Login

भाग ४

त्रिकालचा प्रवेश , ज्यामुळे राजवीर ला आर्या किंवा त्याचे पिशाच्य रूप यामधील एकाला निवडायचे होते. काय करणार होता तो?
भाग ४

खिरसूच्या शांततेतही राजवीरचे मन आजकाल अधिक अस्वस्थ होत होते. त्याला जाणवत होते की या गावात त्याचे उरलेले अस्तित्व अधिक काळ टिकणार नाही. आर्या त्याच्या आयुष्यात अचानक प्रवेशली होती, आणि तिच्या निरागसतेने त्याचं एकाकीपण हलके केले होते, पण त्याच वेळी तिचे अधिक जवळ येणे त्याच्यासाठी धोकादायक होते.त्याच्यातला पिशाच्य जर जागा झाला आणि त्याला तो ताब्यात ठेवता आला नाही तर मग गडबड होईल.

"माझे गुपित जर उघड झाले, तर तिचे आयुष्य उद्ध्वस्त होईल," तो स्वतःशीच म्हणाला. त्याला माहित होते की मानवांसोबतच्या मैत्रीला अनेक मर्यादा होत्या, पण तरीही आर्याच्या सहवासाने त्याला त्याचे आयुष्य पुन्हा उमलत असल्यासारखे वाटत होते.

पण त्याच्या मनाला दुसरे एक मोठे ओझे सतावत होते. ते म्हणजे "आशयचा" नसलेला संपर्क. आशय त्याचा जुना मित्र होता, जो त्याच्या अमरतेचं रहस्य जाणूनही त्याच्यासोबत होता. तो नेहमीच त्याच्यासाठी योग्य आणि सुरक्षित ठिकाणे शोधायचा, कारण राजवीर जिथे जात असे, तिथे काही काळानंतर लोक त्याच्याबद्दल संशय घेऊ लागायचे. त्याच्या अगम्य येण्याजाण्याच्या वेळा, पांढरी त्वचा, राहण्याच्या गोष्टी, कोणातही न मिसळण्याची त्याची सवय या सगळ्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा वाटायचा. त्याच्या आजूबाजूचे प्राणी गायब व्हायचे हे देखील एक वेगळे कारण असायचे.

आशय सध्या कुठेतरी लांब गेला होता, आणि त्याच्याशी संपर्क साधणे अशक्य झाले होते.

"तो परत यायची वाट पाहण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही," राजवीरने स्वतःला समजावलं. 

दरम्यान, आर्या आता तिचा अधिकाधिक वेळ वाड्यात घालवू लागली होती. ती केवळ वाड्याच्या वास्तुकलेवर किंवा इतिहासावर संशोधन करण्यासाठी नाही तर राजवीरशी बोलण्यासाठीही येऊ लागली होती. तिच्या मनात त्याच्याबद्दल असलेलं कुतूहल वाढत होते.

"तू इतका गूढ का आहेस?" एकदा तिने थेट प्रश्न विचारला.

राजवीरने थोडेसे हसून उत्तर दिले, "माझ्या आयुष्यात खूप गूढ गोष्टी आहेत त्यांचे रक्षण करण्यासाठी मला गुढताच पसंत आहे.कदाचित त्यामुळेच तुम्हाला मी गूढ दिसत असेन." 

आर्या सहज थांबणारी नव्हती.

"तू तुझ्या भूतकाळाबद्दल काहीच सांगितले नाही? तू इतक्या मोठ्या वाड्यात एकटाच कसा राहतोस?" 

राजवीरला एकदा वाटले की तिला खरे सांगावे, पण तिच्या डोळ्यांतील निरागसता आणि विश्वास पाहून तो गप्प राहिला. तिला त्रास द्यायचा नाही, हे त्याने ठरवले होते.

"माझ्या कुटुंबात पूर्वी खूप लोक होते.," त्याने शांतपणे उत्तर दिलं.

"पण आता फक्त त्याच्या खूप साऱ्या आठवणी माझ्यासोबत आहेत, त्या कधीच मला सोडून जाणार नाहीत." 

आर्या त्याच्याकडून मिळालेल्या या अपूर्ण उत्तरांवर समाधानी नव्हती. ती दरवेळी नवीन प्रश्न विचारायची, पण राजवीर प्रत्येकवेळी काळजीपूर्वक उत्तरे द्यायचा.

त्याला तिच्या मनातील उत्सुकता दिसत होती, पण त्याला भीती होती की तिला त्याच्या खर्‍या रूपाबद्दल समजले तर ती कधीच त्याला स्वीकारणार नाही. 

राजवीरला आजकाल त्याच्या भूतकाळाच्या भेसूर आठवणी सतावू लागल्या होत्या. शतकांपूर्वीची ती चूक, जी सहस्रपाण्याशी त्याच्या शत्रुत्वाला कारणीभूत ठरली होती, त्याला अजूनही शांत झोपू देत नव्हती. त्याला माहित होते की सहस्रपाण्याने पाठवलेला त्रिकाल अजूनही त्याचा शोध घेत असणार. 

सहस्रपाणी हा एका प्राचीन पिशाच्च कुटुंबाचा शक्तिशाली गुरु होता, ज्याचं वैर राजवीरशी गेली दोनशे शतके होते. राजवीरने एका वेळेस त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा जीव वाचवण्याऐवजी त्यांना वाऱ्यावर सोडून दिले होते, आणि याच गोष्टीने त्यांच्या मनात त्याच्याविषयी अढी निर्माण झाली होती.आणि त्यांने त्याच्या काही शिष्यांना राजवीरला शोधायला पाठवले होते. त्रिकाल त्यातलाच एक होता.     

आता त्रिकालने उत्तराखंडातील खिरसू या गावाबद्दल ऐकले होते.

"राजवीर तिथेच असेल," तो स्वत:शी म्हणाला. "आणि यावेळी त्याला मी माझ्यापुढे झुकायला लावीन नाहीतर त्याच्या अमरत्वाचा घोट घेऊनच गुरुवर्यांचा प्रतिशोध पूर्ण करीन. 

---------


एक दिवस, आर्या वाड्यात परतली, तिच्या हातात काही कागदपत्रे होती. तीला राजवीर दिसताच ती थेट त्याच्याकडे गेली.

"मी पुन्हा पुन्हा सारखे विचारत आहे,तू इतका गूढ का वागतोस? आणि या वाड्यात इतके संशयास्पद पुरावे का आहेत?" 

राजवीरने काहीही न बोलता तिच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यांत खूप सारे प्रश्न तरळत होते, पण त्याच वेळी तिच्या चेहऱ्यावर कणव आणि विश्वासही होता. 

"काय पुरावे?" तो शांतपणे विचारत राहिला. 

"स्वयंपाकघरातल्या ग्लासमधील लालसर द्रव, मेलेल्या प्राण्यांचे अवशेष, आणि हे पुस्तक," तिने एक जुने पुस्तक उघडत सांगितलं. "या पुस्तकात रक्तपिपासू पिशाच्चांबद्दल माहिती आहे. तुला हे वाचून काय मिळते?" या आधी तु जी मला उत्तरे दिली आहेत ती मला अजिबात पटत नाहीत."

राजवीर काही काळ गप्प राहिला. तो तिच्या मनातील प्रश्न ओळखत होता. त्याला माहित होते की या क्षणी चुकीचे उत्तर दिले तर ती कायमची दूर होईल. 

"हे पुस्तक लोकांच्या कल्पनेचं फळ आहे, आर्या. अशा गोष्टी प्रत्यक्षात नसतात, तरी सुद्धा त्या लोकांना आवडतात, लोक त्या प्रमाणे वागायचा प्रयत्न करतात, तु देखील कधीतरी एखाद्या चित्रपटातील नायिकेसारखी वागली असशीलच की" तो उत्तरला. त्याच्या आवाजात शांतपणा होता, पण मनातून प्रचंड घाबरलेला होता.

आर्या अजूनही काहीशी संशयाने त्याच्याकडे पाहत होती, पण ती काही बोलली नाही.

"ठीक आहे, पण तुझे उत्तर अजूनही मला अपूर्ण वाटते, तु नक्की आम्हा लोकांपासून काहीतरी लपवत आहेस" ती aअसे म्हणून निघून गेली. 
-------

त्या रात्री, त्रिकाल खिरसूच्या जंगलात पोहोचला होता. त्याच्या उपस्थितीने जंगलातील प्राणी अस्वस्थ झाले, ते चित्र विचित्र आवाज काढून भीतीने दूर जंगलात लपून राहिले होते. त्याने त्याच्या गुप्त शोधाला सुरुवात केली.

"राजवीर, आता तुझे अमरत्व संपवण्याची वेळ आली आहे," तो स्वत:शीच म्हणाला. 

जंगलातील प्राण्याचा आवाज ऐकून राजवीरला जाणवत होते की त्रिकाल जवळ येत आहे. त्याला हेही माहित होते की आर्यासकट पूर्ण गावाला याचा धोका होणार होता. तो जेथे राहत होता त्याच्या आजूबाजूच्या २५ किलोमीटर जवळ त्रिकाल येऊन पोहोचला होता. राजवीरचा वाडा बरोबर त्या वर्तुळाच्या केंद्र स्थानी होता.त्याच्यासकट, आर्या आणि गावकरी यांना वाचवण्याची जबाबदारी त्याच्यावर येणार होती. नाहीतर त्या गावचा विनाश अटळ होता.

"माझे गुपित उघड होण्याआधीच मला हे गाव सोडावे लागेल," त्याने स्वत:शी ठरवले. पण आशयच्या अनुपस्थितीत हे करणे कठीण होते. तो स्वतःच्या अमरतेमुळे मानवांपासून वेगळा होता, पण आशयच त्याला या जगाशी जोडून ठेवत होता. 

दरम्यान, आर्या राजवीरला पुन्हा भेटली. ती अजूनही त्याच्या भूतकाळाबद्दल विचारत होती.

"माझ्याशी का लपवत आहेस? मला वाटते तू एक वेगळा माणूस आहेस, पण का? तूझ्याबद्दल तु सगळ्या गोष्टी मला का सांगू शकत नाहीस?" 

राजवीर तिच्याकडे पाहून हसला, पण त्याच्या डोळ्यांत दुःख स्पष्ट दिसत होतं.

"काही गोष्टी सांगितल्याने लोकांचे आयुष्य अवघड होत असते ," तो म्हणाला. 

"मी अशा गोष्टींचा सामना करू शकते, तु त्याची काळजी करू नकोस," ती उत्तरली. 

राजवीर काहीही बोलला नाही, पण त्याला तिच्या शब्दांमुळे एक प्रकारचा आधार वाटला. तिचा आत्मविश्वास त्याच्यात एक नवीन उमेद निर्माण करत होता. 

आर्या आणि राजवीरचं नातं एका गूढ स्तरावर पोहोचत होते, पण त्याच वेळी त्रिकालचा धोका अधिकाधिक वाढत होता. राजवीर आता दोन गोष्टींच्या द्विधा मनस्थितीत होता—आर्याच्या जवळ राहणे आणि त्रिकालशी सामना करणे, किंवा आर्याला सुरक्षित ठेवण्यासाठी तिला कायमची दूर करणे.पण त्रिकालशी लढताना, जर आर्या समोर असेल तर तर तसेही तिला सगळे कळणार होते. त्रिकाल देखील अनेक पिशाच्यांना मारून बलवान बनला असणार, त्याच्या विरुध्द झुंज देणे काही खाण्याचे काम नव्हते.

आशयच्या परतीची वाट पाहत, राजवीरने मनोमन ठरवलं की तो आर्याला त्रिकालपासून वाचवण्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार होता, पण त्याच वेळी, त्याला माहित होते की त्याचे गुपित उघड झाले तर आर्या कधीच त्याला माफ करणार नव्हती, आणि तो धक्का पुन्हा एकदा त्याच्या पूर्वीच्या गोष्टींप्रमाणे त्याच्या आयुष्याच्या भूतकाळात सामील होणार होता.

क्रमशः

सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे इरा फेसबुक पेज वर येतील, त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.


ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.