ज्या गावात कित्येक वर्ष सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आलो, जिथं ज्याचा शब्द कोणीही कधी खाली पडू दिला नाही. गावातलीचं काय पणं जिथं जिल्ह्यातील देखील कोणतीच मीटिंग ज्याच्या उपस्थिती शिवाय पूर्ण होतं नसे अशा , गावातला कोणताही महत्वाचा निर्णय असो वा कोणतेही मोठे कार्य असो ज्याच्या संमती शिवाय मान्यच होतं नसे असं एक मातब्बर, राजकीय प्रस्थ असलेलं आणि मोठमोठ्या लोकात उठबस असलेलं धनपाल एक मोठं व्यक्तिमत्व होतं. जेंव्हा त्याला त्याच्या राहत्या घरातून त्याच्या तथाकथित बायको आणि मेहुण्या सकट अपमानास्पद रितीने ओढून नेण्यात आलं. तो क्षण धनपाल साठी मेल्याहून मेल्यासारखा होता. आपल्या तोंडावर झाकायला कपडा मिळावा अशी त्याने विनंती केली. पण त्या उलट दाभोळकरांनी त्याच्या मानगुटीला पकडून त्याला धक्के मारत गाडीत बसवलं. सगळे घाबरून आपल्या घरातून, खिडकीतून हा खेळ पाहात होते. त्याच्या कान फडात वाजवत त्यांनी त्याला गाडीत बसवलं. लोकांना वाटतं होतं किंवा वाटलं होतं तितका धनपाल अजीबात शूर नव्हता. उलटं मान खाली घालून, कोणाला दिसू नये अशा रीतीने तो गाडीत जावून बसला. प्रत्यक्ष मालकाची अशी अवस्था पाहिल्यावर चिंधी आणि पक्या देखील गार पडले.
शेवटी ही वरात एकदाची पोलीस स्टेशनवर पोहोचली. तिथं पक्याला आणि धनपालला पाठीवर सपासप काठ्या मारत आत आणलं गेलं. दाभोळकर साहेब खुर्चीवर बसलेले होते. त्यांच्या टेबलसमोर दोन खुर्च्या रिकाम्या होत्या. सवयीने धनपाल खुर्चीवर जावून बसला. त्या बरोबर जाधव साहेबांनी त्याच्या कानफडात एव्हढ्या जोरात वाजवली की सगळ्या चौकीत आवाज घुमला. तो कोलमडत उभा राहिला. राघवने जाधव साहेबांना जी हकीकत सांगितली होती त्या मूळे त्यांचा संताप अनावर झालेला होता.
" काय झालं साहेब?" त्याने कळवळून विचारलं.
या त्याच्या बोलण्यावर सगळी ताकद एकटवून त्यांनी धनपाल आणि पक्याला तुडवले. त्या दोघांना वेगवेगळ्या कोठडीत बंद करण्यात आले. पोलीस चौकीवरचा बंदोबस्त कडक वाढवला गेला.
थोड्यावेळ दाभोळकर, जाधव साहेब आणि सुरेखा यांनी एक मोठ्ठी मीटिंग घेतली. त्यात बऱ्याच गुप्त गोष्टी ठरवल्या गेल्या. खरं तर हे आरोपी सापडले याचा त्यांना आनंद झाला होता. आता फक्त काळजी एव्हढीच होती की पुरावा अभावी ते निर्दोष सुटायला नको होते.
" सर, माझी एक विनंती आहे" जाधव साहेब नम्रपणे दाभोळकर साहेबांना म्हणाले.
" बोला ना जाधव साहेब, माझा पूर्ण भरवसा तुमच्या वर आहे" दोन्ही हाताच्या तळव्यावर हनुवटी टेकवून दाभोळकर म्हणाले.
" सर, हे सगळे निर्ढावलेले गुन्हेगार आहेत हे आपण जाणतो आणि जर यांच्या विरोधात सबळ पुरावा मिळाला नाही तर ते सगळे संशयाचा फायदा घेऊन मोकाट सुटतील. त्यांना एकही संधी मिळता कामा नये.त्या साठी या सगळ्यांना काही दिवस माझ्या आणि सुरेखाच्या ताब्यात द्यावे. आम्ही दोघं त्यांच्या कडून गुन्हा बरोबर कबूल करवून घेतो. मग दोन तीन दिवसात पुरावे जमा करुन केस दाखल करु या."
" ठीक आहे. बघा कस काय जमतं ते." दाभोळकर म्हणाले. जरी ते निमझरी सारख्या छोट्या गावात होते तरी सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष या केस कडे होतं. गावात वेग वेगळ्या वर्तमानपत्राचे पत्रकार उपस्थीत जमत होते. पण त्या पैकी केशव सोडून ते कोणालाच जास्त जवळ करत नसतं. म्हणून जाधव साहेबांना त्या सर्व गुन्हेगारांचा ताबा दिल्या नंतर त्यांना पोलीस चौकीच्या पायऱ्या चढून येतांना केशव दिसला. केशव बद्दल त्यांना एक वेगळाच आदर वाटतं असे. पत्रकारांची सामाजिक बांधिलकी काय असते याचे केशव एक उत्तम उदाहरण होता. खऱ्या अर्थाने त्यानेचं या गोष्टीला वाचा फोडली होती. नाहीतर कुणास ठावूक अजून किती बळी गेले होते. म्हणून तो दिसताच ते म्हणाले,
" या या, पत्रकार साहेब. खूप दिवसांनी भेट दिली आपण. "
केशव नुसता हसला. "साहेब तुमच्या सारखी व्यक्ती तपास करायला असली की केस संपलीच समजतो आम्ही. बर, एक पत्रकार म्हणून नाही तर एक जागरुक नागरिक म्हणून विचारतो मी की सापडले का आरोपी?"
" दोन्हीं भूमिकेतून तूम्ही विचारू शकता. खरं म्हणजे दोन महिन्या पासून एकही खून न झाल्यामुळे आरोपी माझ्या ताब्यात आहेत असं म्हणायला हरकत नाही. पण कोणताच खात्री लायक पुरावा मिळे पर्यन्त तुम्ही काहीच बातमी छापू नये असं मला वाटतं. "
" अगदीं नक्की, छापणार नाही सर. पणं कोण होती ही मंडळी. ? " केशवने उत्सुकतेने विचारले.
" अहो, गावातलीच प्रतिष्ठित मंडळी आहे ही. तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे का ?" त्यांनीं गमतीत विचारले.
" तुमची हरकत नसेल तर, आवडेल सर " केशव मानभावी म्हणाला.
" हरकत एकच, याची सध्या तरी एकही बातमी बनवायची नाही "
" प्रॉमिस सर " असं केशवने म्हटल्यावर दाभोळकर त्याला घेऊन कोठडीकडे आले. जिथं धनपाल, विक्रम, राघव, पक्या, नागनाथ, चिंधी, सुंदरी सगळेच एकेक कोठडीत होते.
दाभोळकर एकेक कोठडी जवळ जावून एकेक गुन्हेगाराची ओळख करून देत होते. अचानक एका कोठडी जवळ राघवला बघताच केशव दचकला. लगेच त्यांना बाहेर बोलावून तो म्हणाला,
" साहेब, माझा कॅमेऱ्यातला रोल नष्ट करणारा हाच तो माणूस आहे "
" काय म्हणतोस काय? " आश्चर्यचकित होऊन दाभोळकरांनी विचारलं.
" आणि त्या वेळी या माणसाला सपोर्ट त्या पांढऱ्या कपड्यातल्या माणसाने केला होता."
" अच्छा तर अशी गोष्ट आहे ही " दाभोळकरांना एकेक गोष्टीचा उलगडा होतं होता. " केशव, मला तुझ्या साक्षीची गरज लागेल "
" नक्की देईल सर "
त्यांना त्या छोट्या पत्रकाराचा अभिमान वाटला. त्यांनी जाधव साहेब आणि सुरेखाच्या ताब्यात गुन्हेगार दिले.
त्या दिवशी रात्रभर पोलीस चौकीतून आरोळ्या आणि किंकाळ्या ऐकू येत होत्या.
त्या दिवशी रात्रभर पोलीस चौकीतून आरोळ्या आणि किंकाळ्या ऐकू येत होत्या.
( क्रमशः)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा