चॅम्पियन्स ट्रॉफी -२०२५
लघुकथा
शीर्षक:- रक्षणकर्ती
©® सौ.हेमा पाटील.
"सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके |
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ||"
अनिताचे देवघरात पठण सुरू होते.
"अनिता आटपले का नाही तुझे? चल लवकर, वेळ होतोय."
" हो आलेच, पाच मिनिटे थांबा."
" बरं, ठीक आहे. आटप तुझे." असे म्हणून संदीप सोफ्यावर बसला. अनिता नैवेद्य घेऊन परत देवघरात गेली. तिने देवीला हळदी-कुंकू वाहिले.
घटस्थापना झाली होती, आज अष्टमीचा दिवस! सकाळी तिने कुंकूमार्चन केले होते. ते कुंकू तिने व्यवस्थित एका डबीत भरून ठेवले. त्यातील थोडे कुंकू तिने सासूबाईंसाठी पुडी बांधून सोबत घेतले. देवघरातून नमस्कार करून बाहेर पडताना नेहमीप्रमाणे ती देवीला म्हणाली,
" देवी माते, चला माझ्यासोबत," आणि नमस्कार करून ती देवघराच्या बाहेर पडली. बाकी सगळे सामान तिने आधीच भरून ठेवले होते. दरवर्षी नवरात्रीत, अष्टमीच्या दिवशी गावच्या देवीचे दर्शन घेण्यासाठी ते दोघे आवर्जून जातात. वडगावला त्यादिवशी नवचंडी याग केला जातो. त्यात सहभागी होण्यासाठी अनिता आणि संदीप दरवर्षी न चुकता जातात.
गावी सासू-सासरे आणि दीर जाऊ असतात. प्रत्येक सणाला जाणे जमत नाही, पण नवरात्रातील अष्टमी मात्र अनिता कधीच चुकवत नव्हती. संदीपने आपली मोटारसायकल सुरू केली. त्याच्यामागे अनिता बसली, आणि दोघांचा प्रवास सुरू झाला.
पाटणपासून वडगावला जायला दोन तास लागत. तिथे पोहोचल्यानंतर पूर्ण दिवस कसा गेला हे त्यांना समजले नाही. नवचंडी यज्ञ पूर्ण झाला. आहुती देण्यात आली. त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाची सोय केलेली होती. संदीपने महाप्रसाद घेतला. अनिताचा महाष्टमीचा उपवास होता, त्यामुळे तिने फक्त खडीसाखरेचा प्रसाद घेतला.
घरातील सर्वांचा निरोप घेऊन दोघे परत निघाले. सासुबाई आता इतक्या उशिरा जाऊ नका असे म्हणत होत्या, पण मुलांना तिथेच ठेवून आल्यामुळे जाणे गरजेचे होते. आठ वाजून गेले होते. अंधार झाला होता. कडेगावजवळ थोडा निर्मनुष्य रस्ता होता, तेवढ्या भागात थोडी भीती वाटायची. तो भाग वाटमारीसाठी कुप्रसिद्ध होता. बाकी सगळा रस्ता चांगला होता.
ते दोघे कडेगावजवळ पोहोचले, तेव्हा पूर्ण रस्त्यावर एकही गाडी नव्हती. तिने मनातल्या मनात देवीचे नामस्मरण सुरू केले. पुढे गेल्यावर पुढच्या वळणावर त्यांना एक गाडी उभी असलेली दिसली. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, परंतु मनात वाईट विचार न आणता ती शांत बसली.
अचानक बाजूच्या झाडांमधून चार माणसे रस्त्यावर आली, आणि रस्त्याच्या मधोमध उभी राहिली. ती मध्येच उभी राहिल्यामुळे संदीपला गाडी उभी करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्याने गाडी उभी केली.
समोर चार दांडगट माणसे उभी, निर्मनुष्य रस्ता, सभोवताली दाट झाडी, हाक मारायचे म्हटले तरी इथे कोणीही नाही. अशा परिस्थितीत अनिता आणि संदीप दोघेही घाबरणे साहजिकच होते. तरीही ते दोघे शांतपणे समोर पाहत होते.
ते चौघेजण आता हळूहळू त्यांच्याकडे येऊ लागले. पुढे आल्यानंतर दोघांच्या हातात असलेले मोठे सुरे गाडीच्या दिव्याच्या प्रकाशात चमकले. ते पाहून अनिताला दरदरून घाम फुटला.
" हे अंबे जगदंबे, माते आता तूच वाचव या संकटातून," असे म्हणत तिने देवीची करुणा भाकली. चौघांपैकी दोघेजण पुढे आले. त्यापैकी एकजण संदीपला म्हणाला,
"ऐ, खाली उतर. काय गाडीवर बसून राहीलायंस?" हे ऐकल्यावर संदीप गाडीवरून खाली उतरला. तो खाली उतरल्यामुळे अनितालाही खाली उतरावे लागले. ती त्याच्या शेजारी त्याला अगदी चिटकून उभी राहिली. त्यातल्या दोघांनी पुढे येऊन तिच्या गळ्यातले दागिने ओढून काढून घेतले. तिच्या हातात सोन्याच्या बांगड्या होत्या. अष्टमीला जायचे म्हणून तिने दागिने घातले होते.
"ऐ, चल, हातातल्या बांगड्या काढून दे." असे गुरकावत तो गुंड म्हणाला. तिने मुकाट्याने हातातील बांगड्या काढून दिल्या. संदीपच्या गळ्यात चेन होती, ती संदीपने निमुटपणे काढून दिली.
" पैशाचे पाकीट कुठे आहे?" असे म्हटल्यावर संदीपने पैशाचे पाकीटही काढून दिले. उरलेले दोघे गुंड एकटक अनिताकडे पाहत उभे होते. या दोघांनी सगळे पैसे, दागिने गोळा करून त्याची रुमालात पुरचुंडी बांधली, आणि त्यापैकी एकाने ती आपल्या हातात तोलून धरली.
" पैशाचे पाकीट कुठे आहे?" असे म्हटल्यावर संदीपने पैशाचे पाकीटही काढून दिले. उरलेले दोघे गुंड एकटक अनिताकडे पाहत उभे होते. या दोघांनी सगळे पैसे, दागिने गोळा करून त्याची रुमालात पुरचुंडी बांधली, आणि त्यापैकी एकाने ती आपल्या हातात तोलून धरली.
किती माल मिळाला याचा अंदाज तो घेत होता. तेवढ्यात बाजूला उभे असलेले दोघे गुंड हळूहळू पुढे झाले. त्यांच्यापैकी एकाने संदीपला बाजूला ओढले. संदीपला अचानक बाजूला ओढल्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. अनिता घाबरली. त्या दोघातील एकजण तिच्याकडे सरकू लागला. त्याने तिच्या पदराला हात घातला.
ते पाहून इतर तिघेजण सुद्धा पुढे सरसावले. इथल्या भागाची वाईट ख्याती पसरल्यामुळे आता या रस्त्यावर कुणीही येणार नाही याची त्यांना खात्री होती. तिथे आता आपलेच राज्य आहे असा त्यांचा ग्रह झाला होता, आणि ते खरेच होते.
इथे वाटमारी चालते हे माहीत असल्याने संध्याकाळ झाली, की या रस्त्यावर कोणीही फिरकत नसे. चुकून एखाद्या पाहुण्याला उशीर झाला, तर तो त्या गावातच मुक्काम करत असे. अनिता मुलांना घरीच ठेवून आली असल्याने त्यांना गावी थांबणे शक्य नव्हते म्हणून ते दोघे घाई गडबडीने परत निघाले होते. तरीही त्यांना उशीर व्हायचा तो झालाच होता.
आता मात्र अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. काय करावे, हे तिला सुचत नव्हते. चार रानदांडग्या माणसांबरोबर ती आणि संदीप यांचा कुठून मेळ बसायचा असे तिला वाटले. आता जे काही होईल त्याला तोंड द्यावे लागणार आहे हे तिला समजून चुकले.
जवळ आलेल्या एका गुंडाने तिच्या खांद्यावर हात ठेवला. अंगावर पाल पडावी तसा तिने तो झटकून टाकला. त्या स्पर्शाने तिला शिसारी आली. तिने हात झटकला याचा त्याला खूप राग आला. त्याने पुढे येऊन तिच्या पदरालाच हात घातला.
तिने पदराला पिन लावली होती. ती पिन ओढली गेली आणि तिचा पदर त्याच्या हातात आला. उरलेले तिघेजण तिच्या अनावृत्त छातीकडे डोळे फाडून बघत होते. त्याचवेळी अनिताने मात्र डोळे मिटून घेतले होते.
' हा काय प्रसंग आपल्यावर ओढवला आहे! हे देवी माते, माझ्याकडून काय चूक झाली म्हणून मला ही शिक्षा मिळत आहे? ही लाजिरवाणी घटना माझ्या आयुष्यात का घडत आहे?' डोळे मिटून ती असा विचार करत असतानाच अचानक आपल्या ओढलेल्या पदराला ढील मिळाली आहे असे तिला जाणवले, तरीही तिने डोळे उघडले नव्हते.
पुढे घडणाऱ्या प्रसंगाला तोंड कसे द्यायचे हा विचार ती करत होती. पुढचे दोन मिनिटे काहीही झाले नाही, आणि अचानक गाडीचा आवाज आला. त्यामुळे तिने डोळे उघडले. संदीप समोरच उभा होता आणि तो विस्मयाने समोर पाहत होता.
त्या चौघा गुंडांना पळता भुई थोडी झाली होती. ते चौघेजण धावत-पळत त्यांच्या गाडीकडे निघाले होते. पळताना एक जण खाली पडला. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीची भावना स्पष्ट दिसत होती. तो पळत असताना खाली पडलेला गुंड खूपच घाबरला होता.कसेतरी ते गाडीवर बसले आणि गाडीला कीक मारून सुसाट वेगाने तिथून दूर निघून गेले. त्यांना अचानक काय झाले हे अनिता व संदीपला समजले नाही, पण संकटातून सुटका झाली याचा त्यांना आनंद झाला.
त्याचवेळी समोरून एका गाडीवरून दोन इसम येत होते. त्यांनी तिथेच दूर गाडी थांबवली होती. संदीप आणि अनिताला असे वाटले की; समोरून येणाऱ्या गाडीमुळे या चौघांनी घाबरून पळ काढला. त्या इसमांनी गाडी उभी केली आणि ते चालत पुढे आले.
गुंडांनी काढून घेतलेल्या दागिन्यांची पुरचुंडी सुद्धा तिथेच फेकली होती. ती घेऊन जाण्याचे भान सुद्धा त्यांना राहिले नव्हते. इतकी कशाची भीती त्यांना वाटली होती? याचे कोडे अनिता आणि संदीप यांना पडले. समोरून चालत येत असलेल्या दोघांनी ती पुरचुंडी उचलली आणि आणून संदीपच्या हातावर ठेवली. त्यानंतर त्या दोघांनी अनिताच्या पायांवर डोके ठेवून तिला नमस्कार केला.
अनिताला समजेना, ही कोण कुठली माणसे! आपल्याला का नमस्कार करत आहेत? तिने विचारले,
" अहो, माझ्या का पाया पडताय? नमस्कार देवाला करायचा असतो." यावर त्यातील एकजण म्हणाला,
"हो, आम्ही देवीलाच नमस्कार करतोय."
"म्हणजे?" न समजून अनिताने विचारले. तेव्हा त्या दोघांनी सांगितले,
"आम्ही गाडीवरून येत असताना आमच्या मनात धाकधूक होती, कारण आज आम्हाला उशीर झाला होता. हा रस्ता, याची ख्याती आम्हाला माहीत होती, परंतु आम्हाला इस्पितळात जायचे असल्याने जाणे गरजेचे होते.
वळणावरून पुढे आलो आणि अचानक आम्ही काय पाहिले! चार माणसे तुमच्यासमोर उभी होती, आणि या ताईंच्या मागे प्रत्यक्ष महिषासुरमर्दिनी उभी होती. तिच्या हातात तळपती तलवार होती. तिचे तेज डोळ्यांना सहन होत नव्हते. त्या देवीला पाहून त्या चौघांनी पळ काढला."
हे ऐकून अनिता आणि संदीप सद्गदित झाले. देवीची ही केवढी कृपा! अनिताने खाली वाकून जमिनीवर मस्तक टेकवले, आणि तेथील माती आपल्या कपाळाला लावून घेतली.
" देवी माते, तू प्रत्यक्ष येऊन या भक्ताचे रक्षण केलेस. केवढे हे माझे पुण्य!" असे म्हणून ती रडू लागली. संदीपने तिला खांद्याला धरून उभे केले. त्यानंतर दोघे आनंदाने घरी जायला निघाले. घरी आल्या आल्या ती आधी देवघरात गेली. देव्हाऱ्यापुढे नतमस्तक होऊन ती म्हणाली,
" देवी माते, तुला मी सोबत चल म्हटले, तू खरंच आलीस की! अशीच कृपा नेहमी ठेव, एवढेच मागणे! "
देवीची मूर्ती तेजाने उजळून निघाली होती. त्या तेजात न्हालेल्या अनिताच्या चेहऱ्यावर कृतार्थतेचे भाव पसरले होते.
देवीची मूर्ती तेजाने उजळून निघाली होती. त्या तेजात न्हालेल्या अनिताच्या चेहऱ्यावर कृतार्थतेचे भाव पसरले होते.
समाप्त. ©® सौ.हेमा पाटील.
कथा कशी वाटली नक्की सांगा ही विनंती.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा