Login

रणफंदीची जात आमुची ! पार्ट 13

.
सकाळपासून दख्खन दरवाज्यावर तोफांचा मारा सुरू झाला. पण तो दरवाजा मजबूत होता. सर्वकाही सहन करत होता. मुरारबाजी मात्र अस्वस्थ झाले होते. रात्री ते आपल्या कक्षातील खिडकीजवळ आले. अजूनही मारा सुरूच होता. सह्याद्रीचा गार वारा मुरारबाजींच्या देहाला स्पर्शून गेला. त्याने जणू त्यांच्या देहात नवचैतन्य आले.

" अरे पुरंदरा , तू निर्जीव आहेस असे कसे मान्य करू ? बघ हा तोफांचा मारा. आगीत होरपळून निघत आहेस. तरीही तू वाकत नाहीस. झुकत नाहीस. मुकाटपणे सर्व सहन करत आहेस. आईच्या कुशीत लेकरांना जशी ऊब मिळते तसे आम्हा सर्वांना तुझ्या आश्रयात सुरक्षित वाटत आहे. अरे माझ्या पुरंदरा , हा मुरारबाजी तुझ्यावर झालेल्या प्रत्येक घावाचा हिशोब ठेवत आहे. योग्य वेळ येताच तुझ्यासाठी प्राणही वेचेल. पण तुला यवनांच्या हाती लागू देणार नाही. " मुरारबाजी गर्जले.

***

दुसऱ्या दिवशी रात्री उंदराप्रमाणे काही बाहेरची माणसे दख्खन दरवाजावर चढत होती. मोगलांच्या नजरेस पडली नाहीत. ते मोगल गाफील होते. दिंडी दरवाजा उघडला गेला. गडावर पुन्हा नवचैतन्य पसरले. महाराजांनी गडावर दोनशे पोती पाठवली होती. आपली माणसे उपाशी मरू नये या तळमळीपायी महाराजांनी " नृप " म्हणून असलेले त्यांचे कर्तव्य निभावले. परंतु इथे विशेष कौतुक ती रसद पोहचवणाऱ्या त्या मावळ्यांचे वाटते. किती निष्ठा भरली असेल त्यांच्यात. शत्रूंना चकवून त्यांनी इतक्या धाडसाचे काम रातोरात पूर्ण केले. रसद मिळाल्यावर जणू मुरारबाजींच्या देहात शंभर हत्तीचे बळ संचारले. ईश्वराचा प्रसाद आला आहे असेच सर्वाना वाटले.

दुसऱ्या रात्री मुरारबाजींनी अजून एक धाडसी योजना आखली. चाळीस मावळे आपल्या सोबत घेतले. पुन्हा वेषांतर केले. रात्री शत्रूंच्या छावणीत प्रवेश करून अचानक हल्ला केला. सोबत खिळे वगैरे आणले होते. तोफा निकामी केल्या. रातोरात सर्व तोफखाना निकामी झाल्या.

सकाळी ही खबर दिलेरखानाला समजली. रसद पोहचणे , तोफखाना निकामी होणे या गोष्टी त्याला सहन झाल्या नाहीत. सर्व सरदार मान खाली घालून उभे होते. दिलेरच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. त्याचे डोळे लालबुंद झाले होते. मनसोक्तपणे त्याने सर्वाना शिव्या घातल्या. प्रचंड रागावले. इतके की छावणीबाहेरचे सैनिकही थरथर कापू लागले. रसूल बेगला राहवले नाही.

" तुमच्या दारूगोळ्याचाही स्फोट झाला होताच ना ?"
रसूल म्हणाला.

दिलेर स्तब्ध झाला. रसुलची रवानगी परांड्याला करण्यात आली.

क्रमश...

🎭 Series Post

View all