Login

रणफंदीची जात आमुची ! पार्ट 14

.
उग्रसेन यांनी सकाळीच मिर्झाराजेंच्या छावणीत प्रवेश केला.

" हुकूम , आलमगीर जहाजे आणि अतिरिक्त फौजा पाठवायला टाळाटाळ करत आहेत. " उग्रसेन म्हणाले.

" आम्हाला वाटलेच होते. मागच्या वेळी कारतरबखानाचा कोकणात मोठा पराभव झाला होता. म्हणून बादशहाला कोकण मोहिम नको असेल. " मिर्झाराजे म्हणाले.

" हुकूम , शिवाजीराजेंचा वकील म्हणतोय तस आपण एक होऊन जर आदिलशाही संपवली तर ? दस्तुरखुद्द बादशहा शाहजहान यांनीही आदिलशाहशी हातमिळवणी करून निजामशाही घश्यात टाकली होती. आपण तोच इतिहास पुन्हा घडवून आणू शकतो. " उग्रसेन म्हणाले.

" उग्रसेन , आम्हाला आदिलशाहीचा धोका वाटत नाही. परंतु हे शिवाजीराजे विलक्षण चलाख आहेत. आम्ही आहोत तोपर्यंत आदिलशाही नेस्तनाबूत करतील पण आम्ही जाताच पुन्हा मोगली प्रदेशही बळकावू पाहतील. " मिर्झाराजे म्हणाले.

" इथे वेढा घालूनही काही पदरात पडत नाहीये. पुरंदर दाद देत नाहीये. " उग्रसेन म्हणाले.

" खर आहे तुमचे उग्रसेन. गुप्तहेरांनी खबऱ्या आणल्या आहेत की आदिलशाह आणि शिवाजीराजे एक होऊ शकतात. तसे झाले तर राजकारण विस्कटेल. पण आम्ही शिवाजीराजेंसोबत चर्चा केली तर दिलेरला ते आवडणार नाही. तो हट्टाला पेटलाय. काय करावे समजत नाही. " मिर्झाराजे म्हणाले.

***

रसद पोहचवणाऱ्या एका मावळ्याशी मुरारबाजी खास मसलत करत होते.

" या रसदीमुळे फार मदत झाली. महाराजांचे आभार कसे मानू समजत नाही. " मुरारबाजी म्हणाले.

" आभार कसले ? उलट तुम्ही ज्या पद्धतीने किल्ला लढवताय त्यामुळे महाराज आनंदी आहेत. "

" महाराजांनी काही खास निरोप दिलाय का ?" मुरारबाजी म्हणाले.

" महाराज म्हणाले , पुरंदर हे इंद्राचे नाव आहे. इंद्राची ताकद वज्रात. त्यामुळे वज्रगडाकडेही लक्ष असू द्या. गाफील राहू नका. शत्रूला कमी लेखू नका. गड झुंजता ठेवा. अखंड सावध असणे. "