाला घट्ट मिठी मारून तिने तिचं रक्षाबंधन साजरं केलं आणि भावाकडून प्रत्येक बहिणींचं रक्षण होईल हे वचन सुद्धा घेतलं.
©® श्रावणी लोखंडे..