Login

रमा काकू भाग 3

रमा काकू भाग 3
चॅम्पियन ट्रॉफी 2025
जलद लेखन

कथा : रमा काकू

भाग: 3

माधवीची तब्येत चांगली झाली. काही दिवसांनी रमा काकू या आपल्या गावी निघून गेल्या. जोपर्यंत रमा काकू पुण्याला होत्या तोपर्यंत माधवीला कोणतेही काम रमा काकूंनी सांगितले नाही आणि माधवीच्या तब्येतीची काळजी घेतली. सतत तिच्या आवडीचा स्वयंपाक रमाकाकू करायच्या. रमाकाकू असतांना माधवीला आराम मिळाला.

पण काही दिवसांनी माधवीची आई माधवीला भेटायला पुण्याला आली. विजयने माधवीच्या आईला बस स्टॅन्डवरून घरी आणले.

माधवीची आई स्वभावाला आडवे बोलणारी होती. ती घरी आल्या आल्या माधवीला म्हणाली.
"अग माधवी किती बारीक झालीस! तू खूप काम केले काय तुझी सासू असताना? किती खराब झाली."

यावर विजय आणि माधवी एकमेकांकडे बघतच राहिले. विजयला माधवीच्या आईचा खूप राग आला, पण तो शांत राहिला.
"मी बाहेरून येतो." असं म्हणत घरातून निघून गेला.

माधवीच्या आईने येताच दुसरा प्रश्न केला. "अग मी इतक्या दुरून आली, तू स्वयंपाक केला की नाही माझ्यासाठी, मला खूप भूक लागलेली आहे."

मान हलवत माधवीने होकार दर्शवला. माधवीची आई आणि ती दोघींनी मिळून जेवण केले. जेवण झाल्यावर उष्टे भांडे माधवीलाच उचलावे लागले.

स्वतःची आई असतानांही माधवीला पूर्ण काम करावे लागत होते. माधवीची आई फक्त ऑर्डर सोडायची.
"माधवी चहा कर? माधवी पोहे बनव." या सर्व गोष्टीचा माधवीला खूप कंटाळा आला होता.

माधवीची खूप चिडचिड होतं होती. माधवीला प्रश्न पडला की,'विजयची आई सासू असूनही कधी कोणतचं काम सांगितल नाही. स्वतः सर्व काम करत होत्या. सुनेला मुलीसारखं बघत होत्या आणि एक माझी आई आहे, स्वतःच्या मुलीलाच काम करायला लावते. फक्त एका ठिकाणी बसून ऑर्डर सोडते. सोबत दोन घर फिरायलाही आजूबाजूला जाते.'

"माझी सासू काम झाल्यावर पुस्तक वाचायच्या, पेपर वाचायच्या. माझ्या सासूकडून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहे."
उगाच कुणाच्या बोलण्यात येऊन कुणाबद्दल मत बनवू नये हे तिला कळलं. माझ्या आईमुळे बऱ्याच दिवसापासुन सासरला जाणं बंद केलं आणि सासूबाईचा राग ही करायला लागली.

माझी सासू तर माझ्या आईपेक्षा खूपचं चांगली आहे. माधवीला आलेल्या अनुभवातून माधवी हुशार झाली.
"सासूबाई इतक्या चांगल्या असतांना मी उगाच द्वेष करायची." हे तिच्या लक्षात आलं.

माधवी स्वतःच्या आईला म्हणाली,"आई यापुढे तू माझ्या सासूबाईबद्दल उगाच माझ्या मनात भरवू नको. मी तुझं काही एक ऐकणार नाही." असे तिने स्वतःच्या आईला खडसावून सांगितलं.


"माझ्या सासू सारखी बाई नाही कोणी, माझी सासू खूपच चांगली आहे. माझी तब्बेत खराब असतांना माझ्या सासुबाईंनी खूप काळजी घेतली. मला स्वतःच्या हाताने भरवले. सर्व माझ्या हातात देत होती. माझी सासु या जगात एक नंबर आहे. माझ्या सासूबाई सुनेला मुलीसारख बघतात.
माझ्या सासूबाई सुनेला फुलासारखं जपतात."
हे ऐकताच माधवीची आई खजील झाली आणि त्यांनाही त्यांची चूक समजली.