Login

रक्तपिंडाचा श्राप भाग ८८

महाभूषण सहस्त्रपाण्याला भविष्य सांगेल का?
भाग ८८

सहस्त्रपाणी सिंहासनावर ऐसपैस बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर खोटे हास्य झळकत होते, पण डोळ्यांत अस्वस्थतेची झाक होती. त्याला ठाऊक होते की त्याच्या कारस्थानांना आता वेग द्यावा लागणार होता. वज्रदंत आणि सर्पकला दोघेही हरले होते, आशय, राजवीर जिवंत होते, आणि आता त्याच्या पुढ्यात एक नवीन आव्हान उभे राहिले होते—आर्याच्या पोटात वाढणारी ती अज्ञात शक्ती. त्याने आपल्या खास सैनिकांना बोलावले. 

सहस्त्रपाणीच्या डोळ्यांत एक विलक्षण चमक दिसत होती. त्याच्या सिंहासनाच्या समोर उभ्या असलेल्या सैनिकांकडे त्याने रोखून पाहिले. "महाभूषण हा काही साधा माणूस नाही," तो गर्जला. "तो एक त्रिकालज्ञानी आहे. त्याला भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ ठाऊक आहे. पण त्याच्या या ज्ञानाचा उपयोग मला व्हावा, असे मी ठरवले आहे. तो स्वतःहून इथे येणार नाही, याची मला खात्री आहे. त्यामुळेच तुम्ही त्याला बोलावण्याचा प्रयत्न करून वेळ दवडू नका. तो जर ऐकत नसेल, तर त्याला जबरदस्तीने आणा. मग तो त्याच्या झोपडीत असो वा त्याच्या गावात—माझ्या आदेशाची अंमलबजावणी झालीच पाहिजे!" 

सैनिकांनी एकमेकांकडे पाहिले. महाभूषण हा एखाद्या राजाच्या दरबारात राहणारा विद्वान नव्हता, तो स्वतःच्या नियमांनी जगणारा माणूस होता. पण सहस्त्रपाणीच्या आज्ञेच्या विरोधात जाण्याची हिंमत कोणातही नव्हती. "महाराज, आम्ही त्याला लवकरच तुमच्या समोर आणू!" असे म्हणत त्यांनी तत्काळ कूच केली. सहस्त्रपाणीने आपल्या सिंहासनाच्या हातांना घट्ट पकडले. त्याला माहीत होते की महाभूषण सहजासहजी मोकळा होणार नाही, पण आता त्याच्या हातात वेळ नव्हता. आर्याच्या पोटात वाढणारी ती शक्ती काय आहे, हे त्याला लवकरात लवकर जाणून घ्यायचे होते.


महाभूषण हा एक नुसता ज्योतिषी नव्हता  कधीकधी भविष्य घडवण्याची ताकदही त्याच्या ठायी होती, असे म्हटले जायचे. त्याच्या ज्ञानाने कित्येक राजा-महाराजे अचंबित झाले होते. साध्या कुंडलीकडे किंवा चेहऱ्याकडे पाहून तो कुठल्याही व्यक्तीचे भूतकाळातील कर्म, वर्तमानातील संघर्ष आणि भविष्यातील नियती अचूक सांगू शकत होता. काहींनी तर असेही ऐकले होते की तो घडणाऱ्या घटना टाळूही शकतो! 

महाभूषण साधा, सात्त्विक जीवन जगणारा होता. तो कोणत्याही वैभवाच्या मागे नव्हता. अंगावर साधे पांढरेशुभ्र वस्त्र, कपाळावर चंदनाचा टिळा आणि चेहऱ्यावर एक विचित्र शांतता. त्याच्या डोळ्यांत एक विलक्षण तेज होते, जणू काही विश्वातील प्रत्येक गूढ त्याला ठाऊक होते.

महाभूषण एक निर्लोभ व्यक्ती होता. त्याच्या मनात कोणत्याही ऐश्वर्याची लालसा नव्हती.  त्याचा मेंदू मध्ये फक्त ज्ञान नव्हते, तर खोल अंतरज्ञान आणि अनाकलनीय जाणिवा देखील होत्या. त्याच्या नजरेत एक गूढता होती, जणू काही त्याला या ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्ट माहीत होती. तो फारसा बोलत नसे, पण एकदा बोलला की त्याच्या शब्दांमध्ये खोल अर्थ असे. त्याच्या अस्तित्वातच एक अशी जादू होती की कोणीही त्याच्यासमोर आल्यावर नकळत त्याच्या प्रभावाखाली जाई. तो कोणाच्या प्रभावाखाली येत नसे, उलट त्याच्याकडूनच लोकांनी मार्गदर्शन घ्यावे अशी त्याची विद्वत्ता होती.


गावापासून दूर एका लहानशा पर्णकुटीत महाभूषण एकटा राहत होता. त्याच्या कुटीच्या आजूबाजूला प्राणी निवांत फिरत असत—हंस, मोर, हरिण, गायी—तिथे कोणत्याही जाती-धर्माचा भेद नव्हता. मनुष्य आणि प्राणी समान हक्काने नांदत होते. गावातील अनेक लोक आपली समस्या घेऊन तिथे येत आणि त्याच्या ज्ञानाचा उपयोग करून घेत. पण तो स्वतःहून कुठेही जात नसे. 


त्या रात्री सहस्त्रपाणीचे सैनिक त्याच्या कुटीपाशी आले. कुटीसमोर मशालींचा उजेड पडला. कोण आले हे पाहण्यासाठी महाभूषण बाहेर येताच सैनिकांनी गर्वाने त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. 

"महाभूषण, तू अत्यंत विद्वान आहेस. आमच्या महाबलशाली सहस्त्रपाणी राजांनी तुला बोलावले आहे. तुझ्या ज्ञानाची त्यांना गरज आहे!" 

महाभूषण हलकेच हसला. "मी कधीही कुठे जात नाही. ज्यांना माझी खरी गरज आहे, ते स्वतः इथे येतात. सहस्त्रपाणीला माझी गरज असेल, तर त्याने स्वतः यावे. मी त्याच्या दरबारी जाणार नाही." 

सैनिकांनी एकमेकांकडे पाहिले. त्यांना आधीच माहित होते की महाभूषण असा सहजासहजी येणार नाही. त्यामुळे त्यांनी पुढील आदेशाप्रमाणे त्याच्या हातात आणि पायात बेड्या घातल्या आणि त्याला उचलून घेतले. महाभूषण शांत होता. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. 

"तुम्ही मला उचलून घेऊन जाऊ शकता, पण माझे ज्ञान मात्र बलाने मिळवता येणार नाही," तो फक्त एवढेच बोलला. 

गडावर पोहोचताच महाभूषणाला सिंहासनासमोर उभे करण्यात आले. सहस्त्रपाणीने त्याला पाहताच आपल्या सिंहासनावरून उठून हसत विचारले, "महाभूषण! तू मोठा त्रिकालज्ञानी आहे म्हणे! पण तरीही तुला तुझ्या भविष्यात काय होणार आहे, हे माहित नव्हते का?" 

महाभूषण शांतपणे उभा राहिला. त्याच्या डोळ्यांत भीती नव्हती, ना कोणताही त्रागा. त्याने सभोवतालच्या सगळ्या सैनिकांवर एक सहज नजर टाकली आणि मग सहस्त्रपाणीच्या डोळ्यांत नजर रोखून पाहिले. सहस्त्रपाणीच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होते, पण महाभूषणाच्या चेहऱ्यावर मात्र एक गूढ शांतता होती. तो हळूच हसला आणि सौम्य स्वरात म्हणाला, "राजन, भविष्य पाहणे आणि ते टाळणे यात मोठा फरक आहे. जे अटळ आहे, त्याला टाळता येत नाही. मी हे आधीच जाणून होतो की, तुझे सैनिक मला जबरदस्तीने इथे घेऊन येणार. पण मी प्रतिकार केला नाही, कारण ज्याला खरंच ज्ञान असते, त्याला प्रतिकाराची गरज लागत नाही. तूच विचार कर—तू कितीही शक्तिशाली असलास तरी तू माझ्याकडे का आला आहेस? का तुझ्या स्वतःच्या बुद्धीने, शक्तीने तुला उत्तर सापडले नाही?" सहस्त्रपाणीचा चेहरा क्षणभर कठोर झाला. त्याला महाभूषणाकडून उत्तर हवे होते, पण तो स्वतः प्रश्नांच्या जाळ्यात अडकत चालला होता. सभोवतालच्या सैनिकांनीही एकमेकांकडे पाहिले—त्यांना जाणवले की महाभूषण हा साधा ज्योतिषी नव्हता, तो काहीतरी अधिक मोठा आणि गूढ होता.

महाभूषण शांत स्वरात उत्तरला, "माझ्या जीवनात मी बल आणि अहंकारापेक्षा ज्ञान आणि सेवा मोठी मानली आहे. मी लोकांची सेवा करतो, आणि त्यासाठी मी कुठेही जायला तयार आहे. पण मी इच्छेने आलो नाही—तुम्ही मला पकडून आणलंत. मला सांग, महाराज, एवढा मोठा असतानाही तुला माझी गरज का वाटली?" 

सहस्त्रपाणी सिंहासनावर बसला. त्याच्या चेहऱ्यावर एक कपटी हास्य होते. "माझ्यासाठी सगळे उलटे असते, महाभूषण. नदी कधीही तहानलेल्याकडे जात नाही, पण माझ्याकडे सत्तेचा झरा स्वतः पोहोचतो. मी माझ्या इच्छेसाठी कुठेही जात नाही. मला हव्या असलेल्या गोष्टी मी इथेच बोलावतो!" 

महाभूषणाने गूढ स्मित केले. "पण काही गोष्टी अशा असतात ज्या तुझ्या ताब्यात येत नाहीत, सहस्त्रपाणी. सांग, मला का बोलावले आहेस?" 


सहस्त्रपाणी थोडा गंभीर झाला. "माझ्या राज्यात एक नवीन शक्ती जन्म घेत आहे. ती माझ्या नियंत्रणात राहिली, तर मी जगावर राज्य करू शकेन. पण जर ती माझ्या विरोधात गेली, तर माझे सर्वस्व नष्ट होईल. मला त्या शक्तीबद्दल पूर्ण माहिती हवी आहे. ती नक्की काय आहे? तिचे भविष्य काय आहे? आणि जर ती माझ्या मार्गात आली, तर मी तिला कसे संपवू शकतो?" 

महाभूषणने डोळे मिटले आणि काही क्षण स्तब्ध राहिला. मग त्याने डोळे उघडत अतिशय गूढ स्वरात उत्तर दिलं, "सहस्त्रपाणी, तू एका अशा शक्तीशी खेळत आहेस जी या विश्वाच्या नियमांपेक्षा वेगळी आहे. ती तुझ्या हाती येईल की तुला नष्ट करेल, हे तुलाच ठरवायचे आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव—जेव्हा निसर्गाच्या विरोधात काही तरी जाते, तेव्हा निसर्ग आपली ताकद नक्की दाखवतो!" 

सहस्त्रपाणी हसला. "म्हणजे तू माझ्या प्रश्नांचे उत्तर नीट देणार नाहीस?" 

महाभूषण शांत होता. "उत्तरे तुला मिळतील, पण ती तुला पचवता येतील की नाही, हे काळच ठरवेल." 


सहस्त्रपाणी महाभूषणाच्या शब्दांनी थोडा अस्वस्थ झाला, पण त्याने ते लपवले. "ठीक आहे," तो म्हणाला, "तु इथे अजून दोन दिवस राहा, विचार कर आणि मग माझ्या प्रश्नांची उत्तरे दे. तुला इथे मी कोंडून ठेवतो. जोपर्यंत मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत, तोपर्यंत तू माझ्या राजवाड्यातच राहशील!" 

महाभूषण फक्त हसला. "मी तुझ्या कैदेत आहे, पण माझे ज्ञान नाही. हे लक्षात ठेव, सहस्रपाणी." 

सहस्त्रपाण्याने त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहिले. आता त्याला महाभूषणच्या ज्ञानाचा उपयोग करून आपल्याला हव्या असलेल्या उत्तरांचा शोध घ्यायचा होता—आणि त्यासाठी तो कोणत्याही थराला जाणार होता.

क्रमशः


सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे इरा फेसबुक पेज वर येतील, त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.


ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.