Login

रणफंदीची जात आमुची ! पार्ट 15 ( अंतिम भाग )

.
दिलेर हट्टाला पेटला होता. दिवसेंदिवस तोफांचा मारा वाढत चालला होता. पुरंदर होरपळून निघत होता. वज्रगडावरही घाव बसत होते. माणसे मरत होती. अखेरीस मुरारबाजींनी एक धाडसी योजना आखली. सहाशे मावळे घेऊन अचानकपणे आक्रमण करायचे. भयंकर धाडस होते. सिंहगडाच्या किल्लेदाराने असाच अकस्मात हल्ला जसवंतसिंहावर केला होता. तेव्हा सर्व फौज पाठ दाखवून पळाली होती. मुरारबाजींनाही आता हा वेढा कायमचा उधळून लावायचा होता. योजना ठरली. रात्री मुरारबाजींनी येसूची भेट घेतली.

" येसू , उद्या काही बरेवाईट झाले तर लेकरांकडे आणि आईची काळजी घे. मातृभूमीसाठी लढताना जन्मदात्या मातेकडे दुर्लक्ष झाले. पण तू काळजी घे तिची. लेकरांना मोठे कर. सेनेत भरती कर. आपण रक्त गाळणार मगच भविष्यात आपल्या लेकरांना स्वातंत्र्याची गोमटी फळे खायला मिळणार. तू खचून जाऊ नकोस. खंबीर रहा. " मुरारबाजी म्हणाले.

येसूने हुंदका दिला. मुरारबाजींचेही नेत्रे पाणावली.

***

दुसऱ्या दिवशी सकाळी येसूने मुरारबाजींचे औक्षण केले. समोर मावळे उभे होते.

" गड्यांनो , कितीतरी वर्षे आपण यवनांचे अत्याचार सोसले. त्यांनी आपले शेत जाळले. आपले लोक बाटवले. मंदिरे फोडली. स्त्रिया उचलल्या. त्यांच्या पापाचा अंत करून या भूमीत रयतेचे हित जपणारे राज्य निर्माण व्हावे म्हणून महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्याचा घाट घातला. हे स्वराज्य मजबूत झाले तर या पुरंदरामुळे. जेव्हा स्वराज्यावर पहिले आक्रमण झाले तेव्हा इथेच पुरंदराजवळ महाराजांनी आदिलशाही फौजांना नेस्तनाबूत केले. स्वराज्य राखले ते पुरंदराने. आपल्या युवराजाचा , आपल्या शंभुराजेंचे जन्मस्थान आहे हे पुरंदर. म्हणजे आपल्यासाठी तीर्थक्षेत्रच. मग असा हा पुरंदर तुम्ही मोगलांच्या हाती जाऊ देणार का ? आज इतक्या रणावेषात लढा की त्या मुघलांनी दिल्लीची वाट धरली पाहिजे. जेजुरीचा खंडेराया आपल्या पाठीशी आहे. हर हर महादेव. हर हर महादेव. " मुरारबाजी म्हणाले.

गडावरून मावळ्यांची फौज निघाली. खाली येऊन मुघल फौजांना भिडली. त्वेषाने लढू लागली. " हर हर महादेव " हा जयघोष सर्वत्र घुमू लागला. सर्वात मध्यभागी मुरारबाजी स्वतः उभे होते. त्यांच्या हातात दोन तलवारी होत्या. जणू त्यांच्या देहात साक्षात कालभैरव संचारला होता. विजेप्रमाणे त्यांची तलवार चहुबाजूंनी तळपत होती. मिर्झाराजे दुर्बिणीतून निरीक्षण करत होते. त्यांना मुरारबाजी लढताना दिसले.

" कोण आहे हा लढवय्या ? किती बेभान होऊन लढत आहे. असे वाटत आहे याच्या अंगात कालभैरव संचारला आहे आणि तो कालभैरव रौद्रतांडव करत आहे. धन्य आहे ही सह्याद्रीची माती ज्यांनी इतकी वीर नररत्ने जन्माला घातली. " मिर्झाराजे म्हणाले.

***

दिलेरखान युध्दस्थळी आला. त्याने मुरारबाजीला लढताना पाहिले. त्याच्याजवळच्या सरदाराने तो मुरारबाजी म्हणजेच पुरंदरचा किल्लेदार असल्याची खात्री करून दिली. दिलेरखान मुरारबाजींच्या शौर्यावर मोहित झाला.

" थांबा. " दिलेरखान ओरडला.

युद्ध थांबले.

" अरे रणमर्दा , कोण आहेस तू ?"

" मी मावळा आहे महाराजांचा. मुरारबाजी. "

" मुरारबाजी , तुझा पराक्रम पाहून आम्ही बेहद खुश झालो आहोत. कौल घे. आमच्या फौजेत सामील हो. बादशहा तुला इनाम देतील. जहागिर देतील. "

" तुझ्या बादशहाची जहागिर हवीय तर कुणाला ? आमच्या महाराजांची शाबासकी हीच आमची जहागीर असते. प्राण प्रिय असतील तर निघून जा आमच्या मुलखातून. कौल घ्यायला सांगतो काय. अरे मी धिक्कार करतो. आम्हाला आमचे स्वातंत्र्य , आमचा स्वाभिमान हाच प्राणांहून प्रिय आहे. "

" सोच लो. "

" दिलेर , पुरंदर जिंकेपर्यंत पगडी घालणार नाहीस अशी प्रतिज्ञा केलीस ना तू. आता मी तुझे मस्तक धडावेगळे करतो बघ. "

मुरारबाजी दिलेरकडे वळले. दिलेरकडे सैनिकांना नजरेनेच इशारा दिला. मुरारबाजींना मुघल सैनिकांनी वेढले. दिलेरखानने धनुष्यबाण हाती घेतले. तो नेम धरू लागला. त्याने मारलेला एक बाण सरळ मुरारबाजींच्या कंठाशी लागला. मुरारबाजी रक्तबंबाळ झाले. बाकी मावळ्यांनी त्यांना सुरक्षितपणे गडावर नेले. जखमी झालेल्या मुरारबाजींभोवती ब्राह्मण , मराठा , रामोशी , धनगर , प्रभू अश्या सर्व अठरापगड जातींची मंडळी जमली. येसू रडत होती.

" गड्यांनो , मी मेलो तरी गड झुंजवा. त्या दिलेरची शपथ पूर्ण होऊ देऊ नका. महाराजांना माझा शेवटचा मुजरा. " मुरारबाजींनी इतके बोलून प्राण सोडले.

सर्वांची नेत्रे पाणावली. मुरारबाजींच्या देहाला अग्नी देण्यात आला. हे खबर महाराजांपर्यंत पोहोचली. महाराजांना फार वाईट वाटले. दुसऱ्या दिवशी येसू दरबारात आली. सर्वजण शोकाकुल अवस्थेत होते. कमरेवर तलवार बांधलेल्या येसूला पाहून सर्वाना आश्चर्य वाटले.

" माझा कुंकू स्वराज्यासाठी लढता लढता मरण पावलं. पण आपण जिवंत आहोत. किल्लेदार मरण पावलाय म्हणून आपले मनोधैर्य खचले असे त्या मोगलांना किंचितही वाटू देऊ नका. गडावरचा प्रतिकार पुन्हा सुरू करा. कळू द्या त्या मिर्झा आणि दिलेरला की नेता नसूनही हा पुरंदर झुंजत राहू शकतो. हर हर.."

" महादेव.." सर्वजण गर्जले.

मुरारबाजींच्या मृत्यूनंतरही पुरंदर झुंजत राहिला. परंतु , शिवाजी महाराजांनी वाटाघाटीसाठी मिर्झाराजे यांना पत्र पाठवले. मिर्झाराजे हेसुद्धा पुरंदरचा तिखट प्रतिकार पाहून स्तब्ध झाले होते. शिवाय महाराजांच्या हेरांनी आदिलशाह आणि मराठे एक होतील ही अफवा पसरवली होती. शेवटी , मिर्झाराजे आणि महाराजांमध्ये भेट होऊन पुरंदरचा तह झाला. यात महाराजांनी तेवीस किल्ले मुघलांना दिले. पुरंदर शेवटपर्यंत दिलेरला जिंकता आला नाही.
पुढे महाराज औरंगजेबला भेटायला गेले. तिथे औरंगजेबाने महाराजांना नजरकैदेत ठेवले. परंतु महाराज सुखरूपने सुटून महाराष्ट्रात परतले. चिडून औरंजेबाने सर्व राग मिर्झाराजे आणि त्याच्या मुलावर म्हणजे रामसिंगवर काढला. आदिलशाही प्रांतही जिंकता आले नव्हते. किरतसिंग आणि महाराजांच्या मुलीचा विवाह लावण्याचे ढोंग करून महाराजांना ठार करावे अशीही योजना मिर्झाराजे एका पत्रात बोलून दाखवतात. असे काही घडण्यापूर्वीच उदयराज मुन्शी यांनी विष देऊन मिर्झाराजेला ठार केले. नंतर त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला. यात औरंजेबाचा हात असेल अशी शक्यता वाटते. पुढे , दिलेरखान अनेक वर्षे दक्षिणेत राहिला. युवराज शंभुराजे जेव्हा सुटून स्वराज्यात परतले तेव्हा औरंगजेबाने दिलेरखानाला खूप सुनावले. मुघल सल्तनीची निष्ठेने सेवा केलेल्या दिलेरला ही गोष्ट सहन झाली नाही आणि त्याने विष पिऊन आत्महत्या केली.

***

छत्रपती शिवाजी महाराजांचे एकनिष्ठ नरवीर मुरारबाजींच्या पावन चरणी कथा समर्पित..