" कोण होतं रे? " धनपालने पक्याला ओरडून विचारलं.
" कुणास ठाऊक, कोणी तरी चिंधी माणूस होता. चिंधीला भेटायचं आहे असं म्हणत होता. अचानक त्याला काय झालं कुणास ठावूक, भुत पाहिल्या सारखा पळाला." पक्या खो खो हसत म्हणाला.
" तू काय भुता पेक्षा कमी भयंकर आहेस." धनपालही गमतीत म्हणाला.
खरं म्हणजे आज त्याचा मूड अजीबात चांगला नव्हता. त्याला आज त्या नागनाथचा जीव घ्यावासा वाटतं होता. हलकट नागनाथ म्हणत होता, या वेळी बळी न मिळाल्या मूळे आता पर्यंतचे सगळे प्रयत्न वाया गेले होते. आता चिंधीला कधीचं बाळ होणारं नाही. त्याला धनपाल काय चीज आहे अजून माहीत नाही. मनात आणलं तर त्याला होत्याचा नव्हता करून टाकेल मी.
त्याला सूंदरीचाही खूप राग आला होता. काय हलकट बाई होती. जे काम आपल्याला जमत नाही ते करायला पूढे जावेच कशाला. झाला ना पूर्ण सत्यानाश. आता पोलीस स्टेशन मध्ये थोबाड उचकटलं नाही म्हणजे मिळवली. राघवचाही बरेचं दिवस झाले पत्ता नव्हता. पण धनपालला खात्री होती की तो नक्की पोलिसांच्याचं ताब्यात असणार. या दोघांनी जर पोलिसांच्या माराला घाबरून तोंड उघडलं तर आपले दिवस भरलेच म्हणायचे. तसा त्याचा त्या दोघांवर पूर्ण विश्वास होता. आणि समजा राघव काही बोललाच तर त्याने लिहून दिलेला कागद आहेच की आपल्या जवळ. धनपालला त्या कागदाची आठवण येताच एकदम हायसं वाटलं. तो ईतका आनंदी झाला की अलगद शीळ घालू लागला. शिवाय त्या सुंदरीने कशा साठी त्या पोरीला त्रास दिला होता याची आपणास काहीच कल्पना नाही असं सांगून हात वर करायचे असं त्याने मनातल्या मनात ठरवलं. पण लवकरच पोलीस आपल्या जवळ पोहोचणार आहेत या बद्दल त्याला आतून वाटायला लागले होते. आणि आता पोलीस स्टेशनवर जून्यापैकी कोणीच राहिलेलं नव्हतं. जूने पोलीस असते तर त्याला चिंताच वाटली नसती. पण आता या मुंबईच्या साहेबाने जुन्या पोलिसांच्या बदल्या करून त्यांच्या जागी नवे दमदार शिपाई नेमले होते. शिवाय स्वतःची कचेरी देखील गावातच थाटली होती. त्याची आणि दाभोळकरांची दोन चार वेळाच भेट झालेली होती. पण त्यांच्या बद्दल त्याला निश्चित अंदाज बांधता येत नव्हता.
पण चिंधीची चौकशी करणारा कोण असेल हे काही त्याच्या लक्षात येईना. असो तो आपल्याला घाबरून पळाला म्हणजे असेल कोणीतरी कशाला चिंता करायची.
ईकडे चिंधीचा आक्रोश दुसराच सुरु होता. नागनाथ तिला आता मुलगाच होणार नाही असं स्पष्ट सांगत होता. कारण त्याची साधना अपूर्ण राहिलेली होती. तेव्हढ्यात तिला दारूच्या नशेत बडबड करणारा विक्रम दिसला. तो आपल्याच तंद्रीत बडबड करीत होता. त्याला असा लोळलेला पाहून तिला एव्हढा संताप झाला की तिला असं वाटलं त्याच्या कमरेत एक जोरदार लाथ घालावी. नाहीतरी पहिल्या खुनानंतर त्याचा काहीचं उपयोग झालेला नव्हता. फुकटच त्याला पोसण सुरु होतं. आजकाल तर दारूच्या नशेत तो एव्हढा बुडालेला होता की त्याचा धनपालला काडीचा उपयोग होतं नव्हता.
" मला वाटतं एक दिवस विक्रमला दरी कडे न्यावं आणि सरळ ढकलून द्यावं" चिंधी अगदी सहज धनपालला म्हणत होती.
" ए बाई, जरा तोंड बंद ठेवतेस का. मुंबई वरून सीआयडी चौकशीला आलेले आहेत. जरा सांभाळून बोलत जा. त्यांचं पूर्ण लक्ष आपल्या हालचालींवर आहे. "
" असू द्या ना. ते इथे आल्यावर देखील आपण त्यांच्या नाकावर टिच्चून खून केलेच की"
" अग माझे आई, तोंड बंद ठेव जरा. भिंतीला देखील कान असतात. बरं पक्या दोन काम करणार का ? एक म्हणजे या बेवड्या विक्रमचा आणि नागनाथचा कायमचा काटा काढायचा. नागनाथला तर अशी अद्दल घडवं की त्याला कायमचं लक्षात राहिलं पाहिजे. साला, धनपालला फसवतो का?"
" तुम्ही फक्त आज्ञा करा दाजी " आजकाल तो अगदी जवळच्या नातेवाईका सारखा दाजी वगैरे बोलायला लागला होता. " या बेवड्याला आजचं दरीत ढकलून येवू का आणि येता येता त्या नागनाथचा कोथळा बाहेर काढून त्याच्या झोपडीला आग लावून येतो."
धनपालने पक्याकडे आणि चिंधीकडे तुच्छ नजरेने पाहिलं. " अरे, मूर्खा आपल्या वाड्याबाहेर आणि दरी जवळ चोवीस तास कडक बंदोबस्त बसवलेला आहे. तू नुसता बाहेर जरी पडला तरी तुला अटक केली जाईल. तेंव्हा काय सांगशील."
" मग दाजी, नागनाथच काय ? त्याला नाही का अटक होणार रात्री बेरात्री फिरतो म्हणून? "पक्याने विचारायला आणि दरवाजावर थाप पडायला एकच वेळ झाली. दोघांनी चमकून एकमेकांकडे पाहिलं. आता एव्हढ्या मध्य रात्री कोण आलं असावं याचा ते विचार करू लागले.
" दार उघडा दार " बाहेरून आवाज वाढत होता. आता तर कोणीतरी काठीने दरवाजा ठोकत होते. धनपालला काहीच अंदाज येत नव्हता. शेवटी दाभोळकरांनी आवाज दिला.
" मुकाट्यानं दरवाजा उघडा."पक्याने हातात भाला सज्ज ठेवून दरवाजा उघडला. जाधव साहेब आणि दाभोळकर साहेब दोघंही आत शिरले आणि त्यांनी नशे मधे चूर असलेल्या विक्रमला ताब्यात घेतले. त्यांनी विक्रमला ताब्यात घेतलेल बघितल्या बरोबर धनपालचा जीव एकदम भांड्यात पडला.
" पकडा साहेब त्याला आणि चांगली शिक्षा करा. नेहमी दारु पिऊन धिंगाणा घालत असतो. "
" दारु पिऊन धिंगाणा घालतो या साठी मी त्याला अटक नाही करत आहे. त्याची जरा जास्त चौकशी करायची आहे. बघू काय निष्पन्न होते ते. तस कळवेलच तुम्हाला. माफ करा धनपालजी ईतक्या उशीरा तुम्हाला त्रास द्यावा लागला. "
या वर मानभावी पणं हात जोडून धनपाल म्हणाला,
" साहेब माझी कसलीही गरज लागली तर जरूर सांगा. आणि हा जर दोषी असेल तर बेशक शिक्षा करा. माझा माणूस म्हणून सोडून द्या असं मी तुम्हाला कधीचं म्हणणार नाही."
" धन्यवाद धनपालजी, तुमच्या सहकार्या बद्दल आभार. तसा मी कोणत्याच गुन्हेगाराला सोडत नाही. मग तो कोणी का असेना. "
असं म्हणत त्यांनी नशेत चूर असलेल्या विक्रमला ताब्यात घेतल. तसा तो शिव्यागाळ करतं पोलीस स्टेशनवर आला.
( क्रमशः)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा