Login

रक्तपिंडाचा श्राप भाग २२

समीचिने दिलेली औषधे नक्की कामी येणार का ? राजवीर ला त्याने बरे वाटेल का?

भाग २२

आदिवासींच्या पाड्यात घडलेल्या भयंकर घटनेनंतर आशय, आर्या, वक्रतुंड आणि राजवीर एका नव्या संकटाच्या सावटाखाली होते. आदिवासी प्रमुखाने पाहिले होते की गावाबाहेर काही अज्ञात शक्ती फिरत होत्या. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. आणि आता तर त्याने याची देही याची डोळा त्या नर पिशाच्च्याला ‌पाहिल्यामुळे त्याने एक मोठा निर्णय घेतला – आपल्या काफिल्यातील सर्वात अनुभवी, वृध्द आणि विचक्षण स्त्री, समिची हिच्याकडे या नव्या संकटाबाबत सल्ला घ्यायचा असे त्याने ठरवले.

समिची ही गावातील सर्वात वृद्ध स्त्री होती. तिचे वय कोणी ठामपणे सांगू शकत नव्हते. काही म्हणत, ती शंभर वर्षांहून अधिक जगली आहे, तर काही जण तिच्या अतीव ज्ञानामुळे तिला अंधश्रद्धेने अमर समजत होते. काही लोक तर तिच्या विचित्र वागण्या आणि बोलण्यामुळे वेडी देखील ठरवत होते. तिचे घर पाड्या पासून थोड्या अंतरावर, दाट झाडीत लपलेले होते. एक जुनी, फाटलेली चादर, ज्याचा तंबू बनवला होता. तो तंबू देखील मोडकळीस आल्याप्रमाणे एखाद्या बाजूला झुकला होता. सभोवती औषधी वनस्पतींच्या कुंड्या आणि धुके सदृश वातावरण फिरत होते. – हे दृश्य कोणाच्याही काळजाचा थरकाप उडवणारे होते.

"ती कोणत्याही माणसाला सहज भेटत नाही," आदिवासी प्रमुखाने त्यांच्या गटाकडे पाहत म्हटले, "पण ही परिस्थिती वेगळी आहे."

आशय आणि वक्रतुंड या ठिकाणी येण्याबद्दल थोडे साशंक होते, पण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यांनी राजवीरला एका गवतात तयार केलेल्या झोळीत ठेवले आणि सगळे आत गेले.

समिची एक बारीकशा देहाची, पण नितांत खोल डोळ्यांची स्त्री होती. तिचे केस पांढरेशुभ्र होते आणि तिच्या शरीरावर असंख्य सुरकुत्या दिसत होत्या. ती एका जुन्या लाकडी खुर्चीवर बसली होती, जणू काही गेली अनेक शतके तिथेच बसून होती.

ती हळूहळू पुढे झुकली आणि आदिवासी प्रमुखाकडे बघून म्हणाली, "तू पुन्हा माझ्या पुढे उभा आहेस, याचा अर्थ संकट खूप मोठं आहे."

प्रमुखाने हात जोडले, "हे लोक आपल्या ठिकाणी शरण म्हणून आले आहेत. ते एका भीषण शत्रूला सामोरे जात आहेत. त्यांना मदतीची गरज आहे."

" आताच आम्ही एका मनुष्या सारख्या दिसणाऱ्या प्राण्याला पाहिले, तो आपल्या पाड्यातील शंभूला मानेवर चावला आणि त्याचे रक्त पिऊ लागला होता. या आशय महाशयांनी त्याला पळवून लावले, पण शंभू आपल्या जगातून निघून गेला."

समिचीने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिचा पांढराशुभ्र डोळा आशयकडे वळला. "तुम्ही नर पिशाच्यांविरोधात लढत आहात, बरोबर ना?"

ही गोष्ट ऐकताच आदिवासी प्रमुखही थोडा थरथरला. आशय आणि आर्या तर आधीच याबाबत जागरूक होते, पण बाकीच्यांना हा शब्द नवीन होता.

"नर पिशाच्यांबद्दल तुला काय माहीत आहे?" आशयने थोड्या कठोर आवाजात विचारले.

समिची हसली, पण तिच्या हास्यात एक भीतीची सावली होती.

"नर पिशाच्यांना मरण नाही. ते केवळ श्रापीत योद्धे नाहीत, तर एक अशी जात आहे जिने मृत्यूलाच धोक्यात घातले आहे. त्यांचे रक्त वेगळे आहे, त्यांची ताकद अमानवी आहे, आणि त्यांची भूक कधीच संपत नाही, जी जिवंत प्राण्याला, मनुष्याच्या रक्तानेच भागते."

आदिवासी प्रमुखाचा चेहरा काळवंडला. "म्हणजे ते इथे आले तर आपला पाडा नष्ट होईल का?"

समिचीने डोके हलवले. "तुम्ही जितक्या लवकर इथून निघून जाल, तितके बरे. ह्या जंगलात आता त्यांचा वास येऊ लागला आहे, आणि जर त्यांना आपण सगळे इथे आहोत हे जर कळले तर ते एकत्र आपल्यावर हल्ला करून सगळ्यांना मारून टाकतील, कोणी कोणी म्हणून जिवंत राहणार नाही."

"समिची म्हणजे आपल्याला सुद्धा येथून निघावे लागेल का ?" आदिवासी प्रमुख काळजीने म्हणाला.

"जिवंत राहायचे असेल तर." समीची थट्टेने म्हणाली.

आर्या समिचीच्या जवळ गेली आणि तिच्या पायाशी बसली.

"मग आम्ही काय करू? आम्हाला राजवीरला वाचवायचे आहे, तो सध्या खूप जखमी आहे, आणि त्याला घेऊन आम्ही जास्त दूर जाऊ शकणार नाहीत. आम्ही आता कुठे जाऊ शकतो म्हणजे सुरक्षित राहू?"

समिची थोडा वेळ गप्प राहिली. मग तिने एका पेटीतून काही औषधांची भांडी बाहेर काढली आणि आर्याच्या हातावर ठेवली.

"या काही औषधी वनस्पती आहेत. त्याने तुमचा मित्र लवकर बरा होईल. पण खरी मदत तुम्हाला कुठे मिळेल, हे मला देखील माहीत नाही. अगदीच जीवन मरणाचा प्रश्न आला तर लडाखमधील 'थांग' नावाच्या गावात 'विनायक' नावाचा ग्रंथपाल आहे. तोच तुम्हाला नरपिशाच्यांबद्दल सर्वात जास्त आणि उपयुक्त माहिती देऊ शकतो. पण त्याला भेटायचं असेल, तर तुम्हाला हिमालय जवळ करावा लागेल."

आशयने तिच्या डोळ्यात बघितलं. "तुम्हाला खात्री आहे की हा विनायक आम्हाला मदत करेल?"

समिचीने डोळे मिटले आणि मंद स्वरात म्हणाली, "हे मी नक्की सांगू शकत नाही. तुमच्या नशिबात असेल तरच तो तुम्हाला भेटू शकतो, आणि त्याच्या मनात असेल तरच तो तुम्हाला मदत करायला तयार होईल. पण त्याची खूप किंमत तुम्हाला मोजावी लागेल."

येथून मरण नको असेल तर येथून निघायला पाहिजे, हे ऐकून आदिवासी प्रमुख झटपट समीचीच्या तंबुतून निघाला आणि पुन्हा कोणी नर पिशाच्य येण्याच्या अगोदर सगळ्यांना आपला बाडबिस्तरा उचलायला सांगितला.

"माझ्या लोकांना मी लवकरात लवकर सुरक्षित जागी हलवतो. तुम्ही अगर त्यात मदत केली तर मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही." त्याने आशय समोर विनवणी केली.

आशय, आर्या आणि वक्रतुंड यांनी मान हलवली. त्यांनी राजवीरला एका आदिवासी झोपडीत नेले.

आर्या समिचीने दिलेल्या औषधींचे भांडे उघडले त्यातून सुगंधी, पण तीव्र वासाचा धूर उठत होता. तीने ते हलक्या हाताने सगळे एकजीव केले आणि त्याचा एकसर लेप तयार केला. मग हळूहळू, तिने अत्यंत काळजीपूर्वक, राजवीरच्या जखमांवर तो लेप लावायला सुरुवात केली. त्याच्या हातावरील खोल जखमा, छातीवरील निळे पडलेले व्रण, कपाळावरील फुटलेली त्वचा—प्रत्येक ठिकाणी ती अलगद औषध चोळू लागली.

या आधी राजवीरचा श्वास जो अगदी मंदावलेला होता, पण काही क्षणांतच औषधाचा परिणाम दिसू लागला. त्याच्या शरीरातील वेदना कमी होऊ लागल्या, रक्तस्राव जवळ जवळ थांबून गेला, आणि त्याचा थरथरता हात स्थिर झाला. आर्या त्याच्या चेहऱ्याकडे पाहत असताना, तिच्या डोळ्यात माया आणि काळजी दाटलेली होती.

अचानक, राजवीरच्या डोळ्याच्या पापण्या थरथरल्या. काही क्षण तो शांत होता, मग हळूच त्याने डोळे उघडले. तो कष्टाने चारी बाजूला पाहू लागला, आणि जणू फार मोठ्या स्वप्नातून तो जागा झाला आहे असे त्याला वाटू लागले.

"आर्या...?" त्याचा आवाज क्षीण पण स्पष्ट होता.

आर्या हलकेच हसली, तिच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू तरळत होते. "हो, राजवीर... तू आता सुरक्षित आहेस."

तो अजूनही कमकुवत होता. पण थोड्या वेळाने त्याचे ओठ हलू लागले . "आशय... तू .... तू..... कधी आणि कसा आलास ?"

ते ऐकून, जवळ उभा असलेला आशय पुढे आला. "मी इथेच आहे, मित्रा," तो म्हणाला, आपल्या मित्राच्या चेहऱ्यावर समाधानाने पाहत तो त्याच्या अंगावरून मायेचा हात फिरवत बसला.

राजवीर थोडेसे हलायचा प्रयत्न केला, पण त्याच्या शरीरात त्याला अजूनही वेदना जाणवत होत्या. आर्याने लगेच त्याला थोपवले.
"आत्ता काही बोलू नकोस. फक्त विश्रांती घे. तुझे शरीर अजूनही खूप अशक्त आहे."

राजवीर मंद हसला.त्याच्या डोळ्यात कृतज्ञतेची छटा उमटली होती. "तुम्ही मला वाचवलंत... धन्यवाद..."

त्याचे शब्द अपूर्णच राहिले, कारण थकव्याने त्याचे डोळे पुन्हा एकदा मिटले गेले. पण आता त्याच्या चेहऱ्यावर वेदनेऐवजी शांती दिसत होती.

"आता आपण कुठे जाणार?" वक्रतुंडने विचारले.

आशयने उत्तर दिले, "सध्या तरी आपण या आदिवासी लोकांबरोबरच राहू. राजवीर थोडासा बरा झाला की मग पुढचे ठरवू."

आर्या आणि वक्रतुंड दोघांनीही मान डोलावली. पुढील प्रवास अत्यंत कठीण असणार होता, पण त्यांच्या मनात एकच ध्येय होतं – नरपिशाच्यांचा सामना करण्याची योग्य तयारी करणे आणि राजवीरला पूर्ण बरा करणे.

क्रमशः
सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे इरा फेसबुक पेज वर येतील, त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.
ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.