दाभोळकरांना आठवलं आज अमावशा होती. ते तातडीने वाड्यावर जायला निघाले.
आज या मुलीचं नशीब जोरावर होतं म्हणून ती वाचली होती. त्या मुलीच्या हातात दाभोळकरांनी वाघ नखांची जोडी असलेला काळ्या धाग्यातला एक ताईत बघितला. तो ताईत बघताच ते एकदम दचकले. सेम ताईत त्यांनी सुंदरीच्या गळयात पाहिलेला होता. याचा अर्थ स्पष्ट होता की सुंदरी देखील या कारस्थानात सामील होती. त्यांनी त्या मुलीला सावध होवू दिलं. तिला तिच्या कुत्र्यासह घरी पोहोचवल. अशा गंभीर परिस्थीतीत एकटं दुकट बाहेर न पडण्याचा सल्ला तिला तिच्या घरच्या लोकां समोर दिला. आज नशीब बलवत्तर म्हणून निवड तिच्या कुत्र्यामुळे ती जीवानिशी वाचली होती अन्यथा निमझरी मध्ये पुन्हा एक नवीन खून होणार होता.
दाभोळकरांनी मनाशी काहीतरी विचार केला आणि गृहराज्य मंत्र्यांना निमझरी मधल्या हालचाली सांगून काही विशेष अधिकार मागून घेतले. ज्यात कोणताही राजकीय हसतक्षेप त्यांना नको होता. शिवाय वेळेनुसार नियम बाह्य निर्णय घ्यायचा देखील त्यांना अधिकार पाहिजे होता.
कारण इथ गुन्हेगार अतीशय हुशार आणि क्रूर होता. त्याला अधिक वेळ देणं खूप धोकेदायक होत. प्रत्यक्ष मुंबईचे सीआयडी हजर असताना देखील त्यांना गुन्हा करायला अजिबात भीती वाटत नव्हती की पकडलं जाण्याची भीती वाटतं नव्हती. त्यावरून ते किती निर्ढावलेले होते याची कल्पना दाभोळकरांना होती. त्यामुळे कायद्याच्या कक्षेत राहून सगळे प्रश्न सुटतील असं त्यांना अजिबात वाटत नव्हतं.
त्यांच्या विनंतीनुसार आणि अपेक्षा नुसार मुंबईहून त्यांना सर्व प्रकारचे हक्क देण्यात आले. फक्त अट एकच घालण्यात आली की हे प्रकरण ताबडतोब मिटवण्याचा प्रयत्न करा.
निमझरीच्या दोन पोलीस कॉन्स्टेबलची तातडीने बदली करण्यात आली. बदली झालेल्या पोलिसांच्या जागी दोन नवीन कॉन्स्टेबल त्यांना आता खाली मिळाले. ते पोलीस स्टेशन म्हणजे दाभोळकरांचे कार्यालय बनले.
आता त्यांना पुढे सोयीने काम करण्यात करता येणार होती.
आता त्यांना पुढे सोयीने काम करण्यात करता येणार होती.
ज्या दिवशी तो मुलगा त्यांना सांगायला आला होता. त्याच दिवशी संध्याकाळी धनपालच्या वाड्यावरती अशी एक थाप पडली की त्या मुळे धनपालच्या कारस्थानाचे दरवाजे एक एक करून उघडे होणारं होते.
संध्याकाळी दाभोळकर आपल्या सहकाऱ्यांसह धनपालच्या वाड्यावर गेले. धनपालने त्यांचे कसेबसे स्वागत केले. कारण दाभोळकर येण्याच्यापूर्वीच नागनाथ येऊन गेला होता, आणि यावेळी मुलगी न मिळाल्यामुळे त्याची पूजा अर्धवट राहिली होती. त्यामुळे आतापर्यंत केलेले अभिषेक पाण्यात मिळाले होते. नागनाथ म्हणाला की, त्याने त्याच्या परीने आटोकाट प्रयत्न केला होता आणि आता हा शेवटचा बळी होता. यानंतर चिंधीला शंभर टक्के दिवस राहणार होते आणि धनपालच्या संपत्तीला कायदेशीर वारस मिळणार होता. परंतु आता मात्र तो स्वतः असहाय्य झाला होता कारण त्याच्या हातात काहीच राहिले नव्हते. मुंजा त्याचं काहीच ऐकत नव्हता. त्या दिवशी नागनाथ रागा रागात निघून गेल्यानंतर. चिंधी, सुंदरी, धनपाल आणि पक्या या चौघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. वाद विकोपाला गेले. सगळे जण एकमेकांवर आरोप करत होते.
विक्रमचा तर मानसिक ढोल पूर्णपणे ढासळलेला होता. का कुणास ठाऊक त्या नवीन बांधलेल्या ओट्यावर, तो सतत दारू पिऊन पडलेला असे. गेले चार दिवस राघव देखील कोठे होता याचा कोणालाच पत्ता नव्हता. दाभोळकर आत आले आणि बाकीचे जण आपल्या खोलीत चुपचाप बसून राहिले.
" साहेब कसं काय येण केलत ? " धनपालने विचारलं.
ईकडे तिकडे बघत त्यांनी सहज विचारल्या सारखं विचारलं ," काय धनपालजी आज पूजा नाही की काय? " त्यांच्या बोलण्यावर धनपालला खरं तर त्यांचा गळा आवळायची ईच्छा होत होती. पण वरकरणी तो केविलवाणं हसला.
त्यावर दाभोळकर हसत म्हणाले, " ते जावू दे.धनपाल आज मला जरा तुझ्या मेव्हणीशी बोलायचं आहे. बाहेर बोलावतोस का तिला जरा ? "
"तिच्याशी काय बोलता साहेब ? ती एक महामूर्ख बाई आहे. तिला एक काम धड जमत नाही." तिच्यामुळे विस्कटलेल्या कालच्या कामाचा राग धनपालच्या बोलण्यातून व्यक्त होत होता.
" अरे मला तिच्याकडून काही काम नाही करून घ्यायचं ? मला फक्त तिच्याशी थोडसं बोलायचं आहे."
" ठीक आहे साहेब बोलावतो तिला." असं म्हणून त्याने चिंधीला हात मारली आणि सुंदरीला बाहेर बोलवायला सांगितलं. सुंदरी थोड्याच वेळापूर्वी झालेल्या भांडणामुळे रागात होती. त्यात दाभोळकरांनी तिला बोलावल्यामुळे तिचा खूप संताप झाला होता. ती बाहेर आली आणि," काय आहे ? "असं तुसडेपणाने म्हणाली. दाभोळकरांनी ती बाहेर आल्याबरोबर सर्वात आधी फक्त गळ्याकडे पाहिलं. नेहमी चमकत असणारी वाघनखं तिथं नव्हती.
त्यांनी सहज विचारल्यासारखं तिला विचारलं, " सुंदरी तुझ्या गळ्यातली वाघनखं कुठे आहेत ? "असं त्यांनी म्हटल्यावर तिचा हात गळ्याकडे गेला.
" काय माहित साहेब, मला वाटतं कुठेतरी पडली असतील. " ती गडबडीने म्हणाली.
" कुठेतरी नाही, ती वाघनख माझ्याजवळ आहेत. सुंदरी तुझा खेळ संपलेला आहे. ज्या मुलीला तू वाघनखाने मारणार होतीस, त्या मुलीच्या हातात तुझी वाघनखं मला सापडलेली आहेत." असं दाभोळकरांनी बोलल्यावर बरोबर घाबरून जाण्याच्या ऐवजी ती त्यांच्यावरच भडकली,
" कोण कुठली मुलगी ?तिच्या हातात माझी वाघनख मिळाली म्हणून काय तुम्ही मला खूनी समजणार आहात की काय ? सुंदर काय चीज आहे हे तुम्हाला माहीत नाही. ही तुमची दादागिरी बाहेर दुसऱ्यांना दाखवा. मी अजिबात कोणाला घाबरत नाही. ही दुसरी कोणतीतरी वाघनखं असतील."
" ठीक आहे, सुंदरी. तुझ्या गळ्यात नेहमी वाघनख असायची हे सांगणारे गावातले पाच पन्नास तरी लोक मला मिळतील आणि या वाघ नखांचा वापर तू आतापर्यंत काय केलेला आहे. हे देखील मला माहित आहे. मला राघवने सगळं सांगितलं आहे. तुला कदाचित माहित नसेल. पण राघव हा सध्या माझ्या कस्टडीत आहे. आणि विमलला देखील तू याच वाघनखांनी मारलेल आहे, हे देखील त्याने मला सांगितलं आहे."
असं दाभोळकरांनी सांगितल्याबरोबर सुंदरीचा चेहरा वेडा वाकडा झाला. त्याबरोबर दाभोळकरांनी आपल्या सोबत आणलेल्या लेडी कॉन्स्टेबलला सुंदरीला बेड्या ठोकायला सांगितल्या आणि तिला सांगितलं, " सुंदरी तुझं सगळं मागचं रेकॉर्ड मी चेक केलेलं आहे. या क्षणी मी तुला अटक करत आहे. तुला कोणत्याही प्रकारचा जामीन मिळणार नाही, याची तजवीज मी अगोदरच केलेली आहे. तू केलेले गुन्हे आता तू तुझ्या तोंडाने कबूल कर. त्यांची शिक्षा भोग. त्या खेरीज तुझी सुटका होणार नाही."
तिकडे त्या सिमेंटच्या कट्ट्यावर पडलेल्या विक्रमने जेव्हा आपल्या बायकोला सुंदरीने ठार केलेल आहे, असा ऐकलं, त्यावेळी तो चवताळून सुंदरीच्या अंगावर धावला.
" हलकट स्त्री, तू स्त्री जातीला कलंक आहेस. तू माझा संसार उध्वस्त केला. मी तुला जिवंत ठेवणार नाही." असं म्हणत तो सुंदरीच्या अंगावर धाऊन गेला. त्याचवेळी चिंधीने त्याच्या थोबाडीत एवढ्या जोरात फटका मारला की तो जागच्याजागी खाली पडला. सुंदरीला घेऊन दाभोळकर पोलीस स्टेशन मध्ये आले आणि तिची रवानगी त्यांनी गेली.
( क्रमशः)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा