रंग अहिंसेचा भाग ३ (अंतिम)
दोन वर्षांनी अजय मित्राला भेटण्यासाठी म्हणून हॉस्पिटलमध्ये गेला होता. तो हॉस्पिटल मधून बाहेर पडत असताना कॅश काऊंटर जवळ त्याचे दोन्ही चुलत भाऊ गयावया करत त्याच्या नजरेस पडले. अजय त्यांच्या जवळ जाऊन म्हणाला,
"काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का?"
अजयच्या दोन्ही चुलत भावांनी त्याच्याकडे बघितले. मग त्याचा पोलिस चुलत भाऊ म्हणाला,
"दादांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय, त्यांना हार्ट अटॅक आला होता. रिपोर्टस आल्यावर डॉक्टरांनी इमर्जन्सी ओपन हार्ट सर्जरी करायला सांगितली आहे. सर्जरीचे सर्व पैसे ऍडव्हान्स भरायला सांगितले आहे. आम्ही दोघांनी खूप मोठ्या मुश्किलीने पैश्यांची जुळवाजुळव करुन सुद्धा दोन लाख रुपये कमी पडत आहेत. पूर्ण पैसे जमा केल्याशिवाय सर्जरी सुरु होणार नाही. आम्ही ह्यांना कळकळीची विनंती करत आहोत, पण हे लोकं ऐकतचं नाहीये."
"मॅडम पैसे ऑनलाईन ट्रान्सफर केले तर चालतील का?" अजयने कॅशिअर मॅडमला विचारले.
मॅडमने मान हलवून होकार दिल्यावर अजयने दोन अकाऊंट वरुन प्रत्येकी एक लाख रुपये ट्रान्सफर केले. अजय त्याच्या भावांकडे आपलं व्हिजिटींग कार्ड देत म्हणाला,
"हा माझा नंबर गुगल पे आणि फोन पे ला आहे. तुमच्याकडे जेव्हा पैसे येतील, तेव्हा ट्रान्सफर करा."
त्याचे भाऊ पुढे काही बोलण्याच्या आतच अजय तेथून निघून गेला. घरी गेल्यावर अजयने कोणालाच काही सांगितले नाही.
साधारणतः एका महिन्यानंतर एके दिवशी अजयचा चुलता व त्याचे दोन्ही चुलत भाऊ अजयच्या घरी आले. अजयने त्यांना घरात घेतले. चहा पाणी देऊन त्यांचे आदरातिथ्य केले.
अजयच्या आई वडिलांसमोर त्याचा चुलता हात जोडून म्हणाला,
"मला माफ करा. माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. माझ्यामुळे तुम्हाला गाव सोडून यायला लागलं. मी तुम्हाला एवढी मारहाण केली होती, तरी मी मरणाच्या दारात असताना अजयने मदत केली. मी तुम्हाला दोघांना पुन्हा गावी घेऊन जायला आलो आहे. तुमची शेती तुम्हीचं करा. इथून पुढे मी तुम्हाला त्रास देणार नाही."
अजयच्या आई वडिलांनी अजयकडे बघितले, तेव्हा तो म्हणाला,
"दादा, उद्या मी आई बाबांना घेऊन गावी येईल. तसंही आई बाबांना इथं करमत नव्हतचं."
दुसऱ्या दिवशी अजय आई बाबांना घेऊन गावी गेला. अजयच्या चुलत भावांनी फटाके वाजवून सगळ्यांचे स्वागत केले. संपूर्ण गावासमोर अजयच्या चुलत्याने आपण केलेल्या वाईट कर्मांची कबुली देत माफी मागितली.
प्रसाद हे सर्व लांबून बघत होता. अजयच्या पाठीवर थाप देत तो म्हणाला,
"मित्रा मानलं तुला. तुझा त्या दिवशी खूप राग आला होता. पण तू जे काही बोलला होतास त्याचा आज अर्थ कळाला."
यावर अजय म्हणाला,
"हे बघ प्रसाद आपणही मारामारी केली असती तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक उरला असता. हिंसा करुन काय मिळतं? काहीच नाही. पण अहिंसेने जग जिंकता येतं. तो वरचा आहे ना, तो आपल्या प्रत्येक कर्माची नोंद ठेवत असतो, तो बरोबर सगळ्यांची वेळ आणतो. त्यावेळी जर मी पोलिस केस केली असती, तर कोर्टाच्या चकरा माराव्या लागल्या असत्या. पैसा खर्च झाला असताच, पण मनस्थिती सुद्धा बिघडली असती."
'हिंसेचा विचार सोडून देणे
अहिंसेचा मार्ग अवलंबणे
अहिंसा एक मानवता धर्म
कायम त्याचे पालन करणे.'
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा