दुपारचा प्रहर होता. राम्या आणि शेवंता शिवाराहून घरी परतत होते.
" शेवंता , आज पिठलं खूप चविष्ट झाले बघ. बोटेच चाटत बसलो मी तर. " राम्या त्याच्या बायकोला म्हणजेच शेवंताला म्हणाला.
" तुमचे एक काहीतरीच. " शेवंता लाजत म्हणाली.
अचानक " काफर काफर काटो.." असा मुघली फौजेच्या गोंधळाचा आवाज दोघांच्या कानावर पडला. दहा-बारा मुघल घोडेस्वार क्षणार्धात दोघांजवळ आले. शेवंताच्या हातातून चारा पडला. ती घाबरली. दोघेही पळणार इतक्यात एकाने शेवंताला उचलले.
" काफर की बिवी..उठा लो. " घोड्यावर स्वार झालेला एक मुघल सैनिक म्हणाला.
" सोडा तिला. सोडा. " राम्या कळवळीने प्रतिकार करत होता.
पण दुसऱ्या क्रूर मुघल सैनिकाने घोड्याच्या टापाखाली राम्याला तुडवले. मग भाल्याने सपासप त्याच्या देहावर प्रहार केला. राम्या मृत्यूमुखी पडला. त्याच्या रक्ताचे शिंतोडे शेवंतावर उडाले.
" धनी.." शेवंता किंचाळली.
मुघलांनी पूर्ण गाव जाळले. बऱ्याच तरुण स्त्रिया उचलून नेल्या. लहान मुलांना गुलाम बनवले. शेतकऱ्यांनी घाम गाळून शिवारात पिकवलेली मोत्यासारखी पिके जळताना एक वृद्ध बघत होता. त्याच्या नेत्रांमधून अश्रू गळत होते. तो उठला. अनवाणी पायांनी गावात फिरू लागला. बायकांना उचलून नेताना भूमीवर पडलेले त्यांचे मंगळसूत्र , फुटलेल्या बांगड्या त्याच्या नजरेस पडल्या. मुघलांनी रयतेची कत्तल केली होती. गावात चहूबाजूंना सांडलेले रक्त त्या वृद्ध व्यक्तीला अस्वस्थ करून गेले. काही क्षणांपूर्वी हसतेखेळते असलेले आपले गाव आज जणू स्मशानभूमी बनले होते.
***
रात्रीचा प्रहर होता. महाराज आपल्या महालात बहिर्जीसोबत होते. बहिर्जीच्या मुखावर नैराश्य दाटले होते. नेत्रे पाणावली होती. ओठातून शब्द फुटत नव्हता.
" बहिर्जी , जे मनात आहे ते बोलावे. आम्ही ऐकून घेऊ. आमची तयारी आहे. " महाराज म्हणाले.
" महाराज.." बहिर्जीचा कंठ दाटून आला.
" काय झाले बहिर्जी ? तुम्हाला इतके भावूक झालेले आम्ही यापूर्वी कधी पाहिले नाही. " महाराज म्हणाले.
" आपले स्वराज्य जळत आहे महाराज. तो मिर्झाराजे इरेला पेटलाय. तुमची खरी ताकद तुमच्या प्रजेत आहे हे त्याने हेरलंय. त्याने फौजेला आदेश दिलेत. " बहिर्जी म्हणाले.
" कसले आदेश ?" महाराज म्हणाले.
" स्वराज्य उध्वस्त करण्याचे. पुण्यात कुबाहतखानास, कार्ला, मळवली, वडगांव या मावळ भागात कुतुबुद्दीनखान आणि पुण्याभोवतीच्या भागात इंदमणबुंदेला, रायसिंग सिसोदिया या सरदारांना ही धूमाकूळ घालण्याची कामगिरी सांगितली आहे. मुघल फौज गावागावात जाऊन बायकापोरांना उचलून गुलाम बनवत आहे. बायकांच्या त्या किंचाळ्या काळीज भेदून टाकतात महाराज. " बहिर्जी म्हणाले.
" आपली माणसे काय करत आहेत ?" महाराज म्हणाले.
" जमेल तसा प्रतिकार करतात. पण मुघल फौजेचे बळ खूप आहे. निभाव लागत नाही. " बहिर्जी म्हणाले.
" अजून ?" महाराज म्हणाले.
" दिलेरखान आणि मिर्झाराजेमध्ये भांडणे होतात. अजिबात पटत नाही. " बहिर्जी म्हणाले.
" होणारच. बादशहाने जाणूनबुजून ही युक्ती केली आहे. मिर्झाराजेंवर अंकुश ठेवण्यासाठी दिलेरखानास पाठवले आहे. मिर्झाराजे , तुम्ही शत्रू बनून आलात. जर मित्र म्हणून आले असते तर हनुमंताप्रमाणे अवघे दक्षिण जिंकून आपल्या चरणांपाशी वाहिले असते. आमच्या फौजा देऊन आपल्याला दिल्लीच्या तख्तावर बसवले असते. दिल्लीशाहीचे खरे वारसदार तुम्ही. पण आपण चांदतारा फडकवत आलात. शत्रू तर शत्रू. आम्ही मुकाबला करू. आयुष्यात असेही माणसे यायला हवीत. शिकायला भेटते. " महाराज म्हणाले.
थोड्या वेळाने बहिर्जी नाईक मुजरा करून निघून गेले. खूप वेळ महाराज एकांतात विचारात हरवून गेले. तेवढ्यात महाराणी पुतळाबाईंनी महालात प्रवेश केला.
" महाराज , भोजन तयार आहे. " महाराणी पुतळाबाई म्हणाल्या.
" आज खरच इच्छा होत नाही पुतळा. घश्याखाली अन्नच उतरणार नाही. त्या क्रूर मुघलांनी कितीतरी स्त्रियांना भ्रष्ट केले असेल. कितीतरी संसारे उध्वस्त झाली असतील. त्यांच्या घरी चूल पेटली नसेल. राजा म्हणून आम्ही कुण्या तोंडाने घास घ्यायचा ?" महाराज म्हणाले.
महाराजांची नेत्रे पाणावली आणि ते निघून गेले.
***
सकाळचा प्रहर होता. मुरारबाजी महादेवाच्या देवळात पिंडीसमोर हात जोडून बबसले होते.
" हे महादेवा , तू तर दुष्टांचा संहार करतोस. स्त्रियांच्या आर्त आभाळ भेदणाऱ्या किंचाळ्या तुला ऐकू येत नाहीत का ? या मुघलांचा संहार करण्यासाठी आमच्या नसानसात शंभर हत्तीचे बळ दे. आमच्या तलवारीला तुझ्या त्रिशूलाइतके सामर्थ्य दे. तुझा तिसरा नेत्र उघड महादेवा. आज तुझ्या पिंडीवरचे बेलपत्र हातात घेऊन हा मुरारबाजी शपथ घेतो की मुघलांचा असा चिवट प्रतिकार करेल की आमच्या मायभूमीकडे पुन्हा कुणी वाकडी नजर करून पाहणार नाही. " मुरारबाजी विजेप्रमाणे गर्जले.
क्रमश...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा