बहिणीसाठी चिंधीने विक्रमच्या अंगावर धावून जाणे आणि त्याच्या थोबाडीत मारणे ही गोष्ट दाभोळकरांना थोडी विचित्र वाटतं होती. कारण एकतर विक्रम शुध्दीत नव्हता. त्या मुळे त्याला एव्हढ महत्व देवून त्याच्या अंगावर धावून जावून त्याच्या तोंडात मारणं यात नक्कीच काहीतरी पाणी मुरत असल पाहिजे.
थोडक्यात निमझरीच्या सगळ्या विनाशाच मूळ या वाड्यातच आहे या बद्दल दाभोळकरांना पूर्ण खात्री पटत चालली होती. आता फक्त पुरावे मिळवण एव्हढंच महत्वाचं काम बाकी होतं आणि तेचं सगळ्यात कठीण होतं.
पुन्हा एकदा त्यांनी केसचा अभ्यास केला. संभावित संशयितांची यादी तयार केली. त्यात प्रामुख्याने ताब्यात कोणाला घ्यायला हवे याचा विचार केला. आणि त्यांनी विचार केला की वाड्यावर राहणारी मंडळी स्थानीक होती. ती वाडा सोडून कुठं जाणारं नव्हती. शिवाय वाड्यावर चोवीस तास पहारे बसवता आले असते.
हातातून निसटले तरं सापडायला कठीण असे तीन आरोपी बाहेर होते. जे गावा बाहेर रहात होते. जे सुगावा लागताच पळून जाण्याची शक्यता टाळता येत नव्हती. आणि जर का ते हातातून निसटून गेले असते तर पुन्हा हाती लागणे कठीण होते. अशा आरोपीत संशयीत होते पारधी वस्तीवरील मूखिया, चिंधीचा पहिला नवरा परशा, आणि गावाबाहेर राहणारा नागनाथ. यांना ताब्यात घेण सगळ्यात महत्वाचं होत.
आता दाभोळकरांना विशेष अधिकार मिळालेले असल्या मुळे, त्यांनी या अटकेची सगळी सत्र रात्री अवलंबण्याच ठरवल. कारण दिवसा हा प्रकार केला की दुसरे आरोपी सावध होवून पळून जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
म्हणून आज रात्री त्यांनी नागनाथला उचलण्याच ठरवल. त्या साठी आपल्या साथीदारांना सगळी कल्पना देण्याची आवश्यकता होती. कारण नागनाथच्या धमक्या आणि नाटकं यांची त्यांना भीती वाटण्याची शक्यता होती. म्हणून त्यांनी सगळ्यांचे दोन दिवस चक्क बौध्दीक घेतले. त्यांना माहिती होतं की शिक्षण आणि अंधश्रध्दा यांचा परस्परांशी काहीही संबंध नसतो. जादूटोणा, भूत प्रेत, भानामती, करणी असल्या कोणत्याही गोष्टी अजून विज्ञानाने सिद्ध झालेल्या नाहीत आणि कधी होणारंही नाहीत. जो पर्यंत या गोष्टींचा समाजावर कोणताही अनिष्ट परिणाम होत नाही तो पर्यंत कोणाचाही त्यावर आक्षेप घेण्याचा प्रश्नच नव्हता. परंतू जेंव्हा या अंधश्रध्देमूळे नरबळी जायला लागले त्या वेळी कायद्याला आपलं कर्तव्य बजवायलाच हवे.
"जेंव्हा आपण नागनाथला अटक करायला जावू त्या वेळी कदाचित तो आपल्याला धमक्या देईल. नाही नाही ते अगम्य प्रयोग करून दाखवेल. पण अशा वेळी आपण सर्वांनी आपली सद्सद विवेक बुध्दी जागृत ठेवून त्याला कायद्याचा बडगा दाखवलाच पाहिजे. तेंव्हा त्याच्या कोणत्याही धमक्यांना बळी न पडता त्याला आपण आज रात्री अटक करू या. नागनाथ हा या हत्याकांडाचा मास्टर माईंड आहे हे विसरू नका. तो अतीशय निर्दयी आणि पाशवी मनोवृत्तीचा विकृत माणूस आहे. तो हाती लागला की आपली मोहीम फत्ते झालीच समझा. "
दाभोळकरांच्या बोलण्याने सगळ्यांना एकदम हुरूप आला. सगळया महाराष्ट्रात गाजणारे हे भयंकर प्रकरण तडीस नेल्याचं श्रेय या कर्तबगार अधिकाऱ्यांना मिळणारं होतं.
त्या पूर्वी राघव कडून काही माहिती मिळते का हे पाहण्याचा पुन्हा एकदा कठोर प्रयत्न केला गेला. राघवला सतत चार दिवस झाले जागं ठेवलं गेलं होतं. त्यात येणारा जाणारा प्रत्येक जण त्याला प्रसाद देवून जात असे. भर मध्यरात्री देखील प्रखर प्रकाश त्याच्या डोळ्यांवर टाकून त्याला मारहाण केली जाई. ही नुसती झलक आहे. खरा मार अजून सुरू झालेलाच नाही असं त्याला एक जाधव नावाचा पीएसआय होता. तो सांगत असे. जुन्या पोलिसांच्या जागी त्यांची बदली झालेली होती. या जाधव साहेबांची देखील राघवला प्रचंड भीती वाटत असे. ते दिसायला अतिशय उग्र चेहऱ्याचे, बलदंड शरीराचे, राकट आणि गुन्हेगारां बद्दल थोडीही दयामाया न दाखवणारे असे होते. जाधव साहेबांच्या समोरं भलेभले गुन्हेगार नांगी टाकत असतं. " राघवला फक्त एक दिवस माझ्या ताब्यात द्या. मग बघा तो कसा पोपटा सारखा बोलायला लागतो ते. "असं ते दाभोळकर साहेबांना नेहमी म्हणत असत. पण दाभोळकरांना थर्ड डिग्री प्रकार जास्त आवडत नसे. पण आता मात्र त्यांच्याही सहनशिलतेची पराकाष्ठा झाली होती. आणि त्यांनी आपण नागनाथला पकडायला जावू तेंव्हा राघवला जाधव साहेबांच्या हवाली केले. आणि जाधव साहेबांना प्रचंड आनंद झाला. जितका निर्ढावलेला आणि आडमुठा गुन्हेगार असे तितका त्याला बोलत करण्यामधे त्यांना आनंद होई.
मध्यरात्री निवडक सहकारी घेवून दाभोळकर स्वतः नागनाथला पकडण्याच्या मोहिमेवर निघाले. आणि ईकडे राघवच्या कोठडीत जाधव साहेबांनी प्रवेश केला. ती रात्र राघवच्या कायमची लक्षात राहणार होती.
( क्रमशः)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा