रात्र झाली होती. रंगो त्रिमल एका झोपडीत आला. तिथे राहत असलेली एक वेश्या त्याची वाटच बघत होती. दोघांनी दारूचे सेवन केले आणि प्रणयक्रियेत मग्न झाले.
" काय हो ? मी असताना विधवेवर नजर का पडली ?" त्या वेश्येने विचारले.
" सुंदर होती. तिच्या पतीला तिच्या सौदर्याची कदर नाही. तो गेला वरती. म्हणून मी कार्यभाग साध्य केला. " रंगो हसला.
" ती गेलीय शिवाजीराजेंकडे. स्वराज्यात बलात्कारीला एकच शिक्षा. " वेश्या म्हणाली.
रंगोला हे ऐकताच घाम फुटला.
" चौरंगा. " रंगो रडत म्हणाला आणि त्याची धोतर ओली झाली.
वेश्या खळखळून हसू लागली. रंगो जावळीच्या दिशेने पळून गेला.
◆◆◆
सदरेवर संभाजी कावजी कोंढाळकर , माणकोजी दहातोंडे , नेतोजी असे सरदार जमले होते. महाराज नविन मोहिमेची आखणी करत होते. तेवढ्यात गुलाबी साडी घातलेल्या आऊसाहेब तावातावाने तिथे आल्या. सोबत एक विधवा स्त्री होती. आऊसाहेबांच्या डोळ्यात क्रोधाग्नि भडकत होता.
" पुरे झाल्या मोहिमा. जर स्वराज्यातही स्त्रियांची विटंबना होत असेल तर मोगलाई काय वाईट ? लक्षात ठेवा , दरबारात द्रौपदीची आसवे गळाली की कुरुक्षेत्रात कुरुवंशाच्या रक्ताचे पाट वाहतात. ही मुसाखोऱ्याची स्त्री , त्या राक्षसाने काय अवस्था केली पहा. " आऊसाहेब म्हणाल्या.
महाराजांनी त्या स्त्रीकडे नजर फिरवली. कुस्करलेले फुल कुणीतरी जमिनीवर फेकून द्यावे तशी अवस्था झाली होती.
" माऊली , जोपर्यंत तुमच्या अपराध्याला शिक्षा होणार नाही तोपर्यंत हा शिवाजी स्वस्थ बसणार नाही. तुम्ही फक्त नाव सांगा. " महाराज हात जोडून म्हणाले.
" महाराज , रंगो त्रिमल. पण तो जावळीकडे पळाला असे ऐकले. " ती विधवा रडत म्हणाली.
" बहिर्जीना सांगावा धाडा. माहिती काढा. मोऱ्यांनी दिला तर ठीक नाहीतर जावळीत घुसून ठार करू. " महाराज म्हणाले.
आऊसाहेबांना संतोष झाला.
◆◆◆
थोड्यावेळाने महाराज आऊसाहेबांना भेटायला आले. जमिनीवर गुडघे टेकवून आऊसाहेबांच्या मांडीवर डोके टेकवले.
" आम्हाला स्वराज्यातील स्त्रियांच्या अब्रूची फिकीर नाही ऐसे का वाटते आपणास ?" महाराजांनी विचारले.
" तैसे न समजणे. आम्हाला तुमच्यावर अविश्वास नाही. रांझ्याच्या पाटलास जेव्हा न्याय केला तेव्हाच तुम्ही न्यायप्रिय असल्याची खात्री पटली होती. पण जेव्हाही स्त्रियांवर अत्याचार होतो तेव्हा आमच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तुमच्या काकी गोदावरीबाई यांनाही असेच उचलले गेले होते. वर त्या दुष्ट महाबतखानाने पत्र लिहिले , " हाती रुमाल बांधून मुघलांना शरण या नाहीतर या बाईला पुण्याच्या बाजारात विकू. " आम्ही विचार केला जर भोसल्यांच्या सुनेची ही अवस्था तर सामान्य रयतेची काय असेल? कधी कधी वाटते आमच्यात महिषासुरवर्धिनी शिरावी आणि सर्व बलात्कारी पुरुषांना यमसदनी धाडावे. रंगोला जिवंत राहू न देणे. नाहीतर उद्या सर्वजण बलात्कार करून जावळीला पळतील. " आऊसाहेब म्हणाल्या.
" तैसेच होईल. स्वराज्यातील स्त्रियांच्या नेत्रात भय नसेल. त्या रात्रीअपरात्रीही एकट्या न घाबरता फिरु शकतील आणि खळखळून हसतील ऐसेच राज्य उभारू. " महाराज म्हणाले.
◆◆◆
तिकडे जावळीत चंद्रराव मोरे दरबारात आसनावर बसले होते. समोर मुरारबाजी होते. मुरारबाजी यांच्या तलवारीप्रमाणेच त्यांच्या लेखणीतही धार होती. त्यांचा सर्वच कारभार चोख आणि पारदर्शी असत.
" मुरारबाजी , तुमचा कारभार आम्हाला बेहद्द पसंत आहे. तुमच्यासारखे कारभारी असल्यावर राज्यात सुखसमृद्धी वाहणार यात शंका नाही. " चंद्रराव मिशी पिळत म्हणाले.
" आपली कृपा महाराज. " मुरारबाजी म्हणाले.
तेवढ्यात दरबारात रंगो गोंधळ घालत आला.
" महाराज , शरण द्या. शरण द्या. " तो पाय पकडू लागला.
" काय झाले ?" चंद्ररावांनी विचारले.
" महाराज , इतकंच समजा की मधमाश्याला फुलाचा मोह झाला. " रंगो म्हणाला.
चंद्रराव हसले.
" स्त्रियांचे शौकीन तर आम्हीपण आहोत. " चंद्रराव म्हणाले.
" अभय द्या महाराज. नाहीतर शिवाजी महाराज चौरंगा करतील. " रंगो गयावया करू लागला.
" घाबरू नका. आम्ही अभय देतो. शिवाजी जावळीत नाही येणार. " चंद्रराव म्हणाले.
◆◆◆
मुरारबाजी यांची पत्नी येसू त्यांना जेवायला वाढत होती.
" भात द्या. " मुरारबाजी म्हणाले.
येसूने वरण वाढले.
" अहो सूनबाई , लक्ष कुठे आहे ? माहेराची आठवण येत आहे का ?" गौतमीबाई म्हणजेच मुरारबाजी यांच्या आई म्हणाल्या.
" नाही सासूबाई. आज ऐकले की रंगोला चंद्ररावांनी आश्रय दिला. म्हणून जरा विचारात होते. बलात्काऱ्यास आश्रय का द्यावा ? पर्वा दरबारात एका पाटलाचा गळा दाबून खून झाला म्हणे. " येसू म्हणाली.
" चंद्रराव महाराज आपले खाविंद आणि आपण त्यांचे चाकर. मालक कधीच चूका करत नाहीत. चंद्रराव महाराज आम्हास रघुनायक आणि आम्ही त्यांचे हनुमंत. उद्या शिवराय आलेच तर शिवरायांचे स्वराज्यही आमच्या शेपटीने जाळून टाकू. " मुरारबाजी म्हणाले.
येसूला पतीचे हे बोलणे आवडले नाही.
◆◆◆◆
महाराजांना स्वकीयांचे रक्त सांडायची काडीमात्र इच्छा नव्हती. रघुनाथपंत या वकीलास पाठवून महाराजांनी चंद्ररावास गोडी गुलाबीने समजावून पाहिले. पण फायदा झाला नाही. उलट चंद्रराव स्वराज्यात फूट पाडायचा प्रयत्न करत होता. शेवटी महाराजांनी कडक शब्दात पत्र पाठवले आणि त्यात म्हणले , " हाती पांढरा रुमाल बांधून शरण या. " त्यावर चंद्ररावांनी उद्धटपणे उत्तर दिले.
" तुम्ही काल राजे झालात. तुम्हाला राज्य कोणी दिले? आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा महाबळेश्वर! त्याच्या आणि (विजापूरच्या) बादशहाच्या कृपेने आम्हास सिंहासन मिळाले आहे. जावळीत येणारच तर यावे. दारूगोळा मौजूद आहे. जावळीतून एकही मनुष्य माघारी जाणार नाही. येता जावळी, जाता गोवळी! "
या उत्तराने महाराज संतप्त झाले. त्यांनी सर्व सरदारांना बोलावले.
" लोकांनी आम्हास राजे म्हणावे म्हणून हा स्वराज्याचा घाट आम्ही कधीच घातला नाही. स्वराज्य हे तर श्रींची इच्छा आणि ते केवळ रयतेच्या हितासाठी. याच हिताच्या आड चंद्रराव येत आहे. स्वराज्य आणि रयतेस त्याचा त्रास होतो आहे. जावळीमुळे स्वराज्याची दक्षिण आणि पश्चिम सीमा आटत आहे. सोबत आले तर त्यांच्या सोबत , नाहीतर त्यांच्या शिवाय आणि विरोधात आले तर त्यांच्याशी लढून जावळीवर भगवा फडकलाच पाहिजे. स्वराज्याच्या सीमा समुद्राला भीडल्याच पाहिजे. हर हर. " महाराजांनी तलवार म्यानातून काढली.
" महादेव महादेव. " बाकीचे सरदार गर्जले.
दरबारात हर हर महादेव हा जयघोष झाला.
◆◆◆
रात्री महाराजांनी खास मसलत करण्यासाठी काही सेनानी लोकांना बोलावले. जावळीचा नकाशा समोर होता. एक पेटती मशाल महाराजांच्या हातात होती आणि दुसऱ्या हातात मोठी काठी होती. त्या पेटत्या प्रकाशाच्या लख्ख प्रकाशात जावळीचा नकाशा स्पष्टपणे दिसत होता. महाराज योजना सांगू लागले.
" जेधेंच्या माणसांनी आधीच जांबलीवरून मोऱ्यांना पिटाळून लावले आहे. तिथून विरोध व्हायचा नाही. जोरमध्ये मात्र हणमंतराव मोरे प्रतिकार करतील. जोर रघुनाथपंत तुम्ही पुण्याहून फौज आणून घ्यायची. आम्ही इथून पुरंदरला जाऊ. तिथून दहा हजार फौज घेऊ. त्या फौजेच्या दोन तुकड्या होतील. मोठी तुकडी रडतोंडी घाटामार्गे येईल. छोटी तुकडी आम्ही सोबत घेऊन महाबळेश्वरमार्गे निसणीच्या घाटामार्गे येऊ. संभाजी कावजी तुम्ही आमच्यासोबत असणे. " महाराज म्हणाले.
" जी राजे. " संभाजी कावजी म्हणाले.
" वेळ योग्य आहे. आदिलशाह आजारी मरणासन्न अवस्थेत आणि अफजल कर्नाटकात. " सोनोपंत म्हणाले.
" म्हणूनच जावळी घ्यायची आहे. कुणीच गाफील नसणे. वाघाच्या प्रदेशात जातोय सिंहावानी झुंजा. लोक आपलेच आहेत. शरण आले तर जीवदान द्या. पण मोऱ्यास जिवंत पकडणे. ठार न करणे. " महाराज म्हणाले.
दुसऱ्या दिवशी सकाळी महाराज किल्ल्याच्या प्रवेशद्वारजवळ आले. राजमाता जिजाऊ तिथे हातात आरतीची थाळी घेऊन उभ्या होत्या. त्यांनी महाराजांचे औक्षण केले आणि कपाळावर टिळा लावला. महाराजांनी चरणस्पर्श केले.
" शिवबा , जावळी जिंकून या. पण रंगोला मारू नका. त्या सैतानाचा निवाडा आम्ही करू. " राजमाता जिजाऊ बाणेदारपणे म्हणाला.
" जी आऊसाहेब. " महाराज म्हणाले.
क्रमश.....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा