" कोण आहे हा ?" महाराजांनी विचारले.
" मुरारबाजी देशपांडे. " रघुनाथपंत म्हणाले.
मग संभाजी कावजी यांनी धनुष्य हातात घेऊन त्यात बाण लावून प्रत्यंचा ओढली. पण महाराजांनी नकारार्थी इशारा करताच ते थांबले.
" थांबावे मुरारबाजी. " महाराज म्हणाले.
सर्व मावळे लढायचे थांबले. जखमी आणि घामाघूम मुरारबाजी मोठमोठे श्वास घेऊ लागला. महाराज त्याच्या जवळ गेले आणि खांद्यावर हात ठेवला.
" मुरारबाजी , ही तलवार स्वराज्यासाठी चालवावी. " महाराज म्हणाले.
" कदापि शक्य नाही. आमचे इमान फक्त चंद्रराव महाराज यांच्याच पायी. " मुरारबाजी गर्जले.
" तुमचे चंद्रराव पळाले. मोऱ्यांची राजवट संपली. आम्हाला जावळीचा कधीच हव्यास नव्हता. नाहीतर आम्ही चंद्ररावांना कधी गादीवर बसवलेच नसते. पण मोरे एहसानफरामोश. उदरातील व्याधी बनले म्हणून संपवले. तुम्हाला आम्ही धर्मवाट देतो. कुणीच तुम्हाला काही करणार नाही. पण लक्षात ठेवा स्वराज्यात परस्त्रीत माता शोधली जाते आणि मोऱ्यांकडे बलात्कारीला आश्रय दिला जातो. मायभूमीला यवनांच्या जाचातून मुक्त करण्यासाठीच हा स्वराज्याचा अट्टहास. हनुमंत बनावे. पण समोर राम आहे की रावण हे एकदा पडताळून पाहावे. " महाराजांच्या तेजस्वी वाणीतून शब्द बाहेर पडले.
मुरारबाजी तिथून निघाले. महाराजांनी रायरीला वेढा घातला. मोऱ्यांना समजवण्यासाठी प्रयत्न केले. शेवटी चंद्रराव मोरे शरण आले. महाराजांनी त्याला आदराची वागणूक दिली. पण वतन देण्यासाठी नाकारले. त्याला कळून चुकले की आता वतन परत भेटणार नाही. म्हणून तो तिथून निसटला आणि आदिलशाहला शरण गेला. असो. महाराजांनी रायरी जिंकली. महाराज रायरीची टेहाळणी करत होते.
" पंत , हा किल्ला आम्हाला खूप आवडला. याचे नाव बदलून " रायगड " करणे. यावर तटाबुरुजांचे पागोटे चढवा. गड मजबूत करा. इथे राजलक्ष्मीची पाऊले उमटतील. " महाराज म्हणाले.
" जी महाराज. आजच गडाच्या बेबूदीकरणाचे काम सुरू करतो. " रघुनाथपंत म्हणाले.
महाराज संभाजी कावजी आणि मोरोपंतसोबत रपेटीवर गेले. एकेठिकाणी थांबून दुर्बिणीतून ते निरीक्षण करू लागले.
" हे बघा मोरोपंत. काय दिसते ?" महाराज दुर्बीण देत म्हणाले.
मोरोपंतांनी दुर्बिण घेतला आणि त्यांनी बघितले.
" किर्रर्र रान आहे महाराज. हिरवेगार. एकवेळ हिडिंबेच्या केसातील ऊ सापडेल पण जावळीच्या रानातला हत्ती सापडणार नाही. " मोरोपंत म्हणाले.
" अजून ?" महाराज म्हणाले.
" महाराज , ओंजळीत दिवा धरावा तसा या हिरव्या रानातून एक डोंगर वर आलाय. " मोरोपंत म्हणाले.
मग महाराजांनी दुर्बीण संभाजी कावजी यांना दिला.
" पार घाटाच्या तोंडावर आणि रडतोंडी घाटाच्या नाकावर रखवालदार म्हणून हा डोंगर शोभतोय. " संभाजी कावजी म्हणाले.
" या भोरप्या डोंगराचे तासलेले कडे पहा. मोरोपंत इथे किल्ला बांधा. प्रतापगड नाव द्या. " महाराज म्हणाले.
" जी महाराज. काम हाती घेतो. " मोरोपंत म्हणाले.
महाराजांनी जावळीतील सर्व किल्ले जिंकले. जावळीची अफाट धनलक्ष्मी स्वराज्यात आली. स्वराज्य मजबूत झाले.
अस्वस्थ मुरारबाजी देवळात महादेवाच्या पिंडीसमोर बसला होता.
" सांग महादेवा , काय करू ? मोरे की शिवाजीराजे ? मार्ग दाखव. निष्ठा बदलली म्हणून पाप तर चढणार नाही ना ? आयुष्यरुपी हे फुल सुगंधी होऊन तुला अर्पण झाले पाहिजे. " मुरारबाजी म्हणाले.
" तुम्ही स्वराज्यात जा. मायभूमीला स्वातंत्र्य मिळवून द्या. शिवाजी महाराज युगपुरुष. तेच या हनुमंताचे खरे रघुनायक. " मागे उभी असलेली येसू म्हणाली.
" होय. शिवाजीराजे मातीसाठी लढताय. तू मावळा बनलास तर मला खूप अभिमान वाटेल. " मुरारबाजीची आई म्हणाली.
तेवढ्यात बेलपत्र खाली पडले. मुरारबाजी लगेच घोड्यावर बसून महाराजांना भेटले.
" रुद्राने कौल दिला. आजपासून तुम्हीच मुरारबाजीचे रघुनायक. " मुरारबाजी म्हणाले.
" मुरारबाजी , काही दिवस जावळीत रहा. आमच्या कारभाऱ्यांना सर्व माहिती पुरवा. व्यवस्था लावा. मग जावळीचा हा वाघ आम्हाला स्वराज्याच्या सरहद्दीवर अजिंक्य बुरुजाप्रमाणे हवा. पुरंदराची किल्लेदारी येत्या पौर्णिमेपासून आम्ही तुम्हाला सुपूर्द करतोय. " महाराज म्हणाले.
मुरारबाजी याने महाराजांना मुजरा केला.
रंगो त्रिमल जीवंत सापडला गेला. महाराजांना त्याचे मुंडके उडवावे वाटले. पण आऊसाहेब यांना शब्द दिला होता. रंगोला राजगडावर पाठवण्यात आले.
राजमाता जिजाबाईंसमोर रंगोला उभे करताच तो गयावया करू लागला. आऊसाहेबांनी रागाचा एक कटाक्ष टाकला.
" बाईंस बोलवा. " आऊसाहेब म्हणाल्या.
मग ज्या स्त्रीवर बलात्कार झाला ती हातात चाबूक घेऊन आली. तिने रंगोला चाबकाचे फटके मारले.
" या नराधमाचा चौरंगा करा आणि गळफास द्या. अश्या माणसाला जिवंत राहायचा काही अधिकार नाही. " आऊसाहेब गर्जल्या.
रंगोचा अंत झाला. ती स्त्री आऊसाहेबांच्या उराशी कवटाळून रडू लागली.
" आता रडायचे नाही तर महिषासुरवर्धिनी बनून झुंजायचे. " आऊसाहेब त्या स्त्रीस एक तलवार देत म्हणाल्या.
◆◆◆
प्रतिपदेच्या चंद्रकोराप्रमाणे महाराजांचे स्वराज्य वाढले. अफजलखान या सैतानाचा महाराजांनी वध केला. सिद्धी जौहरच्या वेढ्यातून ते सुखरूप सुटले. शाहिस्तेखान याची बोटे कापली. मुघलांची नाक असलेली सुरत बदसुरत केली. या सर्व घटनांमुळे दिल्लीचा बादशहा औरंगजेब खवळला.
औरंगजेबची बहीण जहानआरा तावातावाने पाय आपटत औरंगजेबच्या महालात पोहोचली. ती येताच औरंगजेब उठला.
" आलमगीरच्या राज्यात भय उरले नाही का ? प्रत्येकजण बगावत करतोय. सुरत लुटून एका काफराने मक्कामदिनामध्ये असलेली आमची इज्जत धुळीत मिळवावी इतकी कमकुवत झाली आहे का मुघलशाही ?" ती रागाने म्हणाली.
" आपा , शांत व्हा. आम्हीही रोज सिवाला ठार करायचे स्वप्न बघतोय. आम्ही उद्याच दरबार बोलावून नवीन मोहीम उघडणार. " औरंगजेब दाढी कुरवाळत म्हणाला.
" कोण आहे तो सुरमा जो सिवाला हरवेल ?" जहानआराने विचारले.
" आमचे पणजोबा मरहुम सम्राट अकबर यांनी महाराणा प्रताप विरोधात मानसिंहला पाठवले होते. आम्हीही तसेच करणार. काट्याने काटा काढणार. मराठ्यांना ठेचण्यासाठी रजपूत पाठवणार. " औरंगजेब हसला.
क्रमश....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा