विक्रमला जेंव्हा दाभोळकर साहेब पोलीस स्टेशनवर घेऊन आले. ती रात्र त्यांच्या साठी खूप अविस्मरणीय ठरली. जी सुंदरी कायमची पळून गेली असती ती अगदी अलगद हाताला लागली. या हत्याकांडातला पहिला खूनी आणि त्याला पाहणारा प्रत्यक्ष साक्षीदार त्यांना योगायोगाने हाती मिळाला होता. निमझरीत पहीली हत्या धनपालच्या मुलीची झालेली होती असं अभ्यासाने त्यांना माहीत होतं. आणि ती हत्या विक्रमने केली आहे असं परशा म्हणत होता. मग स्वतःच्या मुलीची हत्या करणाऱ्याला धनपाल का सांभाळत होता, हे कोडं त्यांना अजीबात समजत नव्हतं. असं तर नव्हतं ना की ही गोष्ट धनपालला माहीतच नव्हती. की धनपाल पूत्र मोहात ईतका गुरफटून गेला होता की त्याला त्या बद्दल काहीचं वाटतं नव्हत. दाभोळकर विचारात गढले होते.
त्यांनी विक्रमला जाधव साहेबांच्या ताब्यात दिले. आणि चौकशीचे आदेश दिले. आज पोलीस स्टेशनवर आरोळ्या आणि किंकाळ्याना ऊत आला होता. विक्रमची चौकशी करण्यात काही अर्थ नव्हता. तो नशेत पूर्ण चूर होता. तरीही विक्रमला बघितल्या बरोबर परशाला भीती वाटली. त्याला त्या दिवशी नरपशू प्रमाणे सरुचा जीव घेणारा विक्रम जसाच्या तसा डोळ्यासमोर दिसत होता.
" साहेब हाच तो माणूस आहे, ज्याने मालकाच्या पोरीला ठार केले होते. " परशा भीतीने थरथर कापत म्हणाला.
" खरं बोलतो आहे ना तू? " जाधव साहेबांनी परशाला विचारलं.
" अगदी देवाची शपथ साहेब. पण साहेब मी हे सांगितलं म्हणून मला हा माणूस ठार नाही ना करणारं?" परशा घाबरून म्हणाला.
दिवस भराच्या दगदगीने दाभोळकर पार थकून गेले होते. टेबलवरच डोकं टेकवून ते शांतपणाने झोपल्या सारखी विश्रांती घेत होते.
" मला वाटते, जाधव साहेब आजची रात्र आपण चौकशी थांबवू या. तुम्ही परशाचा जबाब नोंदवून त्याला जावू द्या. कारण विक्रम हा काही बोलण्याच्या अवस्थेत नाही. आणि हो, परशा तू सध्या गाव सोडून कोठेही जावू नको. आणि धनपालच्या वाड्यावर तर नाहीचं नाही. आधीच सांगून ठेवतो तुला जर काही दगा फटका झाला तिथं तर कोणीच वाचवू शकणार नाही. तू विक्रमच्या विरोधात साक्ष देतो आहे ही गोष्ट देखील कोणाला सांगू नको. आणि तुला कधीही काहीही अडचण आली किंवा काही नवीन गोष्ट समजली तर मला केंव्हाही येवून भेट. बरं थोडा वेळ इथच आराम कर. मी सकाळी तुला वस्तीजवळ सोडून देतो." एव्हढे मोठे साहेब आपल्याशी इतक्या आपुलकीने बोलताहेत, परत ते आपल्याला सकाळीं गाडीतून पोहोचवून देखील देणारं आहेत असं म्हटल्यावर परशाला एकदम भरून आलं. क्षणभर त्याचा त्याच्या कानांवर विश्वासच बसेना. सगळी वस्ती त्याच्याकडे ज्याची बायको दुसऱ्याच्या घरी राजरोस नांदत होती असा षंढ माणूस म्हणून बघत होती.
" साहेब, त्या धनपालला देखील अटक करा. त्याने माझी बायको राजरोस पळवली. "
" अरे, मग तू तेंव्हाच तक्रार करायची ना?"
" साहेब, तेंव्हा आम्ही वस्तीवरचे सगळे लोक त्याच्या वाड्यावर गेलो होतो. तेंव्हा हा विक्रम आणि त्याचा साथीदार राघव दोघेही आमची वाट अडवून उभे राहिले. त्या वेळी तर धनपालने मला मारहाणही केली. जर गावाच्या बाहेर नीट राहायचे असेल आणि जर पाणी हवे असेल तर चिंधीला विसरून जा असं त्याने धमकावल. तेंव्हा पासून गावात कोणाचंच काही गेलं नाही. उलट सगळ्यांना पाणी मिळालं. पणं माझी बायको कायमची हिरावली गेली. "
दाभोळकरांना त्या छोट्याशा माणसाची कीव आली. या माणसासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं त्यांना जाणवून गेलं. त्याच्यासाठी आपण नक्की काही तरी काम शोधू. शिवाय या खून सत्रातही त्याला काही मिळवून देता आलं तर नक्की देवू असा त्यांनी विचार केला.
" परशा, सगळं ठीक होईल बघं. तू तुला जमेल तशी मदत मला कर. मी मला जमेल तशी मदत तुला करेल. हे घे आजच्या साठी पैसे. फक्त दारू पीवून घालवू नको. तुझं काम एकच, नागनाथ वर लक्ष ठेवायचं. तो त्याच्या झोपडीत कधी असतो ते मला सांग. आता त्याला पकडायच आहे. " नंतर ते जाधव साहेबांना म्हणाले,
" साहेब हा नागनाथ हातात आला ना की केस सुटलीच म्हणून समजा. "
" मग कसली वाट बघत आहात साहेब. चला आत्ता रात्री तो घरीच सापडेल आणू उचलून त्याला. " जाधव उत्साहात म्हणाले.
" नको हो, रात्रीच्या झोपेचं पुरत खोबरं झालं आहे. उद्या मिशन नागनाथ. का कुणास ठावूक मला ही केस आता जवळ जवळ संपल्या सारखी वाटतं आहे."
" आता हे तीन आरोपी जेंव्हा पोपटा सारख बोलायला लागतील ना. तेंव्हा अजून उलगडा होईल. पणं तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का साहेब, परवा अमावशा होती. आणि गावात एक देखील खून झाला नाही."
" खून झाला नाही हा निव्वळ दैवयोग. अगदी होता होता वाचला. लक्षात घ्या जाधव साहेब. ही सुंदरी त्या पोरीचा जीवच घेणार होती. निव्वळ त्या कुत्र्याने तिला वाचवलं. "
तिकडे सुंदरीच्या कोठडीतून अजूनही शिव्या आणि मार ऐकू येतं होत्या. बघता बघता सकाळ झाली. आणि आनंदाने सुरेखा ओरडतचं दाभोळकरांच्या केबिन मध्ये आली.
" साहेब, आनंदाची बातमी आहे"
( क्रमशः)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा