मिर्झाराजे यांनी कुडतोजीरावांना अभयदान दिले. कुडतोजीराव राजगडावर परतले. सकाळचा प्रहर होता. महाराजांसमोर कुडतोजीराव मान खाली टाकून , दोन्ही हात जोडून एखाद्या अपराध्याप्रमाणे उभे होते. महाराज क्रोधात होते.
" काय गरज होती ऐसे धाडस करण्याची कुडतोजीराव ? नीट नियोजन असल्याखेरीज केलेले धाडस हा एक पराक्रम नसतो तर ती एक मोठी घोडचूक असते. काय विचार केलात आणि ऐसे कृत्य केले ? तुमचे काही बरेवाईट झाले असते तर ?" महाराज म्हणाले.
" महाराज , माझे काही बरेवाईट झाले असते तर तुम्ही आणि आऊसाहेबांनी माझ्या कुटुंबाला सांभाळले असते. पण समजा जर मिर्झा मारला गेला असता तर ? सर्व मुघल फौज उद्याच दिल्लीकडे रवाना झाली असती. माझ्यासारख्या लाखोंनी तुमच्यावर प्राण ओवाळून टाकले तरी चालेल पण हे स्वराज्य टिकायला हवे. तुम्हाला मला जी शिक्षा द्यायची ती द्या फक्त तुमच्यापासून दूर नका करू. " कुडतोजी राव म्हणाले.
महाराजांनी कुडतोजीरावांच्या खांद्यावर हात ठेवला.
" कुडतोजी , तुमच्या धाडसामुळे आणि स्वराज्यनिष्ठेमुळे आम्ही आनंदी झालो आहोत. शत्रूंनी पकडले तरी तुमच्या नजरेत तसूभरही भय नव्हते. तुमच्यासारखी माणसेच आम्हाला लढण्याची प्रेरणा देतात. आम्ही तुम्हाला नवीन नाव , नवीन पदवी देत आहोत. तुमचा प्रताप वाखाणण्याजोगा म्हणून आजपासून तुम्ही " प्रतापराव " म्हणून ओळखले जाल. " महाराज म्हणाले.
कुडतोजीचे डोळे पाणावले आणि त्यांनी महाराजांचे चरणस्पर्श केले. महाराजांनी त्यांना आलींगण दिले. नंतर सोन्याचे कडे , वस्त्रे आणि तलवार देऊन सत्कार केला. थोड्या वेळाने महाराजांनी विचारले ,
" मिर्झा कसा वाटला ?"
" चलाख. धूर्त. वृद्ध झाला आहे पण तरीही तलवार सफाईदारपणे चालवतो. अखंड सावध असतो. आम्हाला अभयदान त्याने मुद्दामहून दिले आहे. म्हणजे लोकांमध्ये मिर्झा किती उदार मनाचा असा संदेश जावा. " कुडतोजी राव म्हणाले.
" शत्रूचे कपट ओळखले. शाब्बास प्रतापराव. " महाराज म्हणाले.
***
रात्रीचा प्रहर होता. आऊसाहेब आणि महाराणी सकवार बाई कोंढाण्यावरील त्यांच्या महालात होत्या. कोंढाणाच्या किल्लेदाराने त्यांना भेटण्याची विनंती केली. आऊसाहेबांनी परवानगी दिली. किल्लेदार आले आणि त्यांनी आदराने मुजरा केला.
" आऊसाहेब , सर्जाखान कोंढण्याला वेढा घालण्याची तयारी करत आहे. " किल्लेदार म्हणाले.
" मग आम्ही चोरवाटेने राजगडाकडे कूच करावे असा सल्ला द्यायला आलात की काय किल्लेदार ?" आऊसाहेब मस्करीच्या सुरात म्हणाल्या.
" नाही नाही. युद्धापुर्वी महाकालीची पूजा केली तर सैनिकांमध्ये रणावेष संचारतो. इथे तर तुमच्या रूपात साक्षात रणचंडीच आमच्या सोबत आहे. बलाढ्य असलेला हा कोंढाणा आता अतिबलाढ्य झाला आहे. " किल्लेदार म्हणाले.
" शाब्बास. मागच्यावेळी जसवंतसिंह जसा पाठ दाखवून पळाला तसाच हा सर्जाही पळेल. " आऊसाहेब म्हणाल्या.
" पळाला नाही तर पळवून लावू. " किल्लेदार म्हणाले.
" मिर्झाराजे आणि दिलेर मुद्दाम कोंढण्याकडे वळले नसावे. जसवंतसिंहप्रमाणे फजिती होईल असे भय छळत असावे. " महाराणी सकवार बाई म्हणाल्या.
" खरंय. पुरंदरलाही वेढा पडला आहे. आई भवानी मुरारबाजीच्या भक्कमपणे पाठिशी उभी राहूदे. " आऊसाहेब म्हणाल्या.
***
मिर्झाराजे आणि दिलेरखान खास मसलत करण्यासाठी एकत्र बसले होते. सोबत किरतसिंगही होते.
" दिलेरखान , वेढा कसा चालू आहे ?" मिर्झाराजेंनी विचारले.
" मिर्झाराजे , आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय. पण एक गोष्ट आम्हाला समजली नाही. " दिलेरखान म्हणाला.
" कोणती गोष्ट ?" मिर्झाराजेंनी विचारले.
" तुम्ही त्या कुडतोजीला अभयदान दिले. शत्रूला सोडले ? तुम्हाला शिक्षा देणे जड जात होती तर आम्हाला सांगायचे होते. आम्ही त्या कुडतोजीचे सर तन से जुदा केले असते. " दिलेरखान म्हणाला.
" दिलेर , त्या मागे आमची एक चाल होती. कुडतोजी परत जातील आणि मिर्झाराजे किती उदार मनाचे आहेत हा संदेश महाराष्ट्रात पसरेल. उद्या शिवाजीराजेचे काही सरदार आपल्याला येऊन मिळतील. आलमगीरचे पिता बादशहा शाहजहान यांनीही असेच शहाजीराजेंचे प्राण वाचवून मराठ्यांची मने जिंकली होती. तेव्हा आदिलशाहने जर शहाजीराजेंना सजा ए मौत दिली असती तर महाराष्ट्रात मराठ्यांनी बंड केले असते. आम्हीही तोच डाव खेळत आहोत. " मिर्झाराजे म्हणाले.
" बहुत खूब. बुद्धिबळ खेळून खेळून दिमाग तेज झाले आहे आपले. " दिलेरखान म्हणाला.
" पुरंदर काय म्हणतोय ?" मिर्झाराजे म्हणाले.
" अहोरात्र तोफांचा मारा चालू ठेवला आहे. पण.." दिलेरखान थांबला.
" पण पुरंदर दाद देत नाही. हेच ना ? हा किल्ला आहेच बेलाग , विशाल जणू घटोत्कच स्वतः पाषाणरूपात अवतरला आहे. सहजासहजी हाती लागणार नाही. " मिर्झाराजे म्हणाले.
क्रमश...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा