Login

रक्त रंजीत 365 रात्री ( भाग 89 )

एक भयावह मालिका

नागनाथला पोलीस आपल्यावर पाळत ठेवून आहेत याची कल्पनाच नव्हती. आपण जे भयानक कृत्य धनपालला करायला सांगीतली होती ती त्याने पुत्र हव्यासा पोटी पार पाडली होती. पण या गोष्टीतून काहीचं निष्पन्न होणार नाही हेही नागनाथ जाणून होता. म्हणून उलट एखाद्या अमावस्येला धनपाल अपयशी व्हावा, म्हणजे आपल्याला या प्रकरणातून अंग काढून घेता येईल असं त्याला वाटे. आणि खरोखरच या वेळी सुंदरी मुळे धनपालला बळी मिळाला नव्ह्ता. म्हणून नागनाथ धनपालच्या वाड्यावर निरोप घ्यायला आला होता. या प्रकरणात त्याला भरपूर पैसा आणि सोने मिळालेले होते. आता त्याला काही नको होते. उलट त्याला निघून जायची घाई झालेली होती. पण त्याला माहिती नव्हते की नियतीने त्याच्या भोवतीचा पाश आवळलेला होता. निमझरीच्या बाहेर चिटपाखरू देखील परवानगी शिवाय जाणारं नाही याचा परीपूर्ण बंदोबस्त दाभोळकरांनी लावून ठेवलेला होता. दरी जवळच्या चिंचेच्या झाडाजवळ, पारधीवस्ती जवळ, नागनाथच्या झोपडी बाहेर आणि धनपालच्या वाड्याबाहेर आज काल तर चोवीस तास बंदोबस्त तैनात केला गेलेला होता. त्या मुळे या चौकडीला अवघड होऊन गेलेलं होतं.

तिकडे पारधी वस्तीवर वेगळीच हालचाल सुरु झालेली होती. हे सगळं संकट परशा मुळे पालावर आलेलं होतं या बद्दल सगळ्यांची खात्रीच झालेली होती. मागे डाक बंगल्यावर देखील शंकर आणि परशालाच बोलावलं गेलं होतं. आणि आता देखील वस्तीवर बंदोबस्त या दोघांमुळे बसवला गेलेला होता. चिंधी परशाची बायको असल्याने त्याच्यावर सगळ्यांचाच राग होता. त्या मुळे त्याने वस्ती सोडून कुठं तरी दूरवर निघून जावं आणि दुसऱ्या एखाद्या पालावर वस्ती करावी असं सगळ्यांचं एकमत झालेलं होतं. आता त्याला देखील या गावात करमत नव्हतं.

जाता जाता चिंधी कडून काही पैसे मिळतात का ते बघायला तो वाड्यावर आला होता. आत मध्ये धनपाल, नागनाथ, पक्या आणि विक्रम सगळे तावा तावात गप्पा मारत होते. विक्रम नेहमी प्रमाणे शुद्धीवर नव्हता. परशाने दरवाजा ठोठावला. पक्याने तो उघडला. परशाला बघितल्यावर त्याचं डोकं एकदम भडकल. काल पासून दिवस खूप खराब सुरू झाले होते. राघव आणि सुंदरीला पोलीस घेऊन गेलेले होते. त्यात चिंधीचा हा बुळा नवरा बघितल्यावर पक्याच तरं डोकंच खराब झालं.

" कोण पाहिजे? " त्याने दरडावून विचारलं.

" चिंधीशी थोडं काम होतं" गयावया करत परशा म्हणाला.

" नाही भेटणार ती तुला. काय करायचं ते करून घे" पक्या परशाची गचांडी धरून त्याला बाहेर फेकणारच होता. तेव्हढ्यात त्याला वाड्याच्या आत सिमेंटच्या कट्ट्यावर दारूच्या नशेत चूर होवून पडलेला विक्रम दिसला. त्या बरोबर त्याची एकदम बोबडी वळली. तो तसाच सुसाट वेगाने बाहेर पळाला. पक्याला वाटलं की तो आपल्याला घाबरून पळाला. पण तस अजीबात नव्हतं. तो तिथून जो निघाला थेट पोलीस चौकीवर येवून हजर झाला. नेमकं त्या वेळी सुंदरीला घेऊन दाभोळकर आणि सुरेखा चौकीवर आलेले होते. सुंदरी अर्धमेली झालेली होती.

का कुणास ठावूक, मुंबईच्या या साहेबा बद्दल परशाला एक आपुलकी वाटतं असे. भले तो माफ करणार नाही पण निदान चुकीच्या माणसाला शिक्षा तरी देणार नाही. त्या मुळे दाभोळकर साहेब दिसल्या वर त्याला खूप आनंद झाला. वेळ मध्य रात्रीची होती.

समोर अचानक परशा दिसल्यावर दाभोळकरांना देखील आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच उत्सुकता होती. आपण जे पाहिलं त्याचा या साहेबाला नक्की उपयोग होईल याची त्याला खात्री होती. आणि आपल्या बातमीचा साहेबाला काही उपयोग झाला तर साहेब खूष होऊन आपल्यालाही काही तरी बक्षीस देईल ही पणं एक आशा त्याला होती.
तो चौकीच्या पायऱ्या चढून आत आला. आपल्या मागून कोणी येतं नाही ना हे त्याने नीट न्याहळून पाहिलं. सुंदरीच्या कोठडीतून किंकाळ्या ऐकू येत होत्या. सुरेखा काही न बोलता फक्त हात पाय चालवत होती. जाधव साहेबांनी आज आराम करायचं ठरवलं होतं.

दाभोळकरांसाठी ती रात्र खूप उपयोगाची होती.

" काय परशा, इतक्या रात्री काय काम काढलं आणि तेही पोलीस चौकीवर? "

" साहेब, खूप महत्वाची बातमी आहे. पण मला काय बक्षीस मिळणार ते आधी सांगा." परशा लाचारीने म्हणाला.

" अरे, बक्षीस कशाला हवे रे तुला? " नंतर मात्र त्यांचे त्यांनाचं वाईट वाटले. ही केस योग्य रीतीने हाताळल्यावर त्यांचं नावं सगळीकडे झालं असतं. त्यांचे अनेक ठिकाणी सत्कार झाले असते. या शिवाय त्यांना प्रमोशन मिळाले असते. पण परशा सारखी माणसं अशीच राहीली असती. गावाबाहेर, उपऱ्या सारख जगत राहीली असती.

त्यांच्या मनात एकदम कणव दाटून आली. खिशात हात घालून त्यांनी हातात आली ती नोट त्याला दिली.

" बरं आता सांग, काय खबर आणली आहे तू ? "

" साहेब, पणं काही होणार नाही ना. "

" तू अगदी बिना संकोच सांग. तूझ्या केसालाही कोणी धक्का लावणार नाही. "

" मग ऐका सर, धनपाल राजच्या मुलीला कोणी ठार केलं आहे हे मला माहीत आहे. कारण मी स्वतः त्या माणसाला खून करतांना बघितलं होतं. ईतके दिवस तो माणूस मला कुठेच दिसत नव्हता आणि आज अचानक त्याला मी धनपाल शेटच्या वाडयात पाहिलं."

दाभोलकर एकदम ताठ बसले. या खूनातला एक आरोपी अगदी आय विटनेस सकट त्यांना न कळतं मिळाला होता.

" खरं सांगतोस?"

" अगदी आईची शपथ सर आणि अजूनही तो वाड्यातच आहे."

" तू नक्की त्याच्या विरुद्ध साक्ष देशील ना? का वेळेवर बदलून जाशील?"

" नाही साहेब, हा माणूस खून करतांना मी स्वतः पाहिला आहे. आणि साहेब हा खून त्याने प्रत्यक्ष धनपालच्या मुलीचा केला होता. "

आता आश्चर्य करण्याची वेळ दाभोळकरांची होती. प्रत्यक्ष पोटच्या पोरीचा खून या माणसाने करु दिला. त्याला तर सोडलच नाही पाहिजे.

" परशा तू फक्त तुझ्या मतावर पक्का राहा. आज या टोळीला मी अशी अद्दल घडवतो की पुन्हा ते असा विचारही करणारं नाही. आणि तूझ्या तर केसालाही धक्का लागू देणार नाही मी."

आणि ही बातमी मिळाल्या बरोबर दाभोळकरांनी सूरेखाला पोलीस स्टेशन सांभाळायला सांगितलं. ते गाडी मधे जाधव साहेब आणि परशाला घेऊन धनपालच्या वाड्यावर जायला निघाले.

( क्रमशः)
0

🎭 Series Post

View all