रंग अहिंसेचा भाग २
प्रसादचं सगळं बोलणं ऐकून घेतल्यावर अजय शांतपणे म्हणाला,
"प्रसाद यातील मला काहीही करायचं नाहीये. आई बाबांना थोडं बरं वाटलं की, मी माझ्या सोबत त्यांना घेऊन जाणार आहे. मला लढून काहीही मिळवायचं नाहीये. मी जेवढं कमावतो, तेवढं मला पुरेसे आहे. मारामारी करणे, कोर्ट कचेऱ्या करणे मला पटत नाही. मला हिंसेच्या मार्गाने जायचं नाहीये."
यावर प्रसाद चिडून म्हणाला,
"तू जर काका काकूंना घेऊन गेलास आणि काहीच केले नाही,तर सगळे तुला पळपुट्या म्हणतील. आपल्याला फक्त त्यांनी जे केलंय त्याला उत्तर द्यायचं आहे. आपण स्वतःहून काहीच चुकीचं करत नाहीये. जोपर्यंत तू त्यांना प्रतिउत्तर देणार नाही, तोपर्यंत त्यांना त्यांची चूक समजणार नाही."
"प्रसाद मला कोण काय म्हणतील? याची अजिबात चिंता नाहीये. माझी मनस्थिती चांगली रहावी, म्हणून मी हे करत आहे. तुला कदाचित आत्ता माझ्या बोलण्याचा अर्थ समजणार नाही, पण काही वर्षांनी नक्कीच समजेल." अजय.
प्रसाद व त्याचे मित्र चिडून निघून गेले. पुढील दोन ते तीन दिवसांनी अजयच्या आई वडिलांची तब्येत थोडी बरी झाल्याने अजय आपल्या आई वडिलांना शहरात घेऊन गेला. आपल्या घराची चावी प्रसादकडे ठेऊन गेला. अजय त्याच्या आई वडिलांना घेऊन गेल्यावर त्याच्या चुलत्याने सगळ्या शेतजमिनीवर ताबा मिळवला. प्रसादने अजयला वेळोवेळी फोन करुन समजावले, पण अजय आपल्या विचारांवर ठाम होता.
अजयचे आई वडील शहरात रुळले होते, त्यांना गावाकडची आठवण यायची, पण अजयने गावाकडे जायला नकार दिल्याने त्यांचा नाईलाज झाला होता. आपल्याला कधी गावाला जाऊन राहता येईल, हा विचारचं त्याच्या आई वडिलांनी मनातून काढून टाकला होता.
अजयचे आई-बाबा गावात जाऊन राहू शकतील का? बघूया पुढील भागात…
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा