Login

रान वेल भाग १

A Story About A Girl Who Lived In Tribal Area
कथा -रान वेल भाग १


लेफ्टनंट जर्नल अविनाश कुमार आज खूप उदास दिसत होते... सराव मैदानाच्या एका छोट्या कट्टया वरती कॉफीचा एक एक घोट घेत ते शांतपणे बसले होते.
आज त्यांना त्यांच्या पत्नीची खूप आठवण येत होती. रूपाने सुंदर दिसणारी, नावाप्रमाणेच गोड गळ्याची 'माधवी' त्यांच्या आयुष्यातून छोट्या आजाराने दूर अनंतात विलीन झाली होती. तिला नेहमी, आलं घातलेला गरमागरम चहा आवडायचा. तर यांना कॉफी. अविनाश कुमार तिच्या आठवणीत गढून गेले. 'आपण कॉफी पिण्याबद्दल तिच्याशी किती वाद घालायचो...' 'शेवटी तिला आपण कॉफी प्यायला तयार केलेच'. तिला सुद्धा नंतर कॉफी आवडायला लागली. ती जेव्हा गाणं गायची, तेव्हा आपण कसे तल्लीन होऊन तिच्या गाण्याला साथ द्यायचो...
तिला, अरुण दाते नी गायलेले , "दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे... मनातल्या मोरपिसाची ची शपथ तुला आहे..." हे गाणं खूपच आवडायचं.
'परंतु एकमेकांना साथ द्यायचं दिलेलं वचन अर्ध्यावर मोडून, तू गेलीस माधवी!'
अशा विचारातच त्यांनी कॉफीचा शेवटचा घोट संपवून स्वतःला शांत केले.आणि एक सुस्कारा टाकला.

नुकतेच कारगील सीमेवरील युद्धाला पूर्णविराम मिळाला होता. सध्या लष्करात थोडी शांतता होती. पत्नी गेल्याचं दुःख त्यांना होतंच. कारण त्यांनी पत्नीला आपल्या सोबत क्वार्टर ला ठेवलेले होते. तिथे लष्करातील अनेक कुटुंब सुद्धा राहत होते. परंतु नुकतेच लग्नाला एक वर्ष झालेले असताना त्यांनी तिला सोबत आणले, हीच आपण चूक केली. असं त्यांना वाटायचं... कारण माधवी ला इथलं थंड हवामान मानवले नाही. व छोट्याशा आजाराने तिचं निधन झालं होतं.

अविनाशने दीर्घ सुटीचा अर्ज कार्यालयात सादर केला. त्यांच्या मनस्थिती चा विचार करून त्यांची सुटी मंजूर केल्या गेली.
त्यांना स्वतःचं कुटुंब म्हणून नव्हतंच. आई वडील लहानपणीच गेल्यामुळे बहिणीने त्यांचा सांभाळ केला. 22व्या वर्षातच लष्करात भरती झाले. व लष्करात तील उच्च पदाची परीक्षा देऊन आता ते कॅप्टन पदावर पोहोचलेले, कर्तृत्ववान लेफ्टनंट म्हणून त्यांची ख्याती होती.

आपण आता दीर्घ सुट्टी टाकलेली आहेच, तर छान अशा निसर्ग रम्य ठिकाणी शांत वातावरणात सुट्टीचा उपभोग घेऊ, असा विचार त्यांनी केला. व ते तडक निघाले विदर्भातल्या मेळघाटच्या सुंदर अशा वातावरणात. मेळघाट चा भाग तसा आदिवासी समाजाचा.

सृष्टी चे सौंदर्य पहावं तर विदर्भातल्या नंदनवनात, मेळघाटात! उंचावरून पडणारे धबधबे, खोल दऱ्या,
त्यातून येणाऱ्या धबधब्या चा खळखळ करणारा नाद... वर्षा ऋतूत संपूर्ण सृष्टीची हिरवाई... हिरव्या रंगाच्या विविध छटा... हे सर्व बघणाऱ्या च्या डोळ्याचं पारणं फिटावं असं दृश्य...

तेथे राहायला विश्राम गृह सुद्धा आहेत.
अविनाश कुमारने आपल्या सामानाची बांधा बांध केली. व ते तडक निघाले, या सृष्टीच्या वातावरणाचा उपभोग घ्यायला. तसा त्यांनी स्वतःचा प्रवेश दूरध्वनी वरून तिथे निश्चित केला होताच. आपण तिथे साधारण किती दिवस किंवा किती महिने राहणार आहोत, हे सुद्धा त्यांना स्वतःला ठाऊक नव्हते.
त्यांना सृष्टीतील सौंदर्य न्याहळण्या ची आधीपासूनच सवय होती. बारीक सारीक गोष्टीत त्यांना सौंदर्य दिसायचे. त्यामुळेच त्यांनी या ठिकाणाची निवड केलेली होती.

रेल्वेने ते प्रथम जिल्ह्याच्या ठिकाणी आले. व नंतर भाड्याने गाडी करून थेट मेळघाटात रवाना झाले. वर्षा ऋतु असल्यामुळे मेळघाट पूर्ण दाही दिशांनी नटलेला असतो. जिकडे पहावे तिकडे सृष्टीने भरभरून ओंजळीत टाकलेलं सौंदर्य! गाडीतून प्रवास करताना वळण वळणावर चा रस्ता... घाट वळणावरून जाणारी वाहने, ढगांना थेट स्पर्श करावा की काय, असं सहज दिसणारं नयनरम्य आल्हाददायक वातावरण!

अविनाश कुमार तर या वातावरणाच्या अगदी प्रेमात पडले. त्यांना मनोमन वाटले, की बरेच झाले आपण या ठिकाणाची निवड केली.
गाडी विश्राम गृहा जवळ थांबली. तेथील शिपायाला त्यांच्या आगमनाची पूर्व सूचना होतीच. त्याने त्यांच्या सामानाची बॅग गाडीतून बाहेर काढली. व आत त्यांच्या खोलीत नेऊन ठेवली. त्यांनी गाडीतून उतरल्यावर तेथील व्यवस्थापकाशी हस्तांदोलन केले, परिचय दिला.
लष्करातील साहेब म्हटल्यावर शिपायाने त्यांना सॅल्यूट केला. आदराने खोलीत नेले. त्यांच्या राहण्याची, तिथे असलेली उत्तम व्यवस्था पाहून ते खूप खुश झाले. चला, आता निवांत येथे राहायला मिळणार, म्हणून त्यांनी कपडे बदलून स्वतःला पलंगावर झोकून दिले.

रात्र झाली... तसे ते उठले. बाहेर अंगणात येऊन पाहतात, तर काय! काजव्या नी तेथील वृक्ष पूर्णतः प्रकाशित झालेले! ते तर हे दृश्य प्रथमच पाहत होते. काजव्यांचा चमचम करणारा लक्ख पांढरा प्रकाश ते पाहतच राहिले. संपूर्ण झाडांवर रात किड्या चा किर्र असा आवाज... काजव्या नी संपूर्ण परिसर प्रकाशमान केलेला होता.
वर्षा ऋतु मधील हे वातावरण बघायला, अनेक पर्यटक गर्दी करीत असतात. त्यामुळे तेथे आलेल्या पर्यटकांनी सुद्धा याचा आनंद घेतला. व काही तासांनी ते तेथून निघून गेले.

सकाळी शिपायाने कॉफीची व्यवस्था केलेली होतीच. त्यांची आवडती कॉफी मोठ्या काचेच्या ग्लास मध्ये घेऊन ते विश्राम गृहा च्या अंगणात निवांत बसले.
तेथून ये जा करणारे आदिवासी बांधव त्यांच्या दृष्टीस पडले. स्वतःची आवरा आवर करून ते बाहेर फेरफटका मारायला निघाले.हे आदिवासी बांधव कसे राहतात, त्यांची घरे, त्यांचा व्यवसाय, इत्यादी ची माहिती घेणे व सृष्टी सौंदर्य न्याहाळणे हा त्यांचा हेतू....


पुढे अविनाश कुमारच्या आयुष्याला कोणते वळण मिळते पाहूया पुढील भागात