रक्षक जेव्हा भक्षक बनतो (Tenali Rama Story In Marathi)

Tenali Rama Story In Marathi
रक्षक जेव्हा भक्षक बनतो

रामाच्या तोंडून ते शब्द ऐकून राजाही चकित झालेला. शेवटी त्याने विचारलं; “तुला कळतंय तू काय बोलतोयस?”

“हो महाराज. मला माहितेय मी काय बोलतोय आणि जे बोलतोय ते पूर्ण जबाबदारीने बोलतोय. तो चोर इथे दरबारात हजर आहे.” रामा म्हणाला.

“हा सगळा या ढोंगीचा बनाव आहे महाराज. हा काय सांगणार चोर कोण आहे. हा स्वतः तिथेच होता.” आचार्य मध्येच म्हणाला.

“कुठे होतो?” रामाने विचारलं.

“राज नर्तकी सौदामिनीच्या घरी.” आचार्य म्हणाला.

“तुम्हाला कोणी सांगितलं?” रामाने उलट विचारलं.

“कोणी कशाला सांगायला हवं मला माहीत आहे.” आचार्य म्हणाला.

“मी तिथे नव्हतो.” रामा म्हणाला.

“होतास.” आचार्य म्हणाला.

“नाही. नव्हतो.” रामा म्हणाला.

असे दोघात वाद होऊ लागले आणि रामा पटकन म्हणाला; “तुम्ही तर असे म्हणताय जसं तुम्ही स्वतः तिथे होतात आणि मला बघितलं आहे.”

“हो होतो. मीही तिथेच होतो.” आचार्य पटकन बोलून गेला.

“कुठे?” रामाने विचारलं.

“सौदामिनीच्या घरी.” आचार्य म्हणाला.

त्याच्या या बोलण्याने राजा एकदम चकित होऊन त्याच्याकडे बघत होता. मंत्री देखील गोंधळून गेला होता आणि त्याने विचारले; “आचार्य! मध्यरात्री तुम्ही राज नर्तकी सौदामिनीच्या घरी काय करत होतात?”

मंत्र्याने हे विचारल्या बरोबर आचार्य गोंधळला. रामा गालातल्या गालात हसत होता तर धनी मणी त्याची खिल्ली उडवत होते.

“कुठे अडकला म्हातारा.” मणी म्हणाला.

“चांगलाच अडकला आहे आता.” धनी म्हणाला.

दोघे कुजबुजत हसत होते. आचार्यने फक्त एकदा मागे वळून पाहिले पण तो काही बोलत नाही हे पाहून मंत्र्यांनी पुन्हा विचारले; “तुम्ही आमच्या प्रश्नाचे उत्तर नाही दिले आचार्य. तुम्ही मध्य रात्री राज नर्तकीच्या घरी काय करत होतात?”

आचार्य विचार करू लागला. त्यावर रामाच बोलू लागला; “अरे आचार्य! यात एवढा विचार करण्याची काय गरज आहे? सांगून टाका सगळ्यांना तुम्ही माझ्याबरोबर तिथे होतात.”

“तुझ्या बरोबर?” आचार्य धीम्या आवाजात केविलवाणा चेहरा करून म्हणाला.

“नाहीतर काय मुनिवर. मी सांगतो महाराज काय झालं ते! जेव्हा तुम्ही मला तीन दिवसात त्या चोराला पकडण्याची मुदत दिली तेव्हा मी खूप काळजीत पडलो. मला कळतच नव्हतं नक्की काय करू. तेव्हाच आचार्य तथाचार्य माझ्या मदतीला आले. त्यांनीच मला धीर दिला. आम्ही काल रात्री नगरात त्या चोराला शोधण्यासाठी फिरत होतो. तेव्हाच आम्हाला सौदामिनीजींच्या ओरडण्याचा आवाज आला आणि आम्ही त्या दिशेने पळालो.” रामा म्हणाला

आणि हात जोडून आचार्यला म्हणाला; “काय आचार्य! असंच झालं होतं ना?”

“हो. हो. असंच झालं होतं महाराज.” आचार्य म्हणाला.

“काय सौदामिनीजी मी बरोबर बोललो ना? असंच झालं होतं ना?” रामाने सौदामिनीला विचारलं.

आचार्यने तिला हळूच मानेने हो म्हण म्हणून खूण केली आणि ती म्हणाली; “हो महाराज असंच झालं होतं. संगीताचा रियाज करता करता कधी मध्य रात्र झाली आम्हाला समजलंच नाही. जेव्हा आम्ही दागिने काढून ठेवायला तिजोरी उघडली तेव्हा पाहिलं ती नथ तिथून गायब होती. तेव्हाच आम्ही तिथून कोणालातरी पळताना पाहिले आणि आम्ही जोर जोरात ओरडू लागलो चोर, चोर, चोर.”

“इथून आम्ही यांचा आवाज ऐकून धावत गेलो आणि दुसरीकडून तो चोर नथ घेऊन आमच्या दिशेने आला आणि आमची त्याला धडक बसली. पुढे तुम्ही सांगा.” रामा आचार्यला म्हणाला.

“पुढे… पुढे…” आचार्य अडखळत म्हणाला.

“बरोबर. पुढे हे होते मागे मी होतो. चोर आधी यांनाच येऊन धडकला महाराज.” रामा म्हणाला.

“म्हणजे आचार्य सगळ्यात पहिले तुम्हीच चोराला पाहिले आहे.” महामंत्री म्हणाले.

“चोर… हा.. म्हणजे..” आचार्य गोंधळून रामाकडे बघत म्हणाला.

“बघा महाराज हीच यांची महानता आहे. चोराला आधी यांनी बघितलं पण यांची इच्छा आहे की मी त्याचं श्रेय घ्यावं. ते सर्व श्रेय मलाच देतायत. शतशत नमन आहे अश्या महान व्यक्तीला.” रामा म्हणाला.

“बघितलं मणी काय धुवून धुवून मारतोय हा पंडित गुरुजीला.” धनी कुजबुजला.

“अरे अजून फक्त धुतलं आहे. आता पिळून वाळत पण घालेल.” मणी म्हणाला आणि दोघं हसू लागले.

“पण महाराज मी एवढा स्वार्थी नाहीये की आदरणीय आचार्यांच्या वाटचे श्रेय मी घेऊन जाईन म्हणून आचार्य मी इच्छितो की तुम्ही इथे सगळ्यांसमोर त्या चोराचे नाव महाराजांना सांगा.” रामा म्हणाला.

“आम्ही.” आचार्य म्हणाला.

“काय? आचार्य तुम्ही?” महामंत्र्यांनी गोंधळून विचारलं.

“नाही नाही. आम्ही पंडितला विचारत होतो काय आम्ही सांगायचं चोर कोण आहे?” आचार्य म्हणाला.

“हा आचार्य. तुम्हीच सांगायचं. सांगा महाराजांना चोर कोण आहे.” रामा म्हणाला.

“तो चोर… तो चोर…” आचार्य एवढंच म्हणाला.

“आचार्य! तुम्ही हेच सांगताय ना तो चोर अजून कोणी नाही तर स्वतः हा नगर कोतवाल आहे.” रामा पाठमोरा मागे जात कोतवाल समोर उभा राहत म्हणाला.

सगळेच जण खूप गोंधळून गेले होते. कोतवाल खूप घाबरला होता आणि दोन मिनिटं स्तब्ध झाला.

“हे काय बकवास आहे. हा पंडित काय बडबडतोय? मी तुमचा नगर कोतवाल आहे महाराज. तुम्हीच सांगा मी कसा चोर असू शकतो? जर मी चोर असेन तर विचारा महाराज याला याच्याकडे काय पुरावा आहे मी चोर असल्याचा.” कोतवाल घाबरून म्हणाला.

“पुराव्या शिवाय कोणावर आरोप करायचे नाही हे काही दिवस तुमच्या संगतीत राहूनच शिकलोय कोतवाल. पुरावा आहे महाराज. आणि तो पुरावा आहे…” रामा त्याच्या भोवती फिरत म्हणाला आणि त्याने कोतवालच्या कंबरेला असलेला बटवा काढला.

कोतवाल गोंधळून फक्त बघत होता. रामाने त्या बटव्यातून चोर जी निशाणी सगळ्या चोऱ्यांमध्ये सोडली होती तशी बाहेर काढली.

“हे बघा महाराज हीच निशाणी चोर प्रत्येक चोरी नंतर ठेवून जातो आणि एवढंच नाही महाराज. याचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे आणखीन एक पुरावा आहे ज्यानंतर कोणत्याच पुराव्याची गरज पडणार नाही.” रामा म्हणाला आणि त्याने त्या बटव्यातून ती नथ बाहेर काढली.

सगळे गोंधळून फक्त बघत होते. रामाला त्याने आणि गुंडप्पाने मिळून कसा तो बटवा कोतवालच्या नकळत त्याच्या कंबरेला असलेल्या शेल्याला बांधला हे आठवलं तर आचार्यला काल रात्री कसे आपण स्वतःच ती नथ पंडित रामाच्या हाती दिली होती हे आठवत होतं.

“आमची नथ! आमची नथ सापडली. हे बघा तथाचार्य जी ही तीच आहे ना!” सौदामिनीने रामाच्या हातून ती नथ घेऊन आचार्यला आनंदी होऊन दाखवू लागली.

आचार्य मात्र नथ न बघता वर बघू लागला.

“खोटं खोटं… हे षडयंत्र आहे महाराज. मला अडकविण्यासाठी हे रचलं गेलं आहे. आचार्य तुम्ही काही बोलत का नाही?” कोतवाल रडकुंडीला येऊन म्हणाला.

आचार्यने त्याच्याकडून नजर चोरली.

“काय आचार्य तुम्ही इकडे तिकडे काय बघताय? महाराजांना सांगत का नाही तुम्ही काल रात्री सौदामिनीजींच्या घरातून याच चोराला पळताना बघितलं आहे.” रामा म्हणाला.

आचार्य काहीच बोलत नव्हता.

“बोला आचार्य.” महामंत्री म्हणाले.

तरीही आचार्य काहीच बोलेना बघून महाराज बोलू लागले; “आचार्य तथाचार्य! तुम्हाला माहित आहे आमच्यासाठी हे आवश्यक आहे की जे सत्य असेल ते आम्ही तुमच्या तोंडून ऐकू.”

“हो महाराज. हाच आहे. यानेच राज नर्तकी सौदामिनी देवींच्या घरून नथ चोरली.” आचार्य म्हणाला.

“आचार्य तुम्ही हे काय…” कोतवाल बोलत होता पण त्याला मध्येच तोडत आचार्य बोलू लागला; “गप्प बस अधर्मी! खबरदार जर तुझ्या तोंडून आमचं नाव जरी घेतलंस तरी. महाराज याला अशी शिक्षा द्या जी विजयनगरच्या इतिहासात कोणालाही दिली गेली नसेल. मृत्युदंड द्या महाराज याला.”

त्याच्या बोलण्याने कोतवालला रामाची बेडूक आणि विंचवाची गोष्ट आठवली.

“जेव्हा रक्षकच भक्षक बनतो तेव्हा न्याय व्यवस्थेकडून न्यायाची अपेक्षा कोणी कशी ठेवू शकेल? या अपराध्याला तर इतर अपराध्यांपेक्षा जास्त कडक शिक्षा दिली जाईल. उद्या सूर्योदय झाल्यानंतर भर चौकात याची धिंड काढण्यात येईल आणि परवा सूर्यास्त झाल्यावर सगळ्यांसमोर फाशी देण्यात येईल. जोवर याचा जीव जात नाही तोवर फाशीवर लटकवले जाईल हा आमचा आदेश आहे.” राजा चिडून म्हणाला.

सगळ्यांनी “महाराज कृष्णदेवराय यांचा विजय असो” असा जयघोष केला. राजाने हात करून सगळ्यांना थांबवलं आणि पुन्हा बोलू लागला; “रामाकृष्ण! नाही पंडित रामाकृष्ण यांना जी मुदत दिली गेली होती त्या आधीच त्यांनी त्यांचं कार्य पूर्ण केलं आणि स्वतःला निर्दोष सिद्ध केलं त्यामुळे त्यांना या प्रकरणातून मुक्त करण्यात येत आहे. शिवाय या अपराध्याला पकडण्यासाठी जी बक्षीस रक्कम ठेवण्यात आली होती ती देखील त्यांना देण्यात येत आहे. सभा समाप्त.”

पुन्हा एकदा सगळ्यांनी राजाचा जयघोष केला.

रामा कोतवाल जवळ आला आणि बोलू लागला; “काय कोतवाल जी कसं वाटलं? मला वाटतंय आता तुम्हाला अनुभव आला असेल जेव्हा निर्दोष व्यक्तीवर आरोप लागतो तेव्हा कसं वाटतं ते.”

कोतवालला लगेच त्याने रामा सोबत केलेला प्रकार आठवला पण तोवर आता उशीर झाला होता. सैनिक येऊन कोतवालला घेऊन गेले.

‘आज तुझ्या नशिबाने वाचला आहेस. भविष्यात काय शिक्षा लिहून ठेवली आहे ते बघू.’ आचार्य त्याच्याकडे कुत्सितपणे बघत मनात म्हणाला.

“काय बंधू आज माझी प्रशंसा करण्यासाठी काही बोलणार नाहीस?” रामा म्हणाला.

“मूर्ख आहेस तू रामा. तुलाच असं वाटतंय की तू सगळ्यांना वेडं बनवलं आहेस पण इथे असं कोणीतरी आहे ज्याला तुझी गोष्ट पचली नाहीये.” बंधू म्हणाली.

“कोण आहे असं?” रामाने विचारलं.

“ते बघ तिकडे.” बंधू म्हणाली.

रामाने पाहिलं तर महामंत्री होते. त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट कळत होतं त्यांना त्याचं कोणतंच बोलणं पटलेलं नाही. रामा आणि महामंत्री दरबारातून बाहेर आले आणि बोलत होते.

“तुला काय वाटतंय आज जे राज दरबारात झालं त्याला बाकी लोकांसारखे आम्हीही सहमत असू? आम्हाला माहीत आहे कोतवाल चोर असूच शकत नाही. हा तू खेळलेला खेळ होता.” महामंत्री म्हणाले.

“क्षमा करा मान्यवर. खोट्यासोबत खोटं करणं हे काही पाप नाही. कोतवालने त्याची चामडी वाचवायला मला खोट्या आरोपात अडकवले म्हणून मी माझे प्राण वाचवायला त्याला अडकवले. मी तर त्याला तेच परत केले प्रभू जे त्याने मला दिले. हा! जे घडलं ते व्यक्तिगत स्वरूपात कितीही बरोबर असलं तरीही न्यायाच्या दृष्टीने चुकीचे आहे.” रामा म्हणाला.

“काय म्हणायचं आहे तुला?” त्यांनी विचारलं.

“मला असं कधीच नाही वाटणार महाराजांच्या निर्णयाने एखाद्या निर्दोष व्यक्तीला शिक्षा होऊन त्यांच्या न्यायाला कलंक लागेल. खरा चोर पकडला जाऊ शकतो जर तुम्ही मला या कामात मदत कराल.” रामा म्हणाला.

“आणि तुला असं का वाटतंय आम्ही तुझी मदत करू?” मंत्री म्हणाले.

“कारण न्यायासाठी.” रामा म्हणाला.

“आणि तुला आमच्याकडून काय मदत अपेक्षित आहे?” मंत्री म्हणाले.

रामाने त्यांना त्याची सर्व योजना समजावून सांगितली.

“यात तुझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.” मंत्री म्हणाले.

“आता मोठ्या गोष्टी मिळवायच्या म्हणजे धोका तर पत्करावा लागेल.” रामा म्हणाला.

दुसऱ्या दिवशी ठरल्या प्रमाणे कोतवालला भर चौकात दोन्ही हात वर बांधून उभे करण्यात आले होते. सर्व नगर चोर पाहायला आले होते. दवंडी पिटवून त्याला उद्या सगळ्यांसमोर फाशी होणार असल्याचे देखील सांगितले गेले.

“बघितलं गोपण्णा याला म्हणतात चकचकीत दुकान आणि फिका माल.” रामा कोतवाल सोबत असणाऱ्या माणसाला म्हणाला.

“नाव मोते लकशन चोटे.” गुंडप्पा म्हणाला.

“बरोबर! नाव मोठे आणि लक्षण खोटे. काय म्हणायचा हा चोर हवा आहे मला कोणी पकडू शकत नाही, वाळू आहे मुठीतून निसटून जातो. आता आला ना कायद्याच्या कचाट्यात?” रामा मुद्दाम म्हणाला.

त्याने एकदा गुंडप्पाकडे बघितलं आणि खूण केली. त्याने लगेच त्याच्या झोळीतून दगड काढला आणि कोतवाल वर भिरकावला. सगळे लोक आता कोतवालवर दगडे फेकून मारू लागली.

“हे सगळं काय करतोयस रामा? याची काय गरज आहे?” बंधू म्हणाली.

“जे होतंय ते होऊ दे फक्त बघत रहा.” रामा म्हणाला.

रामा सगळ्या गर्दीकडे बघत होता. त्याला चोर शोधण्यासाठी हीच एक संधी होती.

क्रमशः…..

Credit:- Sony SAB Tenali Rama serial.

🎭 Series Post

View all