" महाराज , मिर्झाराजे आपल्या सरदारांना आपल्या पक्षात घेण्याचा प्रयत्न करतोय. अफजलखानाचा मुलगा फाजलखान मिर्झाला मिळाला. " मोरोपंत म्हणाले.
" त्यांना जे प्रयत्न करायचे ते करू द्या. आम्हाला आमच्या सरदारांवर विश्वास आहे. ते वतनापायी मिर्झाला जाऊन मिळणार नाहीत. " महाराज म्हणाले.
" खरे आहे महाराज. " मोरोपंत म्हणाले.
" आपला एक वकील मिर्झाराजेकडे पाठवा. आमच्या डोक्यात एक योजना घोळत आहे. बघू. फासे टाकू. आई भवानीची इच्छा असेल तर प्रयत्न यशस्वी होईल. " महाराज म्हणाले.
तेवढ्यात एक सेविका तिथे उपस्थित झाली. तिने महाराजांना आदराने मुजरा केला.
" महाराज , महाराणी पुतळाबाईंना तुम्हाला भेटायचे आहे. " ती सेविका म्हणाली.
" सदरेवरची कामे आटोपली आहेत. आम्ही लगेच त्यांच्या महालात प्रवेश करू. " महाराज म्हणाले.
मुजरा करून ती सेविका निघून गेली. थोड्या वेळाने महाराज महाराणी पुतळाबाईंच्या महालात गेले. तिथे महाराजांसोबत कुडतोजीरावांच्या पत्नीही उपस्थित होत्या.
" वहिनी , तुम्ही इथे ? सारे कुशल ?" महाराजांनी विचारले.
" हे कुठे गेलेत ठाऊक नाही. " कुडतोजीरावांच्या पत्नी म्हणाल्या.
" काय ? कुडतोजीराव यांना आम्ही कोणत्याच मोहिमेवर पाठवले नाही. " महाराज म्हणाले.
" मग कुठे गेले असतील ?" महाराणी पुतळाबाई म्हणाल्या.
" महाराज , आम्हाला एक भय सतावत आहे. " कुडतोजीरावांच्या पत्नी म्हणाल्या.
" कसले भय ?" महाराज म्हणाले.
" ते मिर्झाराजेबद्दल बोलत होते. आम्हाला वाटते की ते मिर्झाराजेला मारायला गेले आहेत. " कुडतोजीरावांच्या पत्नी म्हणाल्या.
" काय ? लाखोंच्या फौजेत शत्रूला मारायला जाण्यासारखे वेडे धाडस ते करतील ?" महाराणी पुतळाबाई म्हणाल्या.
" महाराजांसाठी ते काहीही करू शकतात. मिर्झाराजेमुळे महाराज चिंतेत आहेत ही गोष्ट त्यांना सहन होत नव्हती. महाराजांवर खूप जीव आहे त्यांचा. " कुडतोजीरावांच्या पत्नी म्हणाल्या.
" वहिनी , तुम्ही काळजी करू नका. आम्ही हेरांकडून माहिती काढतो. " महाराज म्हणाले.
महाराज निघून गेले.
***
रात्रीचा प्रहर होता. मिर्झाराजे यांचे जेवण आटोपले होते. ते आपल्या तंबूत होते. सोबत उदयराज मुंशी उपस्थित होते.
" आलमगीर यांना कळवा की आमची फौज पुणे परगण्यात गुंतली आहे. कोकण जिंकण्यासाठी सिंध आणि गुजराततेहून फौज पाठवून द्यावी. लढाऊ जहाजे पाठवता आली तर उत्तम. " मिर्झाराजे बोलत होते आणि उदयराज मुंशी आपल्या लेखणीने पत्रावर मजकूर उमटवत होते.
थोड्या वेळाने रात्र खूप झाली. उदयराज यांना निद्रा छळू लागली. त्यांनी जाण्याची आज्ञा मागितली. मिर्झाराजे यांना नकार देता आला नाही. उदयराज हे मिर्झाराजे यांचे सर्वात विश्वासू सेवक होते. शिवाय मिर्झाराजे नेहमी त्यांचा सल्ला घेत. असो. थोड्या वेळाने मिर्झाराजे यांनाही निद्रा येऊ लागली. रात्र जसजशी तिचे पदर उलगडत होती तसतसे पहारेकरी यांचेही डोळे मिटू लागले. ते गाफील झाले. तेवढ्यात कुणीतरी मिर्झाराजे यांच्या छावणीत घुसले. त्याने देहावर पांढरी शुभ्र वस्त्रे आणि मस्तकावर गुलाबी फेटा घातला होता. त्याच फेट्याने त्या व्यक्तीने आपला चेहराही लपवला होता. कमरेवर तलवार बांधली होती. एका-एका पहारेकऱ्याला त्याने गुप्तपणे यमसदनी धाडले. चलाख आणि विलक्षण सावध असलेल्या मिर्झाराजे जयसिंह याला बाहेर काहीतरी बिनसले आहे याचा संशय आला. अकस्मात त्या व्यक्तीने पडदा फाडून सरळ मिर्झाराजे यांच्यावर हल्ला केला. मिर्झाराजे यांनी तो वार चुकवला. त्यांनी म्यानातून तलवार काढली. मिर्झाराजेंनी त्या व्यक्तीसोबत तलवारबाजी केली. एव्हाना माणसे जमा झाली. तो व्यक्ती पकडला गेला.
" कोण आहेस तू ?" आपली तलवार त्या इसमाच्या दिशेने रोखून धरत मिर्झाराजेंनी विचारले.
" कुडतोजीराव गुजर. " त्या व्यक्तीने तडफदारपणे उत्तर दिले.
" तुला शिवाजीने पाठवले आहे का ?" एका मुघल सरदाराने विचारले.
" शिवाजी महाराज म्हणायचं. " कुडतोजीराव रागात म्हणाले.
त्यांचा आवेश आणि उग्र रूप पाहून काही मुघल सैनिक घाबरले.
" हो हो. शिवाजी महाराजांनी पाठवले आहे का आम्हाला मारण्यासाठी ?" मिर्झाराजे यांनी विचारले.
" नाही. आम्ही स्वतःच्या मर्जीने आलोय इथे. पण आमच्या महाराजांनी हल्ला केला असता तर वाचले नसते तुम्ही. त्यांचा निशाणा चुकत नाही मिर्झाराजे. " कुडतोजीराव उत्तरले.
" पण का केले असे वेडे धाडस ?" मिर्झाराजे म्हणाले.
" स्वराज्यासाठी. मिर्झाराजे , तुम्ही आमचे स्वराज्य गिळायला आले आहात. आमचे महाराज तुमच्यामुळे चिंतेत असतात. म्हणून आम्ही हे धाडस केले. " कुडतोजी राव म्हणाले.
" तुमच्या धाडसाचे आम्हाला विलक्षण कौतुक वाटते. आम्ही तुम्हाला जीवनदान देतो. शिवाय एक तलवार आणि घोडाही तुम्हाला भेट म्हणून देतो. " मिर्झाराजे म्हणाले.
क्रमश..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा