भाग ९१
वक्रसेन गुप्तहेर आकाशाच्या अंधाऱ्या पोटातून वाऱ्याच्या वेगाने गडाच्या दिशेने झेपावत होता. रात्रीच्या काळ्याकुट्ट आकाशात त्याच्या विशाल पंखांचा मागमूसही लागत नव्हता. तो एका सावलीसारखा निसटत वेगाने पुढे जात होता. त्याच्या मनात एकच विचार होता—ही गोष्ट लवकरात लवकर सहस्त्रपाण्याला कळली पाहिजे!
रक्तपिंड कुठे लपवला गेला आहे, हे त्याला समजले होते, आणि ही माहिती मिळताच तो कोणताही वेळ न दवडता गडाकडे झेपावला होता. राजवीरने रक्तपिंड कोठेही दूर नाही, तर सहस्त्रपाण्याच्याच गडावर लपवला आहे! हा धक्कादायक सत्याचा खुलासा त्याच्यासाठीही अनपेक्षित होता, पण याचा अर्थ होता की रक्तपिंड सापडण्याचा आणि सहस्त्रपाण्याच्या हातात येण्याचा मार्ग अधिक सोपा झाला होता.
वक्रसेनला माहित होते की ही माहिती सहस्त्रपाण्याला मिळाली, की तो गडाचा प्रत्येक दगड उलथवुन टाकेल. पण त्याआधी त्याला गडात पोहोचावे लागणार होते—पहारेकऱ्यांनी सुसज्ज असलेल्या त्या दुर्गम किल्ल्यात! वाऱ्याच्या लयीत झेपावत, तो आता गडाच्या भिंतीजवळ येऊन पोहोचला. गडाजवळ पोहोचताच त्याने हवेतच काही वेळ झेप घेतली आणि भिंतीच्या कडेकडेने सरपटत आत प्रवेश केला.
आता तो सैनिकांच्या नजरेत न येता गडाच्या मुख्य भागात पोहोचला होता. त्याने एक झपाट्याने गिरकी घेतली आणि स्वतःच्या शरीरावर एक भेसूर कंपन निर्माण केले. क्षणातच त्याच्या पंखांचा पसारा गायब झाला. त्याचा आकार बदलला, आणि आकाशात झेपावणारे ते वटवाघुळ एका भयानक पिशाच्चाच्या रूपात परावर्तित झाले.लांब नखे, रक्ताळलेले डोळे आणि काळसर कातडी! त्याने गडाच्या भिंतींकडे नजर फिरवली आणि पुढे चालत निघाला. त्याच्या रक्ताळलेल्या डोळ्यांत एक विचित्र चमक होती—त्याची मोहिम यशस्वी झाली होती. तो आता सहस्त्रपाण्यासमोर उभा राहण्यास पूर्ण तयार होता!
गडाच्या अंतर्भागात प्रवेश करताच, वक्रसेन वेगाने सहस्त्रपाण्याच्या शयनगृहाकडे निघाला. त्याच्या प्रत्येक पावलातून उतावीळपणा जाणवत होता, कारण त्याच्याकडे महत्त्वाची माहिती होती जी सहस्त्रपाण्याला तात्काळ सांगणे गरजेचे होते.गडाच्या दाट आणि गूढ वातावरणात त्याच्या पावलांचा आवाजही मोठा वाटत होता. वाऱ्याच्या झोतासारखा तो दालने ओलांडत पुढे जात असताना, अचानक दोन छायासारख्या आकृत्या त्याच्या मार्गात उभ्या राहिल्या.
ते सहस्त्रपाण्याचे विश्वासू शिष्य होते—गडाचे कट्टर रक्षक! त्यांचा चेहरा कठोर होता, आणि त्यांच्या डोळ्यांत शंकेची धार स्पष्ट दिसत होती. त्यातील एकाने पुढे होत वक्रसेनकडे रोखून पाहिले आणि तीव्र स्वरात विचारले.
"थांब! इतक्या उशिरा सहस्त्रपाण्याच्या शयनगृहात प्रवेश करण्याची परवानगी तुला कोणी दिली?" त्यांच्या सुरात एक प्रकारचा धाक होता—कोणत्याही परिस्थितीत ते आपल्या स्वामीच्या शांततेला भंग करू इच्छित नव्हते. पण वक्रसेनला थांबायचे नव्हते! त्याने पुढे झुकून त्यांना रागानेच उत्तर दिले, त्याच्या डोळ्यांत क्रोधाचा ज्वालामुखी धगधगत होता. त्याने दोन्ही रक्षकांकडे रोखून पाहिले आणि संतापलेल्या आवाजात ओरडला,
"मी कोण आहे हे तुम्हाला माहीत नाही का? मी वक्रसेन आहे, महाराजांचा खाजगी गुप्तहेर! त्यांच्यासाठी मी अनेक कठीण मोहिमा पार पाडल्या आहेत. रक्तपिंडाबाबत महत्त्वाची माहिती घेऊन आलोय, आणि तुम्ही जर मला थांबवले, तर त्या मूर्ख राजवीरचे फावेल!"
रक्षकांपैकी एकाने पुढे होत तलवारीच्या मूठीवर हात ठेवत कठोर स्वरात उत्तर दिले.
"तू कोणीही असू दे, पण यावेळी तू शयनगृहात जाऊ शकत नाहीस. आम्हाला तसा आदेशच आहे. सहस्त्रपाणी मंत्रसाधनेत मग्न आहे, आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांची समाधी आम्हाला भंग करायची नाही."
हे ऐकताच वक्रसेनने एक घाणेरडा फुत्कार टाकला. त्याच्या चेहऱ्यावर संतापाची छटा उमटली. तो रागाने पुढे होत, आपल्या लांब नखांनी हवेत एक भेसूर आकृती रेखाटत म्हणाला,
"मूर्खांनो! तुम्हाला कल्पनाही नाही की तुमच्या समोर उभा असलेला मी केवळ एक साधा माणूस नाही. जर मला रोखण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हा दोघांनाही या ठिकाणी भस्म करीन! माझ्याकडे रक्तपिंडाबाबत एक अतिशय महत्त्वाची माहिती आहे! ती तात्काळ सहस्त्रपाण्याला सांगणे आवश्यक आहे. वाट अडवू नका, नाहीतर मोठा अनर्थ घडेल!"
त्याच्या त्या शब्दांत विलक्षण ताकद होती, जणू काही गडालाच हादरवणारी गोष्ट तो उघड करणार होता! रक्तपिंड कुठे आहे, हे महाराजांना कळले नाही आणि तो राजवीरच्याच हाती राहिला, तर या संपूर्ण गडावर संकट कोसळेल! तुम्हाला तुमच्या मूर्खपणाचा पश्चात्ताप करायला वेळही मिळणार नाही!"
हे ऐकताच शिष्यांच्या चेहऱ्यावर संभ्रम उभा राहिला. रक्षक एकमेकांकडे बघू लागले. वक्रसेनच्या डोळ्यांतील तीव्रता आणि त्याच्या आवाजातील भीषण ताकद पाहता ते संभ्रमात पडले. त्यांना आता खरेच वाटू लागले की ही माहिती सहस्त्रपाण्याला त्वरित मिळायला हवी. त्यातील एक रक्षक अजूनही साशंक होता,पण दुसऱ्याने झपाट्याने शयनगृहाच्या दरवाज्यातून आत प्रवेश केला. आणि सहस्त्रपाण्याचा शयनगृहात गडगडाटासारखा आवाज उमटला. त्यामुळे तो मंत्रसाधनेतून थोडा हलला होता, पण कोणीतरी आत येत असल्याचा आभास झाल्याने तो जागा झाला. त्याने मोठ्याने विचारले,
"कोण आहे तिकडे? जो मी मंत्र साधनेत असताना माझ्या शयनगृहात येण्याची हिंमत करत आहे?"
शिष्य घाबरून म्हणाला, "मी तुमचा "शिंत्रु" शिष्य स्वामी, वक्रसेन गुप्तहेर आलाय. त्याच्याकडे रक्तपिंडाबद्दल खूप मोठी माहिती आहे."
हे ऐकताच सहस्त्रपाणी ताडकन उठला. त्याच्या लालसर डोळ्यांत क्रोधाची झलक होती. त्याने हाताने इशारा करत सांगितले, "त्याला आत घेऊन ये!"
वक्रसेन सावध पावलांनी आत आला आणि सहस्त्रपाण्यासमोर नतमस्तक झाला. सहस्त्रपाण्याने तीव्र नजरेने त्याच्याकडे पाहत विचारले,
"बोल! कोणती माहिती घेऊन आला आहेस ?"
वक्रसेनने थोडा वेळ घेतला, आपला श्वास स्थिर केला आणि म्हणाला,
"स्वामी, मला अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजली आहे. रक्तपिंड कुठे आहे हे मला कळले आहे!"
हे ऐकताच सहस्त्रपाण्याचे डोळे अधिक मोठे झाले. तो पुढे झुकून म्हणाला,
"कुठे आहे रक्तपिंड? कुणाकडे आहे तो?"
वक्रसेनने एक हलकीशी स्मितरेषा उमटवत उत्तर दिले,
"स्वामी, हीच एक मोठी गंमत आहे. रक्तपिंड बाहेर कोठेही लपवलेला नाही... तो याच गडावर आहे!"
सहस्त्रपाणी काही क्षण स्तब्ध झाला. मग तो मोठ्याने हसला आणि म्हणाला,
"म्हणजेच तो माझ्याच राज्यात आहे? हा तर आपला खूप मोठा मूर्खपणा होता!"
वक्रसेनने मान हलवली आणि पुढे स्पष्ट केले,
"हो स्वामी, राजवीरने रक्तपिंड कुठल्याही सुरक्षित ठिकाणी लपवण्याऐवजी तो आपल्या गडावरच लपवला आहे. कारण त्याला वाटले की आपण आपल्या गडावर कधीच शोध घेणार नाही!"
सहस्त्रपाण्याच्या चेहऱ्यावर एक हलके स्मित उमटले. तो उठून उभा राहिला आणि आपल्या आसनाजवळ गेला. तिथून एका तेजस्वी दिव्यासमोर उभा राहून तो विचारात पडला. काही वेळाने तो पुन्हा बोलला,
"म्हणजेच ते मला हाच विचार करायला लावू इच्छित आहेत की रक्तपिंड इथे नाही.चांगली कल्पना होती, राजविरची पण त्याला माहित नव्हते की माझे गुप्तहेर त्याच्यापेक्षा देखील खूप हुशार आहेत. आता मी हाच गड पालथा घालून त्याला शोधून काढणार!"
वक्रसेनने आनंदाने मान डोलावली.
"होय स्वामी, आपण आता आपल्या सैनिकांना आदेश द्यायला हवेत. राजवीरच्या समजुतीपेक्षा आपण अधिक चतुर आहोत. गडाच्या प्रत्येक कोपऱ्यात शोधमोहीम राबवली पाहिजे!" वक्रसेनने अधीरतेने सांगितले. त्याच्या रक्ताळलेल्या डोळ्यांत विजयाची चमक होती. सहस्त्रपाण्याने त्याच्या शब्दांवर विचार केला आणि काही क्षणांतच त्याचा चेहरा क्रूर आनंदाने उजळला.
"आताच सूर्योदयापूर्वीच शोधमोहीम सुरू होईल. रक्तपिंड माझ्याच गडावर असेल, तर ते आता फार काळ लपून राहणार नाही!" सहस्त्रपाण्याने आसनावरून उठत गर्जना केली. त्याचा आवाज गडाच्या भिंतींना हादरवत गेला, आणि त्याच वेळी बाहेर वाऱ्याचा वेग अचानक वाढला. जणू निसर्गानेही या महत्त्वाच्या क्षणाची नोंद घेतली होती. गडाच्या कडांवर उभ्या असलेल्या मशालींच्या ज्वाळा झपाट्याने फडफडू लागल्या, आणि अंधार अधिकच गडद वाटू लागला.
गडाच्या खाली, सैनिकांना तातडीने हुकूम कळवला गेला. लांबच लांब कड्यावर शिस्तबद्ध उभे असलेले सहस्त्रपाण्याचे योद्धे युद्धसज्जतेत आले. त्यांच्या अंगावरील काळ्या चिलखतींवर चंद्रकिरणांचे प्रतिबिंब उमटत होते. मशालींच्या प्रकाशात त्यांच्या चेहऱ्यांवरील क्रूरतेचा साक्षात्कार होत होता. आजवर अनेक युद्धे जिंकलेल्या या सैन्याला आता फक्त एकच गोष्ट हवी होती—रक्तपिंड! सहस्त्रपाण्याने आपल्या समोर उभ्या असलेल्या सेनापतीकडे कटाक्ष टाकत निर्वाणीच्या स्वरात म्हटले,
"गडाचा प्रत्येक दगड उलथवुन टाका, प्रत्येक अंधाऱ्या गुहेत, प्रत्येक दालनात रक्तपिंड शोधा! मला तो सापडला पाहिजे, आणि जो कोणी त्याच्या आड येईल, त्याचा एकही श्वास राहु देऊ नका!" त्या क्षणी, गडाच्या अवकाशात एक विजेचा लोळ चमकून गेला, त्याच्या शब्दांसोबतच गडाच्या कडांवर वाऱ्याचा वेग वाढू लागला, जणू तो विधिलिखित बदलण्याच्या तयारीत होता आणि भविष्यातील महाभयानक युद्धाची ती नांदीच होती!
क्रमशः
सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे इरा फेसबुक पेज वर येतील, त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.
ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.
copyright: ©®
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा