आपल्या पर्यंत दाभोळकर कसे पोहोचले हे राघवला काही केल्या समजत नव्हतं. पण दाभोळकरांचा आवेश एव्हढा भयंकर होता की त्याची सगळी विचार शक्ती संपून फक्त जगावं कसं हीच ईच्छा त्याच्यात शिल्लक राहिली होती. त्याने काही बोलण्यासाठी तोंड उघडलं रे उघडलं की दाभोळकर आपल्या कमरेच्या चामडी पट्टयाने त्याची पाठ सोलून काढत होते.
" नीच माणसा, नाही तुला मी फाशीच्या तख्तावर चढवलं तर नावं बदलवून टाकेन. समजलास काय. आज पासून तू तुझे दिवस भरले म्हणून समज." त्याच्या कमरेत लाथ घालत ते ओरडले. दाभोळकरांना एव्हढ संतापलेल कोणी अजुन बघितलेल नव्हतं. शक्यतो ते कायदा हातात घेत नसतं. पण का कुणास ठावूक, या गुन्ह्यातला पहिला गुन्हेगार हाती लागल्या बरोबर त्याने केलेल्या सगळ्या अमानुष हत्या त्यांना आठवल्या आणि त्यांचा सगळा राग ज्वालामुखी सारखा उसळून बाहेर आला. त्या दिवशी आपला राग अजीबात थांबू नये किंवा राघवची आपल्याला अजीबात दया येऊ नये असं ते म्हणत होते. ते थकले की आपल्या सहकाऱ्यांना त्याच्यावर हात साफ करायला सांगत. न्यायदेवता जेंव्हा त्याला न्याय देईल तेंव्हा देईल पण आपण मात्र त्याला तुडवायची संधी सोडायची नाही.
अधून मधून प्रत्येक जण त्याच्यावर हात साफ करत होता. अक्षरशः कमरेच्या बेल्टने त्याला फटके दिले जात होते. त्याला ग्लानी यायला की तोंडावर पाणी मारले जाई, त्याच्या डोळ्यावर प्रखर प्रकाश टाकला जाई आणि पुन्हा पुन्हा त्याला तोच प्रश्न विचारला जाई की,
" तू कोणा कोणाला ठार मारले आहे ते सांग. तूझ्या सोबत अजून कोण कोण आहे. हे बघ मी बरोब्बर तुलाच पकडले कारण माझ्या जवळ तूझ्या विरुध्द ठोस पुरावा आहे. फक्त तू कितपत खरा बोलतो आहे ते मला पाहायचे आहे. एकच गोष्ट तुला सांगतो. मुसाच्या मुलीला तूच ठार मारले आहे आणि याचा प्रत्यक्ष पुरावा माझ्या जवळ आहे. तू स्वप्नात देखील विचार केलेला नसशील अशा तुझ्याच जवळच्या व्यक्तीने मला ही खाजगी माहिती पुराव्या सकट दिलेली आहे. "दाभोळकर असं बोलल्या बरोबर राघव किंचितसा डळमळला. त्याच्या चेहऱ्यावरचा क्षणात झालेला थोडासा देखील सूक्ष्म बदल त्यांच्या लक्षात आला. त्याचं डोकं भिंतीवर आपटून ते ओरडले,
" मूर्खा, ज्या माणसाच्या भरवश्यावर तू हे खून करतो आहेस. त्यानेच तुला फसवले आहे. त्याला तू काहीचं करु शकणार नाही असा भक्कम पुरावा त्याच्या जवळ आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. मार खात तुझं अंग खिळखिळ करून घेवू नको आणि माझाही वेळ घालवू नको. "
तरी देखील राघव बधत नव्हता. मनातल्या मनात विचार करत होता. या मुंबईच्या साहेबाला आपला संशय कसा आला. कदाचित तो आपल्याला बोलण्यात गुंतवून आपल्या कडून सगळ खोटच कबूल करून घेईल. पण त्याचं बरोबर त्याला दाभोळकरांच बोलणं आठवल ,ज्या माणसाच्या भरवश्यावर तू हे खून करतो आहेस. त्यानेच तुला फसवले आहे. त्याला तू काहीचं करु शकणार नाही असा भक्कम पुरावा त्याच्या जवळ आहे. या साहेबाचा रोख धनपाल कडे तर नाही ना. कारण मुसाच्या मुलीला मारण्याची आयडिया त्याचीच होती आणि त्यालाच पूर्ण माहिती आहे. आणि एकाएकी त्याला आपण दारूच्या नशेत धनपालला एका कागदावर सही करून मुसाच्या पोरीला ठार मारल्याचा कबुली जबाब लिहून दिल्याचं आठवल. आता त्या गोष्टीचा वापर धनपाल आपल्याला ब्लॅक मेल करण्यासाठी करेल. या नुसत्या कल्पनेनेच त्याला घाम फुटला. तो असा विचार करत असतांना कोणीतरी त्याच्या डोक्यावर फटका मारला. तो कोलमडून खाली पडला. त्याच्या आजुबाजुला एका पेक्षा एक क्रूर पोलीस ऑफिसर होते. जे येता जाता त्याला फक्त मारत होते.
कसंही करून या केसचा छडा लावायचाच अशा विचारांनी दाभोळकर ग्रासलेले होते. त्यांना सरकारने सर्व अधिकार देवून लवकरात लवकर ही केस सोडवण्याची ऑर्डर दिलेली होती. गावातल्या लोकांचा असहकार आणि वरुन दबाव अशा दुहेरी कात्रीत ते सापडलेले होते. परत गावोगावी निघणारे मोर्चे, वर्तमान पत्रा मध्ये छापून येणाऱ्या अतिरंजित बातम्या या मूळे ते खूप तणावात होते. त्या सगळ्या गोष्टींचा राग राघव वर काढत होते.
राघवला वाटतं होतं की आपल्या चौकशीला धनपाल वगैरे येईल. पण तीन दिवस तो रात्रंदिवस गुरा सारखा मार खात होता. पण कोणीच त्याच्या चौकशीला किंवा त्याला सोडवायला आलं नाही.
बघता बघता आठ दिवस झाले आणि एक दिवस एका मुलीच्या हत्येचा असफल प्रयत्न झाला. ती मुलगी धनगर समाजाची होती. एकटीच रानातून येत होती. अचानक तिच्यावर पाठीमागून कोणीतरी हल्ला केला. परंतू हल्ला करणाऱ्याला माहीत नव्हतं की मुलीच्या सोबत तिचा लाडका धनगरी कुत्रा होता. तो कधी तिच्या पूढे पळत असे तर कधी मागे रेंगाळत राही. तर कधी सोबतही चालत असे. त्या वेळी तो कुत्रा मागे राहून आपल्या सीमा ओल्या करत होता. त्या मुलीची अस्फुट किंकाळी ऐकू आल्या बरोबर कुत्रा क्षणात सावध झाला आणि त्वेषाने त्या मुलीकडे धावत गेला. आपली मालकीण संकटात आहे असं पाहिल्यावर त्याने त्या व्यक्तीवर जोरदार हल्ला केला. तो इतक्या रागात त्या व्यक्तीच्या मागे लागला होता की त्या व्यक्तीला त्या मुलीला सोडून द्यावे लागले. ती व्यक्ती जीवाच्या आकांताने पळत सुटली. ती मुलगी बेशुध्द होऊन खाली पडली. नेमका एक मुलगा तेथून जात होता. त्याने आरडा ओरडा करून माणस जमा केली. कोणीतरी त्या मुलीला पाणी पाजले . तो चुणचुणीत मुलगा धावतच डाक बंगल्यावर आला. त्याने आल्या आल्या धापा टाकतच ती गोष्ट दाभोळकरांना सांगीतली.
ते एकदम ताडकन उठून उभे राहिले. त्या मुलीचं जीवन धोक्यात होतं. घाई करायला हवी होती. त्यांनी त्या मुलाला गाडीत बसवलं आणि ते रानाच्या वाटेवर निघाले.
ते तातडीने तिथं पोहोचले. त्या मुलीचा तो प्रामाणिक कुत्रा तिथंच बसून होता. त्याला माणसं कशी ओळखता येत होती कुणास ठाउक. पण तो दाभोळकरांवर भुंकला नाही. त्यांनी त्या मुलीला नीट न्याहाळले. तिने भीतीने हाताच्या मुठी घट्ट आवळलेल्या होत्या. त्यांनी तिच्या मुठी उघडल्या आणि तिच्या हातातली वस्तू पाहून ते आश्चर्याने थक्क झाले.
( क्रमशः)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा