Login

रंग बाबांच्या मायेचे #fathers_day#अलक

My dad is my hero

निरोप 
डोक्यावर अक्षता पडल्या, जेवणं झाली तसे सतत माझ्या बाजूला उभे असणारे माझे बाबा गर्दीत दिसेनासे झाले. डोळ्यातले अश्रू लपवत घाईघाईने मला निरोप  दिला त्यांनी आणि जशी गाडी हलली तसा अश्रूंचा बांध फुटला असे माझे बाबा.________

विश्वास 
लहानपणी माझ्या पायाचं ऑपरेशन झाले. डॉक्टर म्हणाले कदाचित आता ही चालू शकणार नाही. बाबा मात्र म्हणाले वर्षभराने जेव्हा व्हिजिटला येईल तेव्हा मुलीला चालतच घेऊन येईन. आज बाबांचे प्रयत्न आणि तोच विश्वास खरा ठरला होता. मी चालतच आले होते डॉक्टरांच्या भेटीला.____________

बाप
परिस्थितीमुळे बाबांनी कधीच आईला महागाची, भारीतली साडी घेतली नाही. आईची काही तक्रार नव्हती पण आजी सारखे म्हणायची तुझ्या बापाला जमणारच नाही कधी हौस  पुरवायला. तुझ्या लग्नात काय करतोय बघू ? पण माझ्या लग्नात मात्र बाबांनी 20 हजाराचा शालू घेतला होता माझ्यासाठी. शेवटी एक बाप लेकीला काहीच कमी पडू देत नाही.__________


स्वागत 
पहिल्या मुलीच्या पाठीवर दुसरी पण मुलगीच झाली का. बोलता-बोलता सासर्‍यांनी टोमणा मारला. मला वाटलं कदाचित हे पण नाराज झाले माझ्यावर. पण तसे नव्हते उलट दुसरी लक्ष्मी घरी आली म्हणून यांनी खूपच दणक्यात लेकीचं स्वागत केलं आणि सगळ्यांना सांगितलं दोन लक्ष्मीचा बाप झालोय यातच जगण्याचं सार्थक झाल.______

काळजी
आज मी बाबांची गाडी चालवायला घेतली. मला गाडी येत होती पण बाबांना माहिती नव्हते. मी बाबांना सांगून सोसायटीला राउंड मारायला गेले. गाडी घेऊन परत जेव्हा जागेवर आले तेव्हा बाबा तिथे नव्हतेच. आईला विचारलं बाबा कुठे गेले? तर म्हणाली मागे बघ तुझ्या. बाबांना पाहून डोळे भरून आले राउंड मारेपर्यंत बाबा माझ्या गाडीमागे धावत होते माझ्या काळजीने.____

आनंद
कॉलेजमध्ये गेल्यापासून रवीच्या मागण्या वाढल्या होत्या. पण वडिलांचा सतत नकार असायचा. तो 12वीत बोर्डात पहिला आला. पुढे त्याला डॉक्टर व्हायचं होते पण त्या शिक्षणासाठी लाखो रुपयांची गरज होती आणि बाबा नाही म्हणतील असे त्याला वाटत होते तो जरा नाराजीनेच घरी आला. रवीने त्यांना विचारले मी पुढे काय करू? तसे बाबा म्हणाले अरे डॉक्टर व्हायचं ना तुला बिनधास्त हो. पैशाची काही काळजी करू नको आणि ते ऐकून रवीला आनंदाश्रू आवरेनासे झाले.
__________
भुमिका
माझ्या सगळ्या मैत्रिणी एकमेकींच्या घरी बिनधास्त राहायला जायच्या. गेट-टुगेदर करायचा पण मला मात्र बाबा कधीच परवानगी द्यायचे नाहीत. खूप राग यायचा त्यावेळी. पण आता समजते एका लेकीची आई झाल्यावर खरंच मुलांसाठी बापाची काळजी आणि भुमिका किती महत्वाची असते._____


बाबा
लहान होते तेव्हापासून मला काही झालं की आधी पप्पांना समजायचं, की मला बरं वाटत नाहीये. आता लग्न होऊन सासरी आले. दोन-तीन वेळा असं झालं. खूप डोकं दुखत होतं, अंगात कणकण होती. ते नवऱ्याच्या आधी बाबांना ( सासऱ्यांना) लक्षात आलं की, मला बरं वाटत नाहीये. माझ्या पप्पांची उणीव त्यांनी सासरी मला कधीच जाणवू दिली नाही._________

विश्वास 
गेले चार दिवस नीताला एका मुलासोबत सतत बोलताना पाहून शेजारच्या काकू नीताच्या बाबांना म्हणाल्या, लेकीवर लक्ष नाही तुमचं. आजकाल खूपदा दिसते त्या मुलासोबत. नीताने ते ऐकले आणि थोडीशी घाबरली. पण बाबांनी मात्र काही विचारले नाही. दहा दिवसांनी नीता आणि त्या मुलाने केलेल्या प्रोजेक्टला पहिला नंबर मिळाला होता ती बातमी बाबांनी शेजारच्या काकूंना पेढा देऊन सांगितली तसा काकूंचा चेहरा पडला. हा बाबांचा विश्वास होता नीता वरचा._______


अभिमान 
तिन्ही मुलीच झाल्या, एकही मुलगा नाही तुम्हाला. असे सगळे म्हणायचे पण बाबा मात्र तिकडे दुर्लक्ष करायचे. आज तिन्ही मुली मोठ्या पदावर काम करत आहेत त्यामुळे बाबा अभिमानाने सगळ्यांना सांगतात. माझ्या मुली माझा अभिमान आहेत. पण खरं सांगायचं तर आजच्या या युगात आमचे बाबाच आमचा अभिमान आहेत. कारण त्यांनी मुली असूनही आम्हाला मुलांच्या बरोबरीने घडवलं थँक्यू बाबा.

सौ. विद्या रोहित मेटे ( कारंजकर)