राजगडावर लोकांची मोठी रांग लागली होती. मुघलांच्या अत्याचाराने पीडित रयतेने गडावर गर्दी केली होती. स्वराज्यावर इतके मोठे संकट कोसळले होते पण अजूनही रयतेच्या मनात महाराजांविषयी तितकेच प्रेम होते. ते प्रेम , ती निष्ठा तसूभरही कमी झाली नव्हती. संकटकाळातच राष्ट्राच्या चारित्र्याची खरी कसौटी होते. मोरोपंत जातीने सर्वांसाठी अन्नधान्य वाटप करत होते. महाराज तिथे आले आणि त्यांनी स्वतः हे काम हाती घेतले. एक एक करत ते सर्वाना अन्नदान करू लागले. एका वृद्ध जोडप्याची संधी आली. महाराजांना समोर बघताच त्या वृद्ध स्त्रीला रडू कोसळले. तिचा पती तिला सावरत होता.
" सावर स्वतःला. महाराजांसमोर नको. " तो वृद्ध पुरुष म्हणाला.
महाराजांना जे समजायचे ते समजले. त्यांनी त्या वृद्ध स्त्रीचे हात धरले आणि तिच्या नजरेला नजर मिळवली.
" माऊली , मनात जे असेल ते बोलावे. आम्हीही तुला लेकरासमानच आहोत. " महाराज म्हणाले.
" विचारू नका महाराज. त्या राक्षसवृत्तीच्या मुघलांनी आमचे गाव उध्वस्त केले. तरण्याताठ्या मुलाला उभे कापले. सुनेला उचलून नेले. शेत जाळले. " तो वृद्ध व्यक्ती रडत म्हणाला.
हे सर्व ऐकताच त्या वृद्ध स्त्रीच्या नजरेसमोर जणू भूतकाळ परत तरळून गेला. ती पुन्हा आक्रोश करू लागली. महाराजांच्या तेजस्वी पाणीदार नेत्रांमधून अश्रू गळू लागले. सर्व वातावरण सुन्न झाले. पण त्या वृद्ध स्त्रीच्या मनात कोणता विचार विजेसारखा चमकला कुणास ठाऊक पण तिने स्वतःला सावरले.
" महाराज , आमची काळजी नको करूस. माझे दोन नातू अजूनही शाबूत आहेत. मी त्यांना वाढवेल. मोठं करेल. त्यांना मर्द मावळे बनवून फौजेत टाकेल. पण महाराज तुम्ही लढा. असले शंभर मिर्झा आले तरी तुम्ही लढा. आमच्या पिढीचे रक्त सांडले तरी चालेल. किमान आमच्या पुढच्या पिढीला तरी स्वातंत्र्याची गोमटी फळे खायला भेटतील. आम्ही तुमच्या पाठिशी आहोत. " ती वृद्ध स्त्री म्हणाली.
" माऊली , आज तुझ्या रूपात साक्षात आई भवानीच पाठीवरून हात फिरवत आहे ऐसा भास झाला आम्हाला. आता असे हजार मिर्झा आणि दिलेर आले तरी आम्ही मागे हटणार नाही. जोपर्यंत सह्याद्रीच्या कुशीत तुमच्यासारखी कणखर रयत नांदेल तोपर्यंत आपले हे स्वराज्य दस्तुरखुद्द आलमगीरही गिळंकृत करू शकणार नाही. " महाराज उद्गारले.
कुडतोजीराव दुरूनच हे दृश्य पाहत होते. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. त्यांच्या मनात मिर्झाराजे यांच्याबद्दल क्रोध उत्पन्न झाला. रागात त्यांनी मूठ आवळली.
***
रात्रीचा प्रहर होता. सासवडनजीक दिलेरखान आपली छावणी टाकण्याची तयारी करत होता. तेव्हा अचानक कुठून तरी मराठ्यांची फौज आली. एखाद्या हिंस्त्र प्राण्याने आपल्या शिकाऱ्यावर झडप टाकावी तसे मराठ्यांनी त्वेषाने मुघलांवर आक्रमण केले होते. मराठ्यांकडे मुघलांप्रमाणे बलाढ्य तोफा आणि मोठा खजिना नव्हता. होती ती फक्त महाराजांनी उराउरात पेटवलेली स्वातंत्र्याची आग. मुघल गाफील होते. ते सज्ज होईपर्यंत मराठे फरारही झाले. कुठून आले आणि कुठे गेले कुणालाही समजले नाही. आकाशात उडाले की भूमीने गिळले या प्रश्नाने यवन हैराण झाले. पण दिलेरखान शांत बसणाऱ्यापैकी नव्हता. तो चवताळला. हा प्रकार त्याला त्याचा अपमान वाटला. त्याने फौजेला मराठ्यांचा पाठलाग करण्याचा हुकूम सोडला. दिलेरखान पूर्वीच्या सेनापतींप्रमाणे आळशी नव्हता. कामचुकार नव्हता. चिवट , जिद्दी होता. मुघलांनी मराठ्यांच्या पाठलाग केला. मराठ्यांनी पुरंदर किल्ल्यावर शरण घेतली. दिलेरखान याने पुरंदरला वेढा देण्याचा हुकूम सोडला.
***
मराठ्यांनी पुरंदरच्या किल्ल्यावर आश्रय घेतला. मुरारबाजी जातीने सर्वांची विचारपूस करत होते.
" शाब्बास रे माझ्या वाघांनो. मुघलांना चांगलाच हिसका दाखवलात. तुमच्यासारखे धाडसी मावळे असतील तर एकदिवस आपल्या हिंदवी स्वराज्याचा पवित्र भगवा दिल्लीवरही फडकेल. " मुरारबाजी त्या शिपायांना म्हणाले.
" किल्लेदार.. किल्लेदार.. घात झाला. " एक सेवक धावतच आला.
" काय झाले ? सिंह मागे लागल्यासारखा का धावत आला आहेस ?" मुरारबाजी यांनी विचारले.
" सिंह नाही. लांडग्यांनी घेरलंय आपल्या पुरंदराला. " तो सेवक म्हणाला.
मुरारबाजी धीरगंभीर झाले. गडाच्या टोकावर गेले. हातात दुर्बीण घेतला. त्यांना खाली चांदतारा फडकताना दिसला.
मुरारबाजी धीरगंभीर झाले. गडाच्या टोकावर गेले. हातात दुर्बीण घेतला. त्यांना खाली चांदतारा फडकताना दिसला.
***
सकाळचा प्रहर होता. महाराज सदरेवर होते. तेव्हा एक सेवक हातात खलिता घेऊन आला. त्याने महाराजांना मुजरा केला. महाराजांनी इशाऱ्यानेच तो खलिता मोरोपंतांना वाचायला सांगितला. मोरोपंत पंतप्रधान यांनी तो खलिता वाचला.
" महाराज , वाईट खबर आहे. पुरंदरला वेढा पडला. दिलेरखान पुढाकार घेऊन सर्व पाहतोय. मिर्झाराजेंनी नारायणगावाजवळ छावणी उभारली आहे. " मोरोपंत म्हणाले.
" आम्हाला खात्री होतीच. आमचा वाघ मुरारबाजी जेव्हा झुंजेल तेव्हा त्या दिलेरखानाच्या डोक्यावर पगडीही शाबूत राहणार नाही. " महाराज म्हणाले.
क्रमश...